অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम

गीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम

गीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम

(४ ऑक्टोबर १७८७ — १२ ऑक्टोबर १८७४). सुप्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार आणि मुत्सुद्दी. त्याचा जन्म नीम (दक्षिण फ्रान्स) येथील मध्यमवर्गीय प्रॉटेस्टंट कुटुंबात झाला. त्याचे वडील वकिली व्यवसाय करीत होते. त्याने जिनीव्हा व पॅरिस येथे शिक्षण घेतले. विधिशिक्षण घेऊनही त्याने वृत्तपत्रव्यवसाय स्वीकारला. १८०७ मध्ये एलिझाबेथ पॉलिन (द म्युलां) ह्या लेखिकेच्या ओळखीने तो ला पब्लिसिस्ट ह्या वृत्तपत्रात स्फुट लेख लिहू लागला. पुढे तिच्याच सहकार्याने त्याने एक पुस्तक लिहिले आणि १८१२ मध्ये तिच्याशी तो विवाहबद्ध झाला. त्याच्या इतिहासावरील लेखनामुळे पॅरिस विद्यापीठात त्याची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्याने गिबनच्या द हिस्टरी ऑफ द डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एंपायर या पुस्तकाचे फ्रेंच भाषेत भाषांतर केले. त्यानंतर परिभाषा कोश तयार केला. नेपोलियनच्या पराभवानंतर पुन्हा स्थापित झालेल्या राजेशाहीत त्यास सचिवाचे पद मिळाले; पण १८२० मध्ये तेथून त्याची हकालपट्टी झाली. पुढे दोन वर्षे त्याने लेखनकार्य केले. त्यानंतर तो संसदेवर निवडून आला आणि पुढे जवळजवळ अठरा वर्षे लुई फिलिपच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांत मंत्रिपद भूषविले. १८४० ते १८४८ च्या दरम्यान तो पंतप्रधान होता. १८४० नंतर तो फ्रान्सचा जवळजवळ सर्वाधिकारीच होता. १८४८ च्या क्रांतीनंतर काही दिवस त्याचे वास्तव्य इंग्लंडमध्ये होते. फ्रान्सला परतल्यानंतर उर्वरित आयुष्य त्याने इतिहाससंशोधन व साहित्यलेखन ह्यांत व्यतीत केले.

फ्रांस्वा गीझो

गीझो राजेशाहीचा पुरस्कर्ता नि हुजूरपक्षाचा अनुयायी होता; तथापि त्यास लोकशाही व राजेशाही यांमधील सुवर्णमध्य साधावयाचा होता. म्हणून त्याने संविधानीय राजेशाहीचा जोरदार पुरस्कार केला. गीझोने साहित्य, इतिहास, राज्यशास्त्र, शिक्षण वगैरे विविध विषयांवर लेखन केले. त्याचे काही निबंध, स्फुट लेख व पत्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या अनेक पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतरही झाले. त्यांतील हिस्टरी ऑफ द रेव्हलूशन इन इंग्लंड (६ खंड, १८२६ — ५६),जनरल हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन इन मॉडर्न यूरोप (६ खंड, १८२९ — ३२), मेम्वार टू सर्व्ह अ‍ॅज अ हिस्टरी ऑफ माय टाइम (८ खंड, १८५८ — ६७) वगैरे काही ख्यातनाम आहेत. त्याचा फ्रान्सचा सांस्कृतिक इतिहास अपूर्णच राहिला. गीझो नॉर्मंडीमधील व्हाल रीशर ह्या ठिकाणी मरण पावला.

 

संदर्भ :Johnson, Douglas, Guizot : Aspects of French History, Toronto, 1963.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate