या वंशाचा मूळ पुरुष नन्नूक हा नवव्या शतकाच्या आरंभी होऊन गेला. त्याचा नातू जयशक्ती वा जेज्जाक यांच्या नावावरून चंदेल्लांच्या राज्याला जेजाकभुक्ती किंवा जझौती असे म्हणत.
चंदेल्ल हे आरंभी कनौजच्या प्रतीहारांचे मांडलिक होते. राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने कनौज उद्ध्वस्त केले, तेव्हा तेथील प्रतीहार राजा महीपाल चंदेल्ल हर्षाच्या (सु. ९०० — २५) आश्रयास गेला व त्याच्या साहाय्याने त्याने आपली गादी पुन्हा मिळविली. तेव्हापासून चंदेल्लांचे सामर्थ्य वाढू लागले .
हर्षाचा पुत्र यशोवर्मा याने दुर्भेद्य कालंजर किल्ला जिंकून आपली सत्ता यमुनेपर्यंत पसरविली. त्याने नंतर गौड, मिथिला, मालव, चेदी इ. देशांच्या राजांचा पराजय करून आपले सामर्थ्य जास्तच वाढवले. प्रतीहारांचे मांडलिकत्व असूनही तो यथार्थतः स्वतंत्रच झाला होता.त्याचा पुत्र धंग हा पराक्रमी निघाला. त्याने प्रतीहार सम्राटांचा पराभव करून आपले स्वातंत्र्य जाहीर केले. त्याचे राज्य वायव्येस ग्वाल्हेर, उत्तरेस यमुना, पूर्वेस काशी आणि दक्षिणेस विदिशा येथपर्यंत पसरले होते. त्याने नंतर पाल राजांचा पराभव करून अंग (भागलपुर) आणि राढ (पश्चिम बंगाल) वर स्वाऱ्या केल्या. त्याने स्वातंत्र्यनिदर्शक महाराजाधिराज अशी पदवी धारण केली. पंजाबच्या जयपालाने सबुक्ती स्वारीच्या वेळी ज्या अनेक राजांचा संघ घडवून त्याला प्रतिकार केला, त्यांमध्ये कालंजरचा राजा धंग हा होता. धंग पूर्ण शतायुषी होऊन प्रयाग येथे १००२ च्या सुमारास मृत्यू पावला.
धंगानंतर त्याचा पुत्र गंड गादीवर आला. याच्याही कारकीर्दीत उत्तर भारतात चंदेल्ल राज्य सर्वांत विस्तृत होते. त्याचा पुत्र विद्याधर याच्या काळात गझनीच्या मुहम्मदाच्या भारतावर अनेक स्वाऱ्या झाल्या. कनौजवरच्या स्वारीत प्रतीहार राज्यपाल आपली राजधानी सोडून पळून गेला; याची चीड येऊन विद्याधराच्या आज्ञेने त्याचा मांडलिक कच्छपघात (कछवाह) वंशी अर्जुन याने राज्यपालाचा पराभव करून त्याचा शिरच्छेद केला. त्यामुळे क्रुद्ध होऊन मुहम्मदाने १०१९ व १०२२ मध्ये चंदेल्लांच्या राज्यावर स्वाऱ्या केल्या. पण प्रत्येक वेळी त्याच्या आक्रमणापूर्वी आपला प्रदेश बेचीराख करून विद्याधराने त्याला प्रतिरोध केला. शेवटी मुहम्मदाला पुढे आक्रमण करुन अशक्य होऊन त्याच्याशी सख्य करावे लागले. अशा रीतीने त्याला यशस्वी प्रतिकार करणारा एकमेव भारतीय राजा म्हणून विद्याधराचे नाव इतिहासात संस्मरणीय राहील.
विद्याधर आणि त्याचा पुत्र विजयपाल यांनी परमार भोज आणि कलचुरी गांगेयदेव यांच्याशी युद्धे करून जय मिळविले. नंतरचा चंदेल्ल राजा देववर्मा याला ठार मारून बलाढ्य कलचुरी राजा कर्ण याने चंदेल्लांचे राज्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. पण काही वर्षांनंतर चंदेल्लांचा ब्राह्मण सेनापती गोपाल याने भगीरथ प्रयत्नांनी चंदेल्ल राजा कीर्तिवर्मा याजकरिता ते राज्य परत मिळविले.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
गुहिलोत घराणे : राजपुतान्यातील एक राजपूत घराणे. गु...
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राज...
खजुराहो म्हटले कि आठवतात भव्य मंदिरे, अत्युच्च शिल...
खजुराहो विषयी माहिती