অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इब्‍न बतूता

इब्‍न बतूता

(२४ फेब्रुवारी १३०४?-१३७८). प्रसिद्ध अरब प्रवासी. काझीच्या कुळात मोरोक्कोमधील तँजिअर शहरी याचा जन्म झाला. याचे पूर्ण नाव मुहंमद बिन अब्दुल्ला इब्‍न बतूता. १३२५ मध्ये तो मक्केच्या यात्रेकरिता अ‍ॅलेक्झांड्रियाहून कैरोस आला व तेथून उंटांच्या एका तांड्याबरोबर दमास्कस, मदीनामार्गे मक्केस पोहोचला. या सफरीमुळे त्याला प्रवासाची आवड निर्माण झाली. तेथून परतल्यावर त्याने पर्शिया व इराकचा प्रवास केला. मक्केच्या दुसऱ्या यात्रेनंतर येमेनमध्ये बराच प्रवास करून तो एडनला आला व तेथून दक्षिणेकडे वळला. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोगाडिशू, किल्वा, मोंबासा या बंदरांपर्यंत तो जाऊन आल्याचे व सर्वत्र त्याचे मोठे आदरातिथ्य झाल्याचे तो लिहितो. तेथून समुद्रमार्गे तो ओमानमध्ये उतरला व मक्केच्या तिसऱ्या यात्रेकरिता रवाना झाला. दिल्लीचा त्यावेळचा बादशहा महंमद तुघलक याच्या उदारपणाच्या गोष्टी ऐकून तिकडे जावे ही त्याची महत्त्वाकांक्षा होती.

परंतु जहाज मिळेना म्हणून तांबडा समुद्र पार करून तो ईजिप्तमध्ये आला व तेथून सिरिया आणि आशिया मायनरचा प्रवास करीत काळ्या समुद्रामार्गे काफा बंदरात पोहोचला. आतापर्यंतच्या सर्व प्रवासात त्याला चर्चच्या घंटांचा आवाज या ठिकाणी प्रथमच ऐकू आला व त्यामुळे तो क्षुब्ध झाला. तेथून त्याने उझबेकिस्तानचा प्रवास केला. यानंतरच्या प्रवासाबाबत तो एकदा व्होल्गा नदीवरील बल्घार शहरी गेल्याचे सांगतो, तर एकदा ग्रीक राजकन्येबरोबर कॉन्स्टँटिनोपलला गेल्याचे सांगतो व तेथील खानाच्या भेटीचे सुरस वर्णन तो करतो. तेथून पुढे स्टेप्समधून प्रवास करून तो बुखारा येथे पोहोचला. त्यानंतर इराणमधील खुरासान या विस्तृत प्रदेशाचा प्रवास केल्यावर त्याने हिंदुकुश पर्वत ओलांडला व अफगाणिस्तानमार्गे १३३३ च्या सप्टेंबर मध्ये तो सिंधुकाठी आला. दिल्ली दरबारात पोहोचल्यावर त्याला दिल्लीच्या काझीपदाची मानाची जागा दिली गेली.

हिंदुस्थानातील त्याच्या आठ वर्षांच्या मुक्कामात तो इतरत्र हिंडल्याच्या फारशा हकीगती त्याने दिल्या नसल्या, तरी हिंदुस्थानची भव्यता, विविधता व वैभव पाहून तो दिपून गेला होता. त्याच्या पुस्तकातील एक चतुर्थांश भाग, हिंदुस्थानातील त्याला अपरिचित असलेल्या व विचित्र पद्धती व संस्था, नानाविध पदार्थ व त्यांची विपुलता, लोकांची वागणूक, राहणी तसेच बादशहाचे अपार औदार्य आणि त्याबरोबरच जुलूम, जबरदस्ती व क्रौर्य वगैरेंच्या माहितीने भरलेला आहे. त्याच्यावरही बादशहाची अवकृपा झाली होती; पुढे ती दूर झाल्यावर चीनच्या बादशहाकडे जाणाऱ्या वकीलातीबरोबर जाण्याचा त्याला हुकूम मिळाला. १३४२ मध्ये तो खंबायतहून बोटीने मलबारला गेला. चीनला जाणाऱ्या जहाजाने तो जाऊ शकला नाही व ती जहाजेही पुढे फुटली. तो मग तेथून मालदीवला गेला. तेथे त्याला प्रमुख काझीपद मिळाले. तेथील लोक त्याला फार मान देत. तेथून सु. १३४५ मध्ये त्याने सीलोनला प्रयाण केले.

तेथील पवित्र अ‍ॅडम्स शिखराची त्याने यात्रा केली. कोरोमंडलच्या किनाऱ्यावर उतरून मलबारमार्गे तो पुन्हा मालदीवला आला व तेथून बंगालला रवाना झाला. सिल्हेटच्या फकिराला भेट देऊन तो डाक्कामार्गे चीनला जावयास निघाला. पुढे तो सुमात्रा, काँटगमार्गे हांगजो व पीकिंगपर्यंत गेल्याचे लिहितो. तिकडून परत येताना (पॅसिफिक) महासागरात ‘रूख’ नावाचा खूप मोठा पक्षी पाहिल्याचे वर्णन त्याने केले आहे. अर्थात वक्रीभवनामुळे त्याला एखाद्या लहान बेटाचा तसा भास झाला असावा, असे वाटते. येताना कोठेही फारसे न थांबता तो सरळ बगदादला आला.

तेथे त्याला १५ वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजले. तेथून तो मक्केस निघाला. वाटेत १३४८ मध्ये तो सिरियात प्लेगच्या साथीने उडविलेला हाहा:कार त्याने पाहिला. त्याचे त्याने अतिशय हृदयद्रावक वर्णन दिले आहे. १३४९ मध्ये तो सार्डिनियामार्गे ट्यूनिशिया तसेच फेज या मोरोक्कोच्या सुलतानाच्या राजधानीत व तेथून तँजिअरला आला. त्यावेळेस धर्मयुद्धे जोरात चालू असल्याने तोही सैन्यात सामील झाला. जिब्राल्टर ओलांडून स्पेनमधील ग्रॅनाडापर्यंत जाऊन तो माराकेशला परत आला. १३५२ साली मोरोक्कोमधून निघून सहारा वाळवंट तुडवीत नायजरपर्यंतचा मोठा धाडसी प्रवास त्याने केला. त्या प्रवासाचे व प्रदेशाचे फार सुरेख वर्णन त्याने दिले आहे. मोरोक्कोच्या सुलतानाने बोलावल्यावरून तो १३५४ मध्ये परत फेजला आला व तेथेच मोरोक्कोचा काझी म्हणून मरेपर्यंत राहिला.

मार्को पोलोप्रमाणे इब्‍न बतूताही भूगोलज्ञ नव्हता. दोघांनीही माहिती सांगून लेखकाकडून लिहवून घेतली आहे. इब्‍न बतूताने त्यावेळची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती खूपच दिली आहे. मार्को पोलोच्या वर्णनात अतिपूर्वेकडील माहिती भरपूर मिळते, परंतु इब्‍न बतूताची भौगोलिक माहिती बरीच अचूक आहे. त्याच्या वृत्तांताचे हस्तलिखित एकोणिसाव्या शतकात पॅरिसला नेण्यात आले. १८५२–५९ मध्ये त्याचे फ्रेंच भाषांतर झाले. ११२९ मध्ये गिब याने इब्‍न बतूताचे चरित्र इंग्रजीत लिहिले आणि १९५८–१९६२ मध्ये त्याच्या प्रवासवर्णनाचे इंग्रजी भाषांतर-संपादन सुरू केले. त्याच्या भारतातील प्रवासाचा वृत्तांत आघा महंमद हुसेन याने इंग्रजीत १९५३ मध्ये लिहिला आहे.

 

लेखक : र. रू. शाह

 

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate