प्राचीन काळी बर्फाच्छादित थंड प्रदेशात आदिम मानव बर्फावरून इकडून तिकडे घसरत (स्केटिंग) जात-येत असावा; तथापि स्केटिंगचा फार प्राचीन इतिहास ज्ञात नाही. इ. स. पू. पहिल्या सहस्रकात नैसर्गिक बर्फाच्छादित पृष्ठभागावर विशेषतः गोठलेल्या नद्या, सरोवरे, तळी, कालवे यांवर स्केटिंग रूढ असावे. स्केटिंगसाठी जनावरांची हाडे लावलेली चामड्याची वहाण वापरीत असत. याची सुरुवात मुख्यत्वे उत्तर यूरोप खंडात इ. स. पू. १००० च्या दरम्यान झाली असावी. हिवाळ्यात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी स्केटिंग तंत्राचा उपयोग होत असे. स्केटिंगचा सर्वांत जुना पुरावा लंडनमधील उत्खननात रोमन लोकांच्या वसाहतीत उपलब्ध झाला. त्याचा कार्बन १४ पद्धतीनुसार इ. स. पू. ५० हा काळ असून तत्कालीन मानवाने चामड्याचे तळवे (सोल्स) व त्याला प्राण्यांच्या हाडांपासून तयार केलेली पाती ( ब्लेड्स) लावलेली आढळली. हीच पद्धत पुढे स्कँडिनेव्हियातील भूप्रदेशात इ. स. अकराव्या शतकात दृग्गोचर होते. तेथे स्केट्सचा उपयोग परिवहनासाठी करीत असत. ब्रिटनमध्ये या सुमारास स्केटिंगचा विकास मनोरंजक खेळांसाठी करण्यात आला. नेदर्लंड्समध्ये लाकडी तळव्यांना लोखंडी पाती प्रथम इ. स.१२५० मध्ये लावली. पुढे त्यांना पोलादी पाती लावली गेली; त्यामुळे वजन कमी होऊन स्केटिंग सहजसुलभ झाले. |
|
एक कसरतीचा खेळ. आधुनिक काळात तो एक स्पर्धात्मक खेळ व करमणुकीचे एक साधन म्हणूनआनंददायी छंद बनला आहे. हा प्रामुख्याने पूर्वी बर्फाच्छादित पृष्ठभागावरच खेळला जाई आणि हिवाळ्यातच त्याचे क्रीडासामने होत; परंतु एकोणिसाव्या शतकापासून त्याची अंतर्गेही (इनडोअर) खेळातही गणना होऊ लागली. त्यासाठी कृत्रिम बर्फांगणे (आइस-रिंक) तयार करीत. स्केटिंगचे आइस स्केटिंग व रोलर स्केटिंग हे दोन मुख्य प्रकार असून आइस स्केटिंगच्या अंतर्गत फिगर स्केटिंग, स्पीड स्केटिंग आणि आइस डान्सिंग (हिमनृत्य) हे तीन प्रकार आढळतात. रोलर स्केटिंग प्रकारात आर्टिस्टिक स्केटिंग आणि रोलर किंवा आइस हॉकी यांचा अंतर्भाव होतो. |
परिणामतः चौदाव्या--पंधराव्या शतकांत स्केटिंग हा एक खेळ म्हणून लोकप्रिय झाला. फिलाडेल्फियाच्या इ. डब्ल्यू. बूशनेलने पोलादी स्केट्सना लांब कडा ठेवून त्या अणकुचीदार केल्या (१८५०). त्यामुळे स्केट्स मजबूत व हलके झाले. या सुमारास स्केटिंग क्लब देशभर सुरू झाले. विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात भारतासह अनेक देशांत हा खेळ प्रसृत झाला होता; तथापि यूरोप-अमेरिकेत तो अधिक लोकप्रिय आहे. अमेरिकन बॅले नृत्यकार जॅक्सन हेन्स याने आइस स्केटिंगमध्ये सर्जनशील नृत्य अंतर्भूत करून प्रथमच डान्स स्केटिंग प्रचारात आणले. त्याच्या या कृतीमुळे यूरोपात आधुनिक फिगर स्केटिंगचा परिचय झाला. पहिले अंतर्गेही कृत्रिम बर्फांगण १८७६ मध्ये लंडन येथे आणि १८७९ मध्ये न्यूयॉर्क येथे बनविण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्यातही हा खेळ खेळला जाऊ लागला. शिवाय स्केटिंगचे प्रदर्शनीय सामने होऊ लागले. १८९२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघाची स्थापना झाली आणि त्याच वर्षी स्पीड (वेगवान) स्केटिंग आणि फिगर स्केटिंगच्या पहिल्या जागतिक स्पर्धा व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे झाल्या. फिगर स्केटिंगचा अंतर्भाव १९०८ मध्ये ऑलिंपिक स्पर्धांत करण्यात आला. पुढे १९२४ मध्ये स्पीड स्केटिंगही ऑलिंपिक सामन्यांत प्रविष्ट झाले. सुरुवातीस फक्त पुरुषच या स्पर्धांतून भाग घेत. १९६० मध्ये महिलांना ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळाला. आइस डान्सिंग स्पर्धांत १९७६ मध्ये महिलांनी विशेष कर्तृत्व दाखविले. १९९२ च्या हिवाळी ऑलिंपिकमध्येही महिला सहभागी झाल्या. नॉर्वेच्या सोंजा हेनी हिने जागतिक स्केटिंगच्या स्पर्धांत अजिंक्यपद मिळविले. हेनीनंतर व्यावसायिक स्केटिंगमध्ये बार्बारा अॅन स्कॉट ( कॅनडा), पेगी फ्लेमिंग व डोरोथी हेमील (अमेरिका), कतरिना विट (पूर्व जर्मनी) यांनी विशेष प्रावीण्य दाखविले. अशीच प्रोत्साहक कामगिरी रशियाची ओल्गा कुर्बट (१९७२) आणि रूमानियाची नादिया कोमानेसी (१९७६) यांनी केली.
पुरुषांच्या स्केटिंगमध्ये (फिगर स्केटिंग) विसाव्या शतकाच्या मध्यास डिक बटन आघाडीवर होता. त्याने १९४८ व १९५२ मधील ऑलिंपिक स्पर्धांत सुवर्णपदक मिळविले. अन्य ऑलिंपिक व व्यावसायिक स्केटर्स- मध्ये जॉन करी व रॉबीन कझिन्स (ग्रेट ब्रिटन), टोलेर क्रॅन्स्टोन (कॅनडा), स्कॉट हॅमिल्टन (अमेरिका) यांनी नावलौकिक मिळविला. १९८० च्या ऑलिंपिक स्पर्धांत एरिक हायडन (अमेरिका) याने स्पीड स्केटिंगच्या पाच शर्यतींत सुवर्णपदक मिळविले. बोनी क्लेअर (अमेरिका) याने स्पीड स्केटिंग प्रकारात १९८८ — ९४ दरम्यान हिवाळी ऑलिंपिक व ऑलिंपिक अशा दोन्ही स्पर्धांत पाच सुवर्णपदके मिळविली. नेदर्लंड्स हा देश स्केटिंगमध्ये आघाडीवर असून १९९८ — २००२ दरम्यान त्याच्या स्केटर्सनी अतुलनीय यश मिळविले.
भारतात स्केटिंगची अधिकृत सुरुवात कलकत्त्यात (कोलकाता) १९५५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग असोसिएशनच्या द्वारे झाली. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघटनेला संलग्न आहे. राष्ट्रीय स्केटिंग असोसिएशनच्या शाखा भारतातील सु. २० राज्यांत असून महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांतून हिचा विस्तार आहे. महाराष्ट्रात १९६० मध्ये स्केटिंगची संघटक शाखा कार्यरत झाली. राष्ट्रीय स्केटिंग असोसिएशनद्वारे अखिल भारतीय आइस स्केटिंग स्पर्धा आयोजित केल्या जातात.
आइस स्केटिंग हा स्पर्धात्मक व करमणूक करणारा खेळ आहे. यांतील स्पर्धक फिगर स्केटिंग व स्पीड स्केटिंग या दोन प्रकारांत सहभागी होतात. फिगर स्केटर्स संगीताच्या अनुरोधाने उड्या मारतात, स्वतःभोवती गरगर फिरतात आणि आकर्षक मुद्रा करतात; तर स्पीड स्केटर्स विशिष्ट मीटरच्या अंतरावरील शर्यतीत घसरत जातात. या सर्व स्केटिंगसाठी आइस स्केट्स (बर्फावरून घसरण्यासाठी बुटाला तळाशी बसविलेली पोलादी पट्टी) वापरतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य व आवश्यक सामग्री विशेषतः बूट, त्यांची पाती, वजन आणि त्यांचे आकार व्यक्तिसापेक्ष असावे लागतात. फिगर स्केटर्स, स्पीड स्केटर्स आणि हॉकी स्केटर्स यांचे वेगवेगळे आइस स्केट्स असतात. उदा., फिगर स्केट बूट हा पायांच्या घोट्यांपर्यंत उंच असतो. स्केटिंगला सुरुवात करण्यापूर्वी बुटाच्या नाड्या घट्ट बांधणे आवश्यक असते; नाहीतर इजा होण्याचा धोका संभवतो. नैसर्गिक बर्फावरील स्केटिंग आणि कृत्रिम बर्फांगणा-वरील स्केटिंग यांत मूलतः फरक आहे. दहा सेंमी.पेक्षा कमी थराच्या बर्फावर स्केटिंग करू नये, ते धोकादायक ठरू शकते. तसेच नैसर्गिक बर्फावर एकट्याने स्केटिंग शक्यतो करू नये. शिवाय बचावासाठी शिडी व दोर उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी; कारण शिडीवर पडल्यानंतर ती तुमचे वजन विभागून तुमची गती थांबविते व पडण्या-पासून वाचविते. दोराच्या साह्याने स्केटर सुरक्षित ठिकाणी पोहोचतो. या विशिष्ट कसरतींमुळेच कृत्रिम बर्फांगणावरील स्केटिंग अधिक लोकप्रिय झाले आहे.
फिगर स्केटिंगच्या स्पर्धा ६० X ३० मी. क्षेत्रफळाच्या कृत्रिम बर्फांगणावर घेतल्या जातात; कारण त्याचे कोपरे वर्तुळाकार असून १.२ मी. उंचीचा कठडा असतो. यासाठी विशिष्ट तळव्याचे बूट असून पात्याला आतून व बाहेरून कडा असतात. हालचाली सहजसुलभ व्हाव्यात असा आकर्षक व घोळदार पोषाख असतो. महिला सामान्यतः आखूड झगा वापरतात. फिगर स्केटर्स एकल स्केटिंग, युगुल स्केटिंग, नृत्य स्केटिंग आणि समकालिक स्केटिंगमध्ये भाग घेतात. युगुल आणि हिमनृत्य स्केटिंगमध्ये स्त्री व पुरुष चढाओढ करतात. समकालिक स्केटिंगमध्ये आठ ते वीस लोकांचा चमू स्पर्धा करतो. सर्वांसाठी एकच प्रकारची नियमावली असते. तंत्र आणि सादरीकरणावर गुण दिले जातात. आइस डान्सिंग स्केटिंग प्रकारात बॉलरूम नृत्याला महत्त्व असून प्रेरणायुग्म फक्त दिशा बदलताना विभक्त होतात. फार उंच उचलण्याच्या कृतीला मज्जाव असतो. युग्माच्या नृत्याविष्कारात लयबद्धता असते. त्यांच्या स्पर्धांत सक्तीचे, अभिनव व मुक्त नृत्यप्रकार असतात.
स्पीड स्केटिंगमध्ये शर्यतींना महत्त्व असून काही स्केटर्स ताशी ६० किमी. वेगानेही धावतात. त्यांचे स्केट्स (चार चाके एकामागोमाग एक) त्या दृष्टीने बनविलेले असतात. १९९० च्या दशकात स्पीड स्केटर्सनी ‘ क्लॅपस्केट ’ प्रकारचे बूट वापरण्यास प्रारंभ केला; कारण त्यामुळे अधिकाधिक प्रचालन होऊन गती वाढते, हे लक्षात आले. तसेच चांगले स्केटिंग तंत्र हे गती, तोल, लयबद्धता आणि प्रचोदना ( ड्राइव्ह) यांवर अवलंबून असते. दोन्ही हातांचा तोल सांभाळण्यासाठी खांद्याच्या व कमरेच्या आधाराने केलेल्या हालचालींना स्पीड स्केटिंगमध्ये अनन्य-साधारण महत्त्व आहे. स्पीड स्केटिंगचे लाँग ट्रॅक किंवा ऑलिंपिक स्केटिंग, पॅक स्केटिंग आणि शॉर्टट्रॅक स्केटिंग असे तीन प्रकार असून स्त्री व पुरुष यांच्या स्वतंत्र शर्यती असतात. लाँग ट्रॅक स्केटिंगला आंतरराष्ट्रीय मान्यता असून दोन स्केटर्स पाच मीटर रुंदीच्या स्वतंत्र मार्गावरून धावतात. ५०० — १०,००० मी. लांबीची ही स्पर्धा असते. स्त्रियांसाठी ती ५०० — ५,००० मी. असते. पॅक स्केटिंगमध्ये अनेक स्पर्धक एकाच वेळी धावतात. वयानुसार या शर्यतीचे अंतर निश्चित करण्यात येते. शॉर्टट्रॅक स्केटिंग व्यक्तिगत आणि रिले या दोन प्रकारांत असून स्त्री-पुरुष स्वतंत्र स्पर्धेत उतरतात. या स्पर्धा लंबवर्तुळाकार (१११ मी.) कृत्रिम बर्फांगणावर घेतल्या जातात. तो कमीत कमी ४.७५ मी. रुंद आणि वळणावर ४ मी. रुंद असावा लागतो. कोणत्याही स्केटिंग प्रकारात लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण सहभागी होतात; मात्र स्पर्धा वयोमानानुसार आयोजित केल्या जातात.
रोलर स्केटिंगमध्ये स्पर्धक चाकांचा बूट (रोलर) घालून स्केटिंग करतो. काही व्यक्ती स्वमनोरंजनासाठी डांबरी वा सिमेंट काँक्रीटचे रस्ते, बागा, पादचारी मार्ग यांवर स्केटिंग करतात; तर काहीजण अंतर्गेही स्केटिंग केंद्रात संगीताच्या तालावर स्केटिंग करतात. बेल्जियमच्या जोसेफ मेर्लिन याने १७६० मध्ये रोलर स्केटचा शोध लावला. या स्केटिंगमध्ये बूट आणि स्केट जुळवणी हे महत्त्वाचे घटक होत. सामान्यतः बूट चामड्याचे, उंच आकाराचे आणि पुढे बंद असलेले असतात. स्केट जुळवणी (असेंब्ली) ही धातूंची किंवा प्लॅस्टिकची असून ती बुटाच्या तळव्याला जोडलेली असते. अमेरिकेच्या जेम्स प्लिम्टन याने रोलर स्केटिंगसाठी १८६३ मध्ये खास बुटाचा आकृतिबंध तयार केला. प्लिम्टनच्या स्केटला चार चाके — दोन पुढे व दोन मागे — आयताकृती रचनाबंधात बसविलेली होती. त्यामुळे वळणे सुलभ झाले. त्यानंतरच्या सुधारणांमुळे थांबणे आणि सफाईदारपणे धावणे जमले. विसाव्या शतकात स्केट्समधील सुधारणांमुळे रोलर स्केटिंग लोकप्रिय झाले. तीन किंवा चार अगर पाच चाकांच्याही स्केट्स आहेत. त्या प्रकाराला ‘ इन लाइन ’ (एका ओळीतली) स्केट्स म्हणतात. ती अधिक आकर्षक आणि मजबूत असतात.
आर्टिस्टिक (कलात्मक) स्केटिंगचे स्पर्धक संगीताच्या तालावर आकर्षक मुद्रा करतात. यात फिगर स्केटिंग, फ्री स्केटिंग आणि डान्स स्केटिंग यांचाही कलात्मक आविष्कार अभिप्रेत असतो. भारतात ‘ भारतीय रोलर स्केटिंग महासंघ ’ दरवर्षी स्पर्धांचे आयोजन करतो. महाराष्ट्रात जिल्हानिहाय स्केटिंग संघटना कार्यरत असून त्यांतून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन मिळते.
लेखक:सु. र. देशपांडे
माहिती स्रोत:मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/3/2023