অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायंझटिन साम्राज्य

बायंझटिन साम्राज्य

इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या शेवटी ‘रोमन’ नावाला अभिप्रेत ती वैशिष्ट्ये असणारे रोममधील साम्राज्य लयास गेले. शासकीय वालपकरी कारभाराला सुलभ व्हावे म्हणून एकाच सम्राटाच्या अधिपत्याखाली साम्राज्याचे पूर्व आणि पश्चिम असे भाग पूर्वीपासूनच करण्यात येत; डायोक्लीशन (कार. २८४ - ३॰५) याने सहसम्राट नेमला. कॉन्स्टंटीन (कार. ३३॰ - ३३७) याने ही विभागणी कायम केली. इ.स.पू. सहाव्या शतकात मेगॅरियन व्यापाऱ्यांनी बास्पोरसच्या सामुद्रधुनीवर बिझँटिअम ही वसाहत स्थापलेली होती.

कॉन्स्टंटीन याने तिला ‘प्रतिरोम’ बनविण्याचा निश्चय केला. केवळ सहा वर्षांच्या अवधीत प्रचंड राजप्रासाद, उद्याने, सभागृहे, बाजारपेठा, सार्वजनिक स्नानगृहे उठविण्यात आली. या कॉन्स्टँटिनोपल नगरीच्या अलंकरणासाठी ठिकठिकाणचे शिल्पकार बोलावण्यात आले. अनेक शिल्पे बाहेरून आणण्यात आली.

रोमन सम्राट म्हणून तो इ.स.३३॰ साली येथे राहावयास आला. साम्राज्याच्या ऐक्याची परंपरा इतकी दृढ होती की, या विभागणीला सनदशीर रूप प्राप्त व्हावयास त्यानंतर पाऊण शतकाचा काळा लागला. पहिला थीओडोशिअस (कार.३७९ - ९५) नंतर त्याचे मुलगे होनोरियस (कार. ३९५ - ४२३) आणि आर्केडियस यांनी राज्य वाटून घेतले (३९५). आर्केडियस (३९५ - ४॰८) हा बायझंटिनचा सम्राट झाला. रोमन साम्राज्याची उघड आणि वैध विभागणी झाली. बायझंटिन राजवटीला पूर्व रोमन साम्राज्य किंवा उत्तर कालीन रोमन साम्राज्य याही नावांनी ओळखतात.

राजकीय इतिहास

ग्रीक-रोमन राजकीय इतिहासात व बायझंटिनच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा फरक आढळतो.

शासकीय संघटनेचे जे विविध प्रयोग ग्रीक-रोमनांनी केले, तसे ते बायझंटिन राजवटीत आढळून येत नाहीत. याची दोन कारणे सांगता येतील : एक, रोमन राजकीय प्रयोगांचा वारसा बायझंटिनला आयताच मिळाला व दोन, त्यामुळे उत्पन्न झालेली शासनसंघटना केवळ काही लहानसहान बदल करून येथील अर्थव्यवस्थेला पुरी पडत होती.बायझंटिन साम्राज्याच्या इ.स. ३३॰ ते १४५३ या हजार वर्षापेक्षा थोड्या जास्त काळाचे तीन विभाग पडतात :

(१) आरंभापासून ते १२॰४ पर्यंत,

(२) १२॰४ ते १२६१ व

(३) १२६१ ते १४५३. यांतील दुसरा कालखंड साम्राज्याच्या ग्रहणाचा होय.

या कालखंडात इटलीतील लॅटिन सत्तांशी संबंध असलेल्या राजांनी एक जित राष्ट्र म्हणून येथे राज्य केले. नंतरच्या कालखंडात एकूण बारा राजघराणी होऊन गेली. त्यांतील प्रत्येक राजा वंशपरंपरागत पद्धतीने गादीवर आलेला नसला, तरी त्या त्या राजघराण्याशी तो संबंधित असे. त्या घराण्याविषयी लोकांना वाटणाऱ्या निष्ठेचा फायदा करून घेण्यासाठी विवाहसंबंध जोडण्यात आले वा दत्तकविधाने पार पाडण्यात आली. दुसरे म्हणजे ही सगळी घराणी केवळ कॉन्स्टँटिनोपलची किंवा प्राचीन जहागीरदारांच्या खानदानीतील नव्हती. परंतु सम्राटपद मात्र लष्करी नेतृत्व व शासकीय कर्तृत्व या दोन गुणांच्या बळावर मिळत गेले. प्रत्येक घराण्यातील प्रत्येक सत्ताधारी निर्वेधपणे गादीवर आला किंवा एक घराणे जाऊन त्याजागी दुसरे घराणे शांततेने सत्ताधारी झाले, असे समजण्याचे कारण नाही.

सम्राटांना पदभ्रष्ट करणे, त्यांचे व त्यांच्या वारसांचे खून करणे इ. प्रकार नेहमी चालत असत; तथापि त्यांतून परकीयांना हस्तक्षेपाची संधी मिळाल्याची उदाहरणे थोडी आहेत.आर्केडिअस याच्या ताब्यात आलेल्या राज्याच्या चतु:सीमा ठोकळ मानाने पुढीलप्रमाणे सांगता येतील. समान्यपणे रोमन साम्राज्यात अंतर्भूत झालेला भूमध्य सागराच्या पूर्व भागाभोवतालचा (म्हणजेच एड्रिॲटिक समुद्राच्या पूर्वेचा) बहुतेक सर्व प्रदेश त्यात सामील झाला होता. पश्चिमेला एड्रिॲटिक समुद्रावरील ग्रीसचा किनारा, तेथपासून उत्तरेकडे सरळ रेषा ओढली असता डॅन्यूब नदीला मिळते ती रेषा, उत्तरेच्या बाजूला डॅन्यूब नदी हीच सीमा होती. पूर्वेकडे काळ्या समुद्राच्या पूर्व टोकापासून (कॉकेशस पर्वताच्या पायथ्यापासून) सरळ दक्षिणेकडे युफ्रेटीस नदी आणि तेथून सिरिया व पॅलेस्टाइन यांचा अंतर्भाव करून ईजिप्तपर्यंत पोहचणारी रेषा. दक्षिणेकडे ईजिप्त आणि आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यालगतचा सध्याचा लिबियापर्यंतचा प्रदेश. आपणच रोमन सम्राट आहोत आणि सोईसाठी राज्याची वाटणी केली असली, तरी इटलीसकट पश्चिम साम्राज्याचे सर्व प्रदेश आपल्या ताब्यात यावयास पाहिजेत, अशी इर्षा कॉन्स्टंटीनपासून पुढील तीन शतकांतील सर्व सम्राटांत होती.

कॉन्स्टंटीनने ‘मिल्व्हियन ब्रीज’ येथील लढाईत (३१२) पश्चिमेला अधिपती लिसिअस याच्यावर मात करून रोमन साम्राज्याचा एकमेव सम्राट म्हणून स्वत:ला तात्पुरती मान्यता मिळविली होती. पहिला जस्टिनिअन द ग्रेट (कार. ५२७-५६५) याने आपल्या उत्कृष्ट सैन्यबळाच्या व बेलिसेअरिअस व नार्सीझ यांसारख्या सेनापती - मुत्सद्यांच्या मदतीने पश्चिमेकडील भाग जिंकण्याचा प्रयत्न केला होता. व्हँडाल टोळीवाल्यांकडून आफ्रिकेचा (कार्थेज) कबजा घेऊन (५३६) पुढच्याच वर्षी इटली व दक्षिण स्पेन हे प्रदेशही त्याने जिंकले. पूर्व सीमेवर इराणी सम्राटांशी तहनामे करून (५३२) तेथे शांतता राखण्यात आली. त्यांचे हे विजय लष्करी दृष्ट्या नेत्रदीपक असले, तरी क्षणभंगूर ठरले.

पुढे सिसिली, दक्षिण इटली आणि एड्रिॲटिकच्या काठावरील काही इटालियन नगरे बायझंटिन अंमलाखाली राहिली; तरी साम्राज्याच्या अखंडत्वाचे स्वप्न विराम पावले. उत्तरेकडील सीमा जी डॅन्यूब नदी तिचे रक्षण करण्यासाठी पूर्वीपासून उभारण्यात आलेल्या किल्लेकोटांच्या फळीला जस्टिनिअनने आणखी कोट व ठाणी उभारून अधिकच मजबूती आणली. सामान्यत: रक्षणाच्या दृष्टीने ही व्यवस्था उपयुक्त ठरली; परंतु रशियातून येणाऱ्या तसेच बाल्कन प्रदेशात स्थायिक झालेल्या अर्धरानटी जमातींनीही बायझंटिन राज्यकर्त्यांना कधीही स्वस्थता लाभू दिली नाही.

इ.स. ५८२ पासून ते ६२७ पर्यंत आव्हार्झ टोळ्यांनी दक्षिणेकडे सरकण्याचा यत्न केला. ६२६ मध्ये आव्हार्झंच्या जोडीला बल्गर व स्लाव्ह हे लोक आहे व इराणी सम्राटांच्या सहाकार्याने त्यांनी कॉन्स्टँटिनोपलवरच हल्ला चढविला (६१७). हा हल्ला परतविण्यात आला; पण सीमेवरची अशांतता कायमच राहिली. सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी आव्हार्झ टोळ्यांचे बळ कमी झाले; पण बल्गर जमात मोठी बलदंड बनली. पुढे तीनचार शतके साम्राज्याला त्यांच्यापासून धोका होता. बल्गरांनी ८६४ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने तडजोड सोपी होईल, असे वाटू लागले होते; पण तसे झाले नाही.

शेवटी १॰१४ मध्ये दुसरा बॅझिल याने बल्गरांचा नुसता पराभवच केला नाही; तर १५,॰॰॰युद्धकैद्यांचे डोळे काढून त्यांना परत पाठविले. या दारुण शिक्षेनंतर पुन्हा उठाव झाला नाही. इ.स. १॰५॰ ते १॰६॰ दरम्यान स्लाव्ह (क्रोएशिया, सर्बीया, डाल्मेशिया), बल्गर, हंगेरियन व रशियन टोळ्यांची आक्रमणे व छुपे हल्ले होतच राहिले. तिसरा मायकेल याच्या वेळी (कार. ८४२ – ६७ ) ते काही काळ थांबले; परंतु या भागात शासनाची घडी बसविणे बायझंटिन सम्राटांना यापुढे कधीच शक्य झाले नाही. ही सीमा नेहमीच अस्थिर आणि धोक्याची राहिली. पूर्व सीमेवर इराणची पुनरुज्जीवित सत्ता विस्तार पावू लागली होती. दुसरा जस्टिन याने इराणचा पराभव करून आर्मेनियावर वर्चस्व स्थापले व तुर्कस्तानची पूर्व सीमा सुरक्षित केली. इ.स. ६१॰ नंतर बाजू उलटून सिरिया, पॅलेस्टाइन, ईजिप्त यांवर इराणचा अंमल आला. कार्थेजमधून बायझंटिनच्या विमोचनास आलेल्या हिरॅक्लिअस याने हा भाग पुन्हा जिंकला (६२९). इ.स.

६३२ नंतर मुहंमद पैगंबरांच्या अनुयायांनी धर्मविजयाची आकांक्षा धरून हातात तलवार घेतली. ६४॰ मध्ये इराण, सिरिया व पॅलेस्टाइन आणि ६४२ मध्ये ईजिप्त त्यांनी काबीज केला. इ.स.७॰॰च्या थोड्या आधी (६९८) कार्थेजचाही पाडाव झाला. याच काळात इस्लामी आरमाराने मोठया प्रमाणावर चाचेगिरी करून पूर्व भूमध्य सागरावरील व्यापार बुडविला. इ.स. ७१७ मध्ये खुद्द बिझँटिअमलाच वेढा घालण्यात आला. तिसरा लिओ याने तो एक वर्षाने उठविला. इ.स. ९६॰ नंतर ही लाट मागे लोटण्यात बायझंटिन सम्राटांना काही प्रमाणात यश आले. क्रीट, सायप्रस व सिरियाचा काही भाग दुसरा बॅझिल याच्या नेतृत्वाखाली परत पूर्व रोमन साम्राज्यात आला. ईजिप्शियन व बायझंटिन राज्यकर्त्यांत करार होऊन अँटिऑक ही दोहोंतील सरहद्द ठरविण्यात आली. बगदाद येथे सेल्जुक तुर्कांचा अंमल बसल्यावर त्यांच्या आक्रमणाला पायबंद घालणे कठीण झाले. आर्मेनिया व टॅरॉस ताब्यात ठेवून त्यांना तुर्की प्रदेशात येऊ द्यावयाचे नाही, ही निकडीची गोष्ट ठरली. इ.स. १॰९६ मध्ये सुरू झालेल्या धर्मयुद्धांनी हे काम सोपे केले.

इ.स. बारावे शतक संपले, त्या वेळी पश्चिम यूरोपातील राजकीय सत्तांशी बायझंटिन संबंध वेळोवेळी येत गेला होता व तो उभयतांना सुखकारक ठरला नव्हता. यातही जास्त धोक्याची ठरली ती उत्तर इटालीतील व्यापारी नगरे –मुख्यत: व्हेनिस. इ.स. १२॰२ साली चौथे धर्मयुद्ध सुरू झाले. ही मोहीम ईजिप्तवर हल्ला करण्यासाठी होती; परंतु व्हेनिसचे पुढारी व एक पदभ्रष्ट सम्राट यांच्या संगनमतामुळे प्रत्यक्ष हल्ला कॉन्स्टँटिनोपलवरच झाला. इ.स. १२॰३ मध्ये या शहराचा पाडाव झाला. हा दुसऱ्या कालखंडाचा आरंभ होय. या कालखंडात साम्राज्याचे अनेक तुकडे पडले.

धर्मयुद्धात भाग घेणाऱ्या निरनिराळ्या राजांना व व्यापारी नगरांना वाटेल तशी छोटी छोटी संस्थाने विभागून देण्यात आली. खुद्द फ्लँडर्सचा बॉल्डविन याला कॉन्स्टँटिनोपलचे राजपद देण्यात आले. मोठाली बंदरे, व्हेनिस वा जेनोआ यांच्याकडे गेली. तुर्कस्तान (आशिया मायनर) येथे एक स्वतंत्र राज्य झाले. न्यायसीआ ही त्याची राजधानी. येथे व ईपायरस या वायव्य ग्रीसमधील राज्यात ग्रीक-बायझंटिन परंपरेचा अभिमान सतत ज्वलंत होता व ते वैभव प्राप्त करून घेण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. त्यांपैकी न्यायसीआचे राज्यकर्ते हे जास्त चांगल्या स्थितीत होते. तेथील आर्थिक स्थिती उत्तम होती. पूर्वी साम्राज्याचे आधारस्तंभ असणाऱ्या बडया जहागीरदार-सरदार वर्गांचे ऐक्य व संपत्ती टिकून होती. याचा उत्तम फायदा घेऊन या राज्यांनी यूरोपच्या भूमीवर प्रवेश केला आणि शेवटी इ.स. १२६१ मध्ये आठवा मायकेल याने कॉन्स्टँटिनोपल जिंकले. त्यानंतर या साम्राज्याचा जीवनातील तिसरा आणि शेवटचा कालखंड सुरू झाला.
कॉन्स्टँटिनोपल पुन्हा हातात आल्यावर साम्राज्याच्या पुनरुज्जीवनाची स्वप्ने तेथील राजांना पडू लागावीत यात नवल नव्हते. त्यानुसार भूमध्य सागरातील बेटे जिंकण्यात आली. बल्गर-स्लाव्ह इ. टोळ्या काबूत आणण्यात आल्या. इटालियन व पश्चिम यूरोपीय विरोधाचा नेता अँजूचा चार्ल्स याचा बेराटच्या रणांगणावर आठवा मायकेल याने पूर्णपणे मोड केला (१२७६). रोमन चर्च (पोप) व ग्रीक चर्च यांचे एकीकरण किंवा निदान समझोता साधण्याचा यत्न करण्यात आला. या सर्व कारवाईत आठवा मायकेल याची कारकीर्द (इ.स. १२५९ - ८२ ) सर्वात महत्त्वाची मानली जाते; परंतु त्याचे आणि नंतरच्या सम्राटांचे सर्व लक्ष केवळ यूरोपवरच केंद्रित झाले होते. त्यांना तुर्कस्तानचा जवळपास सर्व भाग थोड्याच अवधीत गमवावा लागला.

शिवाय शत्रुमित्र-विवेक पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसते. यूरोपातील लढाईच्या साहाय्याच्या बदल्यात सहावा जॉन कँटक्यूझीनस (कार.१३४७ - १३५५) याने १३५४ मध्ये तुर्कांना गलिपली प्रांत दिला. १३५॰ मधील दंगलीत अनेक संपन्न व कर्तबगार कुळांचा व पुरुषांचा नाश झाला होता. साम्राज्याची धडाडी संपल्याची लक्षणे दिसू लागली होती. पहिला व दुसरा मुराद यांनी आपल्या प्रदेशावरील मंगोल आक्रमणे पचविली आणि यूरोपात राज्यविस्तार करण्याचे धोरण चालूच ठेवले.१३९१ व १४२२ मध्ये कॉन्स्टँटिनोपलवर झालेले हल्ले परतविण्यात आले; परंतु भोवतालचा प्रदेश तुर्कांच्या ताब्यात जात होता व सगळीकडून फास आवळला जात होता. एप्रिल १४५३ मध्ये या राजधानीचा पाडाव झाला व तिचे रक्षण करताना शेवटचा बायझंटिन सम्राट अकरावा कॉन्स्टंटीन धारातीर्थी पडला. त्याच्या निधनाबरोबरच पूर्व रोमन साम्राज्य लयाला गेले.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate