অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतातील संकटग्रस्त पक्षी - वनपिंगळा

भारतातील संकटग्रस्त पक्षी - वनपिंगळा

भारतातील संकटग्रस्त पक्षी - वनपिंगळा

Owlet

जगात सुमारे २०४ जातीची घुबडे सापडतात, या पैकी सुमारे ३८ जाती भारतात सापडतात. जगातील सर्वात मोठे घुबड “ब्लाकीश्तोन मत्स्य घुबड” आहे तर सर्वात लहान आहे “एल्फ घुबड”. गव्हाणी घुबड हे जगातील सर्वात सामान्य घुबड आहे आणि हे जगात सर्वत्र सापडते. सहाराचा अति शुष्क प्रदेश, दक्षिण गोलार्धातील अति दूर बेटे आणि अंटार्क्टिक सोडून घुबडांचे वास्तव्य जगातील सर्व उपखंडात आहे.

घुबड म्हंटले कि ब-याच जणांच्या मनात भीती उभी राहते याचे कारण त्याच्याशी निगडीत असणाऱ्या अंधश्रद्धा. हा पक्षी रात्रिंचर असल्यामुळे आणि माणसाच्या चेहऱ्याशी याचे साधर्म्य असल्यामुळे याच्या भोवती गूढ वलय निर्माण झाले आहे. भारताच्या ब-याचशा भागात घुबडास अशुभ मानतात. पण पुर्वौत्तर भारतात आणि खास करून पश्चिम बंगालमध्ये यास लक्ष्मीचे वाहन समजतात; हे किटक आणि उंदीर खाऊन मानवाची सेवा करतात हे यामागचे कारण आहे.

वन पिंगळा हे भारतील एक दुर्मिळ घुबडं आहे. हे प्रदेशनिष्ठ (Endemic) असून हे जगात फक्त मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगांमधील पानगळीच्या विरळ जंगलात सापडते. १८७२ साली पक्षीशास्त्रज्ञ ए. ओ. ह्यूम यांनी या पिंगळयाचे नामकरण शास्त्रज्ञ एफ. आर. ब्लेविट यांच्या सन्मानार्थ हेटेरोग्लौक्स ब्लेवीटी (Heteroglaux blewitti शास्त्रीय नाव) असे केले. १८७२ ते १८८४ या कालखंडात याचे ७ नमुने गोळा करण्यात आले. या नंतर या घुबडाला नामशेष समजलं जायचं, कारण १८८४ नंतर याला कोणीही पाहिले नाही. तब्बल ११३ वर्षांनी (१९९७ साली) हा पक्षी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जंगलात दिसून आला. यामागचे प्रमुख कारण कदाचित याचे सामान्य पिंगळयाशी असणारे साधर्म्य तसेच दिनचर स्वभाव असावा (शेकडा ९०% घुबडाच्या रात्रिंचर असतात).

हा पिंगळा आपले घरटं झाडाच्या ढोलीत करतो आणि वर्षानुवर्षे तीच ढोली पुन्हा पुन्हा वापरतो. आताच्या संशोधनातून असे दिसून आले आहे कि या ढोल्या एका जोडीने सुमारे दोन दशकं वापरलेल्या आहेत. नर आणि मादी पिंगळा एकमेकांशी फार इमानदार असतात. विणीच्या हंगामात, मादी जेंव्हा अंडी उबवते तेंव्हा नर मादीला अन्न पुरवण्याचे काम करतो. पिल्ले झाल्यावर दोघे मिळून पिल्लांना सांभाळतात.  हा पिंगळा सुमारे २० जातीचे प्राणी खातो, त्यात ९ जातीचे उंदीर, ३ जातीच्या चिचुंद्र्या, ३ प्रकारचे सरपटणारे प्राणी, ३ प्रकारचे पक्षी आणि सागाच्या सालीतील टोळ यांचा समावेश आहे.

हा पिंगळा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जंगलाला लागणारे वणवे, अतिक्रमण, अवैध जंगल कटाई यामुळे याचं नष्ट होणार आधिवास हेच आहे. पण या पिंगळयाचे महत्व नर्मदेच्या खोऱ्यात राहणाऱ्या माणसांसाठी अनन्यसाधारण आहे. याचा खास संबंध आहे सागाच्या झाडांशी. सागाच्या साली खाणारे टोळ हा याच्या अन्नातील प्रमुख घटक आहे. त्यामुळे सागाच्या जंगलांची निगा राखण्यात याचा प्रमुख वाटा आहे. सागाची जंगले अबाधित राहिली तर नर्मदा नदीच्या खोऱ्यातील पाण्याचा साठा सुरक्षित राहील. सर्वात महत्वाचे म्हणजे हि जंगले कार्बनची मोठी कोठारे आहेत; हवामान बदलासारख्या मोठ्या आपत्तीला रोखण्यासाठी या जंगलांचे महत्व मोठे आहे. शास्त्रज्ञ असे म्हणतात कि जर हवामान बदलाची आपत्ती भारतावर आली तर नर्मदेच्या खोऱ्यातील शेती भारताला अन्न पुरुवू शकते. म्हणूनच वन पिंगळा भारतीयांच्या अस्तित्वासाठी अतिशय महत्वाचा पक्षी आहे. त्याच्या अस्तित्वावर आपले भविष्य अवलंबून असल्यामुळे त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.

 

 

लेखक: डॉ. गिरीश जठार

 

सौजन्य: हा लेख १९ जानेवारी २०१४ रोजी दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाला.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate