অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रीक सत्ता, भारतातील

ग्रीक सत्ता, भारतातील

ग्रीक सत्ता, भारतातील

अलेक्झांडरच्या भारतावरील इ. स. पू. ३२६ च्या आक्रमणानंतर भारतामध्ये काही प्रदेशांनी त्याचे मांडलिकत्व पतकरले, तर काही भागांवर त्याने आपले अधिकारी (क्षत्रप) नेमले. अशा प्रकारे ग्रीक सत्तेचा भारतात प्रारंभ झाला.

भारताच्या वायव्येस ऑक्सस नदीच्या दक्षिणेस बॅक्ट्रिया हा देश पुरातन काळापासून प्रसिद्ध असून भारतीय वाङ्‌मयात त्याचे नाव बाल्हीक असे येते. हा प्रदेश प्रथम इराणी साम्राज्यात मोडत होता. अलेक्झांडरने इराणी साम्राज्य जिंकल्यावर बॅक्ट्रियाचा राजा ऑक्सियार्टस याच्या कन्येशी विवाह करून त्याला त्या प्रांताचा अधिपती नेमले. नंतर त्याच्या पुष्कळ ग्रीक अनुयायांनी बॅक्ट्रियन स्त्रियांशी विवाह करून तेथे वसती केली. अशा रीतीने बॅक्ट्रियामध्ये ग्रीक आणि इराणी संस्कृतींचे मिश्रण झाले.

अलेक्झांडरने वायव्य प्रांत आणि पंजाबचा काही भाग जिंकून तेथे आपले क्षपत्र नेमले होते. पण इ. स. पू. ३२३ मध्ये त्याचे निधन झाल्यानंतर त्या त्या प्रांतांतील लोकांनी बंडे करून त्यांना हाकून लावले. अलेक्झांडरच्या साम्राज्याचा पूर्वेकडील भाग सिरियापासून अफगाणिस्तानपर्यंतचा त्याच्या सील्यूकस नामक प्रबळ सेनापतीच्या वाट्यास आला होता. त्याने अलेक्झांडरप्रमाणे पंजाब प्रांत जिंकण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळी तेथील राजकीय परिस्थिती बदलली होती. अलेक्झांडरच्या वेळी त्या प्रदेशात लहान गणराज्ये होती.

त्यांना जिंकणे त्यास फार कठीण गेले नाही. पण आता तो प्रदेश शक्तिशाली मौर्य साम्राज्यात अंतर्भूत झाला होता. सील्यूकसने आक्रमण करताच चंद्रगुप्त मौर्याने त्याचा मोठ्या शौर्याने प्रतिकार करून विजय मिळविला. सील्यूकसला पंजाब जिंकण्याची आशा सोडावी लागली, एवढेच नव्हे तर आपल्या साम्राज्याचे पॅरोपमिसस (काबूल प्रदेश), ॲराकोझिया (कंदाहार) व एरिआ (हेरात), जिड्रोझिया हे प्रांत चंद्रगुप्ताला द्यावे लागले. चंद्रगुप्ताने त्याच्या मुलीशी विवाह करून त्याला इतरत्र युद्धात उपयोगी पडावे, म्हणून पाचशे हत्ती दिले. काबूल-कंदाहारचा भाग तेव्हापासून निदान अशोकाच्या राजवटीअखेर मौर्य साम्राज्यात मोडत होता. कंदाहार प्रांतात ग्रीक व ॲरेमाइक भाषांत लिहिलेले अशोकाचे व इतर शिलालेख अलीकडे उपलब्ध झाले आहेत.

सील्यूकसच्या साम्राज्यात बॅक्ट्रिया देश अंतर्भूत होता. सील्यूकसचा वंशज दुसरा अँटायओकस याच्या कारकीर्दीत इ. स. पू. २५o च्या सुमारास बॅक्ट्रियाने बंड करून स्वातंत्र्य पुकारले. त्या वेळी तेथील राज्याधिकारी डायॉडोटस होता. त्याचे जवळच्या पार्थियाच्या राज्याधिकाऱ्यांशी वैर होते; पण पुढे त्याच्या मुलाने ही नीती बदलून त्याच्याशी सख्य केले. नंतर पार्थियाच्या राजाने सील्यूकसवंशी सत्ताधाऱ्याचा पराभव करून आपल्या व बॅक्ट्रियाच्या राजाच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले.

दुसऱ्या डायॉडोटसचा पराभव करून बॅक्ट्रियाची गादी युथिडीमस नामक ग्रीकाने बळकावली. पण सील्यूकसवंशी तिसरा अँटायओकस याने पार्थियाच्या राजाचा पराभव करून बॅक्ट्रियावर स्वारी केली आणि त्याची राजधानी बॅक्ट्रा (बाल्ख) ला वेढा दिला. दोन वर्षांच्या वेढ्यानंतर युथिडीमसचा पुत्र डीमीट्रिअस याने संधी घडवून आणला. अँटायओकसने त्याच्या रूपाने आणि रुबाबाने आकृष्ट होऊन त्याला आपली कन्या दिली व नंतर तो भारतावर स्वारी करण्यास निघाला. या वेळी अशोकाच्या निधनानंतर अनेक प्रांताधिपतींनी मौर्यांचे स्वामित्व झुगारून स्वातंत्र्य पुकारले होते. वायव्य प्रांतात सुभगसेन नामक लहान प्रांताधिपती राज्य करीत होता. त्याच्यापासून काही खंडणी घेऊन अँटायओकस मेसोपोटेमियाला परत गेला.

चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक यांच्या काळी सील्यूकस व त्याचा पुत्र पहिला अँटायओकस यांचे मौर्य सम्राटांशी सख्य होते. सील्यूकसने चंद्रगुप्ताच्या दरबारी मीगॅस्थीनीझ याला आपला दूत नेमले होते. अशोकाच्या शिलालेखांत यवनराज अँटायओकसचा उल्लेख आहे. पण अशोकाच्या निधनानंतर केंद्रीय मौर्यसत्ता दुर्बळ झाल्याने ग्रीकांच्या भारतावर स्वाऱ्या होऊ लागल्या. सिरियाच्या तिसऱ्या अँटायओकसच्या स्वारीचा उल्लेख मागे आला आहे. त्यानंतर युथिडीमसचा पुत्र डीमीट्रिअस याने इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या आरंभी भारतावर आक्रमण केले. त्याचा उल्लेख युगपुराणाच्या गार्गी संहितेत आला आहे. तीत म्हटले आहे की, दुष्ट आणि पराक्रमी यवन साकेत (अयोध्या), पेशावर (रोहिलखंड) आणि मथुरा या प्रदेशांवर आक्रमण करून कुसुमध्वज (पाटलिपुत्र) पर्यंत पोहोचतील.

तेथे घनघोर युद्ध होईल. पण यवन फार काळ भारतात रहाणार नाहीत. युगपुराणातील हे वर्णन ग्रीक लेखकांच्या उल्लेखांशी जुळते. ते सांगतात की डीमीट्रिअस भारताच्या स्वारीत गुंतला असताना त्याच्या पश्चात युक्रेटिडीस नामक शूर ग्रीकाने बंड करून बॅक्ट्रियाची गादी बळकावली हे वृत्त समजताच डीमीट्रिअसला मध्य भारतातील काम सोडून बॅक्ट्रियाला परतावे लागले. त्याने बॅक्ट्रियाला वेढा घातला, युक्रेटिडिसने शौर्याची शिकस्त करून आपल्या राजधानीचे रक्षण केले. शेवटी डीमीट्रिअसला वेढा उठवून भारतात परतावे लागले.

डीमीट्रिअसने काही द्वैभाषिक नाणी पाडली. त्यांवर ‘महाराज अपराजित देमेत्रिक’ या अर्थाचा मजकूर पुढील बाजूवर ग्रीक भाषेत व लिपीत आणि मागील बाजूवर प्राकृत भाषेत व खरोष्ठी लिपीत आढळतो. ही नाणी त्याच्या अंमलाखाली असलेल्या प्रदेशांकरिता चलन म्हणून पाडली होती. डीमीट्रिअसचा उल्लेख महाभारतात दत्तमित्र या नावे आला आहे. पतंजलीच्या महाभाष्यावरील टीकेतील दत्तमित्राने दक्षिण सिंधमध्ये स्थापिलेला तो दात्तामित्री डीमीट्रिअसच असावा. या वाक्यखंडातील डीमीट्रिअस भारताचा राजा होता, असा उल्लेख चॉसरच्या कँटरबरी टेल्समध्येही आला आहे.

डीमीट्रिअसला मध्य देशातून माघार घ्यावी लागली; पण त्याच्या अंमलाखाली उत्तरापथ व सिंध यांचा बराचसा भाग होता असे दिसते.

डीमीट्रिअसनंतर पँटेलिऑन आणि आगॅथोक्लिझ या राजांनी बॅक्ट्रिया व भारत या दोन्ही देशांतील काही प्रदेशावर राज्य केले, असे त्याच्या नाण्यांवरून दिसते. हे दोन्ही डीमीट्रिअसचे पुत्र होते असे अनुमान आहे. डीमीट्रिअसने भारतावर स्वारी केली, त्या काळात त्याने बॅक्ट्रिया जिंकून घेतला.

युक्रेटिडीसचीही काही द्वैभाषिक नाणी सापडली आहेत. त्यांवरून त्यानेही भारताचा काही भाग जिंकून तेथे काही काळ राज्य केले असावे असे दिसते. त्याने युथिडीमसच्या वंशातील ॲपोलोडोटस याच्या काही नाण्यांवर पुन्हा आपले छाप मारले आहेत. त्यांवरून ह्याने त्याच्याकडून काही प्रदेश जिंकून घेतला होता असे दिसते. ही नाणी कपिशा (सध्याचा काफिरीस्तान) प्रदेशाकरिता पाडली होती. तेव्हा तो प्रदेश युक्रेटिडीसने जिंकला होता असे दिसते.

युक्रेटिडीसला ठार मारून त्याचा पुत्र हेलिओक्लीस हा गादीवर आला; पण त्याला ऑक्सस नदीच्या उत्तरेकडून आलेल्या रानटी शकांच्या आक्रमणामुळे बॅक्ट्रिया सोडून भारतात यावे लागले. बॅक्ट्रिया व भारताचा काही प्रदेश या दोन्हींवर राज्य करणारा हा शेवटचा ग्रीक राजा होय. याच्या नाण्यांच्या प्रकारावरून याच्या अंमलाखाली कपिशा व गांधार हे दोनही प्रदेश होते असे दिसते. चिनी साधन ग्रंथांप्रमाणे शकांनी बॅक्ट्रिया प्रदेश इ. स. पू. १३५ च्या सुमारास काबीज केला होता.

भारताच्या वायव्य व पंजाब प्रांतांत युथिडीमस आणि युक्रेटिडीस या दोघांचेही वंशज राज्य करीत होते. त्यांची नावे बहुतांशी त्यांच्या नाण्यांवरूनच माहीत झाली. या राजांची संख्या सु. तीस आहे. पण त्यांचा अनुक्रम व त्यांच्या अंमलाखालील प्रदेश यांविषयी निश्चित माहिती नाही. फक्त त्यांच्या नाण्यांच्या प्रकारांवरून काही माहिती ज्ञान होते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate