অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उंट प्राणीशास्त्र

उंट प्राणीशास्त्र

 

हा आर्टिओडॅक्टिला गणातल्या (समखुरी प्राणि-गणातल्या) टायलोपोडा उपगणाच्या कॅमेलिडी कुलातला प्राणी आहे. त्याच्या दोन जाती आहेत : एक अरबी व दुसरी बॅक्ट्रियन. पहिल्याच्या पाठीवर एक मदार असते व दुसऱ्याच्या पाठीवर दोन असतात. पहिल्याचे प्राणिशास्त्रीय
आ. १. अरबी उंटआ.
नाव कॅमेलस ड्रोमेडेरियस  व दुसऱ्याचे कॅमेलस बॅक्ट्रिअ‍ॅनस  असे आहे. अरबी उंट नैर्ऋत्य आशिया व उत्तर आफ्रिका या प्रदेशाचा रहिवासी आहे. भारतीय उंट ह्यापैकीच आहे. बॅक्ट्रियन हा मध्य आशियातील थंड ओसाड प्रदेशात राहणारा आहे. दोन्ही जातींचे उंट माणसाळविले गेल्यामुळे हल्ली रानटी अवस्थेत क्वचितच आढळतात.
अरबी उंट ख्रिस्तपूर्व १८०० च्या सुमारास अरबस्तानात माणसाळविला गेल्याबद्दल पुरावा मिळतो. बॅक्ट्रियन उंट ख्रिस्तपूर्व ८५७ च्या सुमारास माणसाळविला गेला असावा, असा समज आहे.
भारताच्या इतर कोणत्याही भागापेक्षा राजस्थानात उंट अधिक आहेत. हे सगळे पाळीव असून काही लोक त्यांचा व्यापार करतात. राजस्थानातून पंजाब, हरियाणा वगैरे राज्यांत उंट पाठविले जातात. राजस्थानात उंट दोनच कामाकरिता वापरले जातात– स्वारीकरिता व ओझे वाहून नेण्याकरिता. स्वारीच्या उंटावर बसून माणसे दूरचा प्रवास करतात. ओझे वाहणारा राजस्थानी उंट सु. दोन क्विंटल ओझे कोठेही विश्रांती न घेता ३० किमी. नेऊ शकतो. स्वारीचे उत्तम उंट एका रात्रीत १३०–१६० किमी. प्रवास करू शकतात.
उंट रवंथ करणारा प्राणी असला, तरी वर्गीकरणात इतर रवंथी प्राण्यांत त्याचा समावेश करीत नाहीत, कारण त्याच्या जठराचे तीनच कप्पे
आ. २. बॅक्ट्रियन उंट
असतात व तिसरा कप्पा अवशेषी असतो. रोमंथिकेच्या (जठराच्या पहिल्या, अन्न साठविण्याऱ्या कप्प्याच्या) भित्तीत चंबूच्या आकाराच्या लहान गुहिका (पोकळ्या) असून, त्यांच्या मुखावर संकोची स्‍नायू असतात. पाणी प्यायल्यावर रोमंथिका पाण्याने भरली म्हणजे हे स्‍नायू  आपोआप शिथिल होतात व या गुहिका पाण्याने भरतात. हे पाणी जरूर पडेल तेव्हा हळूहळू झिरपून पोटात येते. त्याचप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष असेल तेव्हा मदारीतील वसेच्या (चरबीच्या) ऑक्सिडीकरणामुळे [ ऑक्सिडीभवन] पाणी तयार होते व उंटाला त्याचा उपयोग होतो. यामुळेच उंट पाण्यावाचून बरेच दिवस तग धरू शकतो. उंट पोटात पाणी साठवून ठेवतात व रेताड वाळवंटातील प्रवासात पाण्याच्या दुर्भिक्षाच्या वेळी उंटांना मारून त्यांच्या पोटातील पाणी काढून घेऊन माणसे ते पितात, अशी एक समजूत प्रचलित आहे; पण ती चुकीची आहे.
अरबी व बॅक्ट्रियन यांच्या संयोगाने उत्पन्न होणाऱ्या प्रजेला पहिल्याची एक मदार व दुसऱ्याची धूसर रंगाची केसाळ कातडी असते. अरबी मादी व बॅक्ट्रियन नर यांच्यापासून झालेली प्रजा लोक जास्त पसंत करतात.
उंट अंगाने धिप्पाड व स्वभावाने चमत्कारिक असला, तरी एकंदरीत गरीब, अतिशय काटक व सोशिक प्राणी आहे. ३५०–४०० किग्रॅ. वजनाचे ओझे घेऊन रोज ५० ते ८० किमी. अशी एकसारखी ४-५ दिवस तो सफर करू शकतो. पायांच्या सांध्यांची लवचिक घडण, कठीण खुराऐवजी रुंद जाड तळवा असलेले लांब पाय, मागील पायांच्या मांड्यांची विशेष ठेवण ह्यांमुळे उंटाला लांबलांब टांगा टाकून वेगाने  चालता येते. विशेषतः रेताड वाळवंटातून ओझे घेऊन, दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला जाणे अशक्य असल्यामुळे, उंटाला ‘वाळवंटातील जहाज’ किंवा ‘वालुकारण्य नौका’ असे सार्थ नाव पडले. तो सपाट प्रदेशातून वेगाने चालतो पण खडकाळ, डोंगराळ व उतरणीवरून फार बेताने चालतो. विशेषतः निसरड्या उतारावरून घसरून पडण्याचा संभव असल्यामुळे जास्त काळजीपूर्वक जातो.
त्याच्या खालच्या जबड्यात पुढच्या बाजूस सहा दात, बाजूस दोन सुळे, मागे दोन्ही बाजूंस पाच दाढा व दोन तीक्ष्ण दात असतात.
आपल्या तीक्ष्ण दातांनी त्याला दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करता येतो. तसेच कठीण वा काटेरी चारा खाता येतो. वरचा ओठ लांबट व दुभंगलेला
आ. ३. राजस्थानी उंट
असल्यामुळे त्याच्या हालचालीने चारा निवडून खाता येतो. मान लांब असल्यामुळे तोंड उंच करून दोन-तीन मीटर उंच झाडाचा पाला तो सहज खाऊ शकतो. रवंथ करणाऱ्या प्राण्यांप्रमाणे उंट झाडपाला, चारा वगैरे रवंथ करतो. मोठे डोळे व तीक्ष्ण दृष्टी ह्यामुळे दूरवरच्या संकटाची व शत्रूची माहिती उंटाला लौकर होते. डोके व डोळे उंच असल्यामुळे तापलेल्या वाळवंटातील उष्णतेचा त्याला त्रास होत नाही. डोळ्यांच्या पापण्यांप्रमाणे नाकपुड्यांची उघडझाप करता येणे व कानांत भरपूर केस ह्यांमुळे वादळात नाक व कान ह्यांचे रक्षण करता येते. डोळ्यातील विशेष रचनेमुळे त्याला सूर्यकिरणांचा मुळीच त्रास होत नाही. विश्रांती घेताना तो आपले पाय मुडपून अंगाखाली घेऊन बसतो. त्यामुळे छातीवर, गुडघ्यावर व मागील ढोपरावर कातडी जाड व राठ होते. मानेवर, गळ्याखाली व मदारीवर भरपूर लांब केस असतात. सुदृढ प्रकृती व शरीराचे आकारमान ह्याच्या प्रमाणात मदार भरगच्च व वाढलेली असते. त्यात मांस व विशेषतः वसा जास्त असते. लांबलांबच्या प्रवासात अन्नाशिवाय रहावे लागते तेव्हा ह्या वसेचा त्याला उपयोग होतो. थकलेल्या किंवा अशक्त उंटाची मदार लिबलिबीत होऊन एका बाजूस पडलेली असते. त्याच्या रक्तातील कोशिका (पेशी) वाटोळ्या नसून लंबवर्तुळाकार असतात, हे वैशिष्ट्य आहे. त्याचे घ्राणेंद्रिये फार तीक्ष्ण असल्यामुळे अफाट जंगलात आसपास पाणी कोणत्या दिशेस आहे ह्याचे ज्ञान त्याला होते. काफल्याला पाण्याच्या बाजूकडे जाण्यास उंट मार्गदर्शक होतो.
काही जंगली उंट चतुर असले, तरी सामान्यपणे हा प्राणी बुद्धीने मंदच आहे. अपाय करणाऱ्याचा पाठलाग करून किंवा त्याला अडचणीत गाठून काही सूड घेतात, तर काही मालकावर प्रेम करतात. सामान्यपणे उंट इतका गरीब असतो की, एक मनुष्य आठ-दहा उंटांच्या तांड्याच्या नाकात एक बारीक दोरी अडकवून दूरवर सफर करू शकतो.
उंट माजावर आला म्हणजे बेफाम होऊन सैरावैरा पळतो, इतर नरांवर हल्ला करतो व त्यांना चावतो. तोंडातील वरच्या पोकळ टाळ्यातून ‘गडगड’ असा आवाज करतो. संयोगानंतर मादी सरासरी ३१५ दिवसांनी एका पिलाला जन्म देते. ती एक वर्षपर्यंत दूध देते. त्यात कॅरोटीन जास्त प्रमाणात असल्यामुळे ते फार पिवळे व पौष्टिक असते, पण त्यात लोण्याचे प्रमाण कमी असते. उंट साधारणपणे ४५ ते ५० वर्षे जगतो.
भारी ओझे घेऊन, रखरखीत वाळवंटातून शेकडो किलोमीटर सफर करण्यास उंट उपयोगी पडतात. थोड्या वेळात जरूरी संदेश दूरवर पोचविण्याच्या कामी जलद पळणाऱ्या सांडण्या फारच उपयोगी असतात. रेताड प्रदेशात राहणारे लोक त्याचे दूध व मांस खातात. त्याच्या केसाचा उपयोग कुंचले, तंबू, गालिचे, कपडे वगैरे करण्यासाठी करतात. त्याच्या हाडांचाही विविध वस्तू करण्यासाठी उपयोग होतो. वालुकामय प्रदेशात लढाईच्या कामी उपयोगी पडत असल्यामुळे सुदानच्या हल्ल्याच्या वेळी तसेच पहिल्या जागतिक महायुद्धात उंटाची पुष्कळ पथके होती.
ओझ्याची घर्षणामुळे वा वजनामुळे त्याच्या पाठीवर तसेच घसरण्यामुळे पायावर मोठ्या जखमा होतात. अंगावरच्या दाट तसेच राठ केसांमुळे, तसेच धुण्यासाठी पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे त्याच्या कातडीस चट्टे पडणे, खरूज होणे वगैरे विकार होतात. सर्व अंगभर कंड सुटून तो अस्वस्थ होतो व त्याची एकूण स्थिती खराब होते. जंगलातील गोमाशांमार्फत त्याला ‘सरा’ नावाचा रोग होतो.
क्रमविकास : उंट चार कोटी वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत प्रथम उत्पन्न झाले आणि दहा लक्ष वर्षांपूर्वी  दक्षिण अमेरिका व आशिया खंडांत ते पसरले. यानंतर ते उत्तर अमेरिकेतून अचानक नाहीसे झाले. उंटाच्या क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) इतिहास उपलब्ध आहे. हा प्राणी इओसीन (आदिनूतन) काळापर्यंत (५·५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) आढळल्याचे माहीत नाही. त्याचा पहिला वंशज प्रोटिलोपस प्रजातीमध्ये आढळतो. त्यावेळी त्याच्या शरीराचा आकार मोठ्या सशाएवढा असून, त्याला ४४ दात होते. समकालीन घोडा एपिहिप्पस प्रजातीचा होता.
मध्य व उत्तर ऑलिगोसीन (अल्पनूतन, ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) युगामधील उंटाची पोब्रॅथिरियम प्रजाती ही घोड्याच्या क्रमविकासामधील मीझोहिप्पस प्रजातीच्या समकालीन होय. त्यावेळी उंटाचा आकार मेंढीएवढा झाला पण दातांच्या संख्येत बदल झाला नाही.
मायोसीन (मध्यनूतन, दोन कोटी वर्षांपूर्वीच्या) युगात उंटाचे  तीन भिन्न विभाग झालेले आढळतात व त्यांतील एक हल्लीच्या उंटाच्या प्रगतावस्थेत परिणत झालेला आहे. पहिल्या विभागातील उंटाच्या दातांची संख्या बदलली नाही पण गवत चरण्यासाठी अनुकूल असे स्पष्टपणे ते खोलगट झालेले होते.
प्लायोसीन (१·२ कोटी वर्षांपूर्वीचा) उंट, चरणाऱ्या प्राण्यांपैकी मुख्य असून तो मध्ययुगातील प्रोकॅमॅलस प्रजातीचा वंशज आहे.
क्रमविकासामुळे झालेले बदल : अमेरिकेच्या पश्चिम भागातील मोठ्या सशाच्या आकारापासून हल्लीच्या दोन मदार असलेल्या भव्य उंटाएवढा शरीराचा आकार झाला. पायांच्या बाजूकडच्या अंगुलीचे अवशेष शिल्लक राहिले नाहीत. मागील पायांची लांबी वाढून नालास्थी परसट झाले व हे वैशिष्ट्यपूर्ण असे चिन्ह आहे. अंगुली रुंदट झाल्या. प्लायोसीन युगातील वाळवंटामुळे पायांचे तळवे पसरले, दातांची संख्या ३४ झाली, तसेच चरणाऱ्या प्राण्यांच्या (संघातील) दातांप्रमाणेच त्यांची लांबीही वाढली.
ऋग्वेदात, अथर्ववेद संहिते त व ऐतरेय आणि शतपथ ब्राह्मणात उष्ट्र (उंट) शब्द असून, गाईप्रमाणेच उंटही दान दिल्याचे उल्लेख वेदात सापडतात.
लेखक : त्रिं.रा.खळदकर

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate