शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती; पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.
निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखूजी जाधव मारले गेले (१६२९). त्यामुळे नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाईस शिवनेरीवर ठेवले होते. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहंमद आदिलशहा (कार. १६२७–५६) हा शहाजींवर रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुध्द गेलेली आणि लखुजींच्या मृत्युमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली. अखेर आदिलशहाच्या बोलावण्यावरून ते १६३६ मध्ये त्याच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने त्यांच्याकडे पुण्याची जहागीर बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या सैन्याने १६३८ च्या अखेरीस बंगलोर काबीज केले. तेव्हा बंगलोर, कोलार इ. प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बंगलोर येथे कायमचे राहू लागले.
बालपण शिक्षण -
शिवाजी महाराजांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले आणि देशमुख, देशपांडे, वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. शिवाजी महाराजांना आठ पत्नी असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांपैकी सईबाई (निंबाळकर) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. त्यानंतर सोयराबाई (मोहिते), पुतळाबाई (पालकर), सकवारबाई (गायकवाड), काशीबाई (जाधव) व सगुणाबाई (शिर्के) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यांशिवाय इंगळे व आणखी एका घरण्यातील मुलीबरोबरही त्यांचा विवाहसंबंध झाला. महाराजांना सईबाईपासून संभाजी (१६५७ –८९) व सोयराबाईपासून राजाराम (१६७०–१७००) असे दोन मुलगे झाले. याशिवाय त्यांना सहा कन्याही होत्या. सईबाई १६५९ मध्ये मरण पावल्या आणि काशीबाई राज्याभिषेकापूर्वी मरण पावल्या (१६७४). पुतळाबाई महाराजांबरोबर सती गेल्या. सोयराबाई संभाजींच्या कारकीर्दीत १६८१ मध्ये आणि सकवारबाई शाहूंच्या कारकीर्दीत मरण पावल्या. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी हस्तगत केला. महाराजांना येऊन मिळालेल्या अनुयायांत पुढे प्रसिध्दीस आलेली कान्होजी जेधे, नेताजी पालकर (समकालीन कागदपत्रांनुसार नेतोजी पालकर), तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इ. नावे आढळून येतात. भोरजवळ रोहिडेश्वरासमोर स्वराज्यनिष्ठेची शपथ घेतल्याची कथा ही याच सुमारास असावी. जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्यातील सुरक्षितता कायम रहावी या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले. महाराजांच्या विरुध्द विजापूरचे सैन्य चालून गेले. दक्षिणेत विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी म्हणून जिंजीच्या किल्ल्यासमोर तळ देऊन होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवण्यात येऊन त्यांना कैद करण्यात आले (१६४८) आणि त्यांना विजापूरला आणण्यात आले. या काळात पुरंदरच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी निकराचा लढा देऊन विजापूरचे सैन्य उधळून लावले (१६४८ अखेर). सैन्याची इतर भागांतील आक्रमणेही परतवण्यात आली. शहाजी राजांना काय शिक्षा होईल, याची काळजी महाराज आणि जिजाबाई यांना पडली. त्यावेळी दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून शाहजहानचा मुलगा मुरादबख्श हा औरंगाबाद येथे कारभार पहात होता. त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्याच्या मार्फत विजापूरवर दडपण आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. कोंडाण्याचा किल्ला परत द्यावा, ही अट आदिलशहाने घातली. किल्ला परत देण्यास महाराज नाखूष होते; तथापि सोनोपंत डबीर याने शिवाजी महाराजांची समजूत घातली. सिंहगडचा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजींची सुटका होऊन (१६४९) त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली.
या मोहिमेत महाराजांच्या विरुध्द लढणाऱ्या विजापूरच्या सैन्यात फलटणकर, निंबाळकर, घाटगे, बल्लाळ हैबतराव ही मंडळी होती. त्यावेळी महाराजांच्या सैन्यात गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर व त्याचा भाऊ भैरव चोर इ. निष्ठावान मंडळी होती. पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत बाजी कान्होजी जेधे याने पराक्रमाची शर्थ केली; म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला ‘सर्जेराव’ ही पदवी दिली. याच लढाईत मुसे खोऱ्याचा देशमुख बाजी पासलकर हा कामी आला. मावळातील वतनदार मंडळी ही महाराजांच्या कार्याकडे कशी ओढली जाऊ लागली, हे या मोहिमेवरून दिसून येते.
पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६).
“राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हारपासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता.
मुहंमद आदिलशहाच्या मृत्युनंतर (४ नोव्हेंबर १६५६) त्याचा मुलगा दुसरा अली आदिलशहा गादीवर आला. तो औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे, अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्याने विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बीदर ही स्थळे काबीज केली (१६५७). शिवाजी महाराजांनीही मोगलांचे जुन्नर शहर लुटले आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. विजापुरातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन कोकणात आपल्या पदरात काय पडेल, ते मोगलांकडून मिळवावे, असा विचार महाराजांनी केला होता. विजापूरशी लवकर तह करावा, अशी मोगल बादशहा शाहजहानने आज्ञा केली.
१६५७ मध्ये मोगलांनी घेतलेले बीदर, कल्याणी हे प्रदेश आपल्याकडे ठेवून घ्यावेत, मागच्या तहात मोगलांनी दिलेले कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांत हे विजापूरने परत करावेत, शिवाय खंडणी देत जावी, या अटींवर हे युद्ध संपले. या सुमारास शाहजहान हा अतिशय आजारी पडला (१६५७). हे वृत्त विजापूरलाही कळले होते. त्यामुळे विजापूरने हा तह संपूर्णपणे पाळण्यास टाळाटाळ केली. शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (२४ ऑक्टोबर १६५७).
पुढे १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही काबीज केला. नंतर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले. “मोगल मुलुखावर आपण हल्ला करीत नाही; पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत, म्हणून मी हे करीत आहे”, असे त्यास कळविले. फेब्रुवारी १६५८ मध्ये औरंगजेब औरंगाबादेहून आगऱ्याकडे जाण्यास निघाला आणि २१ जुलै १६५८ मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला.
याच सुमारास, आम्हाला परत केलेल्या कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांतातून शिवाजीला हाकलून लावा, असे दडपण मोगलांकडून विजापूरवर येऊ लागले. विजापूर दरबारने शिवाजी महाराजांविरुध्द अफझलखानाची रवानगी केली. इ.स. १६४९ पासून वाई परगणा अफझलखानाकडे मुकासा (जहागीर) म्हणून होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाची माहिती होती. अफझलखान हा विजापूरहून एप्रिल १६५९ मध्ये निघाला आणि वाईस पोहोचला. वाटेत त्याने पंढरपूर येथे अत्याचार केले, अशा कथा पुढे प्रचारात आल्या. पंढरपूला त्याने जबर रकमा वसूल केल्या असाव्यात आणि धमकी व दहशतीचे वातावरण पसरून दिले असावे. यापूर्वी केव्हा तरी त्याने अशाच प्रकारे उपद्रव तुळजापूर येथेही दिला होता. बजाजी निंबाळकराची कैद आणि जबर दंड ही प्रकरणे याच काळातील होत.
विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इ. मराठे सरदार होते. वाईला आल्यानंतर अफझलखानाने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांतांचा ताबा घेण्यासाठी वरील मराठी सरदार आणि सिद्दी हिलाल यांना त्या प्रांतांत पाठवून दिले. त्या प्रांतांतील मराठे वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुध्द उठविण्याचाही अफझलखानाने प्रयत्न केला.
महाराज या अडचणीत असतानाच सईबाई वारल्या (१६५९); तथापि ते विचलित झाले नाहीत. अफझलखानाच्या सैनिकी बलाची व कर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे, असा आदेश घेऊनच अफझलखान हा विजापूरहून आला आहे, हेही त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला तळ प्रतापगडसारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफझलखानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी केली.
अफझलखानाचे बरेच सैन्य पुणे, कल्याण व भिवंडी प्रांतांत पसरले होते. त्यामुळे त्याच्या सैन्याची साहजिकच विभागणी झाली. वाईला आपल्याजवळ असलेले सैन्य पुरे पडेल, याची त्याला खात्री वाटत नसावी. प्रतापगडसारख्या तळावर जाऊन लढा द्यावा, तर तो यशस्वी होईल किंवा नाही आणि ही मोहीम लवकर आटोपेल की नाही, याची त्याला खात्री वाटेना; म्हणून त्याने महाराजांच्याकडे निर्वाणीचा खलिता पाठवून त्यांच्यावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले.
अफझलखानाने पाठविलेले पत्र आणि त्याला महाराजांनी दिलेले उत्तर ही दोन्ही कवींद्र परमानंदाने आपल्याशिवभारत काव्यात संस्कृतमध्ये अनुवाद करून दिली आहेत. पत्रांवरून विजापूरचे शासन हे मोगलांच्या आदेशाप्रमाणे वागत असावे, याबद्दल संशय रहात नाही. अफझलखानाने महाराजांना कळविले, “तुम्ही राजचिन्हे धारण करीत आहात. तुम्ही शत्रूला अगदी अजिंक्य अशा चंद्रराव मोऱ्यांच्या जावळी या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून ते बलाने काबीज केलेत आणि जावळी घेऊन मोऱ्यांना सत्ताहीन केले. निजामशाहीच्या अस्तानंतर आमच्या आदिलशहांनी निजामशाहीच्या ताब्यातील मुलूख हस्तगत केला होता, तोही तुम्ही आपल्या अखत्यारित आणला आहे.
कल्याण, भिवंडीचा प्रांत आम्ही मोगलांकडे परत केला होता, तो हे शहाजी राजांच्या पुत्रा, तुम्ही बळकाविला आहे आणि तेथील मुस्लिम धर्माशास्त्री आणि प्रतिष्ठित लोक यांना तुम्ही त्रास देत आहात. त्यांच्या धर्मस्थळांनाही तुम्ही नष्ट केले, असेही म्हटले जाते. आम्ही मोगलांना दिलेला पुणे प्रांत हाही तुम्ही अद्याप ताब्यात ठेवला आहे. तेव्हा हा बंडखोरपणा सोडून द्यावा. मोगालांना पुणे, कल्याण, भिवंडी आदी प्रदेश देऊन टाकावेत. चंद्रराव मोऱ्यांकडून जबरदस्तीने घेतलेली जावळी मोऱ्यांना परत करावी आणि आदिलशहाला शरण यावे. आदिलशहा तुम्हाला अभय देऊन तुमच्यावर कृपा करतील तेव्हा हे राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे संधीच कर आणि सिंहगड व लोहगड हे मोठे किल्ले, तसेच प्रबळगड, पुरंदर, चाकण नगरी आणि भीमा व नीरा यांच्यामधला प्रदेश महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशहास शरण जाऊन किल्ले व मुलूखही देऊन टाक.”
पुढे अफझलखानाने आपल्या लष्करी बलाची क्षमता व प्रौढी सांगताना त्यात लिहिले होते, “आदिलशहाच्या आज्ञेवरून माझ्याबरोबर आलेले सहा प्रकारचे सैन्य मला ताबडतोब (युद्धास) उद्युक्त करीत आहे. तुझ्याशी युद्ध करण्यास उत्सुक असलेले व जावळी काबीज करू इच्छिणारे मूसाखान इत्यादी (सरदार) मला या कामी प्रोत्साहन देत आहेत.”
या पत्राची ही भाषा विजयाची खात्री असणाऱ्या माणसाची (योद्ध्याची) वाटत नाही.
महाराजांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळविले, की “आपण प्रतापी, आपला पराक्रम थोर, आपण माझ्या वडिलांचे ऋणानुबंधी; त्यामुळे आपणही माझे हितचिंतक आहात. आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे सध्याच्या वातावरणात मला सुरक्षितपणाचे वाटत नाही. उलट आपण प्रतापगडास यावे. माझा पाहुणचार स्वीकारावा. मी आपले सर्व काही, माझा खंजीरसुद्धा आपल्यापाशी ठेवून देईन.”
महाराजांचा हा डावपेच अफझलखानाला कळला नाही. युद्धावाचूनच शिवाजी आपल्या हातात येणार, या भ्रमात तो राहिला. प्रत्यक्षात महाराजांना कैद करून अगर ठार मारून ही मोहीम निकालात काढावी, असा त्याचा हेतू होता. महाराज आणि अफझलखान हे दोघेही परस्परांच्या हेतूंविषयी साशंक होते, असे विविध साधनांवरून दिसते. महाराजांनी सैन्याची मोठी तयारी केली होती.
घोडदळ अधिकारी नेताजी पालकर आणि पायदळ अधिकारी मोरोपंत पिंगळे हे जय्यत तयारीनिशी येऊन महाराजांना मिळाले. प्रतापगडाभोवतालच्या डोंगरांत मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवण्यात आली. वाईहून प्रतापगडकडे जाताना महाराजांनी अफझलखान आणि त्याचा सरंजाम यांची मोठी बडदास्त राखली. अफझलखानाने जड सामान वाईला ठेवले होते. प्रतापगडाजवळ येऊन पोहोचल्यावर भेटीबाबत वाटाघाटी झाल्या आणि प्रतागडाजवळ ठरलेल्या स्थळी शामियाने उभारून उभयतांच्या
भेटी व्हाव्यात असे ठरले. दोघांनीही बरोबर दहा शरीररक्षक आणावेत, त्यांना शामियानाच्या बाहेर ठेवावे, प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील आणि दोन रक्षक असावेत असा करार झाला. भेटीपूर्वी भेट अयशस्वी झाली, तर काय करावे यासंबंधी शिवाजी महाराजांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. परमानंदाने शिवभारतात महाराजांना अंबाबाईची कृपादृष्टी लाभली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला इ. वर्णन केले आहे.
भवानी देवीची प्रेरणा व आशीर्वाद महाराजांना यश मिळवून देते, ही समजूत तत्कालीन श्रध्देमुळे मराठ्यांची सुप्तशक्ती जागृत करण्यास समर्थ ठरली. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली. महाराजांच्या शरीरक्षकांत गायकवाड, सिद्दी इब्राहीम, जिवाजी महाले (सकपाळ) इ. मंडळी होती, तर अफझलखानाच्या शरीररक्षकांत सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते इ. मंडळी होती. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर हेही बरोबर होते. भेटीपूर्वी दोघांनीही आपल्या तलवारी रक्षकांच्या हाती दिल्या होत्या. दोघांपाशी खंजीरी होत्या. अफझलखानाने शिवाजी महाराजांना घट्ट आलिंगन दिले. शत्रू हाती आला आहे, त्याचा निकाल लावावा असे खानाला वाटले असावे. त्याक्षणी महाराजांनी वाघनख त्याच्या पोटात खुपसले आणि त्याच्या मिठीतून सुटका करून घेतली आणि नंतर कट्यारीने वार केला. परमानंदाने कृपाण म्हणजे लांब खंजीर महाराजांपाशी असल्याचा उल्लेख केला आहे.
संभाजींच्या दानपत्रात शिवाजी महाराजांनी बिचवा खुपसल्याचा उल्लेख आढळतो. या भेटीत अफझलखान मारला गेला आणि त्याच्या शरीररक्षकांनी केलेला प्रतिकारही महाराजांच्या शरीररक्षकांनी मोडून काढला. भेटीपूर्वी ठरल्याप्रमाणे महाराजांनी पुढील हालचालींसाठी सैन्याला इशारा दिला. त्यांनी अफझलखाच्या बेसावध सैन्यावर चाल केली. त्यावेळी झालेल्या युद्धात खानाच्या सैन्याची लांडगेतोड झाली. महाराजांना या युद्धात हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इ. संपत्तीची मोठी लूट प्राप्त झाली. अफझलखानाचे बरेच अधिकारी कैद झाले. काहीजण पळून गेले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अफझलखान भेटीचा प्रंसग हा मोठा आणीबाणीचा समजला जातो. प्रतापगडच्या युद्धात लष्करी डावपेच, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना तसेच अनुकूल रणांगणाची निवड आणि प्रसंगावधान हे शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचे महत्त्वाचे विशेष आढळतात. या प्रसंगी महाराजांचे धैर्य, सावधानपणा आणि धाडस हे गुण प्रकर्षाने प्रत्ययास आले. अफझलखानाचा वध ही महाराजांच्या शौर्यसाहसाची गाथा आहे; पण खानाच्या सैन्याचा धुव्वा उडविणे, हा त्यांच्या रणनीतीचा असामान्य विजय होय. अफझलखानाच्या मृत्यूने सगळा दक्षिण भारत हादरून गेला. [⟶ प्रतापगड].
अफझलखानाच्या मृत्यूनंतर विजापूर राज्यात उडालेल्या गोंधळाचा महाराजांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्या सैन्याच्या एका तुकडीने कोकणात राजापूर, वेंगुर्ल्यापर्यंत धडक मारली, तर दुसऱ्या तुकडीने घाटावर कोल्हापुरापर्यंत आक्रमण केले. नोव्हेंबर १६५९ च्या अखेरीस पन्हाळगडचा दुर्गम किल्ला महाराजांच्या हातात आला. अशा परिस्थितीत विजापूर दरबार स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. पन्हाळगड परत जिंकून घेण्याच्या उद्देशाने सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली विजापूरहून प्रबळ सैन्य चालून आले आणि त्याने पन्हाळागडाला वेढा घातला. यावेळी आदिलशहाने मोगलांची मदत मागितली. शायिस्तेखान हा जानेवारी १६६० मध्ये औरंगाबादेस पोहचला.
शायिस्तेखानाच्या पत्रांवरून मोगल आणि विजापूर हे दोघे परस्परांशी किती एकमताने वागत होते, याची कल्पना येते. विजापूरने मोगलांची मदत मागितल्याचा उल्लेख परमानंदानेही केला आहे. महाराज पन्हाळगड लढवीत होते. त्याच सुमारास शायिस्तेखान हा मोठ्या सैन्यानिशी औरंगाबादेहून कूच करून निघाला. अहमदनगर, सुपे या मार्गाने तो ९ मे १६६० रोजी पुण्यात दाखल झाला. शिवाजीचे पारिपत्य करून त्याच्या मुलखातील किल्ले घेऊन या भागास बंडातून मुक्त करावे, अशी औरंगजेबाची आज्ञा होती. म्हणून शायिस्तेखानाने पुण्यातच तळ ठोकला. पुढील तीन वर्षे तो औरंगाबादेच्या ऐवजी पुण्याहूनच सुभ्याचा कारभार पाहत होता. इकडे महाराज पन्हाळ्यात राहून वेढा लढवीत असता शायिस्तेखानाने उत्तरेकडे कूच करून चाकणच्या गढीला वेढा घातला. मराठे मोगलांशी निकराने लढत होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळे याने चाकणचा किल्ला शर्थीने लढविला.
तीन महिन्यांच्या या वेढ्यात मोगलांचे सहाशेच्यावर सैनिक जखमी वा मृत झाले. शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. मराठ्यांना मोगल आणि आदिलशहा या दोन शत्रूंशी एकाच वेळी लढावे लागत आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वरपांगी सलोख्याचे बोलणे करून मोजक्या लोकांनिशी रात्री पन्हाळगड सोडला (१३ जुलै १६६०) आणि विशाळगडाकडे कूच केले. विजापूरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी गजापूरच्या खिंडीत सैन्याचा निकराने प्रतिकार करीत असता बाजीप्रभू देशपांडे हा जखमी होऊन मरण पावला. महाराज विशाळगडास पोहचले आणि तेथून राजगडास गेले. सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांना पन्हाळगडातून जाऊ दिले, असा संशय अली आदिलशहाला आला. आपल्यावर हा नाहक ठपका ठेवण्यात आला, याचे वैषम्य वाटून सिद्दी जौहरने अली आदिलशहाच्या विरुद्ध बंड केले. अली आदिलशहाच्या वतीने जौहरने पन्हाळागडाला वेढा घातला, तेव्हा महाराजांनी पन्हाळगड मुत्सद्देगिरीने सोडून दिला.
चाकणच्या वेढ्यात आपली मोठी हानी झाली, हे पाहून शायिस्तेखानाने महाराजांच्या किल्ल्यांवर हल्ले करण्याचा नाद सोडला व मोगल सैन्य मैदानी प्रदेशांत पसरले आणि पुणे, कल्याण आणि भिवंडी हे मुलूख त्यांनी काबीज केले. महाराजांनी शायिस्तेखानाशी वाटाघाटी चालू ठेवून घाटावरील कोल्हापूरपर्यंतचा भाग, आदिलशहाच्या अखत्यारीतील कोकण हे प्रदेश मिळत असल्यास आपण विजापूरचे राज्य जिंकून घेण्याच्या कामात पूर्ण सहकार्य करू असे कळविले. शायिस्तेखानाने ही देऊ केलेली मदत झिडकारली. ही मोठी चूक होती, असे पुढे मिर्झा राजा जयसिंहाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मोगल मैदानी प्रदेशात दहशत निर्माण करीत होते; पण त्यांना शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेता आले नाहीत. मोगलांनी १६६१ च्या प्रारंभी लोणावळ्याजवळून कोकणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण मोगल सेनापती कारतलबखान यास उंबरखिंडीत गाठून महाराजांनी त्याला शरण येण्यास भाग पाडले.
उंबरखिंडीचे युद्ध (१६६१) हे शिवाजी महाराजांच्या गनिमी युद्धतंत्राचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण होय. [⟶ गनिमी युद्धतंत्र]. नंतर मोगल आणि मराठे यांच्यात किरकोळ चकमकी झाल्या. शायिस्तेखान पुण्यास मोठे सैन्य घेऊन ठाण मांडून बसलेला होता. अखेर शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाचा समाचार घेण्याची एक धाडसी योजना आखली. ही योजना म्हणजे मोठ्या सैन्याने वेढलेल्या व शायिस्तेखान असलेल्या पुण्यातील लाल महालावर हल्ला करणे, ही होय. शायिस्तेखानाचा दुय्यम सेनापती जोधपूरचा राजा जसवंतसिंह हा होता. ५ एप्रिल १६६३ च्या रात्री महाराज निवडक सशस्त्र सहकाऱ्यांसह शायिस्तेखानाच्या लष्करात घुसले, किरकोळ चकमकीनंतर त्यांनी शायिस्तेखानाला महालात गाठले. शायिस्तेखान पळून जाण्याचा प्रयत्नात असता, त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राचे वार होऊन त्याला आपली बोटे गमवावी लागली. त्याचा एक मुलगा या हल्ल्यात ठार झाला. महाराज आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे सिंहगडाकडे निघून गेले.
शायिस्तेखानाच्या महालातील चाळीस-पन्नास स्त्री-पुरुष ठार अगर जखमी झाले होते. मोगलांच्या छावणीत एकच हाहाःकार उडाला. भीमसेन सक्सेना याने लिहून ठेवलेले आहे, की “यापूर्वी कधीही असे धाडस करणे कुणालाही शक्य झाले नव्हते. मोगल सेनापतीच्या छावणीत घुसून कुणी हिंदू जमीनदार अशा प्रकारे हल्ला करील, असे कुणालाही वाटले नाही.” या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव हिंदूस्थानात सर्वत्र पसरले. हल्ल्यापूर्वी त्यांनी मोगल छावणीची आणि शायिस्तेखानाच्या हालचालींची बारकाईने नोंद व तपासणी केली असली पाहिजे. या प्रकरणात जसवंतसिंहाकडून प्रत्यक्ष उत्तेजन जरी नसले, तरी कानाडोळा किंवा दुर्लक्ष झाले.
‘खरे-खोटे काय, ते परमेश्वर जाणे’, असे भीमसेन सक्सेना म्हणतो. औरंगजेबाच्या अधिकृत चरित्रात या हल्ल्याची हकीकत शबखून (रात्रीचा छापा) अशा शब्दांत त्रोटक देण्यात आली आहे. औरंगजेब त्यावेळी काश्मीरच्या दौऱ्यावर होता. त्याने शायिस्तेखानाला ताबडतोब बंगालच्या सुभ्यावर पाठविले आणि त्या जागी मोठा मुलगा मुअज्जम यास नेमले. शायिस्तेखानानंतर मोगल सैन्याचे नेतृत्व जसंतसिंहाच्या हाती देण्यात आले. त्याने सिंहगडावर हल्ला केला; पण मराठ्यांनी तो परतविला. त्यानंतर मोगली सैन्याच्या हालचाली थंडावल्या.
शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली सामान्यपणे पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण आणि सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश होते. मोगल महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले होते. त्यांना जबर धक्का द्यावा म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी एक सुरत लुटीचा धाडसी उपक्रम योजला. त्याकाळी सुरत मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर होते. मोगलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चाले. यूरोपीय तसेच इराणी, तुर्की व अरब यांच्या जहाजांची तेथे नेहमीच वर्दळ असे. मध्य आशियातून मक्केच्या यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. सुरतेस लक्षाधीश धनिकांच्या मोठमोठ्या पेढ्या होत्या. महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागांतून पोर्तुगीज हद्दीच्या बाजू-बाजूने सरकत सुरत गाठले. मराठे सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मोगल अधिकाऱ्याना त्यांचा पत्ता लागला नाही, हल्ला होताच तेथील मोगल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला, तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही.
