অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोका

कोका

(इं. कोकेन प्लँट; लॅ. एरिथ्रोझायलॉन कोका) ; कुल-एरिथ्रोझालेसी). या लहान वृक्षाचे मूलस्थान दक्षिण अमेरिका (पेरू व बोलाव्हिया) असून त्याची लागवड तेथे, तसेच चिली, जावा, श्रीलंका व थोडी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील प्लॉरिडा व कॅलिफोर्निया येथे केली जाते. अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावर समुद्रसपाटीपासून ४६५–१,८६० मी. पर्यंतच्या उंचीवरही लागवड केली आहे.भारतात तमिळनाडू, म्हैसूर, बंगाल व रांची येथे लागवडीचे प्रयोग करण्यात आले, परंतु व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरले नाहीत; सध्या बागेत शोभेकरिता हा वृक्ष लावलेला आढळतो. दमट व गरम हवेत तो चांगला वाढतो; जंगली अवस्थेत सु.२·५–५·५ मी. पर्यंत उंची आढळते, परंतु लागवडीत २ मी. पेक्षा जास्त वाढू देत नाहीत. फांद्या बारीक, सरळ व तांबूस असून टोकाला लहान, साधी, हिरवीगार, पातळ, दीर्घवृत्ताकृती व केसाळ पाने येतात. फुले लहान व पिवळट पांढरी असून ती गतसालच्या फांदीच्या भागावर झुबक्यांनी येतात; किंजदले तीन असून किंजपुटात तीन कप्पे असतात [ फूल]. फळे लाल आणि अश्मगर्भी (आठळीयुक्त) असून बी एकच असते.

याची लागवड बियांपासून व सु. १९०–२०० सेंमी. पाऊस वर्षभर पडणाऱ्या भागात (उदा., श्रीलंकेत) करतात; ताजे बी सावलीत पेरून त्यांची रोपे १·५ X१·७५ मी. अंतरावर लावतात. पुढे सावलीची जरूरी नसते. साधारणतः झाडे अडीच वर्षांची झाल्यावर (कधी चार वर्षांनंतर) पाने खुडून गोळा करतात; वर्षांतून तीनदा खुडतात व नंतर गरम कपड्यावर पण सावलीत वाळवतात, म्हणजे त्यांना सुरकुत्या न पडता हिरवेपणा कायम राहतो. वाळलेली पाने पिशवीत भरून किंवा गठ्ठे करून निर्यात करतात.

पानांत ‘कोकेन’ हे  अल्कलॉइड असते; बिया व सालीतही हे सापडते. पानांना ‘हुआमको कोका’ हे व्यापारी नाव आहे. कोकेनसाठीच या झाडाची लागवड करतात. भारतातील कोकाच्या पानांपासून ०·४-०·८ टक्के कोकेन मिळते; कोकेन काढून घेतल्यावर पानांचा उपयोग ‘कोला’ या पेयांसाठी करतात. कोका या वर वार्णिलेल्या जातीशिवाय आणखी त्याच वंशातील एक-दोन जाती (ट्रुक्सिला कोका व पेरूव्हियन कोका) कोकेनकरिता उपयोगात आहेत. पानांचा उपयोग चहाप्रमाणे उत्तेजक पेय बनविण्यास करतात. ती कडू व विशिष्ट स्वादयुक्त असतात. फार थोड्या प्रमाणात कोकेन पचनशक्ती आणि तंत्रिका तंत्रास (मज्जासंस्थेस) पौष्टिक म्हणून देतात.

लेखक : ज. वि. जमदाडे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate