অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधमाश्या पालन : शेती उत्पादन वाढीचा नवा मार्ग

मधमाश्या पालन : शेती उत्पादन वाढीचा नवा मार्ग


सध्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ अशा विविध कारणांमुळे शेती करणे जिकरीचे झाल्यामुळे तरूण वर्ग शेतीकडे पाठ फिरवू लागला आहे. अशा परिस्थितीत फक्त शेती करून उत्पन्नाचे साधन वाढविता येत नाही. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड तसेच पूरक व्यवसायाची जोड द्यावी लागेल.

तरच शेती ही किफायतशीर होईल. अनेक तरूण आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळले आहेत. त्यातून अनेक प्रयोग सुरू केले आहेत. त्यातलाच एक व्यवसाय म्हणजे मधुमक्षिका पालन होय.
मधमाश्या पालनातून अकोले तालुक्यातील राजू कानवडे या युवकाने बेरोजगारीवर मात केली आहे. मधमाशी पालन म्हणजे फक्त मधासाठीच हा विचार खोडून मधमाशांचा वापर करून परागीभवनाच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढविण्यासाठी करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
राजू कानवडे या तरुणाने कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता स्वत:ची जिद्द व मेहनतीच्या जोरावर गेल्या सहा वर्षापासून व्यवसायात यश मिळविले आहे. अकोले तालुक्यातच नव्हे तर इतर तालुक्यातही राजू कानवडे यांच्या मधमाश्यांना मागणी वाढू लागली आहे. मधमाश्यांचा वापर फक्त मधासाठीच नव्हे तर शेतीतील भाज्या, फळे, कांदा, लसूण यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कानवडे यांनी केला आहे.

याद्वारे त्यांच्याबरोबरच इतर शेतकऱ्यांचाही फायदा होत आहे.
महाराष्ट्रात सर्वप्रथम लातूर येथील दिनकर पाटील आणि नंतर पुण्यातील सागर मावकर यांनी मधमाश्या पालनाचा व्यवसाय सुरु केला, या दोघांच्या मार्गदर्शनाने व प्रोत्साहनाने राजू कानवडे हे या मधमाश्या पालनाच्या व्यवसायात उतरले.

खादी ग्रामोद्योगाच्या सहाय्याने राजू कानवडे या तरुण शेतकऱ्याने महाबळेश्वर येथील खादी ग्रामोद्योग मंडळात प्रशिक्षण घेतले आहे. सुरुवातीला स्वत:च्या शेतात वेलवर्गीय भाज्यांचे, फळांचे, कांदा व लसूण यांच्या बियाण्याच्या उत्पादन वाढीसाठी त्यांनी या मधमाश्यांचा वापर केला.

मधमाश्यांमुळे उत्पादन दुपटीने वाढल्याचा अनुभव त्यांना आला. त्यातूनच नगर जिल्ह्यातील विविध फळबागांचे परागीभवन मधमाश्यांच्या साहाय्याने करण्याचे काम श्री. कानवडे यांनी सुरु झाले. आता ते राजुरी, वाकडी, पिंप्रीनिर्मळ, नारायणगाव, मंचर, ममदापूर, माहे जळगावपासून ते थेट कर्नाटकातील विजापूर तसेच, राजस्थान या ठिकाणी देखील मधमाश्यांच्या परागीभवनासाठी पेट्या घेऊन जातात.
मधमाश्यांच्या साहाय्याने विविध फळांच्या फुलांचे परागीभवन करतात. या संबंधीची माहिती श्री. कानवडे यांनी दिली. ते म्हणाले की, मधमाश्यांच्या साहाय्याने परागीभवन घडवून आणण्यासाठी मधमाश्यांच्या वसाहतीत प्रामुख्याने दोन प्रकारच्या माश्या आवश्यक असतात. राणी माशी व दुसरी म्हणजे कामकरी माशी.

