অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतातील संकटग्रस्त पक्षी - हिमालयन लावा

भारतातील संकटग्रस्त पक्षी - हिमालयन लावा

भारतातील संकटग्रस्त पक्षी - हिमालयन लावा

Lava

हिमालयन लावा

 

आज आपण भारतातील एका दुर्मिळ आणि रहस्यमयी अशा हिमालयात राहणाऱ्या पक्ष्याची माहिती घेऊ या. हा जमिनीवर राहणारा छोटासा पक्षी तित्तीर, लावे, चकोत्र्या, रानकोंबडे, यांच्या कुळातील आहे. पण त्याच्या बद्दल माहिती करून घेण्याआधी आपण जाणून घेऊ कि यांचे कुटुंब कसे आणि किती मोठे आहे.

जगात सुमारे १८८  जातीचे तित्तर, लावे, रान कोंबडे, चकोत्र्या सापडतात. त्यांना आपण जुन्या जगात (आफ्रिका, आशिया आणि युरोप खंड) सापडणारे आणि नव्या जगात (अमेरिका खंड) सापडणारे असे विभागू शकतो. या सर्वांमध्ये लाव्यांची विविधता सर्वात जास्त आहे, जगात सुमारे ११४ जातींचे लावे सापडतात. हे समुद्र सपाटीपासून बर्फाच्छादित प्रदेशांपर्यंत सर्वत्र आढळतात. ते सहारा वाळवंट, ऑस्ट्रेलियाचा काही भाग, दक्षिण अमेरिकेचा शुष्क प्रदेश, अंटार्क्टिक आणि आर्क्टिक, सोडून जगभरात सर्वत्र सापडतात. जुन्या जगात यांच्या ७८ जाती, तर नव्या जगात ३६ जाती सापडतात. त्यापैकी सुमारे ११ लावे भारतात सापडतात. यांचे वर्गीकरण आपण ढोबळमानाने लावे, झुडपी लावे आणि बटेर असे करू शकतो.

हिमालयन लावा सामान्य लाव्यापेक्षा मोठा आणि तित्तर पक्ष्यापेक्षा लहान होता. याचे १२ नमुने सन १८३६ ते १८७६ या दरम्यान संग्रहालयात जतन केले गेले. यापैकी फक्त ९ च आता वेगवेगळ्या संग्रहालयात अस्तित्वात आहेत. या पक्षाचे नामकरण ग्रे नावाच्या शास्त्रज्ञाने याचा नमुना सापडल्यावर सुमारे १० वर्षांनी सन १८४६ मध्ये केले. हा पक्षी उत्तराखंड राज्यातील देहरादून जवळील झरीपाणी, मसुरी जवळील बनोग भद्राज आणि नैनीताल येथील शेर का दंडा या परिसरात पाहिला गेला. याची शेवटची खात्रीलायक नोंद १८७६ साली शेर का दंडा येथील आहे. यानंतर हा पक्षी नामशेष झाला असावा असे समजले जाते.

याचे शास्त्रीय नाव Ophrysia superciliosa (ओफ्रीसिया सुपरसिलीओसा) असे आहे. याचा अर्थ भुवई असणारा लावा असे होते. हे नाव नर पक्ष्याच्या डोळ्यावर असणाऱ्या आकर्षक अशा पांढऱ्या रंगाच्या भुवई सदृश्य पिसांमुळे पडले आहे. नर पक्षी सुंदर अशा करड्या रंगाचा आणि लालचुटुक पायांचा तर मादी भुरकट तपकिरी रंगाची होती.

हा सुमारे १६५० ते २००० मीटर उंचीवर थंड प्रदेशात रहात असे. हा प्रामुख्याने डोंगर उतारावरील उंच गवत आणि खुरट्या झुडपात राहत असे. हा पक्षी ५-६ संख्येने छोट्या थव्यात राहत असे. कोणाची चाहूल लागल्यास उडून जाण्यापेक्षा हा पळणेच पसंत करायचा. हा मुख्यत्वे गवताच्या बिया, छोटी फळे आणि किडे यावर उदरनिर्वाह करत असावा. हा पक्षी स्थानिक स्थलांतर करत होता असे त्यावेळच्या पक्षी शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. याच कारण बहुधा या लाव्याचे सर्व नमुने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पकडले गेले. तसेच याला ज्या लोकांनी पहिले ते नोव्हेंबर ते जून च्या दरम्यानच. थंडीच्या मोसमात ते उंच थंड प्रदेशातून तुलनेने कमी थंड असलेल्या प्रदेशात स्थलांतर करत असावेत. याच्या विणीच्या हंगामाविषयी खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही.

दुर्दैवाने असा हा सुंदर आणि दुर्मिळ पक्षी १८७६ सालानंतर पाहिला गेला नाही. याला नामशेष होऊन आज सुमारे १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या पक्ष्याला शोधण्याच्या अनेक मोहिमा निष्फळ ठरलेल्या आहेत. त्यामुळे या पक्ष्याला आता अति संकटग्रस्त पक्ष्याचा दर्जा देण्यात आला आहे. असे म्हंटले जाते कि बेसुमार शिकार आणि आधिवासाचा ऱ्हास ही याच्या नामशेष होण्याची प्रमुख कारणे असावीत. पण याच्या नामशेष होण्यामागचे सत्य हे आपणास कधीच समजणार नाही. तसेच या पक्ष्याचे निसर्गातील स्थान काय होते आणि याचा मानवाला काय फायदा होता हे हि समजणे आता शक्य होईल असे वाटत नाही.

 

लेखक: डॉ. गिरीश जठार

 

सौजन्य: हा लेख 16 फेब्रुवारी २०१४ रोजी दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाला.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate