या वंशाचा सुसंगत इतिहास ज्ञात नाही. या वंशाच्या उत्पत्तीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही; मात्र अशोकाच्या शिलालेखात चोल व पांड्य यांबरोबर ‘केरलपुत्त’ असा चेरांचा उल्लेख आढळतो. याशिवाय तमिळ साहित्यात विपुल माहिती मिळते; परंतु बरीच माहिती दंतकथात्मक असल्यामुळे फारशी विश्वसनीय वाटत नाही. अलीकडे चेरांची काही नाणी व कोरीव लेख सापडले आहेत; पण त्यांतूनही फारशी नवी माहिती उपलब्ध झालेली नाही.
चेरांची सत्ता जरी अशोकाच्या काळी अस्तित्वात होती, तरीसुद्धा यांच्या इतिहासास दुसऱ्या शतकापासून सुरुवात झालेली आढळते. पेरुनार या राजाचा पहिल्या शतकात उल्लेख आढळतो. तो चोलांविरुद्ध झालेल्या युद्धात मारला गेला. त्यानंतरचा या वंशातील प्रसिद्ध राजा म्हणजे पेरुम चेरल आदन हा होय. हा करिकाल चोलाचा (१९०) समकालीन असून, त्याने कदंब प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडला आणि दक्षिणेकडील अनेक राजांचा पराभव करून अधिराज ही पदवी धारण केली. मात्र पुढे वण्णीच्या महायुद्धात करिकालाने त्याचा पराभव केला; त्यामुळे लज्जित होऊन त्याने रणक्षेत्रातच आत्महत्या केली. दुसरा महत्त्वाचा राजा म्हणजे उदियंजेरल आदन.
हा पाचव्या शतकात झाला असावा. याच्या नेडुंजेरल आदन या मुलाचा तमिळ वाङ्मयात पराक्रमी पुरुष आणि राजा म्हणून उल्लेख आढळतो. याने कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला होता इ. वर्णन आढळते; पण त्यातील अतिशयोक्ती उघड आहे. याशिवाय त्याने अनेक मंदिरेही बांधल्याचे उल्लेख आहेत. याचा लहान भाऊ कुट्टूवन हासुद्धा अत्यंत पराक्रमी राजा होता. तमिळ ग्रंथांत याच्या विषयीही अनेक दंतकथा प्रचलित आहेत. यानंतर शेंगुट्टुवन ऊर्फ शेंगुतुवन व त्याचा मुलगा गजदृष्टी हे राजे होऊन गेले. या घराण्यातील शेवटचा प्रसिद्ध राजा चेरमाण पेरुमाळ हा ८२५ मध्ये होऊन गेला. त्यानंतर चेर वंशातील राजांची नावे आढळत नाहीत. मात्र दहाव्या शतकात राजराज चोल याच्या आधिपत्याखाली चेरांचे राज्य असल्याचे पुरावे आढळतात.
चेरांचे राज्य कोकणच्या दक्षिणेस मलबार किनाऱ्यावर पसरले होते. त्यात आजच्या त्रावणकोर व कोचीनचाही काही भाग समाविष्ट झालेला होता. राज्याचे कारभाराच्या सोईसाठी पाच जिल्ह्यांत (नाडुंत) भाग पाडले असून ते अनुक्रमे पूळी, कुडम, कुड्डम, बेन व कर्क या नावांनी ओळखले जात. त्यांची राजधानी वंजी, कची किंवा करुवूर व शेवटी तिरुवरिकलमलै असावी. इतिहासकारांमध्ये याविषयी एकमत नाही. त्यांची राज्यव्यवस्था बहुतकरून चोलांप्रमाणेच होती; मात्र चेरांचे आरमार होते. या वंशाच्या कलाक्षेत्रातील कामगिरीची फार माहिती नाही. या वंशास त्याच्या चोल व पांड्य प्रतिस्पर्ध्यांमुळे कोणत्याही क्षेत्रात सांस्कृतिक प्रगती करण्यास फारशी संधी लाभली नाही. धर्माच्या बाबतीत त्यांचे धोरण सहिष्णू असून त्यांनी कोणत्याही विशिष्ट धर्मास उत्तेजन दिले नाही किंवा त्याचा स्वीकारही केला नाही. चेर राजे हिंदुधर्मीय होते; परंतु आपल्या प्रजेवर धर्माच्या बाबतीत कोणतेच दडपण त्यांनी आणले नाही.
संदर्भ : 1. Sastri, K. A. N. Comprehensive History of India, Vol. II, Madras, 1963.
2. Sastri, K. A. N. A History of South India, Bombay, 1958.
3. Sesha Aiyer, K. G. Cher Kings of The Sangam Period, London, 1937.
देशपांडे, सु. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/24/2020
महेंद्र पर्वत : दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. ...
कृष्णा नदी : दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी या...
गोदावरी नदी : दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाच...
पल्लव वंश : दक्षिण भारतातील एक प्राचीन वंश. त्याच्...