অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औरंगजेब

औरंगजेब

(२४ ऑक्टोबर १६१८ - २०फेब्रुवारी १७०७). दिल्लीच्या मोगल घराण्यातील सहावा बादशहा. संपूर्ण नाव मुहियुद्दीन मुहंमद औरंगजेब ⇨ शाहजहान व मुमताज यांचा तिसरा मुलगा. गुजरातमधील दोहद येथे जन्मला. शाहजहानच्या बंडामुळे वयाच्या सहाव्या वर्षी त्यास जहांगीरकडे ओलीस रहावे लागले. पुढे काही दिवस तो नूरजहानच्या कैदेत होता. १६२८ मध्ये शाहजहान दिल्लीच्या तख्तावर बसल्यावर त्याची नूरजहानच्या कैदेतून मुक्तता झाली आणि त्याच्या शिक्षणास प्रारंभ झाला. त्याने कुराण व हदीस यांचा अभ्यास केला; तसेच अरबी, चघताई, फार्सी व तुर्की भाषा आत्मसात केल्या. लहानपणापासूनच त्यास चित्रकला, संगीत व इतर ललितकलांची नावड होती.

शाहजहानने १६३४ मध्ये दहा हजारांची मनसब देऊन औरंगजेबाला बुंदेल्यांचे बंड मोडण्यासाठी पाठविले होते. याच मोहिमेत त्याचे लष्करी कौशल्य दृष्टीस पडले. या स्वारीतील यशामुळेच शाहजहानने औरंगजेबाला दक्षिणेच्या सुभेदारीवर पाठविले. औरंगजेब १६३६ ते १६४४ दक्षिणेचा, १६४५ ते १६४८ गुजरातचा, १६४८ ते १६५२ मुलतानचा व शेवटी १६५२ ते १६५७ पुन्हा दक्षिणेचा सुभेदार होता.

दक्षिणेत पहिल्यावेळी सुभेदार असताना, त्याने बागलाण जिंकले, शहाजीचा पराभव करून अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट केला. मोगलांविरुद्ध बंड करणाऱ्या खेलोजी भोसल्यास ठार मारले. ह्या कामगिरीबद्दल शाहजहानने त्यास पंधरा हजार जात व दहा हजार स्वार अशी मनसब दिली. गुजरातमध्ये असताना शाहजहानने त्यास बाल्ख व बदखशान जिंकण्यासाठी मध्य आशियात पाठविले. यात तो यशस्वी झाला नाही. मुलतानच्या सुभेदारीवर असता तो दोनदा कंदाहारच्या स्वारीवर गेला होता; तथापि त्यास यश मिळाले नाही. म्हणून अखेरीस शाहजहानने त्यास दक्षिणेत पाठविले. दक्षिणेत १६५७ मध्ये औरंगजेबाने विजापूर व गोवळकोंडे या राज्यांवर स्वाऱ्या करून बीदर, कल्याणी व परांडा हे किल्ले जिंकले. दौलताबादपासून जवळच खडकी येथे त्याने औरंगाबाद शहर वसविले. या मुक्कामात त्याने दक्षिणेतील वसुली पद्धतीत व लष्करात अनेक सुधारणा केल्या.

शाहजहान १६५७ मध्ये आजारी पडला, तेव्हा त्याने दारा शुकोहला आपला वारस नेमले. त्याच वेळी औरंगजेबाचे भाऊ मुराद व शुजा यांनी अनुक्रमे अहमदाबाद व बंगाल येथे स्वत:ला बादशहा म्हणून जाहीर केले. या परिस्थितीत औरंगजेब फार धूर्तपणे वागला. त्याने मुरादशी तह करून त्या दोघांनी मिळून शाहजहानच्या सैन्याचा धरमत येथे व दारा शुकोहचा सामूगढ येथे पराभव केला. नंतर शाहजहान व मुराद यांना कैद करून औरंगजेब २१ जुलै १६५८ रोजी सिंहासनावर बसला. मुराद, दारा, शुजा, सुलैमान, शुकोह यांचा काटा दूर केल्यानंतर जून १६५९ मध्ये त्याचे राज्यारोहण झाले आणि आलमगीर ही पदवी त्याने धारण केली. स्वत:च्या वैभवाने परकीय सत्ताधीशांचे डोळे दिपविण्यासाठी औरंगजेबाने १६६१ - १६६७ या काळात मक्का, इराण, बाल्ख, बुखारा इ. ठिकाणाहून आलेल्या दूतांना भारी किंमतीचे नजराणे देऊन आपल्या वैभवाचे प्रदर्शन केले.

रंगजेबाच्या कादकीर्दीचे दोन भाग पडतात

१६५८ ते १६८१ पर्यंतची वर्षे उत्तर हिंदुस्थानात व १६८१ ते १७०७ पर्यंतची वर्षे दक्षिणेत, प्रामुख्याने मराठ्यांविरुद्ध लढण्यात गेली. उत्तरेत असताना साम्राज्यविस्तारासाठी औरंगजेबाने पूर्व व वायव्य सरहद्दींवर चढाईचे धोरण स्वीकारले. १६५७ मध्ये कुचबिहारचा राजा प्रेम नारायण याने मोगल प्रदेशात चढाई केली. म्हणून १६६० मध्ये औरंगजेबाने मीरजुम्‌ला यास बंगालचा सुभेदार नेमले. मीरजुम्‌ला व दिलेरखान यांनी आसामवर स्वारी केली. या स्वारीत मीरजुम्‌ला मरण पावला. आहोमांनी गेलेला प्रदेश हस्तगत केला. १६६१ ते १६६५ पर्यंत मोगलांना या आघाडीवर यश आले नाही. आहोमांनी स्वारी केल्यानंतर औरंगजेबाने शायिस्तेखानाला बंगालचा सुभेदार नेमले. त्याने बिहार, चितगाँग, सोनदीप इ.

प्रदेश जिंकून तेथील पोर्तुगीज व ब्रह्मदेशच्या चाच्यांचा बंदोबस्त केला; तरी आहोम मोगलांना त्रास देत राहिले. १६७० ते १६८१ या काळातील आहोम राजे असमर्थ होते; त्यामुळे मोगलांनी त्या प्रदेशात राज्यविस्तार केला.

वायव्य सरहद्दीवर युसुफझइ (१६६७) तसेच अकमल खानाच्या नेतृत्वाखालील अफ्रिडी (१६७२) आणि अफगाण यांनी केलेले उठाव औरंगजेबाने मोडून काढले. या लढायांत तो स्वत: त्या आघाडीवर गेला होता. त्याचे आर्थिक व राजकीय नुकसान झाले; कारण दक्षिणेतील कुशल अधिकारी या आघाडीवर गुंतविल्यामुळे दक्षिणेत शिवाजी राजांना राज्यविस्तार करण्यास वाव मिळाला.

औरंगजेब एक कर्मठ सुन्नी व परधर्मद्वेष्टा असल्याने त्याने अनेक तऱ्हेचे कर लादून हिंदूंचा छळ केला. १६६९ मध्ये मथुरेच्या फौजदाराने तेथील केशव देवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. अशा तऱ्हेच्या गोष्टी वरचेवर होऊ लागल्या. १६६९, १६७०, १६८१ मध्ये जाटांनी बंडे केली. ही बंडे औरंगजेबाने मोडून काढली. अशाच तऱ्हेने छत्रसाल बुंदेला (१६७१) व सतनामी (१६७२) यांनी औरंगजेबाच्या हिंदूविरोधी धोरणाविरुद्ध उठाव केला. सामर्थ्याच्या जोरावर औरंगजेबाने ती बंडे मोडून काढली. शिखांचा गुरू तेगबहादुर यानेही बादशहाच्या धोरणास विरोध केल्यामुळे त्यास ठार करण्यात आले; म्हणून शिखांनी १६७५ मध्ये औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारले.

काहीना काही कारण काढून औरंगजेबाने जोधपूरचे राज्य खालसा करण्यासाठी अजितसिंग व त्याच्या राण्यांना कैद केले. राजपुतांना हा अपमान सहन झाला नाही. सर्व राजपूत एकत्र होऊन त्यांनी औरंगजेबाविरुद्ध युद्ध चालू केले. ते १६७८ ते १६८१ पर्यंत चालू होते. याच सुमारास औरंगजेबाचा धाकटा मुलगा सुलतान अकबर याने बापाविरुद्ध बंड करून स्वत:ला बादशाह म्हणून जाहीर केले. तो राजपुतांना मिळाला. शेवटी दुर्गादास राठोड मोगलांचा पाठलाग चुकविण्यासाठी अकबराला घेऊन दक्षिणेत संभाजीकडे आश्रयास गेला; हे कळताच औरंगजेबाने राजपूतांशी तह केला. दक्षिणेत औरंगजेब येईपर्यंत त्याच्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने अनेक किरकोळ बंडे मोडली, वायव्य सरहद्दीचा बंदोबस्त केला, आसाम, आराकान ह्यांसारख्या दूरच्या प्रदेशांवर सैन्य धाडले आणि राजपुतांशी युध्दे केली.

राजपुतांशी केलेल्या युध्दांतून दक्षिणेकडे युद्ध उपस्थित होण्यास एक कारण झाले. अकबर व संभाजी यांच्या पारिपत्यासाठी तो १६८१ च्या अखेरीस दक्षिणेत गेला. त्यामुळे सबंध राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. अकबराच्या बंडामुळे औरंगजेबाला मराठ्यांचा नाश करण्याची आयती संधी मिळाली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate