অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अबू बकर

अबू बकर

अबू बकर

(५७३? ६३४). मुहमंद पैगंबराचा निष्ठावान शिष्य, स्‍नेही व सासरा आणि पहिला अरब खलीफा. कुरैश जमातीच्या तायम टोळीतील अबू कुहाफा याचा हा मुलगा. पुढे त्यास अल् सिद्दिकम्हणजेसत्यवादीम्हणण्यात येऊ लागले. पैगंबराचे शिष्यत्व स्वीकारण्यापूर्वीच्या त्याच्या जीवनक्रमाची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. तो एक सामान्य व्यापारी असून आपल्या संपत्तीचा बराच भाग त्याने इस्लामवर निष्ठा असणाऱ्या गुलामांच्या मुक्तीसाठी खर्च केल्याने त्याची आथक स्थिती खालावली असे म्हणतात.

अबू बकरने एकंदर चार लग्ने केली. पैगंबराची प्रिय पत्‍नी आयेशा ही त्याच्या दुसऱ्या बायकोची मुलगी. इस्लामचा स्वीकार करणारा हा पहिला पुरुष, असा समज आहे. तो खरा असो वा नसो, हिजराच्या, सुमारास (मुहंमदाचे मक्केहून पलायन) खुद्द मुहंमदाच्या खालोखाल त्यास मान मिळू लागला होता हे मात्र निश्चित. मदीना येथे जाताना मुंहमदाने त्यास बरोबर घेतले होते. मदीना येथे त्याची मुलगी आयेशा हिचा पैंगबराशी विवाह झाल्याने इस्लामी गटात अबू बकरचे महत्त्व साहजिकच वाढले. त्यानंतरच्या मुहंमदाच्या प्रत्येक स्वारीत तो त्याजबरोबर असे. सर्व  महत्त्वाच्या प्रसंगी पैगंबर त्याचा सल्ला घेई. हिजरी सन ९ च्या यात्रेच्या प्रमुख पदी व स्वत:च्या अखेरच्या आजारातही प्रार्थना सांगण्यास मुंहमदाने त्याचीच नियुक्ती केल्याने आपल्यानंतर अबू बकरकडे इस्लामचे प्रमुखत्व जावे,  अशी पैगंबराची इच्छा असल्याचे दिसून आले.

पैंगबराच्या मृत्युसमयीमुहाजिरिन, म्हणजे मुहंमदाबरोबर मदीनेस आलेले कुरैश जमातीतील लोक; 'अन्सार' म्हणजे मुहंमदाला मदीना येथे मदत करणारे लोक; मुहंमदाचा चुलतभाऊ व जावई अली हाच त्याच्यानंतर इस्लामचा प्रमुख असावा, अशी ईश्वराची इच्छा आहे असे मानणारे लोक व मक्का येथील सधन उमय्या जमात असे मुसलमानांचे चार पक्ष होते. इस्लामचे प्रमुखत्व आपल्याकडेच असावे अशी मुहंमदाच्या मृत्यूनंतर चारही गटांनी खटपट केली, पण शेवटी सर्वांनी अबू बकर यासच आपला प्रमुख म्हणून निवडले.'खलीफत रसूल अल्लाह' म्हणजे 'प्रेषिताचा वारस' ही उपाधी धारण करून इस्लाम धर्मप्रमुख व मुहंमदी राज्याचा वारस म्हणून तो कारभार पाहू लागला (६३२).

पैंगबराचा मृत्यू होताच अनेक अरबी टोळ्यांनी आपण स्वातंत्र्य असल्याचे व अबू बकरचा अधिकार मानत नसल्याचे जाहीर करून इस्लामच्या धार्मिक व राजकीय नेतृत्वास आव्हान दिले. या संघर्षास रिद्दा म्हणजेधर्मत्यागी लोकांच्या गटांचे बंडअसे नाव आहे. अबू बकरने मोठ्या धैर्याने व चातुर्याने बंडखोरांचा बीमोड केला. त्याचा सेनापती खलीद इब्‍न वालिद याने बुझाखा व अक्राबा येथील लढायांत शत्रूंचा पराभव करून इस्लामवरील मोठे संकट टाळले. यानंतर अबू बकरने इराण, तुर्कस्तान, सिरिया आदी देश जिंकण्याचे पैंगबराचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचे ठरविले. त्याच्या आज्ञेनुसार सेनापती खलीद इब्‍न वालिद याने दमास्कस काबीज करून पूर्व रोमन साम्राज्यास मोठाच धक्का दिला. पण सिरिंया जिंकण्याचे कार्य पूर्ण होण्याच्या अगोदरच  अबू बकर निधन पावला. सर्व अरबस्तान इस्लामी सत्तेखाली आणणे, उत्तरेकडील मुलूख जिंकण्याला प्रारंभ करणे व एकंदरीत पैंगबराने जिंकलेल्या मुलुखांची व्यवस्था लावणे, ही महत्त्वाची कामे अबू बकरने आपल्या लहानशा कारकीर्दीत केली. पैंगबराचा सच्चा शिष्य  व नेकीचा दिलदार माणूस म्हणून इस्लामी इतिहासात अबू बकरला मोठा मान मिळतो.

 

पहा : मुहमंद पैगंबर; इस्लाम धर्म.

ओक, द. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate