অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रज-निजाम संबंध

इंग्रज-निजाम संबंध

इंग्रज निजाम संबंध

मीर कमरुद्दीन निजामुल्मुल्क आसफजाह दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. त्यानंतर जरी तो नावाला मोगल साम्राज्याचा सुभेदार म्हणून वागत असला, तरी वस्तुतः स्वतंत्र सत्ताधीशच बनला होता. निजामाच्या हाताखाली दक्षिणेतील सहा सुभे आणि त्यांतील कडप्पा, कुर्नूल, अर्काट, शिरे व सावनूर हा नबाबाचा प्रदेश होता. याशिवाय म्हैसूर, तंजावर इ. संस्थांनाचे राजे त्याचे मांडलिक म्हणून समजले जात. दक्षिणेत त्यास प्रथम मराठे नंतर इंग्रज, हैदर व टिपू हे प्रतिस्पर्धी होते. मराठ्यांचे बळ खच्ची करण्याकरिता निजामाने अनेक उपाय योजले; पण त्याच्या सर्व कारस्थानांना शह देणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशव्याने निजाम व दिल्लीकर मोगल यांचे संबंध तोडण्याचे प्रयत्न करुन निजामाच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळविल्या. १७४८ मध्ये निजामुल्मुल्कच्या मृत्यूनंतर निजामशाहीत गोंधळ माजला.

नवा निजाम नासिरजंग याच्याविरुद्ध त्याचा भाचा मुजफ्फरजंग याने बंड पुकारुन अर्काटच्या नबाबामार्फत फ्रेंचांशी संधान बांधले. या प्रकरणी झालेल्या लढायांत प्रथम नासिरजंग व नंतर मुजफ्फरजंग मारले जाऊन, नासिरजंगाचा भाऊ सलाबतजंग गादीवर आला सलाबतजंगाच्या दरबारी फ्रेंचांचे वर्चस्व वाढून उत्तर सरकार या नावाने ओळखला जाणारा प्रदेश फ्रेंच सैन्याच्या खर्चासाठी देण्यात आला १७५५ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध होऊन उत्तर सरकारचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा ताबा कबूल करण्यात यावा आणि त्याबाबत कंपनीतर्फे काही ठराविक रक्कम निजामाला देण्यात यावी, अशी बोलणी करण्याकरिता इंग्रजांनी आपले दोन अधिकारी हैदराबादला सलाबतजंगाकडे पाठविले, हाच निजाम व इंग्रजांचा आलेला पहिला संबंध होय. सलाबतजंगाने इंग्रजांची मागणी मान्य केली व उत्तर सरकारचा प्रदेश कायमचा इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला

सलाबतजंगाला गादीवरुन काढून त्याचा धाकटा भाऊ निजाम अली १७६२ मध्ये निजाम बनला. त्याने आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत हैदर अली व टिपू यांच्याशी झालेल्या युद्धांनंतर इंग्रजांशी पूर्ण सहकार्य करुन मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. १७९५ मध्ये निजाम अलीने मराठ्यांविरुद्ध इंग्रजांनी आपणास मदत करावी, अशी मागणी केली पण मराठ्यांचे बळ लक्षात घेऊन इंग्रजांनी निजामाची विनंती नाकारली. त्याचा परिणाम म्हणजेच खर्ड्याच्या लढाईत (१७९५) पराभूत होऊन निजामास मराठ्यांबरोबर नामुष्कीचा तह करावा लागला

इंग्रजांनी या युद्धात आपल्याला मदत केली नाही, याचे वैषम्य वाटून निजामाने आपल्याकडे असलेल्या इंग्रजी सैन्याला परत पाठविले, पण स्वतःचा मुलगा आलीजाहने बंड केल्याने निजामास हे सैन्य परत बोलवावे लागले. या काळात निजामाच्या सैन्यात फ्रेंचांचे बरेच वर्चस्व होते. पण १७९८ मध्ये फ्रेंच सेनापती मुसा रेमाँच्या मृत्यूनंतर हे सैन्य बरखास्त करावे, अशी इंग्रजांनी केलेली मागणी निजामाने मान्य केली. यामुळे फ्रेंचांची मक्तेदारी संपून निजामाच्या दरबारात इंग्रजांचे वर्चस्व वाढले. १७९९ मध्ये श्रीरंगपटणच्या टिपूविरुद्धच्या लढाईत निजामाने इंग्रजांस मदत केली. लॉर्ड वेलस्लीने सुरु केलेल्या तैनाती फौजेच्या पद्धतीस निजाम बळी पडला.

१२ ऑक्टोबर १८०० मध्ये निजाम व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात तह झाला. या तहान्वये निजामाच्या संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबाद येथे कायम ठेवण्यात आली. निजामाने हिंदुस्थानातील कोणत्याही सत्ताधीशांबरोबर कसलाही संबंध ठेवणार नाही, असे कबूल केले. इंग्रजी फौजेच्या खर्चाकरिता श्रीरंगपटणच्या लढाईत मिळालेले कडप्पा, कुर्नूल, अनंतपूर व बल्लारी हे जिल्हे निजामाने इंग्रजांना कायमचे दिले. त्यांच्या मोबदल्यात निजामाचे परचक्रापासून व राज्यातील बंडखोरीपासून रक्षण करण्याची जबाबदारी इंग्रजांनी घेतलीयावेळेपासून निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले. ही घटना निजाम अलीचा मुलगा सिकंदरजाह, सरदार महिपतराव वगैरेंना आवडली नाही. त्यांनी इंग्रजांविरुद्ध कारस्थाने व हैदराबाद राज्याविरुद्ध बंडे सुरु केली. १८०० ते १८५७ या काळातील सिकंदरजाह, रावरंभा निंबाळकर, महिपतराव वगैरेंची कारस्थाने, त्याचप्रमाणे निरनिराळ्या जमातींची व व्यक्तींची बंडे मुख्यतः इंग्रजी सैन्याने मोडून काढली.

१८५७ च्या उठावात हैदराबादच्या जनतेने भाग घेतला, पण इंग्रज आणि सालारजंग यांनी या चळवळीचा बंदोबस्त करण्यात यश मिळविले. १८५७ नंतरच्या काळात मुख्यतः निजाम व इंग्रजांविरुद्धच्या हैदराबादमधील जनतेच्या सनदशीर चळवळींचा समावेश होतो. त्यांत १८९२ मधील आर्यसमाजाची स्थापना, १९०५ मधील स्वदेशी चळवळ, १९१० मधील दहशतवाद्यांची कृत्ये, १९२१ मधील आंध्र महासभा व स्टेट रीफॉर्म्स असोसिएशनची स्थापना व १९३८ मधील काँग्रेस, आर्यसमाज व हिंदुमहासभा यांचा सत्याग्रह वगैरे महत्त्वाच्या घटना होत १८८० पासून हिंदी मुसलमानांचा पाठिंबा आपल्याला मिळावा म्हणून इंग्रजांनी, निजाम व त्याचे अधिकारी यांच्या मनात, हैदराबादच्या राज्यास मोगली साम्राज्याचा अवशेष व मुसलमान संस्कृतीचे प्रतीक म्हणून विशिष्ट स्थान आहे, अशा प्रकारची कल्पना भरविली.

अर्थात त्यामुळेच पुढील राजकारणात निजामाने व इतर मुसलमानांनी इंग्रजांना नुसतीच मदत केली नाही, तर काँग्रेसच्या चळवळींनाही विरोध केला. याचा मोबदला म्हणून १९२० च्या सुमारास निजामाने पूर्वी इंग्रजी फौजेच्या खर्चासाठी इंग्रजांस दिलेला वऱ्हाड प्रांत परत मिळविण्याची खटपट केली, पण ती अयशस्वी झाली. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पोलीस कारवाईने हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण करण्यात आले.

 

भिडे, गल

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate