অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रज-गुरखा युद्धे

इंग्रज-गुरखा युद्धे

इंग्रज गुरखा युद्धे

(१८१४-१८१६). हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश जिंकून तेथे आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. त्या राज्यांमध्ये काठमांडूच्या नेवार राजाला प्रमुख पद देण्यात आले. १७६७ मध्ये काश्मीरमधील गुरखे नावाच्या राजपुतांनी नेपाळवर स्वारी करुन नेवार राजाला जर्जर केले, तेव्हा त्याने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी मदत म्हणून काही फौज रवाना केली, पण तराईच्या प्रदेशातून जाताना पर्जन्यामुळे व रोगराईमुळे बरेचसे सैन्य मृत्युमुखी पडले.गुरख्यांचा नेता पृथ्वीनारायण ह्याने नेवार राजाचा पराभव करुन काठमांडूचे राज्य मिळविले (१७६८).

पृथ्वीनारायणाच्या मृत्यूनंतर (१७७१) त्याचा मुलगा प्रतापसिंह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर (१७७५) त्याचा अल्पवयीन मुलगा रणबहाद्दूर ह्यास गादीवर बसवून त्याचा चुलता राज्यकारभार करु लागला. त्यांनी काश्मीर, भूतान, सिक्कीम इ. प्रदेशांवर हल्ले सुरु केले. गुरख्यांनी ल्हासा येथील पवित्र मंदिर लुटताच चीनच्या बादशहाने सत्तर हजार फौज नेपाळवर पाठविली. गुरख्यांनी स्वरंक्षणासाठी इंग्रजांकडे मदतीची याचना केली, पण इंग्रजांनी त्यांना मदत केली नाही रणबहाद्दूर वयात येताच त्याने राज्यकारभार हाती घेतला, पण तो क्रूर असल्याने गुरख्यांनी त्याला हद्दपार केले. तो इंग्रजाच्या आश्रयास गेला. गव्हर्नर जनरल वेलस्लीने त्याचा सत्कार करुन त्याला आर्थिक साहाय्य केले, तसेच काशी येथे त्याची राहण्याची व्यवस्था केली. त्याच्यातर्फे बोलणी करण्यासाठी इंग्रजांनी आपला वकील काठमांडूला पाठविला. रणबहाद्दूरच्या खर्चाची तरतूद करावी व इंग्रजांनी त्याच्यासाठी केलेल्या खर्चाची परतफेड करावी, अशा इंग्रजांनी मागण्या केल्या. त्या गुरख्यांनी अमान्य केल्या. पुढे रणबहाद्दूर परत काठमांडूला गेला, पण त्याचा खून झाला

अयोध्येच्या वजीराचा गोरखपूर जिल्हा इंग्रजांनी फौजेच्या खर्चासाठी ताब्यात घेतला होता. हा जिल्हा नेपाळच्या हद्दीस लागून होता .हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तराई प्रदेशाच्या हद्दीसंबंधाने तंटे उत्पन्न झाले. ते मिटविण्यासाठी बार्लो व मिंटो या दोन्ही गव्हर्नर जनरलांनी नेपाळ दरबारकडे पुष्कळ कारवाई केली. पण गुरख्यांनी ती मानली नाही. लॉर्ड हेस्टिंग्जने तपास केला, तेव्हा ब्रिटिश हद्दीतील दोनशे गावे गुरख्यांनी आपल्या राज्यात सामील केली आहेत, असे त्यास आढळून आले. तो प्रदेश मिळविण्यासाठी त्याने १८१४ च्या उन्हाळ्यात ब्रिटिश लष्कर रवाना केले. पण गुरख्यांनी हल्ला करुन त्यास पिटाळून लावले. हे पाहताच हेस्टिंग्जने नेपाळविरुद्ध युद्ध पुकारले.

नेपाळचा मुख्य सेनापती अमरसिंह भापा हा आपली फौज सज्ज करुन पश्चिमेस सतलजच्या बाजूने पंजाबात उतरणार असे समजताच, त्यावर दोन मार्गांनी इंग्रजी फौजा चढाई करुन गेल्या. डेव्हिड ऑक्टर्लोनीच्या हाताखालील सैन्य पश्चिमेकडून सतलजच्या बाजूने नेपाळात घुसले. तसेच एक तुकडी गोरखपुराहून वुडच्या हाताखाली व दुसरी पाटण्याहून मॉर्लेच्या हाताखाली अशा दोन स्वतंत्र तुकड्या काठमांडूवर चालून गेल्या

नेपाळचा हा डोंगरी प्रदेश इंग्रजांना अज्ञात असून गुरख्यांना मात्र गनिमी हालचाली करण्यास उपयुक्त होता. तोफा, युद्धसाहित्य व मनुष्यबळ पोहोचविण्याच्या दृष्टीने इंग्रजांना फारच त्रास झाला. मुख्यत: ३० ऑक्टोबर, २७ नोव्हेंबर व २५ डिसेंबर १८१४ ह्या तीन दिवशी झालेल्या घनघोर लढायांत इंग्रजांचा पराभव झाला. ऑक्टर्लोनीने मात्र सावधपणे व धीमेपणाने कुमाऊँ प्रांतात घुसून १८१५ च्या डिसेंबरमध्ये शत्रूला पराभूत केले.

युद्ध थांबवून तह करण्यासाठी गुरख्यांनी आपला वकील ऑक्टर्लोनीकडे पाठविला. हेस्टिंग्जने काही प्रदेश घेण्याचे ठरवून मार्च १८१६ च्या तहास मान्यता दिली. या तहासच सिगावलीचा तह म्हणतात. या तहानुसार इंग्रज रेसिडेंट काठमांडूला रहावा असे ठरले. गुरख्यांचा सेनापती अमरसिंह भापा ह्या तहाच्या विरुद्ध होता. त्यामुळे परत युद्धास सुरुवात झाली. ऑक्टर्लोनी काठमांडूवर चालून येतो, असे दिसताच गुरख्यांनी सिगावलीच्या तहास मान्यता दिली. या तहानुसार गढवाल व कुमाऊँ हे प्रांत इंग्रजांनी घेतले; शिवाय तराई मुलूखही घेतला. मात्र पुढे इंग्रजांनी नेपाळवर हल्ला करणार नाही असे कबूल केले

नेपाळच्या युद्धात काही काळ अपयश आल्यामुळे हेस्टिंग्जची बरीच नाचक्की झाली, पण युद्धातील विशिष्ट अडचणी लक्षात घेऊन वरिष्ठांनी हेस्टिंग्जला पाठिंबा दिला. तराईतील वादग्रस्त प्रदेश, तसेच कुमाऊँ व गढवाल हे दोन प्रांत गुरख्यांनी इंग्रजांना दिले, त्यातच सिमला हे थंड हवेचे ठिकाण इंग्रजांना मिळाले. गुरख्यांनी इंग्रजांचा पराभव केलेला पाहून भारतातील सत्ताधीशांच्या मनात इंग्रजांच्या उच्चाटनासंबंधीच्या विचारास चालना मिळाली

 

संदर्भ: Chaudhari, K. C. Anglo - Nepalese Relations, Calcutta, 1960.

भिडे, ग. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate