অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पक्ष्यांच्या दुनियेत…

पक्ष्यांच्या दुनियेत…


नाशिकला हिवाळ्यात तसा जास्तच गारठा असतो. बऱ्याचदा शहरावर सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर असते. आज अशाच वातावरणात नांदूर मधमेश्वर अभयारण्याकडे जाताना उत्साह वाटत होता. माणसांच्या गर्दीपलिकडले विश्व आनंददायी असते, याचा अनुभव कोकणात असताना अनेकदा घेतला आहे. असाच रोमांचित करणारा अनुभव या अभयारण्यात मिळेल, या आशेने या भेटीचे नियोजन झाले होते.

नाशिक-औरंगाबाद रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतात ऊस, द्राक्षे, भाजीपाल्याची लागवड केलेली असल्याने परिसर हिरवागार दिसत होता. सिन्नर फाटा येईपर्यंत तीन बसस्टॉप दिसले. साधारण 22 किलोमीटर अंतरावर अभयारण्याकडे जाणारा रस्ता आहे. दोन किलोमीटर अंतरावर सायखेड आणि तेथून डावीकडे 15 किलोमीटरवर नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे.
….रस्त्याने जाताना बैलगाडीवरून जाणारे ऊस तोडणी कामगारांचे तांडे दिसले… गाडीत ऊस भरणेही सुरू होते. गोड साखरेच्या चवीमागे कष्ट करणारे किती हात असतात!.. गोदावरीमुळे असलेली शेतातील संपन्नता आणि दूर आकाशात होणारा सूर्योदय… प्रवासाचा मस्त आनंद घेताना पक्षी निरीक्षण मनोऱ्याकडे जाणारा मार्ग दर्शविणारा फलक दिसला. प्रकल्पाच्या एक किलोमीटर अलिकडे हा मार्ग आहे. दोनच मिनिटात आमची गाडी अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचली.
पक्ष्यांच्या विविध आवाजांनी आमचे स्वागत केले.

आकाशात ढग असल्याने छायाचित्रकार प्रमोद जाधव थोडे निराश झाले. मात्र आलो आहोत तर भेट स्मरणीय करूच या निर्धाराने आम्ही वनरक्षक चौधरी यांच्यासोबत वॉच टॉवरवर पोहोचलो. उंच वाढलेल्या गवतातून जणू आम्हाला सलामी देण्यासाठीच स्पून बील (चमचा)चा थवा आकाशात झेपावला. या पक्ष्यांची चमच्यासारखी चोच असल्याने त्यांचे सौंदर्य काही वेगळेच होते.
निफाड तालुक्यातील खानगावथडी येथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर 1911 ला बंधाऱ्याची दगडी भिंत उभारण्यात आली. त्यामुळे नदीप्रवाहात गाळ साचल्याने उंचवटे तयार झाले आणि हा परिसर पक्ष्यांसाठी उपयुक्त झाला. पुढे हे पक्षीतीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि 1986 मध्ये हे अभयारण्य म्हणून जाहीर झाले. येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या सतत वाढते आहे. त्यामुळे अभयारण्य व्यवस्थापनाकडून पक्षी गणनेचे काम सातत्याने करण्यात येत आहे. आतापर्यंत 239 पक्ष्यांची सूची तयार करण्यात आली आहे. त्यातील बदकांच्या अनेकविध जाती हे अभयारण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. इथे हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत पक्षीनिरीक्षकांना विशेष पर्वणी असते.
श्री. चौधरी आणि पक्षी मार्गदर्शक गंगाधर आघाव माहिती देत असताना परिसरातल्या दलदलीत अनेक प्रकारची बदके मुक्तपणे विहार करीत होती. त्यात कॉमन कूट (चांदवा वारकरी), चतुरंग बदक, ग्रे हेरॉन, पर्पल मोरहेन मोठ्या प्रमाणात होते. दोन वेगळ्या प्रकारची बदके एकत्रितपणे खेळतानाचे सुंदर दृष्य आणि त्यांच्या पाण्यातल्या कसरती पाहून वेगळाच आनंद मिळत होता. एखादा चित्र बलक (पेंडेंट स्टॉक) स्थितप्रज्ञासारखा शांतपणे उभा असलेला मधूनच दिसे.

व्हिसलिंग रिलचा थवा विशिष्ट आवाज करीत डोक्यावरून भुर्रकन गेला की त्यादिशेने दुर्बिण नेईपर्यंत तो गवतात अदृष्य झालेला असे.
कमळपक्षी, तरंग, नॉर्दन शाऊलर (थापाट्या) अशा विविध पक्ष्यांची माहिती आघाव देत होते. कमळपक्ष्याची शेपूट जून ते ऑगस्ट सर्वात लांब असते, पक्षी आपले क्षेत्र निश्चित करतात, त्यांचे वेळापत्रक यासारखी रंजक माहिती यावेळी मिळाली. मधूनच बगळ्यांचे थवे दूरवर उडताना दिसले की त्यातला काळा-तपकिरी दलदली ससाणा दिसायचा. हा पक्षी मोठी बदकेदेखील अलगद चोचीच दाबतो. म्हणून त्याच्यापेक्षा मोठे पक्षीदेखील त्याला घाबरतात.
एकूण 19.6 चौ. किलोमीटर क्षेत्रातील ही पक्ष्यांची दुनिया खरोखर अद्भूत अशीच होती. वनविभागाने पर्यटकांसाठी प्रदर्शनाची देखील रचना केली आहे. त्याठिकाणी इथे आढळणाऱ्या पक्ष्यांचे मॉडेल्स आणि माहिती आहे. दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून इथली जैवविविधता दाखविली जाते. बालपर्यटकांसाठी पक्ष्यांची चित्रे व आवाज बटन दाबून अनुभण्याचे तंत्र मनोरंजक आहे.

वन विभागातर्फे विश्रामगृह, तंबू, गाईड आदी व्यवस्थादेखील उपलब्ध करून दिली जाते.
पक्षी निरीक्षणाचा खरा आनंद सकाळी आणि सायंकाळी मिळू शकतो. यावेळी पक्ष्यांची संख्या अधिक असते. हे पक्षी आपली मोठी जैविक संपदा आहे. तिचे जतन केले तरच पुढच्या पिढीला त्यांच्या सहवासातील हा आनंद लुटता येईल. मात्र या परिसरात गोंगाट टाळणे आणि कचरा न करणे ही पथ्ये पाळावी लागतात. आपण आपला परिसर घाण केलाय, आता स्वच्छतेची गरज भासू लागली आहे. त्या मुक्या पक्ष्यांचे विश्व सुंदर आणि स्वच्छ आहे. त्यांच्या अधिवासात तरी ढवळाढवळ करू नये, असे त्याक्षणी वाटले.

एका अनोख्या विश्वातून परतीचा प्रवास सुरु झाला होता. या विश्वात सहचर्य अनुभवायला मिळते. मोकळेपणा दिसतो, उत्साह दिसतो, निसर्गाचे विविध रंग आणि किमया तुमच्यासमोर असते. ही पक्ष्यांची दुनिया तुम्हालाही खुणावते आहे. बदक, पाणकोंबडी, फटाकडी, परदेशातील फ्लेमिंगो, सारस, चक्रांग, धनवर, मराल, करकोचा, मैना, पाणकावळा, गायबगळा, सुरमा, असे कितीतरी पक्षी तुमचे मित्र व्हायला तयार आहेत. ही मैत्री जुळवायची असेल तर नांदूर मधमेश्वरला भेट द्यायलाच हवी. (दूरध्वनी-0253-2317114/5)

- डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, ११ डिसेंबर, २०१४

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate