অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑफिओग्‍लॉसेलीझ

ऑफिओग्‍लॉसेलीझ

ऑफिओग्‍लॉसेलीझ

(अहिजिव्ह-गण; इं. अडर्स टंग अँड मूनवर्ट फर्नस). नेचे वर्गातील एक प्रारंभिक गण. यात ऑफिओग्‍लॉसेसी हे एकच कुल असून त्यामध्ये फक्त ३ वंश (ऑफिओग्‍लॉसमबॉट्रिकियम व हेल्मिंथोस्टॅकिस) व सु. ८० जाती आहेत. पहिल्या दोन वंशांत प्रत्येकी सु. ४० जाती असून त्या उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात पसरलेल्या आहेत. तिसऱ्या वंशातील एकमेव जाती आग्‍नेय आशियात व पॉलिनीशियात सापडते. विद्यमान नेचांमध्ये हा गण सर्वांत प्रारंभिक असून त्याचे जीवाश्म (अवशेष) अद्याप आढळले नाहीत, कारण यातील जाती बहुतेक मांसल असून त्यात कठीण ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांचा) अभाव असतो. खोड [मूलक्षोड, ð खोड] भूमिस्थित असून दरवर्षी साधारण एकच पान येते (पहा : आकृती). ते उभट वाढते, पण इतर नेच्यांतल्याप्रमाणे कळीमध्ये गुंडाळलेले (अवसंवलित) नसते. पानाचे वंध्य व बीजुककोशधारक (लाक्षणिक प्रजोत्पादक अंगे असलेले कोश धारण करणारा) असे दोन भाग असतात. बीजुककोश एकाच प्रकारचे, मोठे,बिनदेठाचे व दोन रांगांत असून त्यांवर जाड आच्छादन असते. त्यांचा विकास अपित्वचेच्या कोशिकांच्या अनेक थरांपासून होतो. ते दोन शकलांनी उघडतात व प्रत्येकातून अनेक सूक्ष्म बीजुके सुटी होऊन बाहेर पडतात. बीजुककोश धारण करणाऱ्या पानाच्या भागास ‘फलनक्षम कणिश’ म्हणतात. बीजुक रुजून गंतुकधारी (प्रजोत्पादक कोशिका धारण करणारा भाग) बनतो; तो लहान, मांसल, रंगहीन व भूमिस्थित आणि शवोपजीवी (मृत जैव पदार्थांवर जगणारा) असून संकवकाच्या [→ कवक] साहाय्याने अन्न मिळवितो. या गणापासून पुढे कोणत्याही गटाचा क्रमविकास (उत्क्रांती) झालेला नसावा असे दिसते [ → क्रमविकास]. ऑफिओग्‍लॉसमाचे (अहिजिव्ह) वंध्य पान साधे असून त्यातील शिरांची मांडणी [ → पान] जाळीदार व बीजुककोशधारक भाग (कणिश) तळापासून स्वतंत्रपणे वाढलेला असतो व सर्पाच्या जिभेप्रमाणे दिसतो म्हणून ‘अहिजिव्ह’ हे नाव दिले आहे. भारतात या वंशातील सात जाती आढळतात. ऑ. व्हल्गॅटम ही जाती हिमालय, बिहार, अन्नमलाई, द. भारत, आसाम, महाराष्ट्र (पुणे) इ. ठिकाणी आढळते; ही जाती जंतुनाशक म्हणून तसेच जखमा भरून येण्यासाठी व रक्तस्राव थांबविण्यासाठी उपयुक्त आहे. मूलक्षोडाच्या गरम काढ्याने गळवे व जखमा धुतात. ऑ. पेंड्युलम आसामात आढळते, ह्या  अपिवनस्पतीची पाने लांब पट्टीसारखी व लोंबती असतात. ती खोबरेलात कुस्करून केशवर्धनाकरिता डोक्यास

लावतात. ऑ. रेटिक्युटस ही उभी जमिनीवर वाढणारी जाती, उत्तर प्रदेश (मसूरी), बिहार, बंगाल, आसाम, द. भारत इ. ठिकाणी आढळते. इंडोनेशियात हिची कच्ची पाने कोशिंबीरीप्रमाणे किंवा भाजीप्रमाणे एकटी किंवा इतर भाज्यांबरोबर खातात.ऑफिओग्‍लॉसम वंश व त्यातील अनेक भारतीय जातींबद्दल पुणे विद्यापीठातील त्र्यं. शं. महाबळे यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे.

बॉट्रिकियमाचे पान पिसासारखे विभागलेले असून त्यातील शिरा स्वतंत्र असतात. समान देठावर बीजुककोशधारक कणिशही विभागलेले असून त्यातल्या शाखांवर बीजुककोश दोन्ही बाजूंस चिकटलेले असतात. याच्या तीन जाती (बॉ. लुनॅरिया, बॉ. टर्नेटम, बॉ.व्हर्जिनियानम). भारतात काश्मीरमध्ये तसेच सिक्कीममध्ये (१,५५०-४,०३० मी. उंचीवर) आढळतात. या जाती आमांश, कापणे, फुटणे, जखमा इत्यादींवर गुणकारी आहेत.

हेल्मिंथोस्टॅकिस झेलॅनिका ही जाती द. भारतातील प. घाटावर ९३० मी. उंचीपर्यंत व ईशान्य भारतात आढळते. पानाचा देठ सु. ३० सेंमी लांब व वंध्य भाग हस्ताकृती विभागलेला असून शिरा स्वतंत्र (मुक्त) असतात. बीजुककोशधारक भाग वंध्य भागापासून तळाशी स्वतंत्रपणे वाढतो. कच्ची पाने तशीच किंवा शिजवून खातात. हिच्यात वेदनाहारक व मादक गुण असून ती गृध्रसीवर (खुब्याच्या सांध्यापासून दोन्ही पायांकडे जाणाऱ्या मुख्य मज्जातंतूच्या मार्गात होणाऱ्या वेदनांवर) वापरतात. मलायात मूलक्षोड पौष्टिक समजून माकड खोकल्यावर (डांग्या खोकल्यावर) सुपारीबरोबर देतात; ते जावामध्ये आमांश, सर्दी व क्षयाची प्रथमावस्था ह्यांमध्ये देतात.

 

पहा : नेचे. संदर्भ -1. Blatter, E; D’almeida, J. F. Ferus of Bombay, Bombay, 1922,

2. CSIR Wealth of India, Raw Material, Vol. Vll, New Delhi, 1966.

लेखक: पंरांडेकर शं आ

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate