অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

1 मे - महाराष्ट्र दिन

1 मे - महाराष्ट्र दिन

1 मे - महाराष्ट्र दिन

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.

महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.

देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.

महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. गं.रा.मोगरे यांनी माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित। किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥॥ म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना.के.बेहेरे यांनी भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥ भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥ म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥ असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा। तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥ या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना.गो.नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.

महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा.

लेखक -

राजेंद्र सरग
जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर

 

 

स्त्रोत : http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=yExlw+hPgjQ=

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate