অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शब्दभ्रम कला (व्हेंट्रिलॉक्किझम)

शब्दभ्रम कला (व्हेंट्रिलॉक्किझम)

ध्वनी वा शब्द प्रत्यक्ष बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून न येता दुरून वा वेगळ्या ठिकाणाहून आल्याचाआभास निर्माण करणारी रंगमंचीय कला. बहुधा ही बाहुल्यांच्या साहाय्याने सादर केली जात असल्याने ती '`बोलक्या बाहुल्या' या नावानेही ओळखली जाते. `'पोटातून बोलणे' या अर्थाच्या मूळ लॅटिन शब्दावरून 'व्हेंट्रिलॉक्किझम' हा रूढ इंग्रजी शब्द बनलेला आहे. त्यास गारूडवाणी असाही मराठी पर्याय आहे. माणसाचे कर्णेंद्रिय आवाजाच्या नेमक्या दिशेचा अचूक वेध घेऊ शकत नसल्याने शब्दभ्रमाचा आभास काही प्रमाणात शक्य होतो. रंगमंचावर प्रयोग करताना शब्दभ्रमकार एक किंवा अनेक बाहुल्या वापरतो आणि त्या बाहुल्यांची हाताळणी अशा खुबीने करतो, की त्याने स्व:च ओठ न हलविता काढलेला आवाज बाहुलीच्या तोंडात आला आहे, असे प्रेक्षकांना वाटते. तसेच हा आवाज विकीर्ण (डिफ्यूज्ड) स्वरूपाचा असल्याने तो दुसरीकडून आल्यासारखे प्रेक्षकांना वाटते.

शब्दभ्रमाच्या कलेसंबंधीचे प्राचीन उल्लेख खाल्डियन बुक ऑफ प्रॉफिसिज ह्या ग्रंथात आढळतात. हा ग्रंथ अॅसिरियाचा राजा दुसरा सारगॉन (इ. स. पू. सु. ७२२–७०५) याने लिहिला. हिब्रू व ईजिप्शियन या पुरातन संस्कृतींमध्ये पुरातत्त्वीय संशोधनानुसार शब्दभ्रमाविषयीचे काही निर्देश आढळतात. युरीक्लीझ हा प्राचीन ग्रीसमधील अथेन्सचा एक नावाजलेला शब्दभ्रमकार. काही सायबीरियन जमातींमध्ये आणि परंपरागत जपानी गायकांमध्ये शब्दभ्रमात्मक गायनाच्या पद्धतीही आढळतात. काही समाजात कला किंवा मनोरंजनाचे माध्यम म्हणून नव्हे तर जादूटोणा, जारण-मारण इ. प्रकारांमध्ये काही जादू म्हणून बाहुल्या वापरल्या जातात. भारत व चीन हे देश शब्दभ्रम कलेची आद्य केंद्रस्थाने म्हणून ओळखली जातात.

पाश्चात्य देशांमध्ये अठराव्या शतकात लोकरंजनाचा एक प्रकार म्हणून ही कला हळुहळू विकसित झाली. शब्दभ्रमतंत्राच्या जनकत्वाचा मान फ्रेडरिक मॅकबे या शब्दभ्रमकाराकडे जातो. त्याने १८७० च्या आसपास हाताचे पंजे रंगवून किंवा रंगीत हातमोजे वापरून त्यांच्या साहाय्याने शब्दभ्रमाचे प्रयोग सुरू केले. फ्रेड नीमन, सेनॉर वेन्सेस हेही त्या काळातले महत्त्वाचे शब्दभ्रमकार होते. ग्रेट ब्रिटनमधील फ्रेड रसेल याने या कलेच्या तांत्रिक बाजूकडे विशेष लक्ष दिले, म्हणून त्याला आधुनिक शब्दभ्रम कलेचा प्रवर्तक मानले जाते. तथापि ही कला खऱ्या अर्थाने लोकप्रिय केली, ती सुप्रसिद्ध अमेरिकन शब्दभ्रमकार एडगर बर्गन (१९०३–७८) याने. त्याचा `चार्ली मॅकार्थी' हा बाहुला अमेरिकेच्या सांस्कृतिक जीवनात एक बोलकी दंतकथाच बनला. फ्रान्समधील रोबेअर लामूरे हादेखील उल्लेखनीय शब्दभ्रमकार आहे.

भारतातील सु. शंभर वर्षांपूर्वीचा ज्ञात शब्दभ्रमकार म्हणजे प्रो. नाग. तो आपल्या कापडी बाहुल्यांच्या साहाय्याने लोकांचे मनोरंजन करीत असे, तसेच बाहुली न घेताही शब्दभ्रमाचा प्रभावी आविष्कार करीत असे. नंतरच्या काळात प्रो. भरतकुमार डार्क ऊर्फ गो. ग. भोसेकर यांनी कीर्तनात मुखवट्यांचा वापर करून ही कला अधिक लोकप्रिय केली. यशवंतराव पाध्ये यांनी पूर्णाकृती बाहुल्या प्रथमच भारतात आणून भारतातील शब्दभ्रम कलेचे जनक असा लौकिक मिळवला. क्लॉड केनी, एस्. रॉय व आर्थर कुक हेही व्यावसायिक शब्दभ्रमकार भारतात होऊन गेले. विद्यमान काळात शब्दभ्रम कलेचा प्रभावी व यशस्वी वापर व प्रसार रामदास पाध्ये हे करीत आहेत. त्यांच्या संग्रहात आठशेहून अधिक बाहुल्या आहेत. या कलेचा वापर अनेक देशांत मनोरंजनासाठी व शैक्षणिक कार्यासाठी होत असतो.

संदर्भ : 1. Craggs, Douglas, A. B. C. of Ventriloquism, London, 1944.

2. Hutton, Darryl, Modern Ventriloquism, London, 1978.

3. Schindler, George, Ventriloquism, New York, 1979.

४. पाध्ये, रामदास, बोलविता धनी वेगळाचि, मुंबई, १९८७.

लेखक: रामदास पाध्ये

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate