शेतकरी ते ग्राहक मालाची थेट विक्री या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या तांदुळ महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 51 लाख रुपयांच्या तांदळाची विक्री झाली आहे. यामुळे दलालांची मध्यस्थी संपून शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होण्याबरोबरच ग्राहकांनाही वाजवी दरात चांगल्या दर्जाचा तांदुळ उपलब्ध झाला आहे.
भंडारा जिल्हा तांदळासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात एकूण 1 लक्ष 96 हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी 1 लक्ष 90 हजार क्षेत्रामध्ये धानाचे पीक घेण्यात येते. जिल्ह्यातील शेतकरी तांदुळ न विकता धानाची विक्री करतात त्यामुळे नफ्याची टक्केवारी कमी असते. योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी निराश होतो. यावर उपाय म्हणून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने नागपूर येथे तांदुळ महोत्सवाचे आयोजन मागील वर्षापासून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी धान न विकता त्याची भरडाई करुन तयार झालेला तांदुळ विकावा यासाठी आत्माने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या वर्षी हा महोत्सव 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या अधिवेशन कालावधीत नागपूर येथे ॲग्रोनामी हॉल, विद्यापीठ लायब्ररीसमोर आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यांनी केले. या महोत्सवात जिल्ह्यातील 30 शेतकरी गटांनी सहभाग घेतला. गटातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धानाची भरडाई करुन एका सदस्यामार्फत महोत्सवात तांदुळ विक्रीसाठी ठेवला.
आत्मा अंतर्गत या महोत्सवाची मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 5, 10 व 25 किलोच्या बॅग तांदुळ पॅकिंगकरीता 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आल्या. सदर तांदुळ विक्री महोत्सवामध्ये तांदळाचे निरनिराळे वाण विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये एचएमटी, बीपीटी, जय श्रीराम, चिन्नोर, बासमती, बगड, केसर या वाणांचा समावेश होता. एकाच ठिकाणी विविध प्रकारचे तांदळाचे वाण उपलब्ध झाल्यामुळे तसेच तांदळाची किंमत बाजार भावापेक्षा 5 ते 10 रुपयांनी कमी असल्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ठोक विक्रीच्या तुलनेत 8 ते 10 रुपये प्रती किलो किंमत जास्त मिळाली.
या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकूण 1500 क्विंटल तांदुळ विकून 51 लाख रुपये नफा कमावला आहे. तांदळासोबतच शेतकऱ्यांनी जवस तेल 100 लिटर, हळद तेल 22 लिटर, 650 किलो हळद, 81 किलो तीळ या शेतमालाची सुद्धा विक्री केली. तांदुळ विक्री महोत्सवामुळे शेतकऱ्यांच्या तांदळाला योग्य भाव मिळण्यासोबतच त्यांनी विक्री कौशल्यही आत्मसात केले. या महोत्सवातच नागपूर शहरातील 10 निवडक गृह निर्माण सोसायट्यांमध्ये सुद्धा तीन मोबाईल व्हॅनच्या मदतीने शेतकऱ्यांनी तांदुळ विकला. त्यामुळे शेतकऱ्यांचा नियमित ग्राहक तयार झाला आहे. त्याचबरोबर तांदळाच्या बॅग वरील शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर मुळे ग्राहकांकडून तांदळाची मागणी मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहे, असे महोत्सवात सहभागी झालेल्या देवानंद चौधरी या शेतकऱ्याने सांगितले. अशा पद्धतीने ग्राहक आणि शेतकरी यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित झाल्यामुळे दलालाची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे. तर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला आशेचा किरण सापडला आहे.
माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, २३ फेब्रुवारी, २०१५
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात भाताच्या / तांदुळाच्या खोद्कीडीचे व्यवस...