कामकरी माशीचे आणखी चार उपप्रकार आहेत, ते म्हणजे दायी माशी, संरक्षक माशी, बांधकाम माशी आणि साफसफाई करणारी माशी. राणी माशीचे साधारण आयुष्यमान हे तीन वर्ष इतके असते, तर कामकरी माशीचे तीन ते सहा महिने इतके आयुष्यमान असते. राणीमाशी दिवसाला 1500 ते 2000 अंडी घालतात. कामकरी माश्या फुलांतील मकरंद घेण्याचे काम करतात. या माश्यांची दर सात दिवसांनी तपासणी करावी लागते. त्यात पराग व मकरंद पुरवठा योग्य आहे की नाही हे पाहिले जाते.
आज राजू कानवडे यांच्याकडे मधमाश्यांच्या 230 पेट्या आहेत. त्यात प्रत्येकी दीड ते दोन हजार कामकरी माश्यांसह सुमारे चाळीस ते पन्नास हजार इटालियन मेलाफेरा जातीच्या माश्या आहेत. एक एकर डाळिंब फुलोऱ्यात आले की 15 ते 20 दिवस परागीभवन करण्यासाठी मधमाश्यांच्या पाच पेट्या तेथे ठेवल्या जातात. त्यासाठी सहा ते सात हजार रुपये शुल्क घेतले जाते. श्री. कानवडे यांना या व्यवसायातून 10 ते 15 लाख रुपये इतके वार्षिक उत्पन्न मिळते.

गेल्यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील साडेसहाशे एकर क्षेत्रातील डाळिंब बागांमध्ये फुलोऱ्यात असताना पाळीव मधमाश्यांच्या सहाय्याने परागीकरण करण्यात आले. त्यामुळे फलधारणेचे प्रमाण खूपच वाढले. फळांचा रंग देखील चमकदार झाल्याचा अनुभव आला. मध उत्पादनासाठी पाळलेल्या माश्या आता शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी मदत करु लागल्या आहेत. डाळिंबाचे आगार समजल्या जाणाऱ्या पिंपळीनिर्मळ येथील डाळिंब बागांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

महाराष्ट्रात 15 ऑक्टोबरनंतर हिरव्या चिमण्यांचे आगमन होते. या चिमण्यांचा मधमाश्यांना धोका असतो. त्यामुळे हे ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात मधमाश्या घेऊन कर्नाटकातील विजापूर भागाता जातात. तेथे सूर्यफुलाचे मकरंद घेऊन माश्या मधनिर्मिती करतात. तर 15 डिसेंबरनंतर राजस्थानातील मोहरी उत्पादन होणाऱ्या भागात जातात.
मधमाश्यांच्या एका पेटीतून पंधरा ते वीस दिवसात पाच ते सात किलो मध मिळतो. यासाठी मध काढणीसाठी मधयंत्र असून मधमाश्याच्या पेटीतील प्लेटचे कॅपिंग करुन ती प्लेट मधयंत्रात बसवून हाताने ते यंत्र फिरवले जाते. त्यातून प्लेटमधील मध काढण्यास मदत होते. हा मध नैसर्गिक असून त्यात कुठल्याही प्रकारचे कृत्रिम घटक वापरले जात नाही. या मधाला 200 रुपये प्रति किलो भाव मिळतो.

विविध कंपन्या हा मध जागेवरच विकत घेत असल्याने श्री. कानवडे यांना विक्रीसाठी कुठलेही श्रम घ्यावे लागले नाही. या मधमाश्यांमुळे फळबागांचे परागीभवन व मधनिर्मिती असे दुहेरी फायदा होतो. अशाप्रकारे मधमाश्यांचा वापर शेतीसाठी केल्यास 30 ते 40 टक्के उत्पादनात वाढ करता येईल, हे श्री. कानवडे यांनी दाखवून दिले आहे.
श्री.कानवडे यांच्या कामाची दखल अनेकांनी घेतली आहे.

राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अनेक वेळा त्यांच्या या उपक्रमाला भेट देऊन माहिती घेतली. त्याचबरोबर पुणे येथील पुणे सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर या संस्थेच्या सहाय्याने अमेरिकेतील दोन पीएच.डी.चे विद्यार्थी येत्या 15 जूनला त्याच्या उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी येणार आहेत. यापुर्वी देखील नगरच्या अनेक पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

 

-संजीवनी जाधव-पाटील

माहिती सहाय्यक, शिर्डी

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, ०४ जून, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate