तंत्रशुद्ध व नियोजनबद्ध व्यायाम करण्याचे शास्त्र. व्यायाम म्हणजे आकुंचनात्मक व प्रसरणात्मक स्नायुसमूहांनी शरीराच्या विशिष्ट क्षमतांचा विकास करण्यासाठी केलेली नियोजनबद्ध हालचाल होय. अशी हालचाल मैदानावरील खेळांनी जशी होऊ शकते; तशीच ती आखाड्यात, व्यायामशाळेत, पोहताना, डोंगर चढताना, केवळ चालताना, तसेच योगासनांनीसुद्धा होऊ शकते. ज्या ज्या कार्यासाठी शारीरिक क्षमतांचा विकास करावयाचा असेल, त्या त्या कार्यास अनुरूप अशा प्रकारचे व्यायामप्रकार करणे, हे आधुनिक व्यायामविद्येमध्ये मान्यता पावलेले आहे. ज्यांना वजन उचलावयाचे आहे, मुष्टियुद्ध किंवा गोळाफेक करावयाची आहे, कुस्तीसारखे खेळ खेळावयाचे आहेत; त्यांनी ताकद (स्ट्रेंग्थ्) अधिक वाढवण्यासाठी अवजड वजने उचलणे, जोरबैठका, पृष्ठकल (सीटअप्स), ऊर्ध्वताण (पुशअप्स), अध:ताण (डीप्स) असे व्यायामप्रकार करणे उपयुक्त असते. तद्वतच दीर्घ पल्ल्याच्या धावपटूंची शरीरयष्टी जाडजूड न होता अधिक दमदार होण्यासाठी दमश्वास (स्टॅमिना) वाढविणारे व्यायाम त्यांना उपयुक्त ठरतात. शारीरिक कसरतींच्या (जिम्नॅस्टिक्स) पूर्वतयारीसाठी लवचीकपणा, चलनवलन, प्रसरणशीलता (इलॅस्टिसिटी व फ्लेक्झिबिलिटी) वाढविणारी आसने, मल्लखांब, सूर्यनमस्कार हे व्यायामप्रकार आवश्यक ठरतात.
व्यायामविद्येच्या साहाय्याने विविध शारीरिक क्षमतांचा विकास घडवून आणून आणि त्यानंतर किंवा त्याच काळात त्या क्षमतांचे परस्पर सहनियमन-सहसंयोजन (न्यूरोमरक्यूलर-कोऑर्डिनेशन) साधून क्रीडाकौशल्यांचा विकास साधता येतो.
आधुनिक व्यायामविद्येनुसार (सायन्स ऑफ एक्सर्साइझ) शारीरिक हालचाली करून त्या विद्येचा अपेक्षित परिणाम वा फलनिष्पत्ती साधत नाही. सध्याच्या काळात परिणामसाधक कार्यनियोजन हे फार महत्त्वाचे मानले असल्याने, व्यायामविद्येमध्ये हे तत्त्व मुख्यत: विचारात घेतले जाते. म्हणूनच शारीरिक हालचालींच्या बरोबरच, त्या क्षमतांच्या विकासास पूरक अशा आहाराचाही विचार केला जातो. कसरतपटू-व्यायामपटू-खेळाडूंच्या व्यायामाबरोबरच त्यांचा आहारही स्नायुशक्ती वाढविण्यासाठी जास्त प्रमाणात प्रथिनांनी युक्त असा असावा लागतो. जपानी सुमो कुस्तीगिरांचा आहार अधिक मेदयुक्त असतो.
व्यायामविद्येत आता इतर अनेक विद्याशाखांची भर पडत आहे. विशिष्ट व्यायामात शरीराच्या त्या त्या हालचाली ज्या ज्या कार्यासाठी वा क्रीडाप्रकारासाठी वापरण्याचे हेतू असतील, त्यांच्यासाठी ही विविध शास्त्रे उपयुक्त ठरतात. त्यांत शरीरगतिशास्त्र (कायनेशिऑलॉजी), जीवयामिकी, क्रीडा-वैद्यकशास्त्र, क्रीडा-मानसशास्त्र, व्यायाम शारीरक्रियाविज्ञान (एक्सर्साइझ फिजिऑलॉजी), मानव अभियांत्रिकी (ह्यूमन एंजिनिअरिंग) अशा अनेक विद्याशाखांचा सखोल अभ्यास केला जातो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर विक्रमी यश किंवा उच्चांक प्रस्थापित करणारे खेळाडू घडविण्यामध्ये या शाखांमधले ज्ञान, प्रयोग, प्रयत्न अशा घटकांचा वाटा महत्त्वाचा ठरतो.
जगभर स्थलकालपरत्वे व्यायामाचे शेकडो प्रकार रूढ आहेत. त्यांत साधनयुक्त व साधनविरहित असे दोन स्थूल प्रकार करता येतात. आपल्याच शरीराच्या विविध हालचाली, काही प्रतिकारासह किंवा प्रतिकाराविना केल्या तरी पुरेसा व्यायाम होतो. उदा. नुसत्या उड्या मारणे, धावणे, जोर-बैठका काढणे इत्यादी. मुद्गल-जोडी, मल्लखांब इत्यादींच्या साहाय्यानेही व्यायाम केला जातो. विविध प्रकारची वजने उचलण्याचे अनेक प्रकार करून त्या त्या स्नायूसमूहांना व्यायाम घडवता येतो. भाराधिक्याच्या तत्त्वामुळे (प्रिन्सिपल ऑफ ओव्हरलोड) चांगला व्यायाम होतो. आधुनिक काळातील विज्ञानाधिष्ठित व्यायामविद्येमुळे एखाद्या व्यक्तीला लवचीक, तगडे, बलदंड, आरोग्यसंपन्न शरीर वयाच्या विशी-तिशीतच केवळ नव्हे; तर पन्नाशीनंतरही राखता येते.
व्यायामाचा शरीरास योग्य प्रकारे उपयोग व्हावा; म्हणून योग्य समतोल आहार, पुरेशी विश्रांती व निद्रा यांची आवश्यकता असते.
व्यायामाचे जे वैद्यकीय स्वरूप आहे, त्याला ‘उपचारात्मक व्यायाम’ (थेरप्यूटिक एक्सर्साइझ) म्हणतात. निरनिराळ्या अपघातानंतर, आजारांनंतर रुग्णाला सांध्यांचे चलनवलन सुधारण्यासाठी, स्नायूंमध्ये किमान शक्ती येण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व मार्गदर्शनाखाली हे व्यायामप्रकार विशिष्ट काळासाठी देण्यात येतात. स्त्रियांसाठीही प्रसूतिपूर्वकाळापासून काही ठराविक महिने असे स्वतंत्र व्यायाम देण्यात येतात.
वैद्यकशास्त्राप्रमाणे ‘वायुसापेक्षी’ (एरोबिक्स) व ‘वायुनिरपेक्षी’ (ऍनॅरोबिक्स) हे व्यायामाचे प्रकारही आहेत. पहिल्या प्रकारात प्रामुख्याने शरीरस्नायूंना हालचालींसाठी शक्ती निर्माण करण्यासाठी लागणार्याक अधिक प्रमाणातील प्राणवायूचा अधिक विचार केला जातो, तर दुसऱ्या प्रकारात स्नायू व शरीरातील शक्तिद्रव्ये यांचा अधिक विचार केला जातो.
लेखक:प. म. आलेगावकर
माहिती स्रोत:मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2023
व्यायामातून बरीच उष्णता निर्माण होते.
ब-याच लोकांना चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा अ...
योगासनांची इतर खेळ, मजुरीची कामे, व्यायाम यांच्याश...
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग...