অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यावरण समृद्धीची नवी पहाट

पर्यावरण समृद्धीची नवी पहाट

उपनिषदामध्ये झाडाच्या बी ला मानवी जनुकाची उपमा दिली आहे. झाडाचं बी आणि मानवी जनूकं सारखेच. बी जमिनीत पुरवल्यावर पावसाच्या थेंबामुळं ते अंकुरतं, रोपटं होतं. कालांतराने मोठं झाड तयार होतं. ते केवळ झाड नसतं तर ते पशु-पक्षी, किडे-कीटकांचं एक गाव असतं. ते जीवनभर उन्हा-तान्हात एकाच ठिकाणी उभं राहून सजीवसृष्टीला केवळ देण्याचं काम करतं. झाडं जीवनभर काहीही न मागता केवळ देण्याचचं काम करतात तर मानव केवळ घेण्याचचं काम करतो. घेता घेता आयुष्य गमावतो आणि देण्याचं पवित्र कार्यच विसरुन जातो.
ते करायचं असेल तर लवकरच वर्षाऋतूला सुरवात होत आहे.  पर्यावरण समृद्धीचा एकच झरा, एक बी मातीत पुरवा, ते वाढवा, रक्षण करा , 
निसर्ग हाच गुरु खरा, सुखी जीवनाचा मंत्र बरा !सूर्योदयाची कोवळी किरणं दररोज माझ्या घराच्या परसात पाखरांचा किलबिलाट घेऊन येतात. त्यातूनच मी झोपेतून जागा होतो आणि माझी दैनंदिनी सुरु होते. पिटू पिटू आवाज करत बुलबुल येतात. त्यानंतर मैना एकमेकांच्या चोचीला चोच लावत मानवाला न समजणारा संवाद साधत असतात. चिऊताईंचा चिवचिवाट, कावळ्यांची काव, काव, कोकीळ नराचे कुहू कुहूग् गायन, सातबायांचा न समजणारा गोगाट आणि या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेते ती सुभग पक्ष्याची सुंदरशी शीळ. त्यापाठोपाठ कोतवाल, दयाळ, होले, टिटवी, सूर्यपक्षी इत्यादी पाखरांचा स्वरांचा मेळ बसतो आणि परसात सारं चैतन्य संचारतं.
चैत्राची उन्हे रखरखायला लागली की, आमच्याकडील बहावा सोनपिवळया फुलांनी नखशिखान्त डवरतो. पाखरं पहाटे पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यकिरणात तो अधिकच तेजाळून निघतो. सोन्यापेक्षाही जास्त झळाळी त्यावर दिसून येते. काळे मधुकर भुंगे त्यावर मध मिळविण्यासाठी भुंगगूSS, भुंगूगुSS करत फुलाफुलांतून उडत असतात. मध्येच निळ्या- सोनेरी रंगाचे, लांब टोकदार चोचीचे सूर्यपक्षी बहावावर येऊन गोंधळ घालत झाडांच्या फांदीफांदीतून गिरक्या घेत फिरतात. सदाबहार आंबा, पेरु, अशोक वृक्षाला पाखरांच्या आवाजाला कंठ फुटतो. जांभळाच्या झाडावर पोपट, मैना, बुलबुल, कोकिळेसह कधीकधी राखी बगळा शेंड्यावर बसून खालील भक्ष्याकडे लक्ष ठेऊन असतो, तर कोराटा, गुलाब, जास्स्वंद, जाई-जुई, चमेली इत्यादी लहान सहान फुलझाडांवर राखी वटवट्या, सूर्यपक्षी, शिंपी इ. पक्षीगण मध, किडे-कीटकं टिपण्यात गुंग झालेले असतात.
आमच्या घरातील स्वयंपाक ओट्याच्या खिडकीपलीकडे सात-आठ फुटावर पाच फुटी भिंत असून त्यावर सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांच्या येरझारा सुरु असतात. त्या भिंतीवर एका ठिकाणी कुटूंबातील सदस्यांनी खाल्लेली पपई, अंगूर, डाळिंब, जांभूळ, पेरु, संत्रा, आंबा इ. अर्धवट फळे आम्ही ठेवतो. त्याच्या बाजूलाच एका लहानशा गाडग्यात पाणी ठेवण्यात येते. सकाळी-सकाळी येथे तर रंगबिरंगी पक्ष्यांचा मेळाच भरतो. निसर्गदेवतेने सृष्टीत मुक्तपणे रंगाची उधळण केली असेल तर ती पक्ष्यांवर.
पहाट झाली की, वरच्या विजेच्या तारांवर मैना, बुलबुल, चिऊताई, मुनिया, कोकीळ, खाटीक, कोतवाल, ब्राम्हणी मैना इ. पक्षी जमतात. यात सर्वात अगोदर खारुताई क्षणाक्षणाला परिस्थितीचा आढावा घेऊन खाली उतरतात. चिक् चिक् आवाज करत आपली झुबकेदार शेपटी फुलवत तेथे ठेवलेल्या फळांवर, अन्नावर ताव मारतात. भाताचा एक शीत पुढील दोन पायांच्या बोटात पकडून करवतीसारख्या दाताने ते बारीक करुन खात बसतात. पोट भरले की पाण्याच्या गाड्यागवर उंच होऊन दोन पाय वर ठेवून पाणी पितात. एवढ्यात मैना, चिमण्या, बुलबुल तेथे उतरतात. अन्नाचे, फळांचे कण चोचीत पकडून उडून जातात. काही पक्षी थेट आपल्या घरट्यात पोहोचतात. लहान पिल्लांना खाऊ घालतात. परत परत एका नव्या आशेने त्यांच्या येरझारा सुरु असतात. परंतु पोटाला पाहिजे तेवढेच अन्न ते मिळवतात. माणसासारखे आधाशासारखे खात बसत नाही किंवा त्याचा साठाही करत बसत नाहीत. पक्ष्यांना उद्याची काळजी नसते. एवढ्यात कोकीळ नर-मादी येतात त्यामुळे तेथे ताव मारत बसलेले लहान पक्षी भीतीने भुर्रकन उडून जातात. पक्ष्यांमध्ये इतर लहान पक्षी मोठ्या बलिष्ठ पक्ष्यांचा भीतीयुक्त आदर करतात, कारण त्यांना शरीराप्रमाणे खाद्यही जास्त लागते. त्यातही कधीकधी भूक लागलेले बुलबुल, मैना धारिष्ट्य करुन तेथे पोहोचतात व काही कण मिळविण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या प्रसंगी तेथे मग सातबाया, चिमण्या, बुलबुल, कोकीळ इ. पक्ष्यांची भाऊगदी होते, परंतु एकमेकांवर कधी ते हल्ले करत नाहीत. एकमेकांच्या हातातील,चोचीतील पदार्थ हिसकत नाहीत. बिचारे, आपआपले पोट भरुन उडून जातात. कधी-कधी काव काव करत कावेळेही येतात, चोचीत जमेल तेवढे घेतात आणि तारावर बसून खातात. निघून जातात. पक्ष्यांमध्ये आतताईपणा दिसून येत नाही. माणसाचे मात्र याविरुध्द आहे. का तर माणसाच्या ठायीठायी स्वार्थ दडला असतो.
परसातील लहान-मोठ्या वृक्षलतांमुळे पाखरांची उपस्थिती सतत असतेच. त्यामुळे किड्या-कीटकांचे प्रमाण अतिशय नियंत्रणात राहते. साप, गोम, विंचू फार कमी दिसतात किंवा आपणास दिसण्यापूर्वीच पाखरांच्या ते दृष्टीस पडून त्याचा फडशा पाडतात. त्यामुळे कधीही कुठल्याही रासायनिक पावडर किंवा स्प्रेचा उपयोग करावा लागत नाही. पक्षी मानवी जीवन सुसह्य करीत असतात. पक्ष्यांना अन्न, राहण्यासाठी इवलासा निवारा व सुरक्षितता मिळाली की तेच तुमचं रक्षण करतात. आपल्या कुळांची वाढही करतात. त्याचबरोबर खाल्लेल्या फळातील बिया आपल्या विष्ठेवाटे जमिनीवर टाकतात. पावसाळ्यात त्याची रोपं अंकुरतात व कालांतराने झाडेही तयार होतात. जी शुध्द ऑक्सिजन देण्याचं काम जीवनभर मोफत करत असतात. परिसराला निरोगी ठेवण्यासाठी, शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्ष्यांची उपयुक्तता अत्यंत आवश्यक आहे. उंदीर, घुशींवर हे पक्षी नियंत्रण ठेवतात. मृत पावलेले किडे-कीटकं खाऊन टाकतात. पर्यावरण संतुलनासाठी किती महत्त्वाचे योगदान हे पक्षी देत असतात. माणूस हे कधी शिकणार? पर्यावरण संतुलनाची जबाबदारी काय केवळ पशुपक्ष्यांचीच आहे ?
सूर्यास्तानंतर अंधार दाटू लागला की, ठिपकेवाले घुबड (मटमट्या) सक्रिय होतात. तारावर बसून च्यूक च्यूक च्यूकाट आवाज करतात. त्यातून ते एकमेकांच्या अस्तित्वाची, भक्ष्याची किंवा सुरक्षेची जाणीव इतरांना करुन देतात. परिसरात खाली जमिनीवर साप, विंचू, उंदीर इ. भक्ष नजरेत पडले की, भक्ष्याचा आकार, दिशा, वेग यांचा ताळमेळ साधून आपली शिकार साधतात. रात्रभर मग या मटमट्यांचेच राज्य असते. मात्र, अधूनमधून टिटव्यांचा टिवटिवाट मात्र सुरु असतो. टिटवी हा एकमेव पक्षी असा असावा की, जो दिवसरात्र चोवीस तासही सजग राहतो. इतर पक्षीविश्व रात्री मात्र शांत असते.
शिक्रा, कापशी, कावळ्यासारखे शिकारी पक्षी परिसरात आले की, मग इतर लहान-मोठे पक्षी अंडी, पिल्लं किंवा स्वत:च्या रक्षणासाठी किलबिलाट करतात. आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत असतात. बहादूर आणि चपळ असलेला कोतवाल पक्षी मात्र शिकारी पक्ष्यांचा पाठलाग करुन त्याला हुसकावून लावतो आणि परिसरातील पक्ष्यांवर आलेले संकट दूर करतो. म्हणूनच तर कोतवाल पक्ष्यांच्या आसऱ्याने इतर लहान पक्षी आपले जीवनचक्र सुरु ठेवतात. आदिमानव सुध्दा अन्न मिळविणे, सुरक्षा इ. गोष्टी समूहात राहूनच शिकला. त्यातूनच त्याचा विकास साधत गेला. कदाचित पक्ष्यांकडूनच चांगले गुण मानव शिकला असावा. कारण पक्षी हे मानवापूर्वी लाखो-करोडो वर्षापासून या पृथ्वीवर आपलं जीवन जगत आले आहेत. पर्यावरणाचं संतुलन साधत आले आहेत.हंसदेव चिरचित मृगपक्षिशास् या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे–शिक्षणायाश्च यत्नेन रक्ष्णीयाश्च सर्वदा
तदानीमेव हि नृपा जन्मसाफल्यमीरितम (अर्थात पक्षी प्रयत्नाने राखावे व त्यास शिकवावे. तेव्हाच मानवजन्म सफल झाला असे समजावे.)
पक्षी हे मूर्तिमंत वात्सल्याचे प्रतीक आहे. जोडी जमली की, आपले घरटे ते स्वत:च बांधतात. मादी त्यात अंडी देते. दोघे मिळून अंडी उबवतात. दोघेही पिल्लांचे डोळ्यात तेल घालून संगोपन करतात. पंख फुटेपर्यंत त्यांना चांगलं -वाईट शिकवितात. मादी दगावली तर नर पिल्लांचं संगोपन आत्मीयतेने करतो. दोघेही दगावली तर शेजारच्या घरट्यातील पक्षी पिल्लांना चारा भरवतात. तसेच पक्षी हे कर्मयोग्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. अनासक्त वृत्तीने पिल्लांची वाढ करतात. त्यांच्यासाठी जीव द्यायला ते मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, पिल्लं जाणती झाली की, ते त्यांचा त्याग करतात. मोहमायेच्या बंधनात ते कधी अडकत नाहीत. सुगरण पक्षी विणीनंतर पिल्लं मोठी झाली की घरटं सोडून देतो. म्हणून तर कबीराने म्हटले आहे – ना घर मेरा, ना घर त तेरा
दुनिया रैन बसेरा निसर्गाचं पर्यायानं वातावरणाचं संतुलन बिघडवण्यात मानवानं मात्र सतत पुढाकार घेतला आहे. यात सर्वात प्रमुख गंभीर बाब म्हणजे लोकसंख्येचा भस्मासूर. जगात माणसाची संख्या सात अब्जापर्यंत जाऊन पोहोचली आहे. गावाची नगरं, नगराची महानगरं यामुळे जंगलं, शेती यांचा अतोनात ऱ्हास मानवाच्या निवासासाठी, विकासासाठी होत आहे. विकासासाठी औद्योगिकीकरण आणि त्यामुळे होणारे अपरिमित प्रदूषण या सर्वांच्या विळख्यात पृथ्वी संकटात सापडली आहे. याचा विचार कोण करणार?
प्राणी कळपात राहतात. पक्षी थव्याने राहतात. माणूस समुहाने राहतो. कारण मानव हा सुध्दा निसर्गाचा एक घटक आहे. मात्र, केवळ चंगळवाद आणि स्वार्थाच्या हव्यासापोटी माणसाचा हा समूह अलीकडे दुभंगल्यासारखा वाटत आहे. त्यासाठी केवळ निसर्गाचं संतुलन, संवर्धन आणि रक्षण हेच प्रमुख भूमिका बजावू शकते.
उपनिषदामध्ये झाडाच्या बी ला मानवी जनुकाची उपमा दिली आहे. झाडाचं बी आणि मानवी जनूकं सारखेच. बी जमिनीत पुरवल्यावर पावसाच्या थेंबामुळं ते अंकुरतं, रोपटं होतं. कालांतराने मोठं झाड तयार होतं. ते केवळ झाड नसतं तर ते पशु-पक्षी, किडे-कीटकांचं एक गाव असतं. ते जीवनभर उन्हा-तान्हात एकाच ठिकाणी उभं राहून सजीवसृष्टीला केवळ देण्याचच काम करतं. झाडं जीवनभर काहीही न मागता केवळ देण्याचचं काम करतात तर मानव केवळ घेण्याचच काम करतो. घेता घेता आयुष्य गमावतो आणि देण्याचं पवित्र कार्यच विसरुन जातो.
ते करायचं असेल तर लवकरच वर्षाऋतूला सुरवात होत आहे.
पर्यावरण समृध्दीचा एकच झरा, एक बी मातीत पुरवा, ते वाढवा, रक्षण करा , 
निसर्ग हाच गुरु खरा, सुखी जीवनाचा मंत्र बरा ! प्र.सु.हिरुरकर.


रानभूल, जवाहर नगर,
नवसारी बसस्टॉप जवळ,
पो.व्ही.एम.व्ही.अमरावती.444 604
भ्र.ध्व.9822639798.
ranbhul@gmail.काम

माहिती स्रोत: महान्यूज, मंगळवार, ०२ जून, २०१५

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate