অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भुलेबिसरे समुद्र पक्षी…. मेहरूण तलावाच्या वास्तव्याला

भुलेबिसरे समुद्र पक्षी…. मेहरूण तलावाच्या वास्तव्याला


जळगाव शहराची तहान भागविणारा मेहरूण तलाव. शहरातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. म्हणून सकाळी फेरफटका मारण्यासाठी तेथे लोकांची गर्दी होत असते. असाच फेरफटका मारतांना तलावात विशिष्ट पक्षांचे थवे दिसले. हवेत घिरट्या मारून नंतर जलाशयावर त्यांना उतरतांना पाहणे ही गम्मतच होती. एक थवा काळ्या डोक्याच्या पक्षांचा होता तर दुसरा तपकिरी. हे नक्कीच विदेशी पाहुणे असावेत, या कुतुहलात असतांनाच या पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मेहरूण तलाव परिसरात भटकंती करण्यासाठी आलेले जळगावातले पक्षीनिरीक्षक राजेंद्र गाडगीळ यांची भेट घेतली. त्यांनीच सांगितले की, हा थवा आहे कुरव पक्षांचा ज्यांना समुद्र पक्षी असेही म्हणतात.

कुरव अर्थात समुद्र पक्षी…. हे सध्या जळगावच्या मेहरूण तलावात आले आहेत, पण ते जळगावात आले कसे? हे कुरव जातीचे पक्षी त्यांचं नाग ब्लॅक हेडेड गल आणि ब्राऊन हेडेड गल. समुद्र पक्षी हे पाणी असलेल्या ठिकाणीच जातात. या पक्षांचा भारतातील विहाराचा काळ हा मार्च एप्रिल असाच असतो. मे च्या सुमारास ते त्यांच्या मूळ निवासाकडे म्हणजे रशियाचा उत्तरी भाग किंवा अतिथंड प्रदेशाकडे रवाना होतात. तेथेच ते त्यांचा वीणीचा हंगाम साधतात.

भारतात हे पक्षी तिबेट, लदाख, मानसरोवर या हिमालय पर्वतरांगांच्या थंड रांगांकडून येतात आणि समुद्र किनाऱ्याने भटकंती करतात. प्रामुख्याने हे थव्यांनीच आपला प्रवास करीत असतात. या प्रवासात हे पक्षी समुद्र किनाऱ्यालगत आपले भक्ष्य शोधतात. किनाऱ्याला लागलेल्या जहाजांच्या अवतीभवती फिरणे हा यांचा आवडता कार्यभाग असतो… गाडगीळ या पक्षांची माहिती सांगत होते.
पक्षीनिरीक्षक गाडगीळांच्या मते ते जळगावकडे बहुदा रस्ता भरकटल्यामुळे आले असावेत. पण जळगावला आल्यावर त्यांना मेहरूण तलावासारखा जलसाठा दिसल्यावर ते आपले भक्ष्य शोधण्यासाठी येथे थांबले असावेत. या आधी कधीही हे समुद्र पक्षी जळगाव आणि परिसरात दिसलेले नाहीत.

असेही जळगावचा मेहरूण तलाव हा अनेक पक्ष्यांचे विहारस्थान आहे. अनेक दुर्मिळ पक्षीही तेथे अनेकदा दिसतात. याच मेहरूण तलाव परिसराचा विकास व सुशोभिकरण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आता पर्यंत जळगाव परिसरात 168 पक्षी प्रजातींचा वावर आढळला आहे. त्यात अनेक विदेशी पाहुण्या पक्ष्यांचाही समावेश आहे. उपलब्ध जलसाठे व वृक्षवल्लींमुळे येणारे हे पक्षी पर्यटकांना आनंद देतातच. पण त्यांच्या वावराने या निसर्गसंपदेचे महत्त्व पटते. अन्यथा हे पक्षी जळगावची वाट चुकलेच नसते.

-मिलिंद दुसाने
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate