অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हॉलीबॉल

उंच लावलेल्या जाळीवरून एक जाड चामड्याचा चेंडू हाताने टोलवायचा व जमिनीवर न पाडता तो हाताने अधांतरीच परतवायचा, या दोन क्रियांमध्ये हा खेळ सामावलेला आहे. जाळ्याच्या दोन्ही बाजूला खेळण्याची जागा असते; तेथून दोन संघांत व्हॉलीबॉलचा सामना खेळला जातो. प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात.

इतिहास

अमेरिकेतील मॅसॅचुसेट्समधल्या हॉल्योक येथील वाय्.एम्.सी.ए.च्या आखाड्यात १८८५ साली या खेळाची सुरुवात झाली. शारीरिक शिक्षणतज्ञ विल्यम मॉर्गन याने ह्या खेळाचा शोध लावला. लवकरच हा खेळ अमेरिकेत सर्वत्र पसरला व ‘वाय्.एम्.सी.ए.’च्या चळवळीमुळे त्याचा जगभर प्रसार झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांच्या मनोरंजनासाठी हा खेळ खेळत. ‘व्हॉलीबॉल’ हे नाव डॉ. हलस्टेड यांनी शोधून काढले. तत्पूर्वी या खेळाचे नाव ‘मिन्टोनेटे’ असे होते.

इंटरनॅशनल व्हॉलीबॉल असोसिएशनची स्थापना १९४७ साली झाली. त्यामुळे महायुद्धोत्तर काळात स्त्री-पुरुषांसाठी युरोपियन व जागतिक अजिंक्यपदासाठी प्रतिवर्षी या खेळाचे सामने सुरू झाले. १९५४ सालापासून पॅन अमेरिकन गेम्समध्ये व नंतर ऑलिंपिक स्पर्धेतही व्हॉलीबॉलचा समावेश झाला.

सुमारे ५० देशांतून व्हॉलीबॉल खेळला जातो. जगात करमणूकप्रधान खेळ म्हणून व्हॉलीबॉलचा तिसरा क्रमांक लागतो.

भारतातील व्हॉलीबॉल

भारतात व्हॉलीबॉल १९१६ सालापासूनच खेळला जात आहे. प्रारंभी गोरे सैनिक हा खेळ खेळत. पण आता शाळा-महाविद्यालयांतून तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरही हा खेळ खेळला जातो. १९५२ सालापासून भारताचा व्हॉलीबॉल संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागला. जकार्ता येथील आशियाई स्पर्धांत भारताने रौप्यपदक पटकावले होते. १९६४ साली भारतात ऑलिंपिकपूर्व आशियाई विभागाचे सामने झाले. त्यात सहापैकी चार देशांना जिंकून आशिया खंडामध्ये भारताचा संघ भारी असल्याचे दिसून आले.

व्हॉलीबॉलसाठी १८ मी. लांब व ९ मी. रुंद क्रीडांगण लागते. जाळे १ मी. रुंद व ९·५० मी. लांब असते. जाळ्याच्या दोन्ही बाजूंस लावलेल्या कापडी पट्ट्या (नेट मार्कर–लांबी १ मी.) व त्यांना लावलेल्या फायबरच्या कांब्या (अँटिना–लांबी १·८० मी.) हे जाळाचेच भाग समजले जातात. जाळ्याचा वरचा भाग जमिनीपासून २·४३ मी. उंचीवर असतो. स्त्रियांसाठी ही उंची २,२४ मी. असते. चेंडूचा व्यास ६५ ते ६७ सेंटिमीटर असतो. वजन नऊ ते साडेनऊ औंस असते (२७० + ५ ग्रॅ.). भाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या प्रत्येक संघात सहा अशी असते. या खेळात रुंद रेषेच्या मागून आरंभखेळी (सर्व्हिस) सुरू करावयाची असते. आपल्या हद्दीतून आलेला चेंडू जास्तीत जास्त फक्त तीन खेळाडूंच्या स्पर्शाने परत करावयाचा असतो, अशा खेळीला पासिंग म्हणतात, तर एकट्यानेच परस्पर टोलविल्यास त्यास शॉटी म्हणतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा ‘पासिंग’नेच होतात. मात्र शॉटी व्हॉलीबॉल विशेष लोकप्रिय आहे.

व्हॉलीबॉल सामन्यातील गुणांकन

या खेळाची सुरुवात आरंभखेळीने होते. प्रथम खेळणाऱ्या संघाचा एक खेळाडू रुंद रेषेच्या मागून चेंडू हाताच्या धक्क्याने जाळीवरून प्रतिपक्षाकडे मारतो. असा मारलेला चेंडू प्रतिपक्षाने जाळ्यावरून परतवायचा असतो. तो नेमका परतवता आला नाही किंवा जमिनीवर पडला, तर आरंभखेळी करणाऱ्या संघास एक गुण मिळतो. असा परतवलेला चेंडू आरंभखेळी करणाऱ्या संघाने वरच्यावर प्रतिपक्षाकडे मारला नाही, तर त्यांची फेरी बाद होत असे व प्रतिपक्षाला आरंभखेळी करण्याची संधी मिळत असे. आरंभखेळी हाती आल्यानंतरच त्यांच्या गुणसंचयाला प्रारंभ होत असे. परंतु आता या नियमात बदल झाला असून टेबलटेनिसच्या पद्धतीने गुण मोजण्याची नवी पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. आता एका पक्षाने केलेल्या प्रत्येक चुकीला प्रतिपक्षास एकेक गुण मिळू लागला आहे.

पूर्वी आरंभखेळीमध्ये बदल होत असे. त्यामुळे खेळ लांबत असे. तसे आता न होता आरंभखेळीत चूक झाली की प्रतिपक्षाचे गुणही वाढत असल्याने खेळ वेगवान होण्यास मदत झाली आहे. तसेच सामन्यात आता जास्त चुरस आलेली आहे. नव्या नियमानुसार ५ डाव खेळले जाऊ लागलेले आहेत. यांपैकी चार डाव २५ गुणांचे व ५ डाव १५ गुणांचा असतो. प्रत्येक डावामध्ये ५ मिनिटांची विश्रांती घेण्यात येते.

नियमभंगाची पद्धत जुनीच असून तीत बदल झालेला नाही. म्हणजे असे की (१) आरंभखेळी चुकली तर, (२) खेळाडूच्या हाताचा स्पर्श जाळ्याला झाला तर, (३) किंवा चेंडू हाताला लागून क्रीडांगणाबाहेर गेला तर तो, नियमभंग धरला जातो व त्यावर प्रतिपक्षास एकेक गुण मिळतो.

आता समुद्रकाठी पुळणीवर खेळला जाणारा बीच व्हॉलीबॉलही सुरू झाला आहे. प्रत्येक बाजूला दोन खेळाडू असतात. यात जोराने मारलेल्या चेंडूची गती जास्तीत जास्त ताशी ११० मैल वेगाची असते.

जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धांची सुरुवात १९४९ साली झाली. १९६७ अखेर रशियाने पाच वेळा त्यात जागतिक अजिंक्यपद मिळविले आहे. स्त्रियांच्या स्पर्धेतही रशियाच आघाडीवर आहे. मॉस्को येथे भरलेले व्हॉलीबॉलचे जागतिक सामने पाहण्यासाठी १९५२ साली ६०,००० प्रेक्षक हजर होते. तो एक जागतिक उच्चांकच आहे.

लेखक: बाळ ज. पंडित

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate