অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट

एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट

एल्फिन्स्टन मौंट स्ट्यूअर्ट

(६ ऑक्टोबर १७७९-२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर. कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार. तो डंबार्टनशर (स्कॉटलंड) येथे एका उमराव घराण्यात जन्मला. त्याने वयाच्या सतराव्या वर्षी भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या मुल्की सेवेत कलकत्ता येथे नोकरी धरली (१७९६). डेव्हिज हा त्याचा अधिकारी संस्कृतचा जाणकार होता. त्यामुळे त्यास वाचन-अध्ययनाची गोडी लागली. पुढे त्याची नेमणूक दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या पुणे दरबारात १८०१ मध्ये रेसिडेंट बॅरी क्लोजचा साहाय्यक म्हणून झाली. पुण्यात आल्यानंतर एक वर्षातच दुसरे इंग्रज-मराठे युद्ध सुरू झाले. यात त्याने जनरल वेलस्लीचा परिसहायक म्हणून काम केले. याशिवाय त्याला मराठी, फार्सी इ. भाषा येत असल्यामुळे त्याने दुभाषाचेही काम केले. हे काम त्याने इतके चोखपणे बजावले की, त्याला लवकरच बढती मिळाली. वयाच्या चोविसाव्या वर्षी एल्फिन्स्टनची नागपूर येथे भोसल्यांच्या दरबारात रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली (१८०४-१८०७). दरबारातील बारीकसारीक गोष्टींची माहिती काढण्याचे काम त्याच्याकडे होते.

१८०७ मध्ये त्याला कंपनीचा प्रतिनिधी म्हणून शिंद्यांच्या दरबारात जावे लागले. १८०८ मध्ये लॉर्ड मिंटोच्या आज्ञेप्रमाणे एल्फिन्स्टन वायव्य सरहद्दीचा राज्यकर्ता शाहशुजाबरोबर बंदोबस्तासाठी काबूलकडे गेला. ह्यावेळी नेपोलियनची स्वारी होईल, अशी इंग्रजांना धास्ती वाटत होती, म्हणून एल्फिन्स्टनतर्फे त्यांनी शाहसुजाशी मैत्रीचा तह केला. हा तह मोडताच तो परत कलकत्ता येथे आला. १८११ मध्ये त्याची पुण्याला पेशव्यांकडे रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी दुसरा बाजीरावच गादीवर होता. बाजीरावावर नजर ठेवून त्याने इंग्रजांविरुद्ध केलेल्या कारवायांना एल्फिन्स्टनने प्रतिशह दिला.

पुण्यात असताना पेशवे आणि जहागीरदार यांच्यातील संघर्षात त्याने जहागीरदारांची बाजू घेऊन मध्यस्थी केली. ह्यावेळी त्याने गुप्तचर शाखा उघडल्यामुळे त्याला सर्व गुप्त बातम्या समजत असत. त्याने बाजीरावाने चालू केलेल्या कारवायांच्या माहितीचा योग्य वेळी उपयोग करून घेतला. त्रिंबकजी डेंगळे याच्यावर बडोद्याच्या गंगाधर शास्त्री पटवर्धनाच्या खूनाचा आरोप ठेवून एल्फिन्स्टनने त्याला स्वाधीन करण्यासाठी बाजीरावाकडे प्रथम मागणी केली व नंतर फौज धाडली आणि पेशव्यास मानहानीकारक तह करण्यास भाग पाडले. यातून उद्‍भवलेल्या इंग्रज-मराठ्यांच्या तिसऱ्या युद्धात एल्फिन्स्टनने मराठ्यांचा खडकी व कोरेगाव या ठिकाणच्या लढायांत पराभव केला. या युद्धामुळे मराठेशाहीचा शेवट झाला. इंग्रजांनी जिंकलेल्या मराठी मुलखावर एल्फिन्स्टनची प्रथम दक्षिणेचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पुढे त्याचे प्रशासकीय कौशल्य पाहून त्यास १८१९ मध्ये मुंबई प्रांताचा गव्हर्नर नेमण्यात आले.

या सुमारे आठ वर्षांच्या (१८१९ - २७) कारकीर्दीत एल्फिन्स्टनने मुंबई प्रांतातील एकूण सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश राज्यात मुंबई प्रांतास एक पुढारलेला प्रांत म्हणून लवकरच नावलौकिक प्राप्त झाला. प्रथम एल्फिन्स्टनने साताऱ्याच्या गादीवर प्रतापसिंहास बसविले व ते इंग्रजांचे मांडलिक संस्थान केले. मुंबई प्रांताच्या बंदोबस्तासाठी त्याने कॉर्नवॉलिसने अंमलात आणलेली इंग्रजी-पद्धत स्वीकारली नाही, तर राज्यव्यवस्थेची पूर्वापार चालत आलेली व्यवस्थाच चालू ठेवली. इंग्रजी न्याय, कायदा व शिक्षणपद्धती इथे एकदम चालू करू नयेत, असे त्याचे प्रांजल मत होते. म्हणून प्रथम त्याने सर्व कारभाराची माहिती मिळवून लोकमत अजमाविले; ते आपल्या बाजूला वळवून घेतले आणि प्रजेच्या हिताची अनेक कामे हाती घेतली. शेतकऱ्यांना वसुलाच्या वेळी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास कमी करण्याचा त्याने प्रयत्‍न केला. मध्यस्थ काढून शेतकऱ्यांना सरकारकडे परस्पर सारा भरण्याची त्याने सोय केली. पूर्वीची रयतवारी पद्धत चालू करून जहागीरदारांना सवलती मिळवून दिल्या. पूर्वी जहागीरदारांना साध्या तंट्यांकरिता दिवाणी न्यायालयात जावे लागत असे. एल्फिन्स्टन याने त्यांना कलेक्टरच्या फौजदारी न्यायाच्या अधिकारात असलेल्या न्यायालयात न्याय मिळण्याची सोय करून दिली.

फौजदारी कायद्याचे एकीकरण करीत असता, एल्फिन्स्टनने जनतेची मने दुखविली जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली. फौजदारी न्यायपद्धतीतील चौकशी संबंधीचे दोष त्याच्या लक्षात आले होते. याबाबतीत मान्यवर असा कायदा नव्हता. म्हणून एल्फिन्स्टनने कलेक्टरकडेच फौजदारी न्यायाचे अधिकार दिले. लोकांना तुरुंगात टाकण्यासंबंधी त्याने काही सुधारणा केल्या. दिवाणी न्यायाच्या बाबतीत त्याने पूर्वी चालू असलेल्या पंचायत-पद्धतीत काही सुधारणा केल्या. मुंबई इलाख्यातील गुजरातच्या भागातील कोर्टात फार्सी भाषेऐवजी गुजराती भाषा सुरू केली. दिवाणी न्यायालय मुंबईहून सुरतेला नेल्यामुळे लोकांना न्यायालयीन प्रश्र सोडविणे सोपे पडू लागले. एल्फिन्स्टनला विधिसंहिता तयार करावयाची होती. ही संहिता तयार करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली व पैसाही खर्च केला. हे काम पूर्ण होण्यापूर्वीच १८२७ मध्ये त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला, पुढे त्यास गव्हर्नर जनरल हे पद ब्रिटिश पार्लमेंटने दोनदा देऊ केले, पण त्याने ते स्वीकारले नाही.

हिंदी लोकांना उच्च पदाच्या जागा द्याव्यात, ते सुशिक्षित होऊन आपणास आपले बस्तान आवरावे लागले, तरी हरकत नाही; अशा मताचा एल्फिन्स्टन हा एक होता. त्याने येथील शिक्षणपद्धतीतील दोष पाहून अनेक टिपणे लिहून ठेवली. मातृभाषा आणि इंग्रजी भाषा यांच्या शिक्षणपद्धतीचा त्याला संस्थापक मानण्यात येते. या पद्धतीचा अवलंब मुंबई प्रांतात त्याने प्रथम केला. त्यामुळे इतर प्रांतापेक्षा मुंबई इलाख्याला शिक्षणाच्या क्षेत्रात जास्त महत्त्व प्राप्त झाले. त्याने स्थानिक लोकांच्या शिक्षणासाठी प्रयत्‍न केले. त्यासाठी लहानलहान पुस्तके छापण्याची कल्पना काढली. पेशवे काळात विद्वान ब्राह्मणांना दक्षणा वाटण्याची पद्धत प्रचलित होती, ती त्याने बंद केली. त्याऐवजी दक्षिणाफंड काढून व त्या फंडातून शिक्षणाला प्रोत्साहन देऊन इतर काही सुधारणा केल्या. मुंबई इलाख्यातील एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट किंवा हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेज या संस्था त्याच्या स्मरणार्थ काढण्यात आल्या.

पेशव्यांच्याकडून जिंकून घेतलेल्या प्रदेशासंबंधीचा विस्तृत अहवाल त्याने प्रकाशित केला. तो रिपोर्ट ऑन द टेरिटोरीज काँकर्ड फ्रॉम द पेशवाज या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याने भारताचा हिस्टरी ऑफ इंडिया हा दोन खंडांत (१८४१) इतिहास लिहिला. समकालीन ऐतिहासिक वाङ्‍मयात त्याचा हा ग्रंथ श्रेष्ठ मानला जातो. ह्याशिवाय राईज ऑफ ब्रिटिश पावर इन द ईस्ट (१८८७) व अकौंट ऑफ द किंगडम ऑफ काबूल (१८१५) हे त्याचे दोन ग्रंथही ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

ल्फिन्स्टन सरे (इंग्‍लंड) येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी मरण पावला. आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार ही उपाधी एल्फिन्स्टनला लावली, तर अतिशयोक्ती होणार नाही. नोकरीत प्रवेश केल्यानंतर त्याने सतत वाचनाने व अभ्यासाने आपली बौद्धिक पातळी उंचावली आणि ग्रीक, रोमन, फार्सी आदी भाषांची ज्ञानोपासना केली. काही ग्रंथांचे समीक्षणही त्याने आपल्या खासगी रोजनिशीमध्ये करून ठेवले आहे. दुर्दैवाने त्याची बरीच कागदपत्रे आणि पुस्तके १८१७ साली पुणे येथील संगम रेसिडेन्सी बंगल्याला लागलेल्या आगीत नष्ट झाली. एक श्रेष्ठ प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार म्हणून भारतीय इतिहासात त्यास एक विशेष स्थान आहे.

 

संदर्भ : 1. Choksey, R. D. Mountstuart Elphinstone, Bombay, 1972.

2. Oswell, G. D. Sketches of Rulers of IndiaVol II., Oxford, 1908.

गोखले, कमल

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate