অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कत्यूरी वंश

कत्यूरी वंश

कत्यूरी वंश

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कुमाऊँ (उत्तर प्रदेश) प्रदेशातील एक प्राचीन वंश. ह्या वंशातील राजे नवव्या शतकाच्या अखेरीपासून दहाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत राज्य करीत होते. या वंशाला हे नाव त्या प्रदेशातील कत्यूर खोऱ्यावरून पडले आहे; पण ते त्यांच्या कोरीव लेखांत आढळत नाही.

यांचे फक्त सहा कोरीव लेख आतापर्यंत उपलब्ध झाले आहेत. त्यांपैकी एका ताम्रपटाचे डॉ. कीलहॉर्नने चिकित्सक रीतीने संपादन केले असून दुसऱ्याचे फक्त वाचन प्रसिद्ध झाले आहे; इतर चार लेख अद्यापि अप्रसिद्धच राहिले आहेत.

कत्यूर हा प्रदेश सम्राट समुद्रगुप्त (३३५-३७५) याच्या प्रयाग येथील लेखात नेपाळबरोबरचा सीमाप्रदेश म्हणून उल्लेखिलेला कर्तृपुर देश असावा. तेथील तत्कालीन राजाने समुद्रगुप्ताचे आधिराज्य स्वीकारून त्याला खंडणी दिली होती; पण त्याच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही.

यानंतर गढवाल जिल्ह्यातील पांडुकेश्वर येथील योगबदरी या शिवालयात सापडलेल्या दोन ताम्रपटांवरून खालील वंशावळ समजली : निंबर(राणी नाशुदेवी) → इष्टगणदेव (राणी वेगादेवी) → ललितशूरदेव.

ललितशूरदेवाने आपल्या कारकीर्दीच्या एकविसाव्या व बाविसाव्या वर्षी दिलेली ही दानपत्रे आहेत. त्यांत कोणत्याही संवताचा उल्लेख नाही;पण त्यांतील एकविसाव्या वर्षी दिलेल्या ताम्रपटातील उत्तरायण संक्रांतीच्या उल्लेखाचे गणित करून कीलहॉर्नने त्याची मिती २२ डिसेंबर ८५३ निश्चित केली आहे. त्यावरून या घराण्याचा मूळ पुरुष निंबर हा ७९० च्या सुमारास उदयास आलाअसावा. त्याच्यानंतरच्या राजांनी परमभट्टारक,महाराजाधिराज, परमेश्वर इ. सम्राटपदनिदर्शक पदव्या धारण केल्या होत्या.त्यावरून त्यांनी सभोवारचा प्रदेश जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केलेला दिसतो. त्यांचीराजधानी कार्तिकेयपुर (उत्तर प्रदेशाच्याअलमोडा जिल्ह्यातील गोमतीतीरावरील बैजनाथ) ही होती. त्यानंतर आणखी एका लेखात ललितशूरदेवाच्या भूदेवदेवया उत्तराधिकारी पुत्राचे नाव मिळते.

यानंतर त्या राज्यात क्रांती होऊन दुसरा राजवंश उदयास आला. त्याचा सर्वांत प्राचीन ताम्रपट अलमोडा जिल्ह्यातील बागेश्वर(व्याघ्रेश्वर) देवालयात सापडला आहे. दुसरे दोन ताम्रपट पांडुकेश्वरच्या देवळात सुरक्षित आहेत. त्यांवरून खालील वंशावळ तयारहोते :

सलोणादित्य → इच्छटदेव → देसटदेव → पद्मटदेव → सुभिक्षराजदेव

सलोणादित्याने भूदेवदेवानंतर गादी बळकाविली असे दिसते. पद्मटदेवाच्या ताम्रपटात त्याच्या कारकीर्दीच्या पंचविसाव्या वर्षीसुभिक्षराजदेवाने कार्तिकेयपुराजवळ सुभिक्षपुर असे नवे नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली असा उल्लेख आहे. त्यांनीहीपूर्वोक्त सम्राटपद निदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. यानंतरचा कत्यूरी प्रदेशाचा इतिहास ज्ञात नाही.

 

संदर्भ : Majumdar, R. C., Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1964.

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate