অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काकतीय वंश

काकतीय वंश

काकतीय वंश

आंध्रमधील एक प्रसिद्ध वंश. ह्या वंशाचे राजे अनमकोंडा व वरंगळ ह्या राजधानींमधून सु.१०७५ ते १३०३ च्या दरम्यान

आंध्र प्रदेशावर राज्य करीत होते. तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी उत्तरेस विजगापट्टण, दक्षिणेस चित्तूरच्या आसपास, पूर्वेस समुद्रकिनारा व पश्चिमेस गुलबर्गा असे प्रदेश व्यापले. दक्षिणेत चोल सम्राट राजेन्द्र चोल याच्या उत्तरेतील स्वाऱ्यांमुळे उत्पन्न झालेल्या अस्थिर परिस्थितीत शूद्र जातीच्या काकतीय वंशाचा उदय झाला.

या वंशातील पहिला बेत (सु.अकराव्या शतकाचा पूर्वार्ध) याने त्या परिस्थितीचा फायदा घेऊन पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील नलगोंडा जिल्ह्यात आपला अंमल बसविला. त्याचा मुलगा पहिला प्रोल आणि नातू दुसरा बेत (सु.१०७५-१०९०) यांनी चालुक्य सम्राट पहिला सोमेश्वर आणि सहावा विक्रमादित्य यांना त्यांच्या स्वाऱ्यांत साहाय्य करुन अनमकोंडा येथे आपली राजधानी केली, असे त्यांना अनमकोंडा व काझीपेट येथील अनुक्रमे १०७९ व १०९० साली कोरलेल्या लेखांत म्हटले आहे. त्याच लेखांत त्याने पुढील वारसांचीही नावे उद्‌धृत केली आहेत.

यानंतरचा दुसरा प्रोल यांने तेलंगण व आंध्र प्रदेश जिंकून आणि चालुक्य सम्राट तिसरा तैल याचा पराभव करुन आपले स्वातंत्र्य जाहीर केले. त्याचा पुत्र रुद्र याने कर्नूलचा प्रदेश जिंकला; पण त्याचा भाऊ महादेव हा देवगिरीच्या जैतुगीकडून युद्धात मारला गेला. महादेवाचा मुलगा गणपती (११९९-१२६१) याला यादवांनी काही काळ बंदीत ठेवून नंतर सोडून दिले. हा काकतीयांचा सर्वात प्रबळ राजा होय. याने बऱ्याच मोठया प्रदेशावर आले स्वामित्व स्थापले. १२६२ च्या सुमारास त्याची कन्या रुद्रांबा(१२५९-१२९५) राज्य करु लागली. तिच्या राज्यकारभाराची प्रशंसा केली आहे.

रुद्रांबेनंतर तिच्या मुलीचा मुलगा प्रतापरुद्र (१२९५-१२२३) गादीवर आला. त्याने दक्षिणेत काही विजय संपादन केले, पण १३१० मध्ये मलिक काफूर याने त्याचा पराभव करुन त्याला जबर खंडणी देण्यास भाग पाडले. तरीही त्याने पुन्हा नेलोर, कांची,त्रिचनापल्लीपर्यंत स्वाऱ्या केल्या. पुन्हा १३२३ मध्ये उलुघ खनाने त्याचा पराभव करुन त्याला बंदीवान केले आणि कातीयांचे राज्य खालसा केले.

काकतीयांच्या काळात आंध्र प्रदेशात बौद्ध व जैन धर्माचे महत्व कमी झाले होते. उत्तर व मध्य आंध्रांत शैवपंथ व दक्षिण आंध्रात रामानुजांचा वैष्णव पंथ यांचा उदय झाला. श्री बसवेश्वराच्या लिंगायत पंथाने आंध्र प्रदेशात या काळात बरीच उन्नती केली होती. काकतीय राजे व त्यांचे सरदार विद्या व कला ह्यांचे भोक्ते होते. या दोनशे वर्षाच्या काळात तेलुगू वाङ्मयाची विलक्षण वाढ झाली. केतण, तिक्कन्न, पाल्कुरिकि सोम, सोमनाथ, मल्लिकार्जुन, विद्यानाथ वगैरे कवी व ग्रंथकार या काळात झाले. यांपैकी कवी तिक्कन्न हा तुलुगू वाङ्मयाचा प्रख्यात कवी समजला जातो. काकतीयांनी तेलंगणात अनेक उत्कृष्ट देवालये बांधून त्यांना शिल्पांनी भूषित केले. अनमकोंडा येथील सहस्त्रस्तंभी मंदिर (प्रत्यक्षात हे केवळ त्रिकूटात्मक आह), पालमपेठ येथील रुद्रेश्वराचे मंदिर,पिल्लमरी येथील सरदारांनी बांधलेली मंदिरे काकतीय स्मारकेच होत. त्यांतील काही राजे स्वतः कवी असून त्यांचा संस्कृत कवींनाही आश्रय होता. पहिला रुद्र याने नीतिसार नामक ग्रंथ लिहिला होता. प्रतापरुद्राचा आश्रित विद्यानाथ याने प्रतापरुद्रकल्याण नामक नाटक आणि प्रतापरुद्रयशोभूषण हा अलंकारावरचा ग्रंथ लिहिला होता.

 

संदर्भ : 1. Yazdani, G. Ed. The Early History of theDeccan, Parts VII-XI, New York 1960.

२. कृष्णकुमार, वरंगलचे काकतीम राजे, नांदेड, १९४६.

मिराशी वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate