অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पक्षिवर्ग

पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या पाच वर्गांपैकी पक्षी वर्गात (एव्हीज वर्गात) सर्व पक्ष्यांचा समावेश होतो. पिसे, शरीराचे उच्च तापमान व पंख या विशेष लक्षणांमुळे ते सहज ओळखू येतात आणि इतर प्राण्यांहून ते भिन्न आहेत हे समजून येते. काही शास्त्रज्ञांनी ‘पिसांचे देहावरण असलेला द्विपाद’ अशी पक्ष्याची व्याख्या केली आहे.

पक्ष्याची जास्त सविस्तर व्याख्या पुढीप्रमाणे देता येईल : पक्षी हा नियततापी (पर्यावरणाच्या तापमानात बदल होत असला, तरी शरीराचे तापमान ठराविक पातळीवर स्थिर असणारा; उष्ण रक्ताचा) पृष्ठवंशी प्राणी असून त्याचे हृदय सगळ्या सस्तन प्राण्यांच्या हृदयाप्रमाणेच चार कोष्ठांचे (कप्प्यांचे) बनलेले असते, पुढच्या पायांचे पंखांत परिवर्तन झालेले असते, शरीर पिसांनी आच्छादिलेले असते, प्रजोत्पादन कॅल्शियमयुक्त कवच असलेल्या अंड्यांच्या योगाने होते आणि दृष्टी अतिशय तीष्ण असते; भोवतालच्या परिस्थितीची माहिती मिळविण्याकरिता पक्षी मुख्यत: डोळ्यांवरच अवलंबून असतात.

प्रस्तुत नोंदीत सर्वसाधारण पक्ष्याची शरीररचना, अंडी, पिलांचे संगोपन, अनुकूलनानुसार (ज्या प्रक्रियेने एखादा प्राणी विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य होतो तिच्यानुसार) प्रकार, जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) व क्रमविकास (उत्क्रांती), वर्गीकरण, पक्षी व मानव यांतील परस्परसंबंध इ. माहिती दिलेली असून गरुड, हंस, मोर, कबूतर, घार, एमू, पेंग्विन, किवी इ. महत्त्वाच्या पक्ष्यांवर स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत. पक्ष्यांचे स्थलांतरण व उड्डाण यांविषयीची माहिती ‘प्राण्यांचे स्थलांतर’ व ‘प्राण्यांचे उड्डाण’ या नोंदीत दिलेली आहे. पाळीव पक्ष्यांसंबंधी ‘पाळीव प्राणि’ या नोंदीत विवरण दिले आहे. पक्ष्यांच्या वर्तनाविषयीच्या माहितीकरिता ‘पक्षिगान’, ‘पक्ष्यांचा थाटमाट’, ‘प्रणयाराधन’ व ‘प्राण्यांचे वर्तन’ या नोंदी पहाव्यात.

आ. १. पक्ष्याच्या शरीराचे भाग : (१) कपाळ, (२) डोळे व नाक यामधील भाग, (३) चोच, (४) हनुवटी, (५) कानावरील पिसे, (६) पंखाचा बाक, (७) गळा, (८) छाती (वक्ष), (९) मधली आच्छादक पिसे, (१०) मोठी आच्छादक पिसे, (११) पोट, (१२) बाजू, (१३) द्वितीयक पिसे, (१४) कूस, (१५) प्रथम आद्यके, (१६) आद्यके, (१७) शेपटीच्या खालची आच्छादक पिसे, (१८) शेपटीची पिसे, (१९) शेपटीची बाहेरील पिसे, (२०) शेपटीची वरील आच्छादक पिसे, (२१) नितंब, (२२) उड्डाण पिसे, (२३) खांद्यावरील पिसे, (२४) पाठ, (२५) छोटी आच्छादक पिसे, (२६) मानेचा काटा, (२७) मस्तक, (२८) पाय, (२९) बोटे.

शरीररचना : पक्ष्याचे शरीर पिसांनी झाकलेले असते. ते प्रवाहरेखित (हवा किंवा पाणी यांचा रोध किमान होईल अशा आकाराचे) आणि निमुळते असल्यामुळे त्याला हवा किंवा पाणी यातून सहज जाता येते. पंख हलके व बळकट असतात आणि पक्षी स्वस्थ बसला असताना ते शरीरालगत दुमडलेले असतात. पाय सडपातळ व मजबूत असून सामान्यत: त्यांवर पिसे नसतात. डोके, मान, धड, पंख, पाय आणि शेपूट हे पक्ष्यांच्या शरीराचे मुख्य भाग होत.

आ. २. आहार पद्धतीप्रमाणे झालेल्या चोचींचे प्रकार : (१) रानकावळा (कापण्यासाठी), (२) चिमणी (बिया फोडून खाण्यासाठी), (३) प्रवाळपाद पक्षी (चिखलातील अन्न मिळविण्यासाठी), (४) पाणकावळा किंवा करढोक (मासे पकडण्यासाठी दातेरी कडांची चोच), (५) घार (मासांत घुसविण्यासाठी व फाडून खाण्यासाठी), (६) सुतार पक्षी (लाकूड तासण्यासाठी), (७) हंसक (चिखलातील अन्न गाळून घेण्यासाठी चाळणी), (८) सूर्यपक्षी (फुलातील मध खाण्यासाठी).

डोके : चोच वरच्या आणि खालच्या जंभांची (जबड्यांची) मिळून बनलेली असते. तिचा उपयोग भक्ष्य पकडून नेण्याकरिता त्याचप्रमाणे घरटे बांधण्याकरिता लागणारे साहित्य नेण्याकरिता होतो. शत्रूशी झुंजण्याकरिताही तिचा उपयोग होतो. चोचीच्या साहाय्याने पक्षी आपल्या शरीराची निगा राखतो व शरीरावरील पिसे साफसूफ करतो. आहारपद्धतीनुसार चोचींच्या आकारात फेरफार झालेले असतात (आ. २). जंभ शृंगी (शिंगाच्या द्रव्यासारख्या द्रव्याच्या) आवरणाने झाकलेले असतात. जंभांच्या काठांवर दातांसारखे पुढे आलेले प्रवर्ध (वाढी) किंवा खाचा असणे शक्य असते; परंतु खरे दात केव्हाही नसतात. पक्षी आपल्या दृष्टीवर जवळजवळ सर्वस्वी अवलंबून असल्यामुळे त्यांचे नेत्रगोलक सापेक्षतेने मोठे असतात. पुष्कळ पक्ष्यांचे डोळे डोक्याच्या बाजूंवर असल्यामुळे आणि नेत्रगोलकांची फारच थोडी हालचाल होत असल्यामुळे त्यांची द्विनेत्री दृष्टी (दोन्ही डोळ्यांच्या साहाय्याने एकच प्रतिमा मिळून होणारे त्रिमितीय व यथार्थ दृष्टिज्ञान) मर्यादित असते. म्हणून बहुतेक पक्ष्यांना प्रत्येक डोळ्याने बरेच वेगवेगळे दृश्य दिसते. तथापि घुबडासारख्या पक्ष्यांचे डोळे डोक्यावर समोरच्या बाजूला असल्यामुळे त्यांची द्विनेत्री दृष्टी पुष्कळच चांगली असते. भोरड्यांसारखे इतर काही पक्षी अंतराचा अंदाज घेण्याकरिता डोळे खाली किंवा पुढे फिरवून द्विनेत्री दृष्टीत वाढ करतात अथवा ती तीव्र करतात. झाडाच्या एखाद्या फांदीवर बसायला जाताना किंवा भक्ष्यावर हल्ला करताना ते हे करतात.

डोक्याच्या बाजूवर डोळ्याच्या मागे कानाचे छिद्र असते; ते पिसांच्या एका खास गाबडीने (ठिगळाने) झाकलेले असते. कधीकधी ही पिसे विशिष्ट रंगाची असून त्यांना कर्ण-पिच्छे (कानावरील पिसे) म्हणतात. बाह्य कर्ण अथवा कर्ण-पल्लव नसतो.

मान

सस्तन प्राण्यांच्या मानेमध्ये सामान्यत: सात मणके असतात; पण पक्ष्यांच्या मानेमध्ये त्यांची संख्या यापेक्षा अधिक असल्यामुळे त्यांची मान जास्त लवचिक असते. राजहंसाच्या मानेमध्ये सु. २५ मणके असतात आणि कोकिळ व पोपट यांच्यासारख्या यष्टिसादी (खांब, फांद्या, डहाळ्या इत्यादींवर विश्रांती घेणाऱ्या; पर्चिंग) पक्ष्यांमध्ये १३ इतके थोडे मणके असू शकतात. मणक्यांच्या पल्याणाकृतिसंयोजी (खोगीराच्या आकाराच्या हाडांना जोडणाऱ्या) पृष्ठांमुळे मानेला अधिक लवचिकपणा प्राप्त होतो. घुबड हे अशा लवचिकपणाचे ठसठशीत उदाहरण होय. ते आपले डोके २७० अंशांतून (वर्तुळाचा तीन चतुर्थांश) फिरवू शकते.

पंख

पक्ष्यांचा क्रमविकास चालू असताना आद्य पृष्ठवंशी अग्रपादांचा (पुढच्या पायांचा) पंख बनला; बाहूतील भुजास्थी (खांदा व कोपर यांमधील लांब हाड) आणि प्रबाहूतील (कोपर व मनगट यांमधील हाताच्या भागातील) अरास्थी आणि अरत्नी या अस्थी (आ. ४) न बदलता तशाच राहतात; पण मनगट, पंजा (तळहात) आणि बोटे यांच्या बहुतेक हाडांचे दृढतेकरिता थोड्या घटकांत सायुज्यन (एकत्रीकरण) होते. पसरलेल्या पंखाचे पृष्ठ ज्या मोठ्या अतिव्यापी उड्डाण-पिसांचे बनलेले असते, त्या पिसांची सबंध ओळ अरत्नीच्या पश्च काठाला आणि मनगट व बोटांच्या सायुज्यित अस्थींना चिकटलेली असते.

छाती

(वक्ष). पंखाच्या जोरदार झटक्यांमुळे उत्पन्न होणाऱ्या ताणाला प्रतिरोध करण्याकरिता छाती मजबूत व दृढ असावी लागते व पक्ष्यांमध्ये ती तशीच असते. छातीमध्ये बरगड्यांचा बनलेला पिंजरा असतो व त्याने पाठीचा कणा उरोस्थीला जोडलेला असतो. प्रत्येक बरगडीपासून एक प्रवर्ध निघून तो मागच्या बरगडीवर गेलेला असतो, यामुळे पिंजऱ्याला जास्त मजबुती येते. जोराने पुष्कळ वेळ उडणाऱ्या पक्ष्यांची उरोस्थी रुंद असून तिच्यावर खोल कणा असतो आणि त्याला महत्त्वाचे उड्डाण-स्नायू चिकटलेले असतात. न उडणाऱ्या पक्ष्यांच्या उरोस्थीवर कणा नसतो. वासनास्थी (सायुज्यित जत्रुकास्थी म्हणजे कॉलरचे हाड) आणि लगतच्या अंसतुंडास्थी उरोस्थीच्या पुढच्या भागाला बळकटी आणतात व त्यामुळे छातीच्या दृढतेत भर पडते.

पाय

पक्षी द्विपाद संचलनाकरिता पाय वापरतात; प्रत्येक पायावर जास्तीत जास्त चार बोटे असतात. सामान्यत: तीन बोटे पुढच्या बाजूकडे आणि एक मागच्या बाजूकडे असते. तथापि काही सुतार पक्षी व कोकिळ यांना पुढे दोन आणि मागे दोन अशी बोटे असतात. तीनच बोटे असणे ही काही असाधारण गोष्ट नाही; खंड्या आणि काही सुतार पक्षी यांना तीन बोटे असतात. शहामृग हा एकच पक्षी असा आहे की, त्याला दोनच बोटे असतात.

आ. ३. पक्ष्यांच्या पायांचे प्रकार : रानकावळा (फांदीवर बसण्यासाठी आणि उचलण्यासाठी), (२) सुतार पक्षी (वर चढण्यासाठी), (३) शिकरा (भक्ष्य धरून ठेवण्यासाठी व भोसकण्यासाठी), (४) जकाना (पानांवर चालण्यासाठी), (५) क्षिप्रचला (धावण्यासाठी) (६) दुर्बल (चिकटून राहण्यासाठी) (७) कुरव (पोहण्यासाठी), (८) पाणकावळा (पोहण्यासाठी), (९) डुबडुबी (पोहण्यासाठी).

पक्ष्याची तंगडी त्याचप्रमाणे बोटेदेखील पिसांच्या ऐवजी खवल्यांनी आच्छादिलेली असतात. गुल्फास्थी (घोट्याची हाडे) संमिश्र असून घोट्याच्या आणि पावलाच्या अस्थींच्या सायुज्यनाने बनलेली असते. पक्ष्याच्या तंगडीची रचना वेगाने धावण्याकरिता असल्यामुळे तिची तुलना माणसाच्या पायाशी न करता घोड्याच्या अथवा मृगाच्या मागच्या पायाशी करता येईल. तंगडीच्या वरच्या टोकाशी असलेल्या हाडांच्या संधिस्थानाची घोट्याशी तुलना करता येईल, गुडघ्याशी करता येणार नाही.

तंगडीच्या वर नडगी असून ती अंतर्जंघास्थी व प्रऱ्हसित (ऱ्हास पावलेल्या) लहान बाह्य जंघास्थी (किंवा अनुजंघास्थी) या दोन अस्थींची बनलेली असते. पायाचा हा भाग कमीजास्त प्रमाणात पिसांनी झाकलेला असतो. नडगीच्या वर मांडी अथवा ऊर्वस्थी असते. मांडी व गुडघा ही दोन्ही सामान्यत: पार्श्व-पिच्छांनी पूर्णपणे झाकलेली असतात.

हालचाल करणे, आधार घेणे, भक्ष्य पकडणे, पोहणे इ. कार्यांसाठी पक्ष्यांच्या पायांत फेरबदल झालेले दिसून येतात. (आ. ३).

नितंब

नितंबाला अथवा श्रोणिमेखलेला पाय सांधलेले असून ती अतिशय ताठ अथवा दृढ असते. त्रिक्-कशेरुक युग्मित श्रोणिफलक, आसनास्थी आणि जवनास्थी (आ. ४) या सर्वांच्या एकत्र सायुज्यनामुळे पाठीच्या खालच्या बाजूला एक भरीव खंड (भाग) तयार होतो. सस्तन प्राणी आणि सरीसृप (सरपटणारे प्राणी) यांच्या जघनास्थींच्या पुढच्या भागांचे जरी सायुज्यन होत असले, तरी पक्ष्यांमध्ये जघनास्थींच्या पुढील भागांचे सायुज्यन होत नाही. अंडी घालण्याच्या वेळी यांची टोके अलग होतात; यामुळे मोठी अंडी घालण्याकरिता हे अनुकूलन झालेले असावे असे वाटते.

कंकाल

(सांगाडा).पक्ष्याच्या शरीरात हाडांचा सांगाडा असून त्यामुळेच पक्ष्याच्या शरीराला विवक्षित आकार आलेला असतो. सर्वसाधारणपणे पक्ष्याच्या शरीरातील मुख्य अस्थींची व्यवस्था किंवा मांडणी सस्तन प्राण्यांच्या हाडांप्रमाणेच असते; परंतु काही महत्त्वाचे फरकही आढळतात. आ. ४ मध्ये कोंबडीचा कंकाल दाखविला आहे. पक्ष्यांच्या कंकालाची मुख्य वैशिष्ट्ये पुढे दिल्याप्रमाणे आहेत : सगळ्या अस्थी वजनाने हलक्या असतात. शरीरातील लांब अस्थींमधील मज्जागुहिका (द्रव वाहून नेणाऱ्या वाहिन्या ज्यात आहेत अशा संयोजी पेशीसमूहाने युक्त म्हणजे मज्जायुक्त लांब हाडांमधील पोकळी) मोठी असते आणि प्रौढ अवस्थेत तिच्यात मज्जा नसते, पुष्कळ अस्थींमध्ये फुफ्फुसांशी अखंड असणारे वायुकोश (हवेच्या पिशव्या) असतात, अनेकदा हाडांतील अस्थि-ऊतकाची (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहाची) रचना स्पंजाप्रमाणे असते. कवटीची बहुतेक हाडे सायुज्यित असतात; कवटी कशेरुकदंडाच्या (पृष्ठवंशाच्या म्हणजे पाठीच्या कण्याच्या) पुढच्या टोकाला एका पश्चकपालास्थी-कंदाने (कवटीची मागची बाजू आणि तळाचा भाग तयार करणाऱ्या फुगीर हाडाने) सांधलेली असते; मान आणि वक्ष वगळून बाकीच्या भागातील मणक्यांचा सायुज्यित होण्याकडे कल असतो; श्रोणि-प्रदेशातील (कमरेच्या भागातील) मणक्यांचे अगदी घट्ट सायुज्यन झालेले असते व त्यांच्या श्रोणी-अस्थींशी झालेल्या संयोगामुळे संत्रिक तयार होते. शेपटीत थोडेच मणके असतात आणि त्यांपैकी काहींचे सायुज्यन झालेले असते. अगदी लहान अस्थिकांचे एक पूर्ण वलय डोळ्यातील बाहुलीच्या भोवती असते.

आ. ४ कोंबडी कंकाल : (१) जंभ (जबडे), (२) मानेचे मणके, (३) एकत्रित मणिबंधास्थी व करभास्थी, (४) बोटे, (५) जत्रू, (६) उरोस्यास्थी, (७) उरोस्थी, (८) गुडघ्याचा सांधा, (९) अंतर्जंघास्थी (१०) घोट्याचा सांधा, (११) गुल्फास्थी, (१२) पायाची बोटे, (१३) बाह्य संघास्थी, (१४)ऊर्वस्थी,(१५) आसनास्थी, (१६) जघनास्थी, (१७) शेपटीचे मणके, (१८) पुच्छ-हलास्थी, (१९) श्रोणिफलक, (२०) संत्रिक, (२१) बरगड्या, (२२) वक्षीय मणके, (२३) अरत्‍नी, (२४) अरास्थी (प्रबाहू), (२५) भुजास्थी.त्वचा : पक्ष्यांची त्वचा सामान्यत: पातळ, मऊ, लवचिक आणि नाजूक असते. बहुतेक सगळ्या त्वचेवर दाट पिसे असतात; परंतु गिधाडांसारख्या काही पक्ष्यांच्या डोक्यावरील व मानेवरील त्वचेचा काही भाग उघडा असतो. कधीकधी ही उघडी कातडी चकचकीत रंगाची असते आणि काही पक्ष्यांमध्ये –उदा., महोका, कॅसोवेरी वगैरे- तिच्यापासून मांसल गलुली (गुठळ्या) तयार होतात.

पक्ष्यांच्या त्वचेत तेल ग्रंथी याच काय त्या ग्रंथी असतात. यांत शेपटीच्या लगेच वर असणाऱ्या दोन ग्रंथींचा समावेश होतो. या ग्रंथींपासून एक तेलकट पदार्थ स्रवतो आणि पिसांची निगा राखण्याकरिता पक्षी या स्रावाचा उपयोग करतात. पुष्कळ पक्ष्यांत जरी या तैल ग्रंथी असल्या आणि जलचर पक्ष्यांमध्ये जरी त्यांची चांगली वाढ झालेली असली, तरी काही पोपट आणि कबूतरांच्या काही जाती यांमध्ये त्या मुळीच नसतात.

पिसे

पक्ष्याचे शरीर झाकणारे पिसांचे आवरण अथवा पिसारा हे या प्राण्यांचे एकमेव अत्यंत विशिष्ट अथवा भेददर्शक लक्षण आहे. पिसे बाह्यत्वचीय शृंगी संरचना असलेली असून क्रमविकासामध्ये ती सरीसृपांच्या खवल्यापासून उत्पन्न झालेली आहेत, कारण पक्षी हे सरीसृपांचे वंशज आहेत. पक्ष्यांच्या अतिव्यापी पिसांमुळे त्याची रूपरेषा नितळ होते व त्यांच्यामुळे पक्षी हा एक कार्यक्षम उडणारे यंत्र बनतो. उष्णता निरोधक म्हणूनही पिसांना अतिशय महत्त्व आहे. त्यांच्यामुळे शरीराचे उच्च तापमान नेहमी टिकून राहते. पिसांची रचना व आकारमान यांत बरीच विविधता दिसून येते; परंतु नमुनेदार पिसामध्ये यांत बरीच विविधता दिसून येते; परंतु नमुनेदार पिसामध्ये एक सडपातळ निमुळता पिच्छ-दंड (पिसाचा दांडा) असून त्याच्या दोन्ही बाजूंना पिच्छफलक असतात. पिच्छ-दंडाच्या तळाकडचा आखूड भाग (पिच्छाक्ष) वाटोळा व पोकळ असून त्याच्यावर पिच्छफलक नसतात. पिच्छ-दंडाच्या दूरस्थ (लांबच्या) भागावर –प्राक्ष-फलक असतात. हा भाग भरीव असून अनुप्रस्थ (आडव्या) छेदात कोणीय असल्याचे दिसून येते. प्रत्येक फलक अगदी निकट असलेल्या समांतर पिच्छकांच्या श्रेणीचा (मालेचा) बनलेला असतो, प्रत्येक पिच्छकावर शाखांच्या दोन ओळी असून या शाखांना पिच्छिका म्हणतात आणि प्रत्येक पिच्छिकेवर अगदी लहान शाखांच्या (पिच्छिकाप्रवर्धांच्या) दोन ओळी असतात. काही पिच्छिका-प्रवर्धांच्या टाकांवर आकडा (अंकुश) असतो. पिच्छिका-प्रवर्धांचे अतिव्यापन होऊन त्यांचे अंकुश अडकतात व त्यामुळे मजबूत पण हलके फलक तयार होतात. [® पीस].

पिसांचे कित्येक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे विशिष्ट कार्याकरिता रूपांतर झालेले असते. पक्ष्याचे शरीर झाकणाऱ्या सामान्य पिसांना आवरण-पिच्छे म्हणतात. यांपैकी उडण्याच्या कामी उपयोगी पडणारे पिच्छाक्ष विशेषकरून मोठे आणि ताठ असतात. कोमल-पिच्छांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पिच्छाक्ष अतिशय आखूड असून प्राक्ष नसतो आणि पिच्छक मऊ व एके ठिकाणी गोळा झाल्यासारखे दिसतात. ही बहुधा आवरण-पिच्छांच्या खाली दडलेली असतात आणि त्यांच्यामुळे उष्णता निरोधनात भर पडते. रोम-पिच्छे ही केसांसारखी पिसे असून ती आवरण-पिच्छांमध्ये विखुरलेली असतात. शूक ही फलकहीन पिसे होत. किडे पकडणाऱ्या पुष्कळ पक्ष्यांच्या मुखाजवळ, धनेशाच्या पापणीच्या केसांमधून आणि काही पक्ष्यांत इतर जागीही शूक आढळतात.

पिसांची वाटणी व संख्या

पेंग्विनसारख्या काही थोड्या पक्ष्यांच्या शरीरावर पिसांची एकसारखी वाटणी झालेली असते; परंतु बहुतेक पक्ष्यांत आवरण-पिच्छांची निश्चित प्रदेशात वाटणी झालेली असून पक्ष्याच्या शरीराच्या पृष्ठभागावर या प्रदेशांची मर्यादित क्षेत्रे (पिच्छ-क्षेत्रे) असतात. या क्षेत्रांतून पिसे पसरून उघड्या (जेथे पिसे नसतील त्या) क्षेत्रांना (अपिच्छ-क्षेत्रांना) आच्छादतात.

पंखांच्या मागच्या भागाचा काठ ज्यांचा बनलेला असतो ती लांब उड्डाण-पिसे (पक्ष-पिच्छे) कौलांप्रमाणे एकमेकांवर येऊन त्यांच्यापासून पंखाचा बहुतेक पृष्ठभाग बनतो. या पिसांची संख्या ठराविक असून पक्ष्यांच्या वेगवेगळ्या गटांत ती बदलते. आद्यकांची (बोटांना जोडलेल्या पक्ष-पिच्छांची) संख्या उत्तर व दक्षिण अमेरिका व त्यांच्या आसपासच्या प्रदेशातील चिमण्यांमध्ये ९ असते, तर बहुतेक सूर्यपक्ष्यांमध्ये १० आणि डुबडुबी व बलाक यांत ती १२ असते. द्वितीयकांची (अंत:प्रकोष्ठिकेला जोडलेल्या पक्ष-पिच्छांची) संख्या बहुतेक गाणाऱ्या पक्ष्यांमध्ये ९ असते, तर लांब पंखांच्या ॲल्बेट्रॉसमध्ये ती ३२ पर्यंत पोहोचते. पक्ष-पिच्छांचे खालचे भाग (तळ) लहान पिसांनी-आवरकांनी-वरून व खालून व्यापलेले असतात त्यामुळे पंखावरची रूपरेषा सफाईदार होते.

पक्ष्याच्या शेपटीची बरीचशी लांबी शेपटीच्या लांब पिसांच्यामुळे (पुच्छ-पिच्छांमुळे) बनलेली असते. पक्ष्यांच्या बहुतेक गटांत पुच्छ-पिच्छांची निश्चित संख्या असते. बहुतेक पक्ष्यांत पुच्छ-पिच्छांच्या ६ जोड्या असतात; परंतु काही रेल (कुक्कुटी) आणि कोकिळ यांत ४ जोड्या असतात आणि कृकण पक्ष्यांसारख्या (महोका) इतर काही पक्ष्यांत त्या १६ असतात. पक्ष्यांच्या अंगावर एकंदर किती पिसे असतात हे जाणण्यासाठी काही पक्ष्यांच्या शरीरावरील पिसांची मोजदाद केली गेली आहे. मर्मर पक्ष्याच्या अंगावर अगदी थोडी म्हणजे ९४० पिसे आढळली, पुष्कळ गाणाऱ्या पक्ष्यांच्या अंगावर १,५०० पासून ३,००० पर्यंत व शीळ घालणाऱ्या हंसावर सु. २५,००० पिसे आढळली. उत्तर ध्रुवीय प्रदेशातील पक्ष्यांच्या शरीरावर बहुतकरून उष्ण कटिबंधातील त्यांच्या एवढ्या आकारमानाच्या त्यांच्या नातेवाईक पक्ष्यांपेक्षा जास्त पिसे असतात. थंडीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने हे अनुकूलन झाले असले पाहिजे, हे उघड आहे.

निर्मोचन (पिसे गळणे). पिसाची पूर्ण वाढ झाली म्हणजे ते कोरडे आणि निर्जीव होते व त्याला होणारी इजा किंवा त्याची होणारी झीज भरून येणे शक्य नसते; त्याची भरपाई करण्याकरिता ही पिसे गळून पडतात आणि ठराविक काळाने त्याच्या जागी नवी तयार होतात. जुन्या पिसांची जागा भरून काढण्याची ही प्रक्रिया वर्षातून एकदा विणीच्या हंगामानंतर लगेच होते. या प्रक्रियेत नवी तयार होणारी पिसे जुन्या पिसांना बाहेर ढकलतात व त्यामुळे ती गळून पडतात. सामान्य वार्षिक निर्मोचनाला लक्षात ठेवण्यासारखे बरेच अपवाद आहेत, पुष्कळ गाणाऱ्या पक्ष्यांमध्ये वसंत ऋतूत एक जादा अपूर्व निर्मोचन होते आणि बदकांमध्ये देह-पिच्छांचे वर्षांतून दोनदा पूर्ण निर्मोचन होते.

निर्मोचन ही सामान्यत: क्रमाक्रमाने होणारी प्रक्रिया आहे, एका वेळी फक्त काही थोडी पिसेच गळून पडून त्यांच्या जागी नवी येतात. यामुळे बहुतेक पक्ष्यांचे शरीर नेहमी पिसांनी पुरेसे झाकलेले असते व निर्मोचन चालू असताना देखील ते उडू शकतात. याच्या उलट बदके आणि इतर काही थोड्या पक्ष्यांत सामान्यत: अंडी फुटून पिल्ले बाहेर पडल्यानंतर निर्मोचनाने सगळी उड्डाण-पिसे एकदम गळून पडतात त्यामुळे निर्मोचन चालू असेपर्यंत त्यांना उडता येत नाही.

रंग : चोच, पाय आणि डोळे यांचे रंग पिसांच्या रंगांशी जुळणारें किंवा त्यांच्यापेक्षा स्पष्टपणे निराळे असू शकतात. पिसांचा रंग बव्हंशी दोन गोष्टींमुळे उत्पन्न झालेला असतो : पिसातील वर्णक अथवा रंजकद्रव्य आणि पिसाची सूक्ष्म संरचना. सूक्ष्म संरचनेच्या योगाने प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे) आणि परावर्तन होत असल्याने त्यामुळे खाली असणाऱ्या वर्णकीय रंगात फेरफार (बदल) होतात. बहुतेक पक्ष्यांच्या पिसामध्ये सामान्यत: मेलॅनिने (पिवळी-तपकिरी ते काळी) आणि कॅरोटिनॉइडे (पिवळी ते तांबडी) हे वर्णक आढळतात. पिसाचा पांढरा रंग त्याच्या संरचनेमुळे असतो. पिसावरून सगळ्या प्रकाशाचे परावर्तन झाल्यामुळे तो उत्पन्न होतो. निळा रंग पिसाची रचना आणि मेलॅनीन वर्णकामुळे उत्पन्न होतो; ज्या संरचनेपासून निळा रंग उत्पन्न होतो त्याच रचनेपासून सामान्यत: शुद्ध हिरवा रंग तयार होतो; पण तिच्या खाली पिवळा वर्णक असतो. वर्णकाशिवाय एका निराळ्याच रचनेपासून रंगदीप्ती उत्पन्न होते. पिच्छिका-प्रवर्धांचा बाह्य पृष्ठभाग अतिशय पातळ रंगहीन स्तरांचा अथवा पटलांचा बनलेला असतो. या पृष्ठभागांवरून परावर्तित झालेल्या प्रकाश तरंगांमध्ये व्यतिकरण (सारख्याच तरंगलांबीच्या दोन वा अधिक तरंगमाला एकीवर एक येऊन मिसळल्याने होणारा परिणाम) होऊन रंग दिसतात. या पृष्ठभागांचे कोन निरनिराळे असल्यामुळे, तसेच त्यांवर पडणाऱ्या प्रकाश किरणांच्या बदलत्या कोनामुळे व्यतिकरणाद्वारे रंगदीप्ती निर्माण होते.

रंगांचे बदल : पिसाची वाढ पूर्ण झाली म्हणजे केसांप्रमाणे ते निर्जीव होते आणि त्यामुळे त्याच्यात असणारी वर्णकाची व्यवस्था त्याला बदलता येत नाही-वर्णक कमी करता येत नाही किंवा त्यात भर घालता येत नाही. तथापि रंगात कित्येक बदल होतात. काही पक्ष्यांच्या अंगावरील पिसांचे रंग विटल्यामुळे त्यांच्या रंगात बदल झाल्यासारखा दिसतो. पिसे झिजल्यामुळेही रंगात बदल होतात. ‘स्नो बंटिंग’ या पक्ष्यामध्ये पिसांच्या झिजण्याचे परिणाम स्पष्टपणे दिसून येतात. शरद ऋतूत या पक्ष्याचा रंग बदामी तपकिरी असतो, वसंत ऋतूच्या सुमारास पिसांचा तपकिरी टोके झिजून नाहीशी झाल्यामुळे पिसांचे काळे आणि पांढरे भाग उघडपणे दिसू लागतात.

अनुकूली रंग

शत्रूपासून बचाव करण्याच्या दृष्टीने लपून राहण्याकरिता आणि प्रियाराधनाच्या वेळी आपला थाटमाट वाढविण्याकरिता पक्ष्यांना काही रंगांचा उपयोग होतो. दलदलीच्या काठावरील वाळलेल्या बोरूच्या बेटात उभ्या असलेल्या बिटर्नचा (एका जातीच्या बगळ्याचा) रंग या पार्श्वभूमीशी इतका जुळणारा असतो की, इतर आक्रमक किंवा लुटारू प्राण्यांना तो मुळीच दिसत नाही. बिटर्नचा तपकिरी रेषा असणारा पिसारा रंग आणि आकृतिबंध या दोन्ही बाबतींत तो रहात असलेल्या बोरूच्या निवासस्थानाशी जुळणारा असतो. पार्श्वभूमीशी होणारी अशा प्रकारची जुळणी तपकिरी रेषा असलेला पिसारा असणाऱ्या व गवतात राहणाऱ्या काही चिमण्या, कुनाल (स्नाइप) आणि लावा या पक्ष्यांत दिसून येते.

वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या पक्ष्यांच्या पुष्कळ जातींचे रंग पुष्कळदा फिक्कट असतात आणि ते त्यांच्या पार्श्वभूमीच्या सर्वसाधारण रंगाशी जुळणारे असतात. आशिया आणि आफ्रिकेतील रखरखीत प्रदेशात राहणाऱ्या चंडोलांमध्ये अशा प्रकारच्या रंगांमध्ये आणखी प्रगती झालेली दिसून येते, ज्या जमिनीवर हे पक्षी राहतात तिच्या रंगाची झाक या पक्ष्यांच्या शरीरावर दिसून येते (उठावदार रंग असणाऱ्या काही पक्ष्यांचे मांस मंद रंग असणाऱ्या काही पक्ष्यांच्या मांसापेक्षा बेचव असते) [® रंजन, जैव].

आ. ५. पारव्याची (कोलंबा) आंतरिक संरचना : (१) प्रमस्तिष्क (मोठा मेंदू), (२) दृक्‌पाली (३) निमस्तिष्क (लहान मेंदू), (४) लंबमज्जा, (५) मणके, (६) मेरुरज्जू, (७) फुफ्फुस, (८) यकृत, (९) वृषण (पुं-जनन ग्रंथी), (१०) वृक्क, (११) मूत्रवाहिनी, (१२) रेतोवाहिनी, (१३) तैल ग्रंथी, (१४) शेवटचा मणका, (१५) उंडुक, (१६) गुदांत्र, (१७) अवस्कर, (१८) पित्तवाहिनी, (१९) अग्निपिंड, (२०) आतडे, (२१) पेषणी, (२२) ग्रंथिल जठर, (२३) उरोस्थी, (२४) परिहृदय, (२५) हृदय, (२६) अन्नपुट, (२७) ग्रसिका, (२८) श्वासनाल, (२९) जीभ, (३०) चोच, (३१) नाकपुडी, (३२) मेदुर (वरच्या चोचीच्या तळाला आच्छादणारी मऊ त्वचा), (३३) कंठ (स्वरद्वार).

आंतरिक संरचना : पचन तंत्र : (पचनसंस्था). अन्न मुखगुहिकेतून ग्रसिकेत (घशापासून जठरापर्यंत अन्न वाहून नेणाऱ्या मांसल नलिकेत) जाते. पुष्कळदा ग्रसिकेचा विस्तार होऊन ती मोठी होऊ शकते. पाणकोळ्यासारख्या (पेलिकन) काही पक्ष्यांत ग्रसिका कायमची विस्तृत होऊन गळधानी तयार होते. पाळीव कोंबडी व चिमण्या यांच्यासारख्या इतर काही पक्ष्यांत ग्रसिकेचा खालचा भाग मोठा होऊन अन्नपुट बनतो. या दोन्ही प्रकारच्या विस्तारांचा उपयोग अन्न नेण्याकरिता किंवा साठविण्याकरिता होतो. ग्रसिका जठरात उघडते. जठराच्या पुढच्या (अग्र) भागाला ग्रंथिल जठर म्हणतात, याच्या ग्रंथींपासून पाचक रस स्रवतो. जठराच्या मागच्या भागाच्या (पश्चजठराच्या) भित्ती जाड असतात, कधीकधी त्या अतिशय स्नायुमय असतात, तेव्हा या भागाला पेषणी हे नाव देतात. पक्ष्यांनी गिळलेल्या खड्यांच्या साहाय्याने अन्नातील कठीण पदार्थ या भागात दळले जाऊन त्यांचे पीठ बनते. दातांच्या अभावाची भरपाई त्यामुळे होऊ शकते. यकृत मोठे असते. पक्ष्यांच्या काही जातींत पित्ताशय असतो, तर इतर जातींत तो नसतो. लघ्वांत्राला (लहान आतड्याला) वेटोळी पडलेली असून त्याचे मागचे टोक बृहदांत्राला (मोठ्या आतड्याला) ज्या ठिकाणी जोडलेले असते त्या ठिकाणी उंडुकांची (बाहेरच्या टोकाशी बंद असणाऱ्या नळ्यांची वा पिशव्यांची) एक जोडी असते किंवा नसते. बृहदांत्र सरळ आणि आखूड असून त्याचा शेवट अवस्कराने (एका कोष्टाने) होतो. अवस्करात जननवाहिन्या (जननपेशी वाहून नेणाऱ्या वाहिन्या) व मूत्रवाहिन्याही उघडतात.

रुधिराभिसरण तंत्र : रुधिराभिसरण तंत्राचे सर्वसाधारण स्वरूप सस्तन प्राण्यांच्या त्याच तंत्रापेक्षा फारसे वेगळे नसते. तथापि त्यात काही लक्षात ठेवण्यासारखे फरक आढळतात. हृदय चार कोष्ठांचे बनलेले असून सस्तन प्राण्यांच्या हृदयापेक्षा सापेक्षतेने मोठे असते. लहान पक्ष्यांत मोठ्या पक्ष्यांतल्यापेक्षा ते सापेक्षतेने मोठे असते. ऑक्सिजनीकृत (ऑक्सिजनमिश्रित) रक्त महारोहिणी चापातून पृष्ठमहारोहिणीच्या मार्गाने शरीराला पुरविले जाते. हा महारोहिणी चाप सस्तन प्राण्यांप्रमाणे हृदयाच्या डाव्या बाजूपासून निघत नसून उजव्या बाजूपासून निघतो. हृदयाचे ठोके अतिशय जलद गतीने पडतात. सामान्यत: दर मिनिटाला ते ३००-१,००० पडतात. लहान पक्ष्यांपेक्षा मोठ्या पक्ष्यांत ते कमी असतात. विश्रांती घेत असलेल्या काही प्रौढ पक्ष्यांच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला पुढे दिल्याप्रमाणे असतात : चिमणी ४६०, रॉबिन ५७०, कबूतर २१८, कावळा ३४२, टर्की ४३.

पक्ष्यांच्या रक्तात तांबड्या कोशिका (पेशी) असून त्या अंडाकृती व केंद्रकित (कोशिकेतील कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर जटिल पुंजाने युक्त) असतात. त्या सस्तन प्राण्यांच्या रक्तरुधिर कोशिकांपेक्षा काहीशा मोठ्या असतात. पक्ष्यांच्या श्वेत कोशिका अथवा भक्षिकोशिका अतिशय क्रियाशील व कार्यक्षम असून त्या जखमांची दुरुस्ती आणि रोगजंतूंचा नाश करतात.

पक्षी हे नियततापी प्राणी आहेत, त्यांच्या शरीराचे तापमान ४०.५-४४ से. असते, म्हणजे सस्तन प्राण्यांच्या सामान्य तापमानाप्रमाणे ते १-८ से. जास्त असते.

श्वसन तंत्र

पक्ष्यांचे श्वसन तंत्र दोन फुफ्फुसे आणि कित्येक वायुकोश यांचे बनलेले असते. फुफ्फुसे सापेक्षतेने लहान असतात व त्यांचे प्रसरण आणि आकुंचन थोडे होते. वायुकोश मोठे असून देहगुहेत (शरीराच्या पोकळीत) असतात व त्यांच्या भित्ती अतिशय पातळ असतात. त्यांच्यापासून अंधवर्ध (एका टोकाशी बंद असलेल्या नलिका वा पिशव्या) निघालेले असून ते पसरून बहुधा ऊर्वस्थी, भुजास्थी आणि मणके यांत गेलेले असतात; परंतु काही जातींत ते कंकालाच्या कोणत्याही भागात, पायांच्या बोटांत सुद्धा गेलेले असतात. सस्तन प्राण्यांतल्याप्रमाणे श्वसनाला मदत करणारे मध्यपटल (छाती व उदर यांच्यामधील स्नायुमय विभाजक पडदा) पक्ष्यांमध्ये नसते, म्हणून त्याकरिता ते देहभित्तीच्या प्रसरणावर व आकुंचनावर अवलंबून असतात.

अंतःश्वसनामध्ये (हवा आत घेण्याच्या क्रियेमध्ये) हवा मुखातून अथवा नासाद्वारांतून श्वासनालात (मुख्य श्वासनलिकेत) शिरते आणि श्वसन्यांमधून फुफ्फुसात जाते; बरीचशी हवा फुफ्फुसातून पलीकडे वायुकोशात जाते. उच्छ्‌वसनामध्ये (हवा बाहेर सोडण्याच्या क्रियेमध्ये) वायुकोशांवर वक्षाच्या व उदराच्या स्नायूंचा दाब पडल्यामुळे त्यांच्यातली बरीचशी हवा पुन्हा फुफ्फुसातून जाते. श्वसन्यांचा शेवट सूक्ष्म वायु-केशिकांनी (केसासारख्या बारीक वायुनलिकांनी) होतो. या केशिकांना रक्ताचा भरपूर पुरवठा असून त्यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांची अदलाबदल होते. शरीर हलके करणे हे वायुकोशांचे कार्य आहे असा समज होतो; पण हे त्यांचे मुख्य कार्य नसून आंतरिक बाष्पीकरणाने अथवा उष्णतेच्या विसरणाने (विखुरण्याने) शरीर थंड करणे, हे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे.

पक्ष्याच्या श्वासोच्छ्‌वासाचे प्रमाण बदलणारे असून, ते तडफ मनःक्षोभ व परिस्थितीजन्य गोष्टींवर अवलंबून असते. पाळीव कोंबड्यांमध्ये हे प्रमाण दर मिनिटाला १२-३७ आणि कॅनरी पक्ष्यात ९६ ते १२० असते, तथापि हे प्रमाण पक्ष्याच्या तापमानाबरोबर बदलते. शरीराचे ४१.७ से. तापमान असलेले एक कबूतर मिनिटाला ४६ वेळा श्वासोच्छ्‌वास करीत असल्याचे दिसून आले; परंतु त्याचे तापमान वाढून ४३.३ से. झाल्यावर ते दर मिनिटाला ५१० वेळा श्वासेच्छ्‌वास करू लागले.

ध्वनि-उत्पादक इंद्रिये

पक्ष्यांमध्ये ही इंद्रिये सस्तन प्राण्याच्याप्रमाणे श्वासनालाच्या शेंड्यावर स्वरयंत्रात नसतात; पण ती श्वासनाल आणि श्वासनलिका यांच्या जोडावर असतात. पक्ष्यांच्या स्वर-पेटिकेला कूजित्र (सिरिंक्स) म्हणतात, त्यात उपास्थिमय (कूर्चेची) वलये आणि कला (पातळ पटले) असतात. काही विशिष्ट स्नायूंच्या जोड्यांनी कला हलविल्या जातात. पक्ष्याच्या प्रकाराला अनुसरून या स्नायूंच्या संख्येत बदल होतो. आत जाणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे कलांचे कंपन होऊन ध्वनी उत्पन्न होतो.

उत्सर्जन तंत्र : श्रोणीच्या खाली दोन वृक्क (मूत्रपिंड) असून ते गडद तपकिरी रंगाचे असतात. प्रत्येकापासून एक मूत्रवाहिनी निघून ती अवस्करात उघडते. मूत्राशय नसतो, म्हणून अर्धसांद्र टाकाऊ द्रव्य (मुख्यत: यूरिक अम्ल) वृक्कांपासून अवस्करात जाते. या ठिकाणी ते विष्ठेत मिसळते आणि निर्गम द्वारातून (गुदद्वारातून) त्याचे उत्सर्जन होते.

तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). पक्ष्याचा मेंदू सरीसृपाच्या मेंदूपेक्षा मोठा असतो, तो आखूड आणि रुंद असतो. प्रमस्तिष्क (मोठ्या मेंदूचे) गोलार्ध मोठे असतात आणि गंध-पाली (गंधज्ञान जेथे होते तो भाग) लहान असतात. मध्यमस्तिष्कावरील दृक्-पालींची (दृष्टिज्ञान जेथे होते त्या भागांची) विशेष वाढ झालेली असते. निमस्तिष्काच्या (लहान मेंदूच्या) पृष्ठावर पुष्कळ दुमडी तयार झाल्यामुळे पृष्ठभाग वाढलेला असतो. मेरुरज्जू आणि मेरु-तंत्रिकांच्या जोड्या वस्तुत: इतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या प्रमाणेच असतात. वक्षीय अथवा बाहु-जालक मोठ्या उड्डाण स्नायूंना तंत्रिकांचा पुरवठा करीत असल्यामुळे विशेष मोठा असतो.

अंतस्रावी ग्रंथी अथवा हॉर्मोन तंत्र : अंतस्रावी ग्रंथी (ज्यांच्यापासून उत्पन्न होणारा स्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तातच मिसळतो अशा ग्रंथी) हॉर्मोने स्रवतात व ती रक्तातून शरीराच्या विविध भागांत जातात. या हॉर्मोनांचे जे काही महत्त्वाचे परिणाम होतात त्यांत शरीराची वाढ, देहव्यापार आणि हंगामी वर्तन यांवरील प्रभावांचाही समावेश होतो.

पोष ग्रंथी मेंदूच्या तळाखाली असून तिला अधिप ग्रंथी म्हणतात, कारण तिच्या स्त्रावाचा पुष्कळ शरीरक्रियांवर प्रत्यक्ष प्रभाव तर पडतोच; पण त्याशिवाय ती इतर ग्रंथींवर नियंत्रण ठेवते. प्रकाशाच्या तीव्रतेत होणाऱ्या हंगामी बदलांचा पोष ग्रंथीवर परिणाम होणे शक्य असल्यामुळे ती प्रजनन आणि स्थानांतर यांच्यासारख्या चक्रीय क्रियांवर नियंत्रण ठेवण्याकरिता कालमापन-यंत्रणेचे कार्य करू शकते. अवटू ग्रंथी गळ्यात असून आहाराचा तिच्यावर परिणाम होतो, आयोडिनाच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी मोठी होते अथवा गळ्याला गलगंड नावाचा रोग होतो. अवटू ग्रंथीच्या स्रावाने पिसांची वाढ, रंगाचे निक्षेपण (साचविण्याची क्रिया) व इतर शरीरक्रिया यांचे नियंत्रण होते. परावटू ग्रंथीदेखील गळ्यातच असते आणि तिच्या स्त्रावाचा अनेक दैहिक प्रक्रियांवर परिणाम होतो. पक्ष्यांच्या वृक्कांच्या अधर पृष्ठावर असलेल्या दोन अधिवृक्क ग्रंथींच्या कार्यांविषयी विशेष माहिती नाही [® अंतस्रावी ग्रंथी].

वर उल्लेख केलेल्या अंतस्रावी ग्रंथीखेरीज शरीरातील काही अंगे आपली विशिष्ट कार्ये तर करतातच; पण त्यांशिवाय हॉर्मोनांचेही स्रवण करतात. अशा अंगांमध्ये अग्निपिंड आणि जनन ग्रंथी यांचा समावेश होतो. आंत्राच्या पहिल्या वळशामध्ये असणाऱ्या अग्निपिंडातील लांगरहान्स द्वीपकांपासून (पी. लांगरहान्स या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या व अग्निपिंडाच्या ग्रंथिल भागात मधूनमधून बेटांसारख्या दिसणाऱ्या कोशिका-पुंजांपासून) इन्शुलीन स्रवते. या स्रावाने ग्लुकोजाच्या चयापचय क्रियेचे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींचे) नियंत्रण होते. जनन ग्रंथींच्या स्रावांचा दुय्यम लैंगिक लक्षणांवर (उदा., नर व मादी यांच्या पिसांची लक्षणे) ताबा असतो.

ज्ञानेंद्रिये : पक्षी आणि मानवसदृश स्तनी हेच प्राणी असे आहेत की, ज्यांची दृष्टी आणि श्रवण तीक्ष्ण असते; पण घ्राणेंद्रिय मंद असते.

दृष्टी : पक्ष्यांच्या दृष्टीच्या कार्य प्रवृत्तीची माणसाच्या दृष्टीच्या सामर्थ्याशी तुलना करता येते; पण त्यात दोन मुख्य फरक आढळतात. पहिला फरक हा की, बहुतेक पक्ष्यांची दृष्टी मुख्यत: एकनेत्री असते कारण त्यांचे डोळे डोक्याच्या बाजूंवर असतात. या पक्ष्यांच्या डोळ्याला एखाद्या वस्तूचे जे चित्र दिसते ते सपाट द्विमितीय असते व त्यामुळे मूळ वस्तूचे यथार्थ दर्शन होत नाही. याच्या उलट मनुष्य आणि घुबडासारखे काही पक्षी यांच्यात वस्तूचे दिसणारे चित्र त्रिमितीय व वस्तूचे यथार्थ दर्शन घडविणारे असते. अशा एकनेत्री पक्ष्यांना दृष्टीची खोली मिळण्याकरिता डोके फिरवावे लागते. तथापि एकनेत्री दृष्टी असणाऱ्या पक्ष्यांमध्ये सुद्धा पक्ष्याच्या अगदी समोर असलेले लहान क्षेत्र तो द्विनेत्री दृष्टीने पाहू शकतो. द्विनेत्री दृष्टी कितीही मर्यादित असली, तरी भक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पक्ष्याला तिचा बराचसा फायदा होतो.

दुसरा लक्षात ठेवण्यासारखा फरक हा की, पक्ष्याच्या डोळ्याच्या रचनेवरून असे दिसते की, पक्ष्याला डोळ्यांनी दिसणारे चित्र स्वच्छ आणि सगळ्या बारीकसारीक गोष्टी स्पष्टपणे दाखविणारे असते; पण मनुष्याला एका वेळी दृष्टिक्षेत्राच्या एका लहानशा भागाचा तपशीलच फक्त दिसतो.

काही पक्षी मुख्यत्वेकरून दिनचर रंगांच्या वर्णपटांची सबंध रांग मनुष्याप्रमाणे पाहू शकतात. रात्रिंचर पक्ष्यांना आपले भक्ष्य रात्री दिसते असे म्हणतात; पण या म्हणण्याला काहीही आधार नाही. घुबड गडद अंधारात आपले भक्ष्य पकडतात; पण या कामी ती आपल्या अत्यंत तीष्ण श्रवणेंद्रियांचा उपयोग करतात.

श्रवण : पक्ष्यांमध्ये बाह्यकर्ण (कानाची पाळी व बाह्यकर्णमार्ग यांनी बनलेला भाग) नसल्यामुळे त्यांना सस्तन प्राण्यांप्रमाणे ध्वनितरंग गोळा करून अंतर्कर्णाला पाठविता येत नाहीत. सस्तन प्राण्यांमध्ये बाह्यकर्णापासून ध्वनितरंग अंतर्कर्णाला पाठविण्याकरिता ऐरणास्थिका, मुद्‌गरास्थिका आणि स्थापन्यास्थिका या तीन अगदी लहान अस्थी असतात [® कान]; पण पक्ष्यांमध्ये कर्णस्तंभिका ही एकच लांब अस्थी असते. पक्ष्यांची श्रवणेंद्रियेदेखील तीक्ष्ण असतात; पण महत्त्वाच्या दृष्टीने डोळ्यानंतर त्यांचा क्रम लागतो. पक्षी विविध प्रकारचे आवाज बऱ्याच अंतरावरून ऐकू शकतात. पहिल्या जागतिक युद्धामध्ये असे दिसून आले की, स्फोटांचे आवाज माणसांना काही वेळा ऐकू येत नसत; पण पक्षी मात्र त्यामुळे अनेकदा फार अस्वस्थ झालेले दिसत. आवाज कितीही बारीक असला, तरी तो त्यांना ऐकू येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घुबडे संपूर्ण काळोखात चूचू असा बारीक आवाज काढणारे उंदीर पकडतात.

गंध : बहुतेक पक्ष्यांत घ्राणेंद्रिय असते; परंतु बहुतेक सस्तन प्राण्यांतल्याप्रमाणे त्याची चांगली वाढ झालेली नसते. बाह्यत: पक्ष्यांची घ्राणेंद्रिये नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते, कारण जास्त आदिम (आद्य) पक्ष्यांमध्ये घ्राणेंद्रिये अति-विकसित आणि विशेषित पक्ष्यांपेक्षा मोठी आणि चांगली वाढ (विकसित) झालेली असतात. उदा., न्यूझीलंडमधील किवी पक्ष्याचे घ्राणेंद्रिय चोचीच्या टोकाजवळ असून अतिशय तीक्ष्ण असते. हा पक्षी चोच चिखल, पाणी किंवा गाळ यांत खुपसून केवळ वासाच्या साहाय्याने कृमी पकडतो.

रूची : (स्वाद). स्वादेंद्रिये जिभेच्या तळाशी आणि मुखगुहिकेत (तोंडाच्या पोकळीत) असतात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांत त्यांचा विकास कमीजास्त प्रमाणात झालेला असतो. जे पक्षी धान्याचे दाणे, मासे वगैरे भक्ष्य सबंध गिळतात त्यांत स्वादेंद्रिय विशेष विकास पावलेले नसते. जे पक्षी रसाळ फळांचे तुकडे करून खातात त्यांना त्यांची चव विशेष जाणवत असावी असे वाटते. काही पक्षी एखाद्या भक्ष्याबद्दल विशेष आवड दाखवितात, उदा., पट्टेरी घुबड बेडूक खाते; पण भेकाला (बेडकाशी सदृश असलेल्या व उभयचर-पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या-प्राण्याला) स्पर्श करीत नाही. चोचीचा स्पर्शेंद्रिय म्हणून काहीसा उपयोग होत असावा असे दिसते.

जनन तंत्र

(प्रजोत्पादन तंत्र). जनन तंत्र पुष्कळसे सरीसृपाच्या जनन तंत्रासारखे असते; परंतु पक्ष्यात प्रवेशी मैथुनांग नसते, यास रॅटिटी गटातील पक्षी ( उदा., शहामृग) आणि पाळीव बदके अपवाद आहेत. नर पक्षी आपल्या अवस्कराचे द्वार मादीच्या अवस्कर द्वाराला चिकटवून शुक्राणू तिच्या शरीरात सोडतो. विणीच्या हंगामात (प्रसवन-ऋतूत) जनन ग्रंथी वाढून मोठ्या होतात; पण इतर वेळी त्या अतिशय लहान असतात. नरामध्ये जनन ग्रंथींची (वृषणांची)जोडी असते; परंतु मादीमध्ये सामान्यत: फक्त डाव्या बाजूचा अंडाशय असून उजव्या अंडाशयाचा अपक्षय (ऱ्हास) होतो.

जनन-चक्रामध्ये अंडी घालणे, ती उबविणे आणि पिल्लांना पक्वदशा येईपर्यंत वाढवून मोठी करणे या गोष्टी गोवलेल्या आहेत. कित्येक गायक (गाणाऱ्या) पक्ष्यांमध्ये हे चक्र कित्येक आठवड्यांत पुरे होते, तर ॲल्बेट्रॉससारख्या काही पक्ष्यांत ते पूर्ण होण्यास जवळजवळ एक वर्ष लागते. काही गायक पक्ष्यांच्या लागोपाठ दोन किंवा तीन विणी होतात आणि नंतर हे पक्षी कित्येक महिने विश्रांती घेतात. ॲल्बेट्रॉस दोन जनन-चक्रांमध्ये एक किंवा जास्त वर्षे जाऊ देतात.

विणीचे हंगाम : पक्ष्यांचा जनन-ऋतू ठराविक असतो आणि त्याच्या नंतर काही काळ ते विश्रांती घेतात. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीचा विणीचा हंगाम वर्षातील ठराविक काळी असतो; परंतु दर १२ महिन्यांनी एकच हंगाम असलेले वार्षिक चक्र हा नियम आहे. ॲसेन्शन बेटावरील धूमिल कुररी हा या नियमाला एक लक्षात ठेवण्यासारखा अपवाद आहे. दर नऊ महिन्यांनी त्याची वीण होते. विणीच्या हंगामाचे बाह्यत: बाह्यकारणांनी नियमन केले जाते आणि प्रकाश हे यांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. समशीतोष्ण हवामानात प्रजननाला वसंत ऋतूच्या बरोबरच सामान्यत: सुरुवात होते, या कालयोजनेमुळे पिल्लांना खाऊ घालण्याकरिता पुरेसे अन्न मिळू शकते आणि पिल्ले मोठी होऊन स्वत: अन्न मिळवू लागल्यावर त्यांना ते सहज मिळू शकते. उष्ण कटिबंधात पुष्कळ ठिकाणी विणीचा हंगाम उन्हाळ्याची अखेर आणि पावसाळ्याची सुरुवात या काळात असतो, कारण या काळात किडे भरपूर मिळू शकतात.

राज्यक्षेत्र आणि युग्मन : प्रजननाचा काळ जवळ येत चालला म्हणजे कायम रहिवासी पक्षी आपल्याकरिता खास जनन-क्षेत्राची निवड करण्यास सुरुवात करतात. या क्षेत्रांना ‘राज्यक्षेत्रे’ (टेरिटरीज) म्हणतात. राज्यक्षेत्राची स्थापना ही पुष्कळ गायक पक्ष्यांच्या जननचक्राची प्राथमिक पायरी होय. पुष्कळ गायक पक्ष्यांच्या राज्यक्षेत्रांचे क्षेत्रफळ अर्धा हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त असते आणि त्याचा उपयोग प्रियाराधन, घरटे बांधणे आणि सगळे भक्ष्य मिळविणे या कामी होतो. तथापि बक आणि एकटी राहणारी कबुतरे यांत हे क्षेत्र घरट्यांच्या जागेपुरतेच मर्यादित असते. सामान्यत: नर राज्यक्षेत्राची स्थापना करतो आणि त्याचे रक्षण करतो. मादी नंतर त्याला येऊन मिळते; परंतु काही जातींच्या पक्ष्यांची मादी राज्यक्षेत्राची निवड करते व त्याचे रक्षण करण्याच्या कामात नराला मदत करते. प्रजोत्पादनाच्या काळात जोडप्याला कोणताही त्रास होऊ नये हा राज्यक्षेत्राच्या स्थापनेचा मुख्य हेतू असावा असे दिसते. जनन-क्षेत्राची निवड झाल्यानंतर सामान्यत: नर आणि मादी यांची जोडी जमते; परंतु कित्येक जातींमध्ये त्याच्या पूर्वीच जोडपे जमलेले असते.

थाटमाट (भावदर्शन) आणि गायन : संवेशनाच्या हालचालींच्या प्राथमिक अवस्थेत भावदर्शन आणि गायन या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. ज्या पक्ष्यांच्या शरीरांचे रंग निस्तेज असतात ते पक्षी गायनाचा सर्रास उपयोग करतात; पण जे आपल्या भडक रंगांचे प्रदर्शन करू शकतात त्यांना गायनाचे तितकेसे महत्त्व नसते. हे पक्षी आपल्या पिसाऱ्यावरचे चकचकीत ठिपके, शेपटीची लांबी शोभिवंत पिसे, बगलेवरचे झुपके अथवा इतर पिसे, गलुली, उघडी गलत्वचा आणि चकचकीत रंगाचे पाय यांचा उपयोग करतात. प्रदर्शन आणि गायन ही सामान्यत: (पण नेहमी नव्हे) नराची कार्ये असतात. नराच्या गाण्याचा मादीला आकर्षित करून राज्यक्षेत्रात आणण्यास आणि सबंध जनन-चक्रभर टिकून राहणारा संयोग करण्यासाठी तिला भीड घालण्याकरिता उपयोग होतो; पण जेव्हा नर अत्यंत शोभिवंत असतो आणि मादी निस्तेज असते तेव्हा मैथुनानंतर किंवा मादीने अंडी घातल्यानंतर नर मादीशी फारसा संबंध ठेवत नाही. थाटमाटाचा मुख्य हेतू मादीला आकर्षित करणे व मैथुनाकरिता उत्तेजित करणे हा असतो. [® पक्ष्यांचा थाटमाट; पक्षिगान; प्रणयाराधन].

पक्ष्यांची घरटी : अंडी ठेवण्याकरिता, ती उबविण्याकरिता आणि पिल्लांचे संवर्धन करण्याकरिता पक्षी घरटी तयार करतात. सामान्यत: घरटी साधी असतात, ती बशीसारखी किंवा खळगा असलेल्या वाटीसारखी असतात; पण काही पक्ष्यांची अशी साधी घरटीही नसतात, जमीन थोडीशी उकरून तिच्यावर चारही बाजूला गवताच्या थोड्या काड्या टाकल्या म्हणजे त्यांचे घरटे तयार होते (उदा., टिटवी).याच्या उलट कित्येक पक्षी मोठ्या श्रमाने व कौशल्याने सुंदर घरटी तयार करतात (उदा., सुगरण पक्षी).

एखाद्या विशिष्ट जातीने घरट्याकरिता निवडलेल्या जागेत भौगोलिक स्थानाला अनुसरून बदल होतो. याचे एक चांगले उदाहरण काही अमेरिकी बकांचे होय. हा पक्षी फ्लॉरिडामध्ये उंच झाडांवर घरटे बांधतो; परंतु टेक्ससच्या किनाऱ्यापासून लांब अंतरावर असलेल्या बेटात तो जमिनीवर घरटे बांधतो.

माणसाच्या ढवळाढवळ करण्याच्या वृत्तीमुळे घरटी बांधण्याकरिता पक्ष्यांनी केलेल्या जागेच्या निवडीत स्पष्टपणे बदल झालेले आहेत. एका जातीचे दुर्बल (यांना इंग्रजी भाषेत ‘चिमनी स्विफ्ट’ म्हणतात) पोकळ झाडात घरटी करण्याऐवजी धुराड्यात करतात, पर्वतीय भांडीक पर्वतांच्या कड्यांवर घरटी न बांधता हल्ली घरांवर बांधतात. मागे उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्यक्ष घरट्याच्या जागेची निवड मादी करते; पण काही जातींमध्ये नर ती जागा निवडतो आणि घरटे तयार करायला सुरुवात करतो, मादी नंतर त्याला येऊन मिळते आणि घरटे तयार करण्याच्या कामात मदत करते.

पुष्कळ पक्षी ज्या ठिकाणी नेहमी भक्ष्य मिळवितात त्या निवासक्षेत्रात किंवा त्याच्या जवळ घरटी तयार करतात. विजल्पक (वॉर्ब्लर) आपली घरटी झाडांच्या फांद्यांत बांधतात, या फांद्यांतूनच भराभर इकडे तिकडे जाऊन ते आपले भक्ष्य (कीटक) मिळवितात. कुररी व पुष्कळ ऑक पक्षी आपली घरटी पाण्याच्या अगदी जवळ बांधतात, कारण ते पाण्यातून भक्ष्य मिळवितात. पाणबुडे (डुबडुबी) सुद्धा पाण्यावर तरंगणारी घरटी बांधतात.

कित्येक पक्षी ज्या ठिकाणी नेहमी भक्ष्य मिळवितात त्याच्यापेक्षा अगदी वेगळ्या जागी घरटे बांधतात; उदा., मोठा बक नेहमी उथळ पाण्यात हिंडून भक्ष्य मिळवितो; पण घरटे मात्र उंच झाडाच्या शेंड्यावर बांधतो.

घरटे तयार करणे : ज्या पक्षि-जातींमध्ये नर आणि मादी केवळ मैथुनाकरिता एके ठिकाणी येतात त्या जातींमध्ये घरट्याविषयीची सर्व जबाबदारी मादीची असते. ज्या जातींमध्ये एकपत्नीव्रत असून जोडी जन्मभर टिकते त्यांच्यातसुद्धा मादीला घरटे बांधण्यासंबंधीचे सगळे काम करावे लागण्याची शक्यता असते; परंतु अशा प्रकारात मादी जंव्हा घरटे बांधण्याकरिता सामान गोळा करायला बाहेर जाते तेव्हा बहुधा नर तिच्याबरोबर जातो आणि कधीकधी तिला मदतही करतो. सुगरण पक्ष्यांमध्ये जोडी जमण्याच्या आधीच नर घरटे बांधण्याचे काम करतो आणि नंतर मादी घरट्याला आतून अस्तर लावते. झाडाच्या खोडात घरट्याकरिता पोकळी तयार करण्याचे काम सुतार पक्ष्यांचे जोडपे (नर व मादी) करते.

लांब चोचीचा कच्छ-चिकुर पक्षी (नर) आपल्या उपयोगाकरिता घरटे बांधतोच; पण याशिवाय आणखी काही बनावट घरटी तयार करतो, या बनावट घरट्यांना अस्तर नसते, उपयुक्ततेच्या दृष्टीने यांचा काहीही उपयोग नसतो; पण काही झोपण्याकरिता उपयोगी पडत असवीत.

पक्ष्यांना घरटे बांधण्याकरिता कमीजास्त कालावधी लागतो. एकाच जातीच्या पक्ष्यांमध्येही लागणाऱ्या वेळेचे प्रमाण कमीअधिक असते. हंगामाच्या अगदी सुरुवातीला एखाद्या गायक पक्ष्याला घरटे पूर्णपणे बांधण्याकरिता कित्येक आठवडे लागणे शक्य असते; पण भर हंगामात किंवा मादीची अंडी घालण्याची वेळ अगदी जवळ आली म्हणजे त्या पक्ष्याला घरटे तयार करण्याला काही दिवसच लागतात. मादीने घरट्यात अंडी घातली, तरी घरट्याचे काम पूर्णपणे थांबत नाही. अंडी उबविणारा पक्षी (नर किंवा मादी) मधूनमधून घरट्याच्या द्रव्यात भर घालीत असतो किंवा त्याची डागडुजी करीत असतो. [® घरटे].

अंडी, अंडी घालणे व पिल्लांचे संगोपन : जेव्हा पीतकाने (पोषक द्रव्याने) अतिशय फुगून मोठी झालेली अंडकोशिका (स्त्रीबीज) अंडाशयाच्या पुटकातून मोकळी होऊन तिचे निषेचन (फलन) होते तेव्हापासूनच नव्या पक्षिशावकाच्या (पक्ष्याच्या पिल्लाच्या) अस्तित्वाला वस्तुत: सुरुवात होते. निषेचित अंडे अंडवाहिनीतून खाली उतरत असताना त्याच्याभोवती श्वेतकाचा (भरपूर प्रथिनयुक्त पांढऱ्या बलकाचा) जाड थर, चर्मपत्रासारख्या कला आणि अखेरीस कठीण कॅल्शियमयुक्त कवच आणि त्याचे रंग तयार होतात. याच सुमारास अंडकोशिकेचा सजीव भाग वाढून एक सूक्ष्म बहुकोशिकी चकती किंवा युक्-स्तर तयार होतो, हा पीतकाच्या बाजूवर असतो. युक्-स्तरापासून पक्षिशावकाचा भ्रूण तयार होतो. अंड्यामध्ये असेपर्यंत भ्रूणाचे पीतक आणि श्वेतक यांवर पोषण होते. नुकत्याच घातलेल्या अंड्यात वायुकोष्ठिका (हवा असलेला भाग) नसते; परंतु अंड्याच्या आतील पदार्थ थंड होऊ लागले म्हणजे अंड्याच्या एका टोकाला ती उत्पन्न होते. [® अंडे].

अंड्याचे आकारमान व आकार

अंड्यांच्या परिमाणाचा ती घालणाऱ्या पक्ष्यांच्या आकारमानाशी जरी काही संबंध नसला, तरी मोठे पक्षी सगळ्यात मोठी अंडी घालतात आणि लहान पक्षी सगळ्यात लहान अंडी घालतात. प्रकूज पक्ष्यांच्या ( गुंजारव करणाऱ्या पक्ष्यांच्या) वाटाण्याएवढ्या अंड्यांपासून तो शहामृगाच्या मोठ्या अंड्यापर्यंतच्या (१६-१७ सेंमी. लांब आणि सु. १.५ किग्रॅ. वजन असलेले) विविध आकारमानांची अंडी असतात. ज्या पक्ष्यांची पिल्ले चांगली वाढ झालेल्या अवस्थेत जन्मतात ते पक्षी, ज्यांची पिल्ले कमी वाढ झालेल्या स्थितीत जन्मतात अशा पक्ष्यांपेक्षा सापेक्षतेने मोठी अंडी घालतात.

आकाराच्या बाबतीत कोंबडीचे अंडे हा आदर्श मानला जातो. त्याच्या आकाराचे वर्णन ‘अंडाकृती’ असे करतात, त्याची अनुदैर्ध्य रूपरेषा दीर्घवर्तुळ असून त्याचे एक टोक दुसऱ्यापेक्षा जास्त निमुळते असते. पक्ष्यांच्या अंड्यांचा हा नेहमी आढळणारा आकार असला, तरी काही अंड्यांचे निमुळते टोक जास्त टोकदार असते, तर काही पक्ष्यांची अंडी जास्त लांब दीर्घवृत्ताकार असतात आणि घुबडासारख्या काही थोड्या पक्ष्यांची अंडी वाटोळी असतात.

अंड्यांचा रंग : सामान्यत: अंड्याच्या कवचावर थोडीशी तकाकी असते; परंतु पाणकावळ्याच्या अंड्याच्या पृष्ठावर खडूच्या भुकटीसारखा पांढरा थर असतो, तो खपल्या पडून निघून जातो आणि कवचाचा निळा रंग दृष्टीस पडतो. कॅसोवेरी पक्ष्याच्या अंड्यावरील कवच दाणेदार असते आणि शहामृगाच्या अंड्याच्या कवचाचा पृष्ठभाग गर्तमय (लहान लहान खळगे असलेला) असतो. पुष्कळ पक्ष्यांच्या अंड्यांचे रंग सुंदर असून त्यावर ठिपके किंवा इतर चिन्हे असतात. पक्ष्याची जी जात असेल तिच्याप्रमाणे अंडी पांढरी अथवा निळसर, हिरवट, पिवळसर किंवा तपकिरी असतात, रंग सगळीकडे सारखा असू शकतो अथवा त्याच्यावर गडद अथवा मळकट तपकिरी रंगाचे लहानमोठे ठिपके, डाग अथवा गिचमिड रेघोट्या असतात. काही ठिपके फिकट करड्या अथवा जांभळ्या रंगाचे असतात. बिळात घरटी करणारे पक्षी- उदा., खंड्या, तांबट, सुतार पक्षी इ.– सामान्यत: निर्मळ पांढरी स्वच्छ अंडी घालतात; पण उघड्यावर घरटी बांधणारे पक्षी अनेक वेळा रंगीत अथवा ठिपके असलेली अंडी घालतात.

अंड्यांची संख्या

एका क्षेत्रात राहणारे एकाच जातीचे पक्षी घालीत असलेल्या अंड्यांची संख्या बहुतेक सारखीच असते. ॲल्बेट्रॉससारखे काही पक्षी, काही पेंग्विन आणि उष्ण प्रदेशातील काही कबुतरे फक्त एकच अंडे घालतात. विलापी कपोत (कबूतर) व लाल मानेचा प्रकूज पक्षी एका वेळी फक्त दोनच अंडी घालतात. पुष्कळ बदके, ग्राऊझ, रेल आणि लावा हे पक्षी जास्त अंडी घालतात; काही लावा पक्षी २० पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालतात.

सामान्यत: पक्ष्यांची मादी अंड्यांची संख्या पुरी होईपर्यंत दररोज सकाळी एक अंडे घालते; पण हे काही कायमचे नाही. काही पक्षी प्राय: एक दिवसाआड किंवा मधे काही दिवस जाऊ देऊन अंडी घालीत असतात.

अंडी उबविणे

अंड्यातील भ्रूणाची वाढ होण्याकरिता अंड्याला उष्णता पोहोचविणे आवश्यक असते. आई किंवा बाप अंड्यांवर बसून आपली गरम छाती अंड्यांवर टेकून ही उष्णता अंड्यांना देतात. अंड्यांना उष्णता देण्याची ही क्रिया सुलभ करण्याकरिता जनकाच्या (बापाच्या किंवा आईच्या) त्वचेवर योग्य हंगामात उबवण खंडक उत्पन्न होतात. हे खंडक म्हणजे त्वचेवरील रक्ताचा जास्त पुरवठा होणाऱ्या आणि ज्यांच्यावरील पिसे गळून पडली आहेत व त्वचेचे थर जाडसर झाले आहेत अशा उघड्या जागा होत. निरनिराळ्या जातींच्या पक्ष्यांत अंडी उबविण्याचा काळ पुष्कळच वेगवेगळा असतो. तो ११ दिवसांपासून सु. ३ महिन्यांपर्यंत असतो. पुष्कळ गायक पक्ष्यांचा अंडी उबविण्याचा काळ ११-१५ दिवस असतो; परंतु काहींचा ३ आठवड्यांपर्यंत असतो. सुतार पक्षी आणि पारवे यांचाही साधारणपणे गायक पक्ष्यांइतकाच असतो; पण प्रकूज पक्षी, दुर्बल आणि कापूर पक्षी यांमध्ये तो १६-२० दिवस असतो. प्लव्हर, ग्राउझ, फेझंट, डुबडुबी, पाणकावळा आणि बक यांच्यात हा काळ सामान्यत: ३-४ आठवडे असतो आणि बदके, कादंब व हंस यांत तो ४-६ आठवडे असतो आणि शिकरा व गरुड यांत ४-८ आठवडे असतो. ॲल्बेट्रॉस ९-११ आठवडे, तर शहामृग फक्त ६ आठवडे अंडी उबवितात.

सामान्यत: अंडी उबविण्याचे काम फक्त मादी करते, नर तिला मदत करतो किंवा मुळीच करीत नाही; परंतु लाविका (बटन क्केल) आणि शहामृगासारखे काही पक्षी यांचे फक्त नरच अंडी उबवितात. नर आणि मादी जेव्हा आलटून पालटून अंडी उबवितात तेव्हा ती क्वचितच उघडी पडतात. फक्त मादीच जेव्हा अंडी उबविण्याचे काम करते तेव्हा नर तिला घरट्यात अन्न आणून देतो; पण त्याने जर भक्ष्य आणून दिले नाही, तर मादीला ते मिळविण्याकरिता घरटे सोडून बाहेर पडावे लागते व अंडी काही वेळ उघडी पडतात. अंडी अशा प्रकारे काही वेळ उघडी पडून थंड झाली, तरी त्याचा त्यांच्यावर फारसा वाईट परिणाम होत नाही. काही पक्ष्यांच्या माद्या (उदा., डुबडुबी) अन्न मिळविण्याकरिता बाहेर जाताना घरट्याच्या बाजूवरील पदार्थ अंड्यांवर ओढून ती झाकतात. अंडी लपविणे हाच यात मुख्य हेतू असतो.

अंडी फुटून पिल्ले बाहेर पडणे : अंड्यातून बाहेर पडण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागते तसतशी पिल्ले अंड्यांच्या आत थोडी हालचाल करू लागतात आणि अगदी बारीक आवाज करतात. आपले डोके हलवून, चोचीच्या टोकाच्या वर असलेल्या अंड-दंताने कवचाला टोच्या मारून आणि शरीर वाटोळे फिरवून पिल्लू अंड्यातून बाहेर पडण्याकरिता धडपड करते. कवचाच्या बाहेर पडायला पिल्लाला (अगदी लहान पक्ष्यांच्या सुद्धा) जवळजवळ एक दिवस लागतो, मोठ्या पक्ष्यांच्या पिल्लांना जास्त दिवस लागतात. गायक पक्ष्याच्या पिल्लांना जन्माच्या वेळी पिसे नसतात, ती आंधळी असतात आणि काही दिवस तरी तोंड उघडण्याखेरीज (आईबापानी तोंडात घातलेले अन्न खाण्याकरिता) इतर विशेष हालचाली त्यांना करता येत नाहीत. घरट्यात ती स्वस्थ पडून राहतात. अशा दुबळ्या अवस्थेत जन्मलेल्या पिल्लांना सुपोष्य म्हणतात. मोठ्या पक्ष्यांमध्ये पाणकावळा आणि शिकारी पक्षी यांची पिल्ले सुपोष्य असतात.

याच्या उलट लावा व बदक यांच्या पिल्लांच्या अंगावर जन्मत:च कोमल पिच्छे असतात, ती वाळल्यावर पिल्ले चालू लागतात आणि आईच्या किंवा बापाच्या पाठोपाठ जाऊन भक्ष्य टिपू लागतात. अशा प्रगत अवस्थेत जन्मणाऱ्या पिल्लांना पूर्व-पक्व म्हणतात. ग्राउझ आणि फेझंट यांची पिल्लेही अशीच असतात. काही पक्ष्यांची पिल्ले वरील दोन अवस्थांच्या मधील अवस्थेत जन्मतात. उदा., कापूर पक्षी, कुररी आणि कुरव या पक्ष्यांच्या पिल्लांच्या अंगावर जन्मापासूनच कोमलपिच्छे असतात व ती लवकरच थोडीफार हालचाल करू लागतात; पण अन्नाकरिता आईबापांवर सर्वस्वी अवलंबून असतात.

पितृ-वात्सल्य

गायक पक्ष्यांमध्ये पिल्लाच्या पराधीनतेचा काळ दोन आठवड्यांइतका थोडा असू शकतो. या काळात अंगावर पिसांचे आवरण तयार होते, डोळे उघडतात आणि भोवतालच्या परिस्थितीची जाणीव होऊ लागते. पिल्ले घरट्यात बसू लागून इकडे तिकडे पाहू लागतात, चोचीत भक्ष्य घेऊन येणारी आई किंवा बाप दिसला म्हणजे जोरात चिवचिवाट करतात, चोचीने पिसे साफसूफ करतात, पंख फडफडवतात आणि भिती वाटली म्हणजे घरट्याच्या तळाशी दबा धरून बसतात. रात्री आई त्यांना पंखांनी झाकून उबारा देते.

पक्षी आपल्या चोचीतून अन्न आणून पिल्लांच्या उघडलेल्या तोंडात घालतात. घुबडांची पिल्ले आईने आपल्या चोचीत धरलेला मांसाचा तुकडा कुरतडून खातात; पण आईने मारून घरट्यात आणलेल्या उंदराचे अथवा एखाद्या प्राण्याचे तुकडे करून खायला ती लवकरच शिकतात. कुरव पक्षी खाल्लेले अन्न ओकून टाकतात व ती ते खातात. पाणकावळे आणि पाणकोळी आपल्या घशात मासे साठवून ठेवतात. ते घरट्यात आल्यावर पिल्ले आपली डोकी त्यांच्या घशात खुपसून मासे काढून खातात. पारवे आणि कबुतरे अगदी सुरुवातीला आपल्या पिल्लांना ‘कपोत-दुग्ध’ पाजतात. हे दुग्ध म्हणजे अन्नपुटाचा एक प्रकारचा स्राव असतो. पिल्लू आपली चोच आईच्या चोचीच्या आत घालते आणि मादी (आई) पिल्लाच्या घशात दुग्ध सोडते. लहान क्रियाशील पक्षी पिल्लांना अन्न भरविण्याच्या कामात दिवसभर मग्न असतात

विष्ठेने घरटे खराब होऊ नये म्हणून स्वच्छता ठेवण्यासाठी घरट्यात दोन प्रकारची व्यवस्था असल्याचे दिसून येते. पहिल्या प्रकारची व्यवस्था कित्येक गायक पक्ष्यांमध्ये आढळते. पिल्लांना अन्न खाऊ घातल्यानंतर ती आपल्या शरीराचा मागचा भाग उंच करून एका जिलेटिनी पिशवीत विष्ठेचे उत्सर्जन करतात, नर किंवा मादी ही पिशवी खाऊन टाकते किंवा दूर नेऊन टाकते. दुसऱ्या प्रकारची व्यवस्था शिकरा आणि इतर काही पक्ष्यांमध्ये आढळते. या पक्ष्यांची पिल्ले घरट्याच्या काठावरून विष्ठा बाहेर टाकतात. खंड्या आणि हुप्पी यांच्यासारख्या बिळात अंडी घालणाऱ्या पक्ष्यांच्या घरट्याजवळची जागा अतिशय घाणेरडी झाली, तरी पिल्ले अगदी स्वच्छ असतात. पाणकावळा आणि बक यांच्यासारख्या पक्ष्यांच्या वसाहतीत सडणाऱ्या माशांची आणि विष्ठेची घाण येत असली, तरी या पक्ष्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही असे दिसते. कारण बहुतेक पक्ष्यांप्रमाणेच यांची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण नसतात.

घरट्यातून बाहेर पडणे

बहुतेक गायक पक्ष्यांची सुपोष्य पिल्ले चांगले उडता येण्यापूर्वीच घरटे सोडतात. कित्येक दिवस ती झाडांवर, झुडपात किंवा गवतात स्वस्थ बसून राहतात आणि आईबाप भक्ष्य आणून त्यांना खायला घालतात. त्यांना साधारण बरे उडता येऊ लागले म्हणजे आईबापांच्या मागोमाग ती जातात. फेझंट, लावा आणि बदके यांच्यासारख्या पूर्व-पक्क पक्ष्यांत कोमलपिच्छांचे आवरण असलेली पिल्ले जन्मल्याबरोबरच घरटे सोडून आईबापांबरोबर जातात. आईबाप त्यांना योग्य निवासस्थानात ठेवतात, भक्ष्य आढळले म्हणजे ते त्यांना बोलावून अन्नाचे तुकडे करून त्यांना देतात, आवाज काढून धोक्याची सूचना देतात, इतकेच नव्हे तर रात्री त्यांना आपल्या पंखाखाली झाकतात. ग्राउझ आणि लावा यांच्या पिल्लांच्या पिसांची वाढ फार लवकर होते आणि थोड्याच दिवसांत ती काही अंतरापर्यंत उडत जाऊ शकतात; पण बदकांच्या पिल्लांची जवळजवळ पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांच्या पंखांची वाढ होत नाही.

कोकिळांसारखे काही पक्षी स्वत:चे घरटे तयार करीत नाहीत. कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. अंडी फुटून पिल्ले बाहेर पडली म्हणजे कावळ्यालाच आपल्या पिल्लांबरोबर कोकिळाच्या पिल्लांचीही जोपासना करावी लागते. कोकिळाला सामाजिक परजीवी म्हणता येईल [® कोकिळ]. अमेरिकेतील काऊबर्ड, काही आफ्रिकी सुगरण पक्षी आणि द. अमेरिकेतील बदक हेदेखील असेच परजीवी पक्षी आहेत.

अनुकूलनानुसार जिवंत पक्ष्यांचे प्रकार : विशिष्ट परिस्थितीशी झालेल्या अनुकूलनाच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे पक्ष्यांचे तीन प्रकार पडलेले दिसून येतात : (१) भूचर पक्षी, (२) जलचर पक्षी आणि (३) निशाचर पक्षी.

375 - 1

भूचर पक्षी भूचर पक्षी अगदी वेगवेगळ्या गटांतील असून शहामृग, लावा, माळढोक, प्लव्हर, चंडोल आणि पिपिट ही त्यांची काही उदाहरणे होत. यांपैकी बहुतेकांनी भक्ष्य मिळविण्याकरिता आणि शत्रूपासून बचाव करण्याकरिता जमिनीवर राहण्याची सवय लावून घेतलेली असते. ते जमिनीवर चालतात व धावतात आणि बहुतेकांच्या अंगी जरी उडण्याचे सामर्थ असले, तरी कोणी त्यांचा पाठलाग केला, तर ते पळून जातात. ज्यांची उडण्याची शक्ती अगदी नाहीशी झाली आहे, असे पूर्णपणे भूचर असलेले पक्षी थोडेच आहेत. ते पुष्कळ मोठे आणि सामर्थ्यवान असतात. यात आफ्रिका आणि अरबस्तानातील शहामृग, न्यू गिनीच्या जंगलातील कॅसोवेरी, ऑस्ट्रेलियातील एमू, न्यूझीलंडमधील किवी आणि द. अमेरिकेतील रीआ यांचा समावेश होतो. त्यांच्या काही लक्षणांवरून हे पक्षी पूर्वी मुबलक असलेल्या प्राचीन पक्ष्यांचे प्रतिनिधी असावेत असे वाटते. अर्वाचीन काळात उडू न शकणारे मोठे पक्षी उ. अमेरिका सोडून बाकीच्या सर्व खंडांत असल्याचे दिसून येते.

किवी हा पक्ष्यासारखा न दिसणारा पक्षी आहे. वर उल्लेखिलेल्या इतर पक्ष्यांपेक्षा याच्या सवयी अगदी निराळ्या आहेत. चोच लांब असून तिच्या अगदी टोकावर नाकपुड्या असतात. हा पक्षी इकडे तिकडे हिंडताना आपल्या समोरच्या जमिनीवर चोच टेकून तिचे परीक्षण करतो (आंधळा माणूस काठी टेकून जसे करतो तसे). वरवर पाहिले, तर या पक्ष्यांना पंख नसावेत असे भासते; पण काळजीपूर्वक तपासणी केल्यावर पंख पिसांच्या खाली दडलेले दिसून येतात. पंख अगदी लहान असून पूर्ण पसरलेल्या स्थितीत त्यांची लांबी सु. ८ सेंमी. असते. हे पंख उडण्याकरिता उपयोगी पडत नाहीत.

कॅसोवेरीचे पंखदेखील लहान असून लांब केसांसारख्या पिसांनी झाकलेले असतात. डोक्यावर एक विचित्र शिरस्त्राण असते. एमूचे पंखसुद्धा लहानच असतात; परंतु शहामृग आणि रीआ यांचे पंख मोठे असून धावताना हे पक्षी कधीकधी ते पसरवतात. हे पंख उडण्याच्या कामी पूर्णपणे निरुपयोगी असतात. या सर्व पक्ष्यांचे शरीर अवजड आणि पाय मोठे व मजबूत असतात. शहामृगाला फक्त दोनच बोटे असतात व बाकीच्यांना तीन असतात. सर्व उडणाऱ्या पक्ष्यांच्या उरोस्थीवर आढळणारा कणा या पक्ष्यांमध्ये नसतो.

जलचर पक्षी

पाण्यात राहण्याकरिता ज्यांचे अनुकूलन झाले आहे अशा पक्ष्यांमध्ये पेंग्विन अग्रगण्य होत. यांच्या सु. १५ जाती असून त्या दक्षिण समुद्रात राहणाऱ्या आहेत. सगळ्यांत मोठा ‘एंपरर पेंग्विन’ सु. १२० सेंमी. लांब असून त्याचे वजन ४२ किग्रॅ. असते. न्यूझीलंड व आग्नेय ऑस्ट्रेलियातील निळा पेंग्विन सगळ्यांत लहान असून त्याची लांबी सु. ४० सेंमी. असते. पेंग्विनांचे शरीर लांबट असून दाट, मऊ पिसांनी सगळीकडे सारखे झाकलेले असते. पंख आखूड, रुंद वल्ह्यांसारखे असून त्यांवर वाढ झालेली ‘क्विल्स’ (पंख-पिच्छे) नसतात. पिसे एकमेकांना चिकटलेली असतात व ताठ असतात, पाण्याच्या पृष्ठाखालून (पाण्यातून) तो अक्षरश: उडत पुढे जातो म्हणजे चपटे पंख त्याचे शरीर पाण्यात पुढे वेगाने ढकलीत असतात. पाय मागच्या बाजूला ताणून पसरलेले असतात व त्यांचा उपयोग सुकाणूसारखा होतो. पाण्यात राहण्याकरिता अनुकूलन झालेल्या इतर पक्ष्यांत पाण्यात डुबक्या मारणारे पक्षी आणि डुबडुबी यांचा समावेश होतो. हे पक्षी पाण्याखालून पोहताना रुंद पावलांचा उपयोग करतात. पाणकावळे आणि पाणबुडे पोहताना आपल्या पावलांचा उपयोग करीत असले, तरी त्यांचे पंख थोडे उघडे असतात.

निशाचर पक्षी

रात्रीच्या अंधारात आयुष्य कंठण्याकरिता ज्यांचे अनुकूलन झालेले आहे असे पक्षी पुष्कळ आहेत; पण स्ट्रायजिडी कुलातील घुबडे व कॅप्रिमुल्जिडी कुलातील कापूर पक्षी हे या प्रकारचे नमुनेदार पक्षी होत. बहुतेक निशाचर पक्ष्यांचे डोळे मोठे असून ते सामान्यत: प्रकाशाचे परावर्तन करतात. कापूर पक्ष्यांच्या डोळ्यांवर प्रकाश टाकला, तर अंधारात त्यांचे डोळे विस्तवातील निखाऱ्याप्रमाणे चमकतात आणि ही चमक बऱ्याच दूरपर्यंत दिसते. पुष्कळ निशाचर पक्ष्यांच्या डोळ्याचे अतिशय अंधुक प्रकाशकिरण गोळा करण्याकरिता अनुकूलन झालेले असल्यामुळे त्यांना रात्री दिसते.

वय आणि मृत्युसंख्या

अगदी खालच्या दर्जाच्या प्राण्यांशी तुलना केली, तर असे दिसून येईल की, पक्ष्यांना थोडी पिल्ले होतात आणि ती मोठी होऊन अन्न मिळवू लागेपर्यंत आईबाप त्यांची काळजी घेतात. पक्षी जरी आपल्या पिल्लांची पुष्कळ काळजी घेत असले, तरी त्यांची मृत्युसंख्या बरीच असते. पिल्लांच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात ३५-८० % पिल्ले मरतात. शिल्लक राहिलेल्यांमध्ये नंतरच्या वर्षांत मृत्युसंख्येचे प्रमाण बरेच कमी होते. उदा., बदकांमध्ये पहिल्या वर्षात मृत्यूचे प्रमाण ५०-८५% असते; पण नंतरच्या वर्षात ते ४०-६५ % होते. कुरवांच्या मृत्यूचे प्रमाण पहिल्या वर्षी ४०-६०% असते; पण नंतरच्या वर्षात ते १८-३०% असते.

नैसर्गिक परिस्थितीत कोणता पक्षी किती वर्षे जगतो हे सांगणे कठीण आहे. नैसर्गिक वसतिस्थानात राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा बंदीवासात राहणारे पक्षी जास्त जगतात. जंगलातील लहान पक्षी क्वचितच पाच किंवा सहा वर्षांपेक्षा जास्त जगतात. लहान पक्ष्यांपेक्षा मोठ्या पक्ष्यांना जास्त आयुष्य असते. गरुड, हंस, कावळे आणि इतर पुष्कळ मोठ्या पक्ष्यांच्या आयुष्याची संभवनीय मर्यादा २५-३० वर्षे असते; पण बंदीवासात ठेवलेल्या या पक्ष्यांची आयुर्मर्यादा जास्त असते. पिंजऱ्यात ठेवलेला शहामृग ४० वर्षे जगल्याची नोंद आहे. डोमकावळा ५०-६९ वर्षे जगतो. चिमणीएवढे पक्षी क्वचित २५ वर्षे जगतात; पण नैसर्गिक अवस्थेत त्यांचे आयुष्य ५-८ वर्षे असावे असे वाटते. गिधाडे ५२ वर्षे, मोठे शृंगी घुबड ६८ वर्षे, हंस २५ वर्षे, पाणकोळी व गरुड ५० वर्षे, कबुतरे २५-३५ वर्षे आणि मोर २० वर्षे जगतात, नैसर्गिक परिस्थितीत हळदी ८ वर्षे, तर धूसर बक १६ वर्षे जगतो असे आढळून आले आहे

आ. ७. काही लुप्त पक्षी : (१) हेस्परॉर्निस, (२) इक्थिऑर्निस, (३) डायाट्रिमा.

जीवाश्म व क्रमविकास : लहान आकारमान, हलका सांगाडा आणि विशिष्ट जीवनप्रणाली यांमुळे पक्ष्यांचे शव लवकर नष्ट होते. सामान्यत: प्राण्याची हाडे व दात जीवाश्मरूपात टिकून राहण्याची अधिक शक्यता असते. तथापि हाडे बारीक व काहीशी पोकळ वा हलकी असल्याने ती सहज तुटतात, फुटतात किंवा त्यांचा लवकर भुगा होतो. त्यामुळे ती जीवाश्मरूपात टिकून राहण्याची शक्यता कमी असते. पक्ष्यांचे दात त्यांच्या क्रमविकासाच्या आधीच्या काळातच गेले. या कारणांमुळे पक्ष्यांचे जीवाश्म थोडेच आढळतात. तसेच जे जीवाश्म आढळतात ते अपूर्णावस्थेत असतात व कवटी जीवाश्मरूपात क्वचितच आढळते. पाण्यात व दलदलीत राहणाऱ्या काही पक्ष्यांचे जीवाश्म इतरांच्या मानाने अधिक आढळतात कारण गाळामुळे पक्ष्यांचे जीवाश्म टिकून राहण्यासाठी अधिक अनुकूल परिस्थिती मिळाली असावी. तसेच ज्यांची हाडे अधिक जड आहेत अशा बुडी मारणाऱ्या, न उडणाऱ्या पक्ष्यांचे अवशेष अधिक प्रमाणात टिकून राहिलेले आढळतात. आतापर्यंत पक्षि-जीवाश्मांच्या ९१० पेक्षा जास्त जाती आढळल्या आहेत.आर्किऑप्टेरिक्स लिथोग्राफिका हा पक्ष्यांचा सर्वांत जुना जीवाश्म उत्तर जुरासिक (सु. १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील असून तदनंतरच्या २ कोटी वर्षांच्या (पूर्व व मध्य क्रिटेशस) काळातील पक्षि-जीवाश्म आढळलेला नाही. त्यामुळे त्या काळातील क्रमविकासही माहीत नाही. मोआ पक्ष्यांचे न्यूझीलंडमधील जीवाश्म सोडल्यास पक्ष्यांच्या इतर गटांचे जीवाश्म पुरेशा प्रमाणात आढळले नाहीत. यामुळे पक्ष्यांच्या पूर्ण क्रमविकासाचे वर्णन करणे अवघड आहे.

जुरासिक काळातील पक्ष्यांच्या जीवाश्मांचे दोन नमुने बव्हेरियातील स्लेटी खडकांत १८६१ साली सापडले असून त्यांना आर्किऑप्टेरिक्स म्हणतात. हा सरड्यासारखा व कबुतराएवढा प्राणी होता. त्याचे दात खाचांत बसविलेले होते व पाऊल आधुनिक पक्ष्यांप्रमाणे होते; परंतु त्याची शेपटी सरीसृपासारखी असून तिच्यावर पिसे होती [® आर्किऑप्टेरिक्स]. क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात यापेक्षा जास्त जीवाश्म आढळत असले, तरी त्यांची संख्या कमीच आहे. अमेरिकेतील कॅनझस संस्थानातील उत्तर क्रिटेशस काळातील निक्षेपात (गाळाच्या खडकांच्या राशीत) आढळलेल्या हेस्परॉर्निस संबंधित पक्षि-जीवाश्मांच्या अभ्यासावरून १० कोटी वर्षापूर्वीदेखील विशिष्ट जीवनप्रणालीला अनुसरून पक्ष्यांच्या शरीररचनेत परिवर्तन झालेले होते. हेस्परॉर्निस हा उत्तम पोहणारा व पाणबुड्या असून बहुधा माशांवर उपजीविका करणारा होता; त्याची मान लांब व पाय बळकट होते. त्याचे पंख अवशेषी असून उरोस्थीवर कणा नव्हता. दात असणारे हे शेवटचे पक्षी असून त्यांचे दात गर्ताऐवजी खोबडीत जडविलेले होते. याच काळातील बॅप्टॉर्निस हा पक्षी हेस्परॉर्निसाचा नातेवाईक होता; मात्र बॅप्टॉर्निस लहान व दुबळा होता आणि त्याची शेपटी अधिक आखूड होती. इक्थिऑर्निस वॲपॅटॉर्निस हे वरवर पाहता कुरवासारखे दिसणारे पक्षीही उत्तर क्रिटेशस काळातील आहेत. इक्थिऑर्निसाचे बुडी मारणारे व उडणारे असे प्रकार होते आणि त्यांना दात असावेत असे पूर्वी मानीत; परंतु यांचे म्हणून मानण्यात आलेले जबडे प्रत्यक्षात मोसासॉर नावाच्या लहान, सागरी सरीसृपाचे असावेत.इलॉप्टेरिक्स, स्कॅनिऑर्निस, गॅलॉनिस इ. जीवाश्मही क्रिटेशसमधील आहेत. यांशिवाय पाणबुडा, पाणकावळा, लून, रेल, सँडपायपर इ. पक्ष्यांशी संबंधित असलेल्या पक्ष्यांच्या जाती क्रिटेशस काळाच्या शेवटी होत्या. ऑस्ट्रेलियातील याच काळातील शैलसमूहांमध्ये पक्ष्यांच्या पिसांचे जीवाश्म आढळले असून त्यांवरून त्या काळी पक्षी जगभर पसरले होते, असे म्हणता येते.

नवजीव महाकल्पात (गेल्या सु. ६.५ कोटी वर्षांत) आढळणारे पक्षांचे जीवाश्म विविध आकारमानांचे आहेत. त्यांत अतिशय मोठ्या पक्ष्यांपासून आधुनिक लहान आकारमानाच्या पक्ष्यांपर्यंत सर्व तऱ्हेच्या पक्ष्यांचे जीवाश्म आढळतात. यामुळे गेल्या १० लाख वर्षांत इतर फरकांबरोबरच पक्ष्यांच्या आकारमानांत कसकसे बदल होत गेले, याचा छडा लावता येतो.

तृतीय कल्पाच्या प्रारंभापर्यंत (सु. ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत) आधुनिक प्रकारचे पक्षी सर्वसामान्य झाले होते. उदा., पेंग्विन, लून, बदक, पाणकावळा, शिकरा, करकोचा, घुबड इत्यादी. पॅलिओसीन (सु. ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील पक्ष्यांचे (उदा., रेल, आद्य पाणकावळा इ.) थोडेच जीवाश्म आढळले आहेत. पॅलिओसीन ते मध्य इओसीनपर्यंतच्या (सु, ५.५ कोटी वर्षापूर्वीच्या) काळात उ. गोलार्धामध्ये डायाट्रिमा वंशाचे व त्यांचे नातेवाईक पक्षी हे प्रमुख मांसाहारी पक्षी होते. हे पक्षी सु. २ मी. पर्यंत उंच होते व त्यांना वाकडी, बळकट चोच होती. हे करकोचा व रेल या पक्ष्यांच्या पूर्वजांचे नातेवाईक असावेत. लुप्त झालेल्या वंशांच्या पक्ष्यांच्या जोडीनेच सध्याच्या कुलांतील काही वंशाचे पक्षीही इओसीन काळात होते. उदा., बूबी, हंसक, बक, कुरव, गिधाड, शिकरा, घुबड, करकोचा, रेल, सुतार पक्षी इत्यादी. ओडोंटोप्टेरिक्स टॉलिॲपिकस हा इंग्लंडमधील पक्षि-जीवाश्म सध्याच्या पाणकोळ्याचा (पेलिकनाचा) नातेवाईक आहे. त्याच्या खालच्या व वरच्या जबड्यांच्या कडांवर दातांप्रमाणे बाहेर डोकावणारे, तीक्ष्ण, अणकुचिदार व अस्थिमय प्रवर्ध आढळले आहेत. ईजिप्तमध्येही इओसीन काळात पाणकोळ्यासारखे पक्षी होते.

ट्रोगॉन व पोपट (फ्रान्स), बॅथॉर्निथिडी कुलातील पक्षि-जीवाश्म, सेरीमशी निगडित तीन जाती (द. अमेरिका) हे ऑलिगोसीन (सु. ३.५ कोटी वर्षापूर्वीच्या) काळातील वैशिष्ट्यपूर्ण जीवाश्म असून आता असलेल्या पुढील पक्ष्यांसारखे पक्षीही तेव्हा होते : टिटवी, शृंगी घुबड, टर्की, प्लव्हर, आयबिस, भाटतीतर वगैरे. शिवाय दक्षिण अमेरिकेत फोरोऱ्हॅकॉस व संबंधित वंशांचे पक्षी ऑलिगोसीन ते मध्य प्लायोसीन (सु. १.२ कोटी वर्षापूर्वीच्या) काळात होते. त्यांची उंची सु. २.५ मी. पर्यंत होती. मायोसीन (सु. २ कोटी वर्षांपूर्वीच्या)काळातील पेंग्विन पक्ष्यांचे जीवाश्म ऑस्ट्रेलियात व दक्षिण अमेरिकेत आढळले आहेत. तसेच याच काळातील शिकरा व हल्लीच्या काही वंशांतील प्रातिनिधिक जातींचे पुष्कळ जीवाश्म जगातील कित्येक भागांत आढळले आहेत. (उदा., ॲल्बट्रॉस, ऑक, ससाणा, गरुड वगैरे). यांपैकी स्यूडोडोंटोर्निस(कॅरोलायना) व सु. ५.३ मी. पंखविस्तार असलेली ऑस्टिओडोटोर्निस (कॅलिफोर्निया) या दोन महत्त्वाच्या जाती असून त्यांना वरीलओडोंटोप्टेरिक्सप्रमाणे बळकट व अणकुचिदार प्रवर्ध होते. आताच्या असंख्य पक्ष्यांचे (उदा., नटहॅच, कावळा, चिमणी, चंडोल, कस्तूरक इ.) प्लायोसीन काळातील जीवाश्म सापडले आहेत.

पक्ष्यांचे सर्वाधिक जीवाश्म प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख वर्षापूर्वीच्या) काळातील निक्षेपांत आढळले आहेत. उदा., कॅलिफोर्नियातील टार पिट भागात या काळातील पक्ष्यांची हजारो हाडे जीवाश्मरूपात आढळली आहेत. या काळातील हिमोढीय निक्षेपांत (हिमनद्यांच्या क्रियेने बनलेल्या गाळांच्या राशींत) आता अस्तित्वात असलेल्या पुष्कळ पक्ष्यांचे जीवाश्म सापडले आहेत. त्यावरून या काळाच्या सुरुवातीस हल्लीच्या पक्ष्यांच्या अनेक जाती (कित्येकशे प्रकार) पृथ्वीवर असाव्यात. पंखांचा विस्तार सु. ५ मी. असलेला टेराटॉर्निस (कॅलिफोर्निया) हा गिधाडासारखा पक्षी, कॅलिफोर्निया टर्की इ. या काळातील नमुनेदार पक्षी आहेत. ज्ञात असा सर्वांत मोठा पक्षी डायनॉर्निस मॅक्झीमस (न्यूझीलंड) हा सु. ४ मी. उंच होता व तो अलीकडेच लुप्त (नाहीसा) झाला. मॅलॅगॅसीमधील ईपिऑर्निस हा पक्षी प्लाइस्टोसीन काळात लुप्त झाला. तो सु. ३ मी. उंच असून त्याचे अंडे सु. ३० सेंमी. लांब होते.

अभिनव कल्पात (गेल्या सु. ११ हजार वर्षांत) खरे तर ऐतिहासिक काळाच्या आधीच कित्येक पक्षी नामशेष झाले. त्यांपैकी काहींची संगतवार माहिती मिळते. मॉरिशस बेटातील डोडो पक्षी कबुतराच्या जातीचा होता. हल्लीच्या कबुतरांपेक्षा तो बराच मोठा असून त्याला पंख नव्हते. हा पोर्तुगीजांना १५०७ मध्ये प्रथम आढळला आणि एका शतकाच्या आतच तो लुप्त झाला. तसेच न्यूझीलंडमधील मोआ पक्ष्याचे अस्तित्व त्याच्या आढळलेल्या हाडांवरूनच उघड झाले.

टेरोसॉर हे माहीत असलेले सर्वांत जुने उडणारे प्राणी होत. मात्र ते खरे पक्षी नसून सरीसृप होते व त्यांच्यातील उडण्याची क्षमता स्वतंत्रपणे उत्क्रांत झाली होती [® टेरोडॅक्टिल]. आर्किऑप्टेरिक्स हा सरीसृप आणि पक्षी यांच्यातील चांगला दुवा आहे; कारण त्यात पिसे आणि पंख ही पक्ष्याची वैशिष्ट्ये आहेत, तसेच लांब शेपटी, दात व सरीसृपासारखी कवटी ही सरीसृपांची वैशिष्ट्येही त्यात टिकून राहिलेली आढळतात.

पक्षी हे कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जिवंत असणाऱ्या सरीसृपांचे वंशज होत. हल्ली असणाऱ्या पक्ष्यांची शरीररचना आणि वर्तन यांत आज देखील सरीसृपांची लक्षणे दिसून येतात. कवटीची रचना, पायांची बोटे, उरोस्थीला आधार देणारे भाग आणि पंखांच्या टोकावर आढळणारे नखरांचे (नखांचे) अवशेष हे सर्व सरीसृप नमुन्याचे आहेत; शिवाय पक्ष्यांची अंडी घालण्याची क्रियादेखील सरीसृप नमुन्याचीच आहे. सरीसृप व पक्षी यांच्या अनेक जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे दिसून येते की, सगळे पक्षी पक्ष्यांच्या एकाच गटापासून पैदा झाले आहेत; या गटाचे पूर्वज स्यूडोसुकिया उपगणातील लहान व किरकोळ चणीचे सरीसृप होते व ते पर्मियन कल्पात (सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळात) राहत होते. त्यांच्यापासून पक्ष्यांचा पुढीलप्रमाणे क्रमविकास झाला असावा.

जमिनीवरील मोठ्या मांसाहारी प्राण्यांपासून सुरक्षितता लाभावी म्हणून स्यूडोसुकियनांचा एक गट वृक्षवासी बनला असावा आणि या वृक्षवासी जीवनप्रणालीमुळे त्यांच्यात बदल होत जाऊन क्रमविकास झाला असावा. उदा., झाडावर राहिल्याने ज्या पायांनी आधार पकडण्याची क्रिया होई ते लांब झाले असावेत; तसेच नख्या मोठ्या व अग्रपाद लांब झाले असावेत; डोळे मोठे, मुस्कट अरुंद होऊन निमस्तिष्काचा विकास घडून आला असावा. हलकेपणा, तोल सांभाळणे व कीटकांवरील उपजीविका यांकरिता जबडे लहान झाले असावेत. पक्ष्यांतील नियततापी गुणधर्माचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे वृक्षाच्या शेंड्यावरील हवेच्या झोतात राहण्याच्या दृष्टीने त्यांचा फायदा झाला. नियततापी गुणधर्माला पोषक अशी उष्णता निरोधक पिसे आली असावीत असे काहींचे मत आहे. मात्र काहींच्या मते पिसे उड्डाणाकरिता आली असावीत व विविध कामांसाठी त्यांचे अधिकाधिक विशेषीकरण होत गेले असावे. पिसे सरिसृपांच्या खवल्यांपासून उत्क्रांत झाल्याचे निश्चित माहीत नाही; परंतु हे खवले व पिसे यांचे रासायनिक संघटन सारखे असल्याचे आढळले असून काही स्यूडोसुकियनांच्या खवल्यांवर पिसांसारख्या आकाराचे ठसे आढळले आहेत. अग्रपादावरील लांब पिसे आणि शेपटी तोल सांभाळण्यासाठी व विसर्पणासाठी (हवेतून संथपणे सरकण्यासाठी; ग्लायडिंगसाठी) विकसित झाल्यावर आर्किऑप्टेरिक्स ही अवस्था अवतरली असावी.

आ. ८. पक्ष्यांच्या क्रमविकासाचे काही टप्पे : (१) स्यूडोसुकियन सरीसृप (साल्टोपोसुकस), (२) आर्किऑप्टेरिक्स, (३) आधुनिक पक्षी.

आर्किऑप्टेरिक्स अवस्थेपासून आधुनिक पक्ष्यापर्यंतच्या क्रमविकासाच्या आधीच्या काळातील पक्ष्यांमध्ये चांगली उड्डाणक्षमता आली असावी. उड्डाणक्षमतेमुळे उडता उडताच कीटक पकडून खाणे व शत्रू अथवा प्रतिकूल परिस्थिती यांपासून सुटका करून घेता येणे शक्य झाले. पंखांची हालचाल ज्या स्नायूंनी होते ते स्नायू चांगल्या उड्डाणक्षमतेमुळे मोठे झाले आणि ते स्नायू जोडले जाण्यासाठी अधिक जागा हवी म्हणून उरोस्थीवर कणा विकसित झाला असावा. जास्त प्रमाणात सुकाणू म्हणून थोड्या प्रमाणात आधारासाठी शेपटीचा उपयोग होत राहिल्याने ती आखूड झाली असावी व एक सलग अवयव म्हणून ती हलू लागली असावी. जोरदार व एक सारखे उड्डाण करण्यासाठी पंखांच्या हाडांचाही विकास झाला असावा. तसेच दूरस्थकशेरुक घटक एकाच हाडात सायुज्यित होऊन पक्ष्यांतील पुच्छ-हलास्थी विकसित झाली असावी. नियततापी, वृक्षावासी व विसर्पण यांच्या क्रिमविकासाबरोबरच डोळे, मेंदू, तसेच श्वसन व रुधिराभिसरण तंत्रे यांचाही क्रमविकास चालू होता. अशा प्रकारे पक्ष्यांना चांगले उडता येऊ लागेपर्यंत पुष्कळ नवनव्या परिसरांत जाण्याच्या दृष्टीने त्यांची शारीरिक तयारी झाली होती आणि क्रिटेशसच्या सुमारास पक्ष्यांचा नवीन परिसरांत प्रसार होऊ लागला होता. या प्रसारातूनच सध्या माहीत असलेले अनेक प्रकारचे अनुकूलनशील पक्ष्यांचे प्रकार विकसित झाले आहेत, असे मानले जाते.

पक्ष्यांच्या एका मूळ समुदायापासून त्यांचे गट तुटक होऊन वेगळे पडल्याने योग्यतम अतिजीवितेमुळे आणि वेगवेगळ्या आवासांत किंवा परिस्थितींत राहण्याच्या दृष्टीने झालेल्या अनुकूलनामुळे पक्ष्यांच्या विविध जाती झालेल्या आहेत; म्हणून आपल्याला समुद्री आणि भूचर पक्षी, उडणारे आणि न उडणारे पक्षी, फलाहारी आणि मांसाहारी पक्षी, धावणारे आणि जवळजवळ चालता न येणारे पक्षी, दाट अरण्यात व माळरानात राहणारे पक्षी इ. प्रकारचे पक्षी आढळून येतात.

शहामृगासारख्या गवत व झाडपाला खाणाऱ्या प्रचंड पक्ष्यांच्या क्रमविकासाविषयी कुतूहल असून तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेथे मोठे मांसाहारी (हिंस्र) प्राणी नव्हते आणि संरक्षणार्थ पळून जाण्यासाठी उडण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी या पक्ष्यांचा विकास झाला असावा. जेथे मोठे मांसाहारी होते अशा खंडांवर हे पक्षी जलद धावणारे (शहामृग, रीआ, एमू) बनले; परंतु जेथे मांसाहारी नव्हते अशा बेटांवर ते हळूहळू चालणारे व अवजड शरीराचे झाले. मॅलॅगॅसीत ‘हत्ती पक्षी’ व न्यूझीलंडमध्ये मोआ (सर्वांत मोठा, ३.३ मी. उंच) होते. ईजिप्तमध्येही मांसाहारींचा प्रवेश होण्यापूर्वी (इओसीन व ऑलिगोसीन काळात) असे पक्षी होते.

वर्गीकरण

पक्ष्यांचे वर्गीकरण मुख्यत्वे त्यांच्या सांरचनिक वैशिष्ट्यांच्या आधारे केले जाते. अशा प्रकारे पिसारा, चोच, पाय, मांडीचे स्नायू इ. वैशिष्ट्यांचा वापर करून वर्गीकरणाचे प्रयत्न करण्यात आले आहेत. प्रथिनांची संरचना आणि गुणसूत्रे (आनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) यांच्या अध्ययनात अलीकडेच झालेल्या प्रगतीमुळे वर्गीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त असा पुरावा उपलब्ध झाला आहे; मात्र अद्यापि पक्ष्यांच्या वर्गीकरणाविषयी शास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता झालेली नाही. कारण जगातील पक्ष्यांच्या जवळजवळ सर्व जाती-उपजातींचे वर्णन करण्यात आलेले असले, तरी पक्ष्यांचे जीवाश्म पुरेशा प्रमाणात आढळत नाहीत; तसेच पक्ष्यांच्या एकाच गटात समाभिरूपी क्रमविकासाच्या (निरनिराळे पूर्वज असणाऱ्या प्राण्यांत वरवर पाहता सारख्या संरचना उद्‌भवण्याच्या) घटना पुन:पुन्हा आढळतात. या दोन कारणांमुळे पक्ष्यांचे गण, उपगण आणि कुले यांच्यामधील जातिविकासविषयक संबंधांची माहिती त्रोटकच राहिली आहे.

पक्षी वर्गातील सर्व पक्षी आर्किऑर्निथीज व नीऑर्निथीज या दोन मुख्य उपवर्गात विभागलेले आहेत. पहिल्या उपवर्गात पूर्वज पक्ष्यांचा म्हणजे सरीसृपांसारखी शेपटी आणि दात असणाऱ्या पक्षि-जीवाश्मांचा (आर्किऑप्टेरिक्स, आर्किऑर्निस इ.) समावेश होतो. या उपवर्गात आर्किऑप्टेरिजिफॉर्मिस हा एकच गण असून त्यातील सर्व पक्षी लुप्त झालेले आहेत. नीऑर्निथीज या दुसऱ्या उपवर्गात सर्व अर्वाचीन पक्ष्यांचा तसेच पंख्यासारख्या शेपट्या असलेल्या व दात नसलेल्या सगळ्या पक्षि-जीवाश्मांचा समावेश होतो. नीऑर्निथीज उपवर्गाचे ओर्डोंटोग्नॅथी व नीओग्नॅथी हे दोन महागण आहेत. या उपवर्गाचे एकूण ३१ गण पाडले असून त्यांपैकी हेस्परॉर्निथिफॉर्मिस, ईपिऑर्निथिफॉर्मिस आणि इक्थिऑर्निथिफॉर्मिस हे गण लुप्त झालेल्या पक्ष्यांचे म्हणजे केवळ पक्षि-जीवाश्मांचे आहेत. या सगळ्या गणांत मिळून १५८ पेक्षा जास्त कुले आहेत.

शास्त्रज्ञांनी केलेल्या मोजदादीवरून हल्ली पृथ्वीवर पक्ष्यांच्या एकूण ८,६०० जाती असाव्यात असा अंदाज आहे; परंतु उपजाती आणि प्रजाती जर विचारात घेतल्या, तर ही संख्या जवळजवळ ३०,००० होते. १७५८ मध्ये कार्ल लिनीअस यांनी पक्ष्यांच्या जातींची जेव्हा प्रथम मोजदाद केली तेव्हा माहिती असलेल्या पक्ष्यांच्या जातींची संख्या फक्त ५६४ भरली.

येथे पक्ष्यांचे वर्गीकरण कोष्टकरूपात पृ. ३८० ते ३८३ वर दिले आहे. ते मुख्यत्वे अलेक्झांडर वेटमोर यांच्या कल्पनेवर आधारलेले असले, तरी त्याकरिता इतर अनेक तज्ञांच्या कल्पनाही विचारात घेतल्या आहेत. हे वर्गीकरण पुष्कळांना मान्य होण्यासारखे आहे; मात्र ते सर्वांनाच मान्य होईल, असे नाही. कारण या वर्गीकरणात दिलेल्या पक्ष्यांच्या कित्येक गटांच्या स्थानांविषयी मतभेद होऊ शकतील. काही गट येथे दिलेल्या गणाऐवजी दुसऱ्या गणात समाविष्ट होऊ शकतील किंवा काही गटांचा स्वतंत्र गण होऊ शकेल. उदा., येथे टौरॅको हा गट क्युक्युलिफॉर्मिस गणात समाविष्ट केला आहे; मात्र काहींच्या मते याचा म्युसोफॅजिफॉर्मिस असा स्वतंत्र गण केला पाहिजे. तसेच कधीकधीडायाट्रिमा व त्याच्याशी संबंधित असे न उडणाऱ्या, हिंस्त्र आणि लुप्त झालेल्या पक्ष्यांचे कित्येक वंश यांचा डायाट्रिमिफॉर्मिस हा स्वतंत्र गण करून त्याला ग्रुइफॉर्मिस गणाच्या जवळचे स्थान दिले जाते. येथे हंसक (फ्लेमिंगो) फिनिकॉप्टेरिफॉर्मिस गणात आहेत; तर कित्येक वर्गीकरणांमध्ये ते सिकोनिफॉर्मिस गणात समाविष्ट केले जातात. भाटतीतरांचे टेरोक्लिडी कुल हे कोलंबिफॉर्मिस गणातील कबुतरांपेक्षा कॅरॅड्रिफॉर्मिस गणातील समुद्रकिनारी पक्ष्यांना अधिक जवळचे आहे, असे काहींना वाटते; तरीही सामान्यत: हे कुल कोलंबिफॉर्मिस गणात समाविष्ट केले जाते.

पक्षी व मानव

निसर्ग व मानवयांच्या दृष्टीने पक्षी वर्ग महत्त्वाचा आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचे काम पक्षी करीत असतात, तर पक्ष्यांमुळे मानवाचे अनेक फायदे होतात. अर्थात पक्ष्यांमुळे मानवाला उपद्रवही होत असतो; परंतु पक्ष्यांचे तोट्यांपेक्षा फायदेच अधिक आहेत.

मानव पृथ्वीवर अवतरल्यापासून जंगलातील पक्ष्यांचे मांस व अंडी खात आला आहे. अजूनही याकरिता काही ठिकाणी कुरव, मटणपक्षी (शीअरवॉटर) इ. जंगली पक्षी पाळले जातात. शेती करू लागल्यावर मांस व अंडी यांसाठी माणूस कोंबड्या, टर्की, बदके, हंस, फेझंट इ. पक्षी पाळू लागला. त्याच्या हद्दीत घुसण्याऱ्या घुसखोराची सूचनाही अशा पक्ष्यांच्या कलकलाटातून त्याला मिळू लागली. संदेश पोहोचविण्यासाठी कबुतर, फ्रिगेट पक्षी वगैरेंचा उपयोग होतो. एक खेळ म्हणून काही पक्ष्यांची (उदा., पाणकोंबडी, लावा, होला, ग्राउझ, फेझंट इ.) शिकार केली जाते. पक्ष्यांची अथवा प्राण्यांची शिकार करण्यासाठी ससाण्याचा उपयोग होतो; तर चीनमध्ये पाणकावळ्यांना मासे पकडण्याचे शिक्षण दिले जाते. काही पक्ष्यांना बोलणे शिकविता येते. अशा प्रकारे मनोरंजन आणि सौंदर्य या दृष्टिकोनातून पोपट, मैना, बुलबुल, काकाकुवा, कॅनरी, मोर, कोकिळ, हंस, फिंच, लव्हबर्ड इ. पक्षी पाळले जातात. कोंबड्यांसारख्या काही पक्ष्यांच्या झुंजी लावतात. ऑस्ट्रेलियात विविधरंगी पक्ष्यांच्या प्रजननासाठी पक्षी पाळले जातात. पक्ष्यांची पिसे,सौंदर्यप्रसाधन म्हणून शिरस्त्राणात (उदा., नागा, रेडइंडियन लोक) घालतात तसेच सजावटीसाठी पिसे वापरतात. शिवाय गाद्या, उशा व रजया यांत भरण्यासाठी, लेखणीसाठी, बाणांच्या टोकांना लावण्यासाठी, बॅडमिंटनची फुले, पंखे वा कुंचे बनविण्यासाठी पिसे वापरतात. एस्किमो व पॉलिनेशियन लोक तर पिसांची वस्त्रेही (विशेषत: स्त्रियांची) बनवितात. काही पक्ष्यांची घरटी गृहसजावटीकरिता वापरली जातात. उदा., सुगरण, बुलबुल. फॉकलंड बेटांत पक्ष्यांच्या चरबीपासून तेल बनवितात. आयुर्वेदामध्ये काही पक्ष्यांचे मांस व तेल रोगचिकित्सेत उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. उदा., पारव्याचे मांस व रक्त पक्षाघातावर (लकव्यावर), धनेशाचे तेल वातरोगावर. काही ठिकाणी मुख्यत्वे पक्ष्यांच्या मलमूत्रापासून फॉस्फरस आणि नायट्रोजन भरपूर असलेला पदार्थ बनतो, त्याला ⇨ ग्वानो म्हणतात व त्याचा चांगले खत म्हणून उपयोग होतो.

पक्ष्यांचे वर्गीकरण

गणांचे नाव

कालावधी

शारीरिक वैशिष्ट्ये

आकारमान व प्रचार

आर्किऑर्निथीज उपवर्ग

आर्किऑप्टेरिजिफॉर्मिस

(आर्किऑप्टेरिक्स*)

उत्तर जुरासिक

दात उखळीत जडविलेले; शेपटीतील मणके लांब व सुटे (न जोडले गेलेले); मणक्यावर पुच्छ-पिच्छांची एक जोडी; उरोस्थीला कणा नसे; हाताच्या बोटांवर कार्यशील नख्या; विसर्पण करीत.

लांबी सु. ५० सेंमी.; यूरोप

नीऑर्निथीज उपवर्ग

ओडोंटोग्नॅथी महागण

हेस्परॉर्निथिफॉर्मिस

(हेस्परॉर्निस, बॅप्टॉर्निस)

उत्तर क्रिटेशन

दात जबड्यातील खोबडीत जडविलेले; न उडणारे; पायांच्या साहाय्याने बुडी मारणारे

१ ते २ मी. लांब; उत्तर व दक्षिण अमेरिका.

नीओग्नॅथी महागण

टिनॅमिफॉर्मिस

(टिनॅमस)

उत्तर प्लायोसीनपासून आतापर्यंत

वरवर पाहता ग्राउझसारखे किंवा लाव्यासारखे; जमिनीवर राहणारे; चापट, लांबट व काहीशी कमजोरी चोच; अगदी छोटी शेपटी.

१५ ते ५० सेंमी.; मध्य व दक्षिण अमेरिका.

रीफॉर्मिस

(रिआ*)

पूर्व इओसीनपासून आतापर्यंत

शहामृगाप्रमाणे धावण्यासाठी अनुकूलन झालेले; शेपटी अगदी छोटी; अनुपिच्छ नसते; नर व मादी सारखी दिसतात.

९० ते १३० सेंमी. लांब; द. अमेरिका.

स्ट्रुथिऑर्निफॉर्मिस

(शहामृग*)

पूर्व प्लायोसीनपासून आतापर्यंत

पायांची बोटे दोन; जमिनीवर पळणारे; नर काळा व पांढरा, मादी उदी; अनुपिच्छ, कोमल पिच्छ व रोमपिच्छ नसतात; सध्याचा सर्वांत मोठा पक्षी; वजन १३६ किग्रॅ., अंड्याचे वजन १.६ किग्रॅ.

लांबी १८० सेंमी., उंची २६० सेंमी.; नैर्ऋत्य आशिया व आफ्रिका.

कॅझुॲरिफॉर्मिस

(एमू*; कॅसोवेरी*)

प्लाइस्टोसीनपासून आतापर्यंत

धावणारे; प्रचंड; नर व मादी सारखी दिसतात; उदी (एमू) वा काळसर रंगाची गलुली व शिरस्त्राण (कॅसोवेरी); अनुपिच्छ अतिशय मोठे.

१३० ते १९० सेंमी.; ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी व लगतची बेटे.

ईपिऑर्निथिफॉर्मिस

(‘हत्ती पक्षी’)

प्लाइस्टोसीन

अतिप्रचंड व बोजड शरीराचे; यांच्या एका अंड्याचे वजन १० किग्रॅ. असावे असा अंदाज करण्यात आला आहे.

उंची ३ मी.; मॅलॅगॅसी.

डायनॉर्निथिफॉर्मिस

(किवी*; मोआ*)

उत्तर मायोसीन वा पूर्व प्लायोसीन

पासून आतापर्यंत

अतिशय मोठे व बोजड किंवा लहान; पंख जवळजवळ नाहीत; रात्रिंचर

मोठे ३ मी. उंच, लहान लांबी ३० ते ८० सेंमी.; न्यूझीलंड.

गणांचे नाव

कालावधी

शारीरिक वैशिष्ट्ये

आकारमान व प्रचार

पोडिसीपिडिफॉर्मिस

(ग्रीव, डुबडुबी*)

पूर्व मायोसीनपासून आतापर्यंत

पायांनी रेटा देऊन डुबी मारतात; पाळीसारखे प्रवर्ध असलेली बोटे; अगदी छोटी शेपटी; रेशमासारखा मऊ पिसारा.

लांबी २१ ते ६६ सेंमी.; जगभर.

प्रोसेलॅरिफॉर्मिस

(ॲल्बट्रॉस*; पेट्रेल*)

मध्य इओसीनपासून आतापर्यंत

सागरी; बोटे पातळ त्वचेने जोडलेली; नाकपुड्या नळीसारख्या; वरच्या व खालच्या जंभांवरील शृंगी आवरण पट्टांत विभागलेले; कस्तुरीप्रमाणे वास; बहुतेकांचे पंख अरुंद; तीव्र विसर्पी उड्डाण.

लांबी १४ ते १३५ सेंमी.; सर्व महासागर.

स्फेनिसिफॉर्मिस

(पेंग्विन*)

उत्तर इओसीनपासून आतापर्यंत

पाण्यात हालचाल करण्यास सोयीचे असे माशांच्या परांसारखे पंख; पाय आखूड व मजबूत; बोटांत पडदे; ताठ उभे राहतात; पिसे आखूड व दाट.

४० ते २० सेंमी. (जीवाश्म १८० सेंमी.);

दक्षिण गोलार्धातील महासागर.

पेलिकॅनिफॉर्निस

(पाणकोळी*; पाणकावळा*)

पॅलिओसीनपासून आतापर्यंत

पाण्यात राहणारे; चारही बोटांत पडदे; बाकदार वा सरळ आणि अणकुचिदार चोच.

लांबी ५० ते १८० सेंमी.; जगभर.

ॲन्सरिफॉर्मिस

(स्क्रिमर, पाणकोंबडी*)

मध्य इओसीनपासून आतापर्यंत

बोटांत पडदे; रुंद चोच (पाणकोंबडी); किंवा दलदलीत राहणारे मोठ्या पायांचे; चोच कोंबडीच्या पिल्लासारखी (स्क्रिमर) असणारे.

लांबी २९ ते १६० सेंमी.; जवळजवळ जगभर.

फिनिकॉप्टेरिफॉर्मिस

(हंसक*)

क्रिटेशसपासून आतापर्यंत

जीवाश्मांत अधिक विविधता व त्यांचा प्रसारही जास्त; पायांना पडदे; तंगड्या व मान लांब; चोच वाकडी; पिसाऱ्यात गुलाबी वा तांबडी छटा पुष्कळ असते; सिकोनिफॉर्मिस गणाला जवळचा गण म्हणून कधीकधी दोघांचा एक गट करतात.

लांबी ९१ ते १२२ सेंमी.

(काही जीवाश्म लहान);

ऑस्ट्रेलेशिया वगळता इतर उबदार प्रदेश.

सिकोनिफॉर्मिस

(बक, बलाक*; आयविस*; दवींमुख*)

उत्तर क्रिटेशसपासून आतापर्यंत

चोच व तंगड्या लांब; पाण्यातून चालणारे; पायांना पडदे नसतात; बलाक व बक वेगवेगळ्या गणातही येऊ शकतात.

लांबी २८ ते १५२ सेंमी.; अगदी उत्तरेकडील प्रदेश सोडता जगभर.

फॅल्कॉनिफॉर्मिस

(दिनचर शिकारी पक्षी) (ससाणा*;शिकरा*; गिधाड*)

उत्तर पॅलिओसीनपासून आतापर्यंत

बाकदार चोच; लांब नख्या; आखूड (शिकरा, ससाणा) वा लांब (सेक्रेटरी पक्षी) तंगड्या; मृत प्राणी खाणाऱ्यांच्या नख्या कमजोर व फाडण्यास योग्य अशी चोच (गिधाड)

लांबी १५ ते १५० सेंमी.

(काही जीवाश्म अधिक मोठे); जगभर

 

गणांचे नाव

कालावधी

शारीरिक वैशिष्ट्ये

आकारमान व प्रचार

ग्रुइफॉर्मिस

(करकोचा*; कारंड*; माळढोक*)

उत्तर क्रिटेशसपासून आतापर्यंत

पुढील अगदी भिन्न गट यात येतात: लावा, लांब तंगड्यांचा करकोचा, दलदलीतील रेल, पोहणारे कारंड, धावणारे माळढोक, डायाट्रिमा व संबंधित पक्षी.

लांबी ११ ते १५२ सेंमी.

(जीवाश्म २०० सेंमी. पर्यंत); जगभर.

इक्थिऑर्निथिफॉर्मिस

(इक्थिऑर्निस, ॲपॅटॉर्निस)

उत्तर क्रिटेशस

वरवर पाहता कुरव किंवा कुररीसारखे दिसणारे परंतु निश्चित आप्तभाव पाणपक्षी.

लांबी सु. २१ ते २६ सेंमी.;

उत्तर अमेरिका.

कॅरॅड्रिफॉर्मिस

(कुरव*; कुररी*; ऑक*)

उत्तर क्रिटेशसपासून आतापर्यंत

(१) उपगण कॅरॅड्री : पाण्यातून धावणारे समुद्रकिनारी पक्षी; पाण्यातील वा चिखलातील लहान प्राणी खाणारे; चोच बहुधा लांब; (२) उपगण लॅरी : पायात पडदे; पिसारा दाट; पाणपक्षी; (३) उपगण ॲल्सी : पिसारा दाट; पायांना पडदे; सागरी; बुडी मारण्यासाठी पंखांचा वापर.

लांबी १३ ते ७६ सेंमी.; जगभर.

गॅव्हिफॉर्मिस

(लून, बुड्या मारणारे)

उत्तर पॅलिओसीनपासून आतापर्यंत

पायांनी रेटा देऊन बुडी मारतात; पायांना पडदे; अणकुचिदार चोच अंतर्जंघास्थीची वाढ होऊन बनलेला जंघीय तुरा.

लांबी ६६ ते ९५ सेंमी.; होलार्क्टिक.

कोलंबिफॉर्मिस

(कबूतर*;डोडो*; भाटतीतर*; होला*)

उत्तर इओसीन (वा पूर्व ऑलिगोसीन)-पासून आतापर्यंत

जलद उडणारे; पंख टोकदार; चोच कमजोर; बिया व फळे हा आहार.

लांबी १५ ते ५४ सेंमी.; अगदी उत्तरेकडील प्रदेश सोडून जगभर.

सिट्टॅसिफॉर्मिस

(लोरी, पोपट*; काकाकुवा*)

उत्तर ऑलिगोसीनपासून आतापर्यंत

बहुधा चकचकीत रंग; जोमदारपणे उडणारे; फळे, मकरंद वा बिया खाणारे; मजबूत बाकदार चोच; बाहेरचे बोट मागे वळलेले.

लांबी ९.५ ते ९९ सेंमी.; सर्व उष्ण कटिबंध, काही जाती समशीतोष्ण भागात.

क्युक्युलिफॉर्मिस

(टोरॅको, कोकिळ*)

उत्तर इओसीन (वा पूर्व ऑलिगोसीन)-पासून आतापर्यंत

शेपटी लांब; बाहेरचे बोट मागे वळलेले; फळे व लहान प्राणी हे अन्न; बहुतेक वृक्षवासी; थोडेच भूचर; काही आपल्या पिल्लांचे संगोपन दुसऱ्या पक्ष्यांवर युक्तीने ढकलतात (उदा., कोकिळ).

लांबी १६ ते ७० सेंमी.; अगदी उत्तरेकडील प्रदेश सोडता जगभर.

स्ट्रायजिफॉर्मिस

(घुबड*)

इओसीनपासून आतापर्यंत

रात्रिंचर; शिकारा पक्षी; बाकदार चोच; मजबूत नख्या; पिसारा मऊ.

लांबी १३-६९ सेंमी.; जगभर.

गणांचे नाव

कालावधी

शारीरिक वैशिष्ट्ये

आकारमान व प्रचार

कॅप्रिमुल्जिफॉर्मिस (भेकमुख, तैलपक्षी, कापूर पक्षी*)

प्लायोसीनपासून आतापर्यंत

मायावरणी (बाह्य परिस्थितीशी एकरूप झालेल्या) नमुन्याची रंगव्यवस्था; पिसारा मऊ; रात्रिंचर; कमजोर पाय; अतिशय मोठे तोंड; उडताना कीटक पकडून खातात.

लांबी १९ ते ५३ सेंमी.; अगदी उत्तरेकडील प्रदेश सोडून जगभर.

ॲपोडिफॉर्मिस

(प्रकूज पक्षी, दुर्बल*)

उत्तर एओसीन (वा पूर्व ऑलिगोसीन)-पासून आतापर्यंत

जलदपणे उडणारे; कीटक व मकरंद हे अन्न; ‘हात’ व आद्यके यांनीच पंखांचा मोठा भाग बनतो; पाय कमजोर.

लांबी ६.३ ते २३ सेंमी.; अगदी उत्तरेकडील प्रदेश वगळता जगभर.

कोलिफॉर्मिस

(कोली, मूषपक्षी)

जीवाश्म सापडलेले नाहीत

पिसारा मऊ; लांब, टोकदार शेपटी; चारही बोटे पुढील बाजूस वळलेली; अन्न बहुधा वनस्पती, काहींचे कीटक.

लांबी २९ ते ३६ सेंमी.; सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिका.

ट्रोगॉनिफॉर्मिस

(ट्रोगॉन =लोह-चटक)

उत्तर इओसीन (वा पूर्व ऑलिगोसीन)-पासून आतापर्यंत

अतिशय मऊ पिसारा; वृक्षवासी; खालची बाजू पिवळी ते तांबडी; डोके व मान बहुधा रंगदीप्त (फिरते रंग); शेपटी लांब व काळी पांढरी; पाय कमजोर; पहिले व दुसरे बोट मागे वळलेले; कीटक व लहान फळे हे अन्न.

लांबी २३ ते ३४ सेंमी.; ऑस्ट्रेलेशिया वगळता सर्व उष्ण कटिबंध.

कोरॅसिफॉर्मिस

(खंड्या*)

इओसीनपासून आतापर्यंत

बिळात घरटे करून राहणाऱ्या विषम जातींचा गट; पुष्कळांची चोच लांब व अणकुचिदार आणि पिसारा निळा वा हिरवा; दुसरे व तिसरे किंवा तिसरे व चवथे बोट तळाशी जोडलेले; अन्न मुख्यत्वे प्राणी, ⇨

धनेश (हॉर्नबिल) मात्र बहुधा फळेच खातो.

लांबी ९ ते १६० सेंमी.; अगदी उत्तरेकडील प्रदेश सोडता जगभर.

पिसिफॉर्मिस

(सुतार पक्षी*; तांबट*)

उत्तर ऑलिगोसीन (कदाचित उत्तर इओसीन) पासून आतापर्यंत

बिळात घरटे करून राहणारे; बाहेरचे बोट मागे वळलेले; फळे व कीटक हा आहार; सुतार पक्षी झाडावर चढू शकतो.

लांबी ९ ते ६१ सेंमी.; बऱ्याच प्रदेशांत.

पॅसेरिफॉर्मिस

[ यष्टिसादी (पर्चिंग) पक्षी उदा., कावळा*]

उत्तर इओसीनपासून आतापर्यंत

यष्टिसादी पक्ष्यांच्या या जटिल समूहात एकूण सर्व ज्ञात पक्ष्यांच्या निम्यापेक्षा जास्त जाती येतात; चोच, पिसारा आणि सवयी यांत अतिशय भिन्नता आढळते.

लांबी ७.५ ते १०२ सेंमी.; जगभर.

कॅप्रिमुल्जिफॉर्मिस (भेकमुख, तैलपक्षी, कापूर पक्षी*)

प्लायोसीनपासून आतापर्यंत

मायावरणी (बाह्य परिस्थितीशी एकरूप झालेल्या) नमुन्याची रंगव्यवस्था; पिसारा मऊ; रात्रिंचर; कमजोर पाय; अतिशय मोठे तोंड; उडताना कीटक पकडून खातात.

लांबी १९ ते ५३ सेंमी.; अगदी उत्तरेकडील प्रदेश सोडून जगभर.

*या पक्ष्यांवर स्वतंत्र नोंदी आहेत. येथे या पक्ष्यांचा त्या त्या गणाचे प्रतिनिधी म्हणून उल्लेख केलेला आहे.

  • पक्ष्यांचे मांस मासेमारीकरिता आमीष म्हणून वापरले जाते. कावळे, गिधाडे इत्यादींसारखे पक्षी मृत शरीरे, उष्टे खरखटे, टाकाऊ पदार्थ खातात त्यामुळे सफाईचे काम तर होतेच शिवाय रोगप्रसारासही काही प्रमाणात प्रतिबंध होतो.

शेतकऱ्यांना पक्ष्यांपासून अनेक फायदे होतात. पक्षी कीटक नियंत्रणाचे काम करतात. ते पीडक कीटक, कृमी, अळ्या वगैरे खातात. त्यामुळे पिकांचे व वनस्पतींचे रक्षण होते व रोगांनाही आळा बसतो. तसेच काही पक्षी झाडांच्या सालीवरील कीटकही खातात त्यामुळे त्या लाकडाचे संरक्षण होते. वनस्पतींच्या ⇨ परागणासही पक्षी मदत करीत असतात. काही फळझाडांच्या बियांचा प्रसार पक्ष्यांमार्फत होतो; तसेच काही गवतांच्या बीजांचा प्रसारही पक्षी करतात व या गवतांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. उलट काही तणांचे बी पक्षी खातात व त्यामुळे अशा तणांचे नियंत्रण होते. काही मांसाहारी पक्षी उंदीर, घुशी, ससे वगैरे कृंतक (कुरतडणारे) प्राणी खातात व अशा प्राण्यांचा होणारा उपद्रव कमी होतो.

पक्ष्यांच्या निरीक्षणाचा छंद हळूहळू वाढत असून त्याद्वारे पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन माणसाला आनंद मिळू शकतो. पक्षी वर्गाच्या अध्ययनामुळे जीवविज्ञानाच्या सैद्धांतिक व प्रायोगिक ज्ञानात भर पडत असते. उदा., गालॅपागस फिंच व इतर पक्ष्यांच्या अभ्यासातून चार्ल्‌स डार्विन यांना ‘नैसर्गिक निवडीद्वारे जाति-उत्पत्ती’ या कल्पनेची प्रेरणा मिळाली. पक्षी हे सर्वांत चांगले माहीत झालेले प्राणी असल्याने संशोधनासाठी असलेल्या पक्षिसंग्रहालयांतील एकूण अभ्यासामधून भौगोलिक विभेद, प्राणिभूगोल इ. शाखांच्या अध्ययनाचा पाया तयार होतो. कोंबड्यांच्या आधीच्या अध्ययनातून उत्पत्ती व भ्रूणविज्ञान या जीवविज्ञानाच्या शाखांच्या विकासास मदत झाली आहे. प्राण्यांच्या वर्तनाविषयीचा अभ्यास मुख्यत्वे पक्ष्यांच्या वर्तनाच्या अभ्यासातूनच विकसित होत आहे.

पक्षी शेतकऱ्यांना उपयुक्त असले, तरी थोड्या प्रमाणात त्यांचा उपद्रवही होतो. ते धान्याची व पिकांची नासाडी करतात. तसेच फळे खातात वा खराब करतात. ससाणा, शिकरा, घुबड इ. शिकारी पक्षी मासे व पाळीव प्राणी खाऊन नुकसान करतात. मोठ्या इमारतींत राहणाऱ्या चिमण्या, साळुंक्या, कस्तूरक इत्यादींमुळे काही ठिकाणी आवाज, घाण वगैरेंसारख्या समस्या निर्माण होतात. कधीकधी पक्ष्यांची विमानाशी टक्कर होऊन अपघात होऊ शकतात; पॅसिफिक बेटांवरील विमानतळाच्या धावपट्टीवर असलेल्या ॲल्बेट्रॉस पक्ष्याच्या घरट्यांमुळे वाहतुकीस उपद्रव पोहोचतो. आफ्रिकेत तांबड्या चोचीच्या क्वेलिआ पक्ष्यांच्या टोळांप्रमाणे धाडी येतात व त्यांच्या एकूण वजनाने झाडांच्या फांद्या तुटू शकतात. पक्ष्यांना अनेक रोग होतात व त्यांच्यात अनेक परजीवी असतात; परंतु पक्ष्यांच्या संसर्गाने माणसाला अगदी थोडेच रोग होऊ शकतात. ज्या व्हायरसांमुळे शुकरोग (सिटॅकोसिस) वा ऑर्निथओसिस होतो, ते व्हायरस माणसाकडे सरळ पक्ष्यांकडून येऊन हा रोग माणसाला होतो व कधीकधी या रोगाने मृत्यूही येतो. तसेच मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) हा गंभीर रोगही माणसाला पक्ष्यांमार्फत होतो. जंगली पक्ष्यांद्वारे पाळीव पक्ष्यांना घातक रोग होऊ शकतात (पक्ष्यांमध्ये अधिकाधिक प्रमाणात व्हायरस आढळून येत आहेत).

ज्याप्रमाणे पक्ष्याचे मानवी जीवनावर परिणाम होतात, त्याचप्रमाणे मानवी वर्तनाचे पक्ष्यांवर परिणाम होतात व ते वाढत आहेत. १६८० सालापासून मानवामुळे पक्ष्यांच्या सु. ८० जाती लुप्त झाल्या असून त्यांपेक्षा जास्त जाती (उदा., एमू, काही पोपट व चिमण्या इ.) नष्ट होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. लोप पावलेले बहुतेक सगळे पक्षी बेटांवर राहणारे होते. फक्त सहा उ. अमेरिका खंडातील होते. पूर्वी शिकार हे पक्ष्यांच्या ऱ्हासाचे कारण होते. ‘हत्ती पक्षी’ (ईपिऑर्निस), मोआ (डायनॉर्निस), प्रवासी (पॅसेंजर) कबूतर, लॅब्रॅडॉर बदक, कॅरोलायना पॅराकीट, डोडो वगैरे पक्षी हे ऐतिहासिक काळापर्यंत होते व ते मानवामुळे लुप्त झाले असे मानतात. उत्तर अटलांटिक क्षेत्रात राहणारा मोठा ऑक हा पक्षी १८५० साली लुप्त झाला. द. अमेरिका व आफ्रिका खंडांतील कोणताही पक्षी लुप्त झालेला नाही. यूरोपात मोठा ऑक हा एकच पक्षी लुप्त झाला आहे. आशिया खंडात एक (शेल ड्रेक) आणि ऑस्ट्रेलियात एक पक्षी लोप पावला. उलट वेस्टइंडीजमध्ये १३ जाती व उपजाती, हवाई बेटांत १३ जाती व १३ उपजाती, मध्य व पश्चिम पॅसिफिक बेटांत १४ जाती व उपजाती लोप पावल्या आहेत. प्रदूषण व पीडकनाशक द्रव्ये ही काही जाती नष्ट होण्याची प्रमुख कारणे असली, तरी मुख्यत्वे पक्ष्यांच्या नैसर्गिक वसतिस्थानांवर होणारे मानवाचे आक्रमण, तसेच परकीय प्राणी व नवीन रोग यांमुळे पक्ष्यांचा सर्वांत जास्त नाश होत असावा. पीडकनाशक द्रव्यांमुळे काही पक्षी मरतात, तर काही पक्ष्यांची अंडी उबत नाहीत वा फुटून जातात. कधीकधी प्रदूषक द्रव्यांमुळे पक्ष्यांचे भक्ष्य असलेले प्राणी मरतात व त्याचा पक्ष्यांवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. नवीन उद्याने व शेते यांमुळे पक्ष्यांची संख्या वाढत असली, तरी जंगले व दलदली यांची क्षेत्रे कमी झाल्याने तेथील पक्ष्यांची संख्या कमी झाली. यांशिवाय मानवी जीवनाचे पक्ष्यांवर पुढील परिणामही होतात. उंच इमारती,दूरचित्रवाणीचे मनोरे इत्यादींमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरास अडथळा होऊ शकतो. विमानांच्या तसेच हमरस्त्यावरील वाढत्या वाहतुकीमुळे अधिक प्रमाणात पक्षी घायाळ होतात वा मरतात. खनिज तेलावर चालणाऱ्या जहाजातून पाण्यात टाकल्या जाणाऱ्या साख्यामुळे (इंधन जळाल्यावर मागे राहिलेल्या गाळ्यामुळे) तेथील पक्ष्यांची पिसे एकमेकांना चिकटतात व त्यांना उडणे अवघड होते. शिवाय त्यांच्या पंखांचा निरोधक गुणधर्मही या साख्यामुळे नाहीसा होतो.

अशा तऱ्हेने विरळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या जाती टिकवून ठेवण्याचे व त्यांच्याविषयी शक्य तितकी अधिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत. या दृष्टीने बहुतेक देशांत पक्ष्यांना विशेषत: शेतीला उपयुक्त असलेल्या पक्ष्यांना कायद्याने संरक्षण देण्याचे प्रयत्न चालू आहेत. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संरक्षणाचे कायदे अनेक देशांत असून त्यांत पक्ष्यांच्या शिकारीविषयीचे कायदेही आहेत. काही देशांत जंगली पक्षी, त्यांचे शव, अंडी, कातडी अथवा पिसे यांची खरेदी-विक्री व निर्यात यांवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. काही कायद्यांनुसार पक्ष्यांची अंडी व घरटी यांनाही संरक्षण देण्यात आले आहे. पक्ष्यांना क्रौर्याने वागविण्याविरुद्धही काही देशांनी कायदे केले आहेत [® प्राण्यांविषयीची निर्दयता]. बहुतेक देशांमध्ये पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने उभारली असून काही देशांत जंगली पक्ष्यांसाठी काही प्रदेश राखीव म्हणून जाहीर केले आहेत (उदा., हाइड पार्क) [® राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश].

पुष्कळ देशांच्या पुराणकथांत व साहित्यात पक्ष्यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले आढळते. काही ठिकाणी कला, भाषा व साहित्य यांमध्ये पक्ष्यांविषयी काही संकेत रूढ झाले आहेत. तसेच काही समाजांमध्ये विविध पक्ष्यांसंबंधी निरनिराळ्या समजुती रूढ आलेल्या आढळतात; उदा., हंसाची नीरक्षीरविवेक. (चित्रपत्रे ४४, ४५, ४६. ४७).

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate