प्रत्येक पेऱ्यावर एकच पान येऊन सर्व खोडावर (किंवा फांदीवर) एकाआड एक पाने रचलेली आढळतात. अशा पद्धतीस सर्पिल (एकांतरित) पर्णविन्यास म्हणतात. याचे कारण एका पानाच्या तळापासून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वगैरे पानांच्या तळांतून जाणारी एक काल्पनिक रेषा काढली, तर ती खोडाभोवती (फिरत्या जिन्याप्रमाणे) फिरकीसारखी जात असल्याचे आढळते. अशा तिरप्या रेषेस ‘जननिक सर्पिल’ म्हणतात. या मांडणीत विविध प्रकार आढळतात. गवतांमध्ये (उदा., ऊस, मका इ.) खोडावर पानांच्या दोन उभ्या रांगा असतात. एका उभ्या रांगेत पहिले, तिसरे, पाचवे इ. विषम क्रमांकांची पाने असतात, तर दुसऱ्या उभ्या रांगेत दुसरे, चौथे, सहावे इ. सम क्रमांकांची पाने येतात. म्हणजेच पहिल्याच्या बरोबर वरच्या बाजूस तिसरे (दुसरे नव्हे), त्याच्यावर पाचवे अशी पाने येतात. तसेच दुसऱ्या क्रमाकांच्या पानाच्या वरच्या बाजूस चौथे पान (तिसरे नव्हे) व त्यावर सहावे याप्रमाणे मांडणी असते. येथे पर्णविन्यास १/२ या अपूर्णांकाने दर्शविला जातो.
कोणत्याही एका पानापासून काढलेली काल्पनिक रेषा त्या पानाच्या बरोबर वरच्या (त्याच रांगेतल्या) पानास जाऊन पोहोचताना खोडाभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा करते व (पहिले पान सोडून) ती करीत असता वरच्या दोन नवीन पानांच्या तळांतून जाते. येथे खोडाच्या पृष्ठावर सारख्या अतरावर पानांच्या दोन उभ्या रांगा असतात. त्यांना ‘सरल पंक्ती’ व सर्पिल रेषेस ‘सर्पिल पंक्ती’ असे म्हणतात. १/२ या अपूर्णांकातील एक हा अंशाचा आकडा प्रदक्षिणेचा असून दोन हा छेदाचा आकडा पानांच्या रांगांचा (अथवा वरच्या पानांचा) असतो. लव्हाळा, मोथा (सायपेरेसी कुल) इ. वनस्पतींच्या खोडावर पानांच्या तीन रांगा असल्याने त्यांचा पर्णविन्यास १/३ असतो. येथेही वरच्याप्रमाणे एकाच प्रदिक्षणेत पहिल्या पानापासून निघालेली सर्पिल रेषा चौथ्या पानाच्या तळात येते; पहिले पान सोडून दिल्यास वरच्या तिसऱ्या नवीन पानाच्या तळात ही प्रदक्षिणा पूर्ण होते व हे पान पहिल्याच्या बरोबर वरच्या बाजूस व त्याच रांगेत असते.
गवतांच्या बाबतीत किंवा तशाच इतर १/२ पर्णविन्यास असणाऱ्या वनस्पतींत दोन पानांतील अंतर प्रदक्षिणेच्या किंवा सर्पिल पंक्तीच्या (वर्तुळाच्या) निम्मे असते, हे उघड आहे. त्याचप्रमाणे १/३ पर्णविन्यास असणाऱ्या वनस्पतीत दोन क्रमागत (लागोपाठच्या) पानांतील अंतर परिघाच्या १/३ असते. वर्तुळाच्या केंद्राभोवताली काटकोनांची संख्या चार असल्याने एकूण केंद्रवर्ती कोनांचे मूल्य ९०°×४ म्हणजेच ३६० अंश असते. यावरून १/२ पर्णविन्यासात दोन क्रमागत पानांमधील अंतर कोनात मोजले, तर ३६०° × १/२=१८०° होते. याला ‘परामुखताकोन’ म्हणतात. १/३ पर्णविन्यासात ३६०° ×१/३=१२०° परामुखताकोन असतो. पपनस व पारोसा पिंपळ या वनस्पतींत पानांच्या पाच रांगा असून कोणत्याही पानापासून निघणारी सर्पिल रेषा खोडाभोवती दोन प्रदक्षिणा करून मग त्याच रांगेतल्या बरोबर वरच्या पानाच्या तळात येते व हे पान पाचवे असते. येथे परामुखता-कोन ३६०×२/५=१४४° असतो.
अंतिम सुधारित : 10/7/2020
भरमसाट येणारे वीजबिल व दिवसेंदिवस वाढणारे भारनियमन...
द्विदलिकित वनस्पती
रासायनिक पद्धतीवर भर देऊन हायब्रीड भात पिकांचे उत्...
कॅन्स्कोरा डिफूजा : (कुल-जेन्शिएनेसी). सु. १५-६० स...