অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंकोरवात

प्रस्तावना

कंबोडियातील म्हणजे सध्याच्या ख्मेर प्रजासत्ताकातील (कंबोज) प्राचीन वास्तूंतील प्रमुख अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ, अंकोरवात ख्मेरराजांच्या कलापद्धतीचा उत्कृष्ट आविष्कार यथार्थतेने मानला जातो. पहिल्या धरणींद्रवर्मनच्या (११०७-१११३) कारकीर्दीत अंकोरवातच्या बांधणीस सुरुवात झाली असावी; मात्र त्याचे संपूर्ण बांधकाम दुसऱ्या सूर्यवर्मनच्या (१११३-सु.११५०) कारकीर्दीत पूर्ण झाले. तथापि दुसरा धरणींद्रवर्मन व दुसरा यशोवर्मन (११५०-११६५) ह्यांच्या कारकीर्दीतही येथील शिल्पांत थोडी भर पडली. अंकोरवातचे देवालय मानवी हाताने बांधले नसून ते बांधण्याकरिता खुद्द स्वर्गातून देव आले होते अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. ‘अंकोर’ या शब्दाचा मूळचा अर्थ ‘नगर’ असा असला, तरी नंतरच्या काळात ‘देऊळ’ ह्याही अर्थी हा शब्द रूढ झाला. ‘अंकोरवात’ याचा अर्थ ‘नगरातले मंदीर’ असा होतो.

वास्तूची वर्णनात्मक माहिती

अंकोरवात अंकोरथोमपासून दक्षिणेस सु. दीड किमी. वर आहे. अंकोरवातच्या देवळाभोवतालची भिंत प्रचंड आहे. या भिंतीच्या चारही बाजूंची एकंदर लांबी चार किमी. आहे. या भिंतीभोवती १९० मी. रूंदीचा खंदक असून त्याची खोली आठ मी. आहे. तो फक्त पश्चिमेकडून ओलांडता येतो. सु. २० किमी. एवढा मोठा खंदकाचा घेर आहे. खंदक ओलांडल्यावर आत पाच मजली प्रवेशद्वार लागते. याची रचना दक्षिण भारतातील देवळांच्या गोपुरांची आठवण करून देते. या गोपुरांमधून सु. ३४० मी. चालून गेल्यावर मुख्य देऊळासमोरचा चौथरा लागतो. मुख्य देऊळ एकावर एक असणाऱ्या तीन चौथऱ्यावर उभारलेले आहे. या प्रत्येक चौथऱ्याची उंची सु. साडेचार ते सहा मी. असून तळचा चौथरा १८० X २१३ मी. या मोजमापाचा आहे प्रत्येक चौथऱ्याच्या तीन बाजूंस व्हरांडा असून व्हरांड्याच्या भिंतींत उत्कृष्ट शिल्पे आहेत. मुख्य देऊळ २०४ मी. रुंद व २२१ मी. लांब असून देवळाची एंकदर उंची ६६ मी. आहे. प्रवेशद्वारापासून ते मंदीरापर्यंतच्या रस्त्याची लांबी देवळाच्या पश्चिम बाजूच्या दुप्पट असल्याने प्रवेशद्वारात येताच वास्तूची भव्यता नजरेत भरते. वास्तू रूंद आहे, पण एकावर एक अशा चौथऱ्यांनी आणि देवळाच्या शिखरांनी गगनचुंबी उत्सेधाचा आभास निर्माण झाला आहे.

दगडी शिल्पे

येथील स्तंभ, द्वारशाखा व चौथऱ्यांवरील नक्षी यांपेक्षाही येथील सु. दोन-दोन मी. उंचीची दगडी शिल्पे अधिक नजरेत भरतात. येथे प्रामुख्याने विष्णुकथाच शिल्पित केलेल्या आढळतात. याशिवाय विविध अलंकार ल्यालेल्या अप्सरा, भजनात दंग असलेले भक्त, सात फण्यांचे नाग, समुद्रमंथन, कृष्णकथा वमहाभारत-रामायणांतील विविध प्रसंग आहेत; यमराजापुढे आपल्या आयुष्यातील कृत्यांचा झाडा देण्याकरिता उभ्या असलेल्या मानवांच्या रांगा आहेत; याचबरोबर या देवळाच्या बांधणीला कारणीभूत झालेल्या विष्णुभक्त सूर्यवर्मनचा राज्याभिषेक आणि हत्तीवरील यद्धोन्मुख सेनेची चालही दर्शविली आहे. तज्ञांच्या मते या शिल्पांत चित्रकाराच्या कुंचल्याची नाजुकता ठायी ठायी प्रकट होते. काहींच्या मते याच कालात भारतात ज्याप्रमाणे शिल्प आणि वास्तू एकजीव झालेल्या आढळतात, तसे येथे होत नाही; वास्तू आणि शिल्प परस्परपूरक वाटत नाहीत.

या देवळात कोणती देवता पूजिली जात होती, हे निश्चित सांगता येत नाही. राजाची दहनोत्तर रक्षा ठेवण्याकरिता हे मंदिर बांधले गेले असावे, असे सुचविले जाते. ह्या मताला पुष्टी म्हणून या देवळाचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे आणि त्यावर यमराजाची शिल्पाकृतीही आहे, हे प्रामुख्याने निर्देशिले जाते. फर्ग्युसनच्या मते अंकोरवात मूलतः बौद्धांचे नसावे, कारण येथील वास्तूंत बौद्ध वास्तुशिल्पाचे काहीही वैशिष्ट्ये आढळत नाहीत. या मंदिरातील पूजामूर्ती म्हणजे ‘देवराज’ असावी, असे काही तज्ञांचे मत आहे. देवराज ही विष्णूचे स्वरूप आणि आयुधे धारण करणाऱ्या सम्राटाची मूर्ती होय. ‘राजा म्हणजे साक्षात ईश्वरी अवतार’ ही कल्पना कंबोडियाकडील सर्व भागांत प्रचलित होती. जावा बेटातही अशा पद्धतीची मंदिरे आढळतात. अंकोरवात मंदिराच्या नऊ उपमंदिरांत विष्णूचे उरलेले नऊ अवतार दाखविले होते व ते ते स्वरूप धारण केलेल्या त्या सूर्यवर्म्याच्या मंत्र्यांच्या प्रतिकृती होत्या. येथील यमलोकाचे शिल्पपट्ट व त्यांची उजवीकडून डावीकडे (नेहमीपेक्षा उलटी) मांडणी, ह्यांवरून हे मंदिर सूर्यवर्म्याने आपले स्मारक किंवा समाधी म्हणूनही उभारले असावे, असे सांगता येते.

अंकोरवात येथे सापडलेली इतर शिल्पे आणि ब्राँझच्या मूर्ती ह्यांत मात्र विशेष असे काही नाही. चौरस चेहरे, ठळ भुवया आणि शुष्क ओठ ख्मेरच्या कलेचा ऱ्हासच दाखवितात. चेम राजांनी अंकोर जिंकल्यावर तेथील हिंदू परंपरांची आणि ख्मेर कलेची पीछेहाट झाली.

समुद्रमंथनाचे अपोत्थितशिल्प कैलास पर्वत हलविणारा रावण : उत्थितशिल्प

वाली - सुग्रीव द्वंद्वयूद्धाचे शिल्पांकन

संदर्भ: 1. Groslier, B. P.Indo China-Art of World Series, Vol. IX, Londan, 1962.

2. Zimmer, Heinrich; Ed. Campbell Joseph, The Art of Indian Asia, 2Vols., NewYork, 1960.

लेखक : शां. भा. देव

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate