पाश्चात्त्य संस्कृतींमधील एक प्रगत पहिली संस्कृती. या संस्कृतीची इतर अनेक संस्कृतींवर पुढे छाप पडली, असे मानतात. या संस्कृतीचा उगम ग्रीसमध्ये झाला, म्हणून या संस्कृतीला ग्रीक संस्कृती या नावाने संबोधितात. यूरोपीय आचारविचार, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, शासन-संघटना इत्यादींच्या मुळाशी ग्रीक कल्पना किंवा मूल्ये आहेत, असे साधारणपणे पाश्चात्त्य इतिहासकार मानतात. स्वाभाविकपणेच, आधुनिक युगाच्या आरंभी पाश्चात्त्य देशांत जी ज्ञानसाधना सुरू झाली, तीमध्ये ग्रीसला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यूरोपीय सुशिक्षित मनाची मजल ॲरिस्टॉटल, प्लेटो, पेरिक्लीझ, अलेक्झांडर वगैरेंपर्यंतच पोहोचत होती. तोपर्यंत ते ग्रीसच्या स्तवनातच गुंग होते. परंतु गेल्या शंभर वर्षांत झालेल्या पुरातत्त्वविषयक व इतिहासविषयक संशोधनामुळे हे चित्र काहीसे बदलले आहे.
ज्या वेळी यूरोपीय संस्कृतीचे हे आद्यस्थानच बाल्यावस्थेत होते, अज्ञान आणि अनुभव यांच्या अंधःकारात चाचपडत होते, त्याच्या कितीतरी आधी निरनिराळ्या पौर्वात्य, समाजांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत आश्चर्यकारक प्रगती केली होती, हे आता स्पष्ट झाले आहे. ईजिप्त, भारत (सिंधू संस्कृती), ॲसिरिया, बॅबिलोनिया इ. प्रदेशांतील समाज कालदृष्ट्या अनुभवाने व विचाराने ग्रीसहून प्राचीन तर होताच. शासनव्यवस्था, शस्त्रास्त्रे, कला यांसारख्या बौद्धिक तसेच धर्म व तत्त्वज्ञान यांसारख्या बौद्धिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतही या प्रत्येक संस्कृतीत निरनिराळे प्रयोग करून पाहण्यात आलेले होते. एवढेच नव्हे, तर तद्विषयक अनेक समस्यांचा उलगडाही करण्यात आलेला होता. या सर्व अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा ग्रीक समाजाला मिळाला, हे उघड आहे.
इतकेच नव्हे, तर तो त्यांच्यापर्यंत कसा येऊन पोहोचला तेही दाखविता येते. क्रीट आणि इजीअन येथील समाजांनी हा वारसा ग्रीकांपर्यत आणून पोहोचविला. पुढे तेच ज्ञान ग्रीकांनी पुन्हा यूरोपात प्रसृत केले. प्राचीन पौर्वात्य संस्कृतींच्या अनुभवातून जे जे घेतले, ते ते ग्रीसद्वारे यूरोपात पोहोचले. खुद्द ग्रीक समाजाची कर्तबकारी अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक असली, तरी ग्रीक इतिहासाच्या मूल्यमापनात, प्राचीन पौर्वात्य व आधुनिक यूरोपीय अशा दोन संस्कृतींना जोडणारा दुवा म्हणून असलेले ग्रीसचे महत्त्व विसरता येत नाही. प्राचीनांची विद्या, त्यांची कला, त्यांची शास्त्रे आत्मसात करून ग्रीकांनी त्यात अनेक दिशांनी प्रगती केली. जीवनाच्या सर्व शाखांत शुद्ध तर्कवादाला महत्त्वाचे स्थान देण्याची धडपड त्यांनी केली व प्राचीनांच्या कल्पनेतही न येणाऱ्या दिशांची कवाडे खुली केली.
ग्रीक इतिहासाचा हा जरी अस्तिपक्षी भाग झाला, तरी दुसरा तितकाच महत्त्वाच भाग नास्तिपक्षी होता. ग्रीक भूमीचा इतिहास ही यादवीची रक्तलांछित काहील आहे. प्रत्येक नगराने, विशेषतः अथेन्सने, निरनिराळे कलाकार व तत्त्वज्ञ उदयास आणले हे खरे असले, तरी यांपैकी कोणापाशीच राष्ट्रीयत्वाची भावना वा ग्रीक ऐक्याची फारशी जाणीव नव्हती.
आपले हितसंबंध रक्षण करण्यासाठी एकत्र येण्याऐवजी हीच नगरराज्ये वर्षानुवर्षे झगडत राहिली, एकमेकांविरुद्ध दुसऱ्या नगराची मदत घेणे, नगर-संघ स्थापन करून लढाया करणे, एवढेच नव्हे तर प्रसंगी इराणसारख्या परकीय देशांची मदत घेणे, ही कृत्ये त्यांनी केली. पुढे तर नालायक, लाचखाऊ किंवा उघड देशद्रोही म्हणून हाकलण्यात आलेले लोक आपल्याच नगराविरुद्ध परक्यांची मदत मागतात, त्याला साहाय्य करतात, असे दिसून येते. आधुनिक पाश्चात्त्य इतिहासकारांची यासंबंधीची मल्लिनाथी बाजूला ठेवली, तर उघडे सत्य दिसते ते हे की, वांशिक व भाषिक ऐक्याचा (निदानपक्षी समतेचा) पाया असूनही राष्ट्रीय ऐक्याची कोणाला किंमत वाटली नाही. हा कमालीचा स्वार्थी फुटीरपणा व आत्मलक्षी विचारपद्धती, ही ग्रीक समाजाच्या इतिहासाची काही अंगे होत.
ग्रीक भूमीचे प्राचीन नाव हेलस. या राष्ट्रात किंवा देशात, म्हणजे प्राचीन हेलसच्या कक्षेत, खुद्द ग्रीसचे द्वीपकल्प, इजीअन समुद्रातील लहानमोठी बेटे आणि आशिया मायनरचा काही भाग (आजचा तुर्कस्तान), भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगतचा प्रदेश यांचा पूर्वी समावेश होत असे. यांपैकी यूरोपच्या भूमीवरील ४५ भाग ग्रीसचा. ग्रीसचे ठोकळमानाने तीन स्वाभाविक विभाग पडतात.
द्वीपकल्पाच्या साधारण मध्याला पूर्व-पश्चिम अशी रेषा ओढली, तर त्या रेषेच्या लगतचा सखल प्रदेश आणि त्याच्या उत्तरेचा काहीसा डोंगराळ प्रदेश, हा उत्तर ग्रीसमध्ये समाविष्ट होतो. यात थेसाली, ईपायरस आणि मॅसिडोनिया हे प्रदेश येतात. पैकी मॅसिडोनिया हा ग्रीसचा भाग मानत. अथेन्स किंवा स्पार्टा यांसारख्या सुधारलेल्या नगरांच्या दृष्टीने रानवटच होते. ईपायरसचा भाग डोंगराळ, अगदी रानवट नसला, तरी साधारण तसाच.
फक्त थेसाली निराळा, या एकाच प्रदेशात सलग व सखल अशी शेतीला उपयुक्त जमीन पुष्कळ होती. सगळ्यात अधिक धान्योत्पादन येथे होई. वर जी काल्पनिक पूर्व-पश्चिम रेषा उल्लेखिली तेथपासून तो कॉरिंथच्या आखातापर्यंतचा प्रदेश म्हणजेच मध्य ग्रीस. यात थोड्याफार प्रमाणात शेतीस उपयुक्त अशा जमिनी उपलब्ध होत्या.
त्या भागातच पुढे थीब्झ वा डेल्फाय यांसारखी नगरे अथवा पार्नॅर्सस पर्वत व थर्मॉपिलीची खिंड ही ठिकाणे प्रसिद्धीस आली. यापैकी सगळ्यांत प्रसिद्ध म्हणजे अथेन्स आणि त्याभोवतालचा ॲटिका प्रदेश होय. कॉरिंथच्या आखाताच्या दखिणेला पेलोपनीसस द्वीपकल्प आहे. या द्वीपकल्पात आर्गोलिस, कॉरिंथ, स्पार्टा, ऑलिंपिया वगैरे काही नगरे भरभराटीस आली.
याशिवाय इजीअन सागरातील यूबीआ, सिक्लाडीझ, क्रीट, रोड्झ, सॅमोथ्रेज, लेझ्बॉस वगैरे बेटांनाही ग्रीक इतिहासात महत्त्व प्राप्त झाले.
आशिया मायनरच्या म्हणजे सध्याच्या तुर्कस्तानच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्या अनेक ग्रीक वसाहती स्थापन झालेल्या होत्या; त्यांत सर्वांत उत्तरेकडील थ्रेस, त्याखाली आयलिसस, साधारण मध्याला आयोनिया आणि दक्षिणेस करिआ ह्या महत्त्वाच्या ठरल्या. याशिवाय, भूमध्य समुद्राच्या इतर किनाऱ्यावर, तसेच सिसिलीत किंवा आफ्रिकेच्या आणि यूरोपच्या किनाऱ्यांवर ग्रीक वसाहती स्थापन होत गेल्या.
आयोनियामधील शहरे प्रामुख्याने व्यापारी केंद्रे होती; तशीच इजीअन समुद्रातील बेटेही व्यापारी आणि आरमारी ठाणी होती. खरे महत्त्व होते ते यूरोपीय ग्रीसलाच. थेसालीचा प्रांत सोडला, तर इतरत्र सलग असा प्रदेश कोठेच नव्हता. ग्रीसच्या सबंध भूमीचे डोंगरांच्या अनेक रांगांनी छोटे तुकडे पाडलेले होते.
आडव्या उभ्या पसरणाऱ्या या रांगांमुळे जे खोलगट भाग किंवा दऱ्या उत्पन्न झाल्या, त्या सोळा ते वीस किमी. एवढ्या लांब आणि तितक्याच रुंद होत्या. यापेक्षा विस्तृत असे प्रदेश क्वचित होते. या तुकड्यात शेती होई. ईजिप्त, बॉबिलोनिया यांसारख्या देशांच्या मानाने ग्रीस अन्नोत्पादनात दरिद्रीच होता. त्यामुळे अत्यंत परिश्रमाची व तुटपुंज्या उत्पन्नाची शेती आणि त्यापेक्षा थोडी अधिक फलदायी मेंढपाळी हा ग्रीक जीवनाचा कायमचा भाग बनला.
काही प्रमाणात निसर्गाने ही कृपणता भरून काढली होती. किनारा चांगला दंतुर असल्याने व भोवती लहानमोठी अनेक बेटे असल्याने नौकानयन शक्य होते. याच व्यवसायाकडे ग्रीक लोकांपैकी बरेच वळले.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/2/2020
सुवर्ण छेद म्हणजे एखाद्या दिलेल्या रेषाखंडाचे एका ...