चार दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली (६ ते ९ जानेवारी १६६४). मोगलांचा सगळा प्रतिकार त्यांनी हाणून पाडला. इंग्रज, डच इ. यूरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या वखारींचे संरक्षण करण्याच प्रयत्न केला. मराठे त्यांच्या वाटेला गेले नाहीत. सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती. अहमदाबाद आणि मोगल राज्यांतील इतर भागांतून सैन्य चालून येत आहे, अशी वार्ता लागताच महाराजांनी सुरत सोडले आणि संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले.
या स्वारीनंतर शहाजीराजे कर्नाटकात घोड्यावरून पडून होदिगेरे येथे २३ जानेवारी १६६४ रोजी मरण पावले.
महाराजांच्या सुरतेवरील या स्वारीचे तपशीलवार वर्णन यूरोपीय वखारवाल्यांच्या कागदपत्रांतून आढळते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले. सुरतेहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधूदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. याची सुरवात त्यांनी कल्याण-भिवंडी घेऊन यापूर्वीच सुरू केली होती (१६५७). पश्चिम किनाऱ्याचे रक्षण आणि आरमाराला सुरक्षितता या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले. यूरोपीयांच्या राजकीय डावपेचावर महाराजांचे सतत लक्ष असे. जंजिऱ्याच्या सिद्दीला इंग्रज आणि पोर्तुगीज मदत करतात, हे ते जाणून होते. इंग्रजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात (१६६०) सिद्दी जौहरला दारुगोळ्याची मदत केली होती. याबद्दल शिक्षा म्हणून महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून त्यांचे काही अधिकारीही कैद केले होते.
इंग्रजांनी मोठे प्रयत्न करून त्यांची सोडवणूक केली; तेव्हा आदिलशहाने दक्षिण कोकण घेण्यासाठी अझीझखानाच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले. अझीझखान आणि वाडीचे सावंत एक झाले, परंतु अझीझखान मरण पावल्यामुळे (१० जुलै १६६४) आदिलशहाने खवासखान याला पाठविले. तेव्हा महाराजांनी वेंगुर्ल्यावर हल्ला केला आणि कुडाळ येथे ते खवासखानावर चालून गेले (ऑक्टोबर १६६४). खवासखानाने निकराने प्रतिकार केला आणि विजापूरकडे तातडीची मदत मागितली. ती मदत घेऊन मुधोळचा बाजी घोरपडे येत असता मराठ्यांनी त्याला गाठले. या लढाईत बाजी घोरपडे जखमी झाला आणि पुढे लवकरच मरण पावला. त्याजकडील खजिना मराठ्यांनी लुटला. बाजी घोरपड्याची सु. दोनशे माणसे ठार झाली. घोरपड्याच्या मृत्युनंतर खवासखानही पराभूत होऊन निघून गेला (डिसेंबर १६६४). विजापूरकरांची ही मोहीम म्हणजे कोकण ताब्यात ठेवण्यासाठी आदिलशहाने केलेला शेवटचा प्रयत्न होय. त्यानंतर कोकणात मराठ्यांची सत्ता निर्वेध चालू राहिली.
जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्करी तुकड्या ठेवल्या आणि त्यांना जागरुक राहण्याचे आदेश दिले.
जयसिंहाचा दुय्यम सेनापती दिलेरखान याने पुरंदरला वेढा घातला. जयसिंहाने आदिलशहा, पोर्तुगीज आणि लहानमोठे जमीनदार यांना शिवाजीला मदत करू नये असे बजावले. आदिलशाहीतील अनेक सरंजामदार त्याने आपल्याकडे ओढले. दहा ते पंधरा हजार सैनिकांच्या स्वतंत्र तुकड्या करून त्यांनी शिवाजीचा प्रदेश उद्ध्वस्त करावा, अशा आज्ञा दिल्या. त्यामुळे प्रजा हैराण होऊन गावे सोडून कोकणात आणि अन्यत्र जाऊ लागली. महाराजांनी जयसिंहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण शरणागती पत्करल्याशिवाय बोलणे नाही, ही भूमिका त्याने घेतली.
मोगलांनी निकराचा हल्ला करून पुरंदरजवळचा रुद्रमाळचा किल्ला ताब्यात घेतला (१४ एप्रिल १६६५). तो जाऊ देऊ नये आणि पुरंदर हाती यावा अशी त्यांची योजना होती. दिलेरखान सासवड येथे ठाण मांडून राहिला. मोगलांनी बुरुजांच्या उंचीचे दमदमे तयार केले (३० मे १६६५). त्यांवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करण्याचा त्यांचा हेतू होता. मराठे व मोगल यांच्या रोज चकमकी झडत. महाराजांनी किल्ल्यात मदत पाठविण्याचे प्रयत्न केले; पण ते पुरंदरच्या शिबंदीला कमी पडत होते. मोगल शेवटी पुरंदर घेणार अशी चिन्हे दिसू लागली. शिवाय जयसिंहाने प्रबळ लष्करी पथके मराठ्यांच्या मुलखात पाठवून तो बेचिराख करण्याचे सत्र सुरू केले. पुरंदरच्या युद्धात मुरारबाजी देशपांडेसारखा पराक्रमी सेनापती कामी आला. तेव्हा शिवाजी महाराजांनी एकदंर परिस्थितीचा विचार करून शेवटी चाणाक्षपणे व दूरदृष्टीने तह करण्याचे ठरविले. त्यांचा हेतू राज्य आणि शक्य तितके किल्ले वाचवावे, हा होता. ११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराजांनी जयसिंहाची भेट घेतली. संपूर्ण शरणागती पत्करून मिळेल त्यावर समाधान मानावे, ही जयसिंहाची मागणी. कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावे, हा महाराजांचा हेतू. अखेर पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी होऊन अटी ठरल्या. त्या अशा :
(१) महाराजांनी मोगलांना २३ किल्ले आणि वार्षिक चार लाख होन उत्पन्नाचा किंवा महसुलाचा मुलूख द्याव.
(२) उरलेले १२ किल्ले आणि वार्षिक एक लाख होनाचा मुलूख बादशहाशी राजनिष्ठ राहण्याच्या अटीवर आपल्याकडे बाळगावा. (३) मुलगा संभाजी याला पाच हजाराची बादशाही मनसब देण्यात येईल.
(४) महाराजांना मनसबीची आणि दरबारात हजर राहण्याची माफी देण्यात येईल; पण दक्षिणेत मोगल सांगतील ती कामगिरी आपण करू, असे आश्वासन त्यांनी द्यावे.
(५) विजापूरच्या मोहिमेत सहकार्य करण्याची एक अट होती. त्या मोबदल्यात घाटावरचे विजापूरचे पाच लाख होनाचे प्रांत शिवाजींनी जिंकून घ्यावेत आणि कोकणातील मुलूख सांभाळावेत व त्या मोबदल्यात वर्षाला तीन लाख होन या हिशोबाने चाळीस लाख होनाच्या खंडणीचा बादशाही खजिन्यात भरणा करावा. आदिलशहाचा कोकणातील मुलूख आपल्या ताब्यात आहे. त्याचे उत्पन्न चार लाख होनाचे आहे, असे महाराजांनी कळविले.
शिवाजी महाराजांनी मोठय़ा नाखुशीने हा तह स्वीकारला. शिवाजींचा संपूर्ण कोंडमारा केला, तर ते विजापूरशी हातमिळवणी करतील, हा धोका जयसिंहाला दिसत होता. घाटावरचा मुलूख आम्ही तुम्हाला देऊ, अशी बोलणी विजापूरने शिवाजी महाराजांशी सुरू केली होती. म्हणून जयसिंहाने शिवाजी महाराजांना १२ किल्ले आणि आदिलशाही मुलूखाचे आश्वासन देऊन त्यांना गुंतवून ठेवले.
पुरंदरच्या अटींनी औरंगजेब संतुष्ट झाला नाही; कारण जयसिंहाने शिवाजीचा नाश करण्याची संधी घालविली, असे त्याचे मत होते. तहातील अटींनुसार मोगलांनी पुणे, कल्याण आणि भिवंडी हे प्रांत शिवाजी महाराजांकडून घेतले. त्याचे महाराजांना मनस्वी दुःख झाले; पण कोकणातील आणि घाटावरील काही किल्ले व प्रदेश महाराजांनी टिकवून ठेवण्यात यश मिळविले.
औरंगजेबाने विजापूरही जिंकून घ्यावे, अशी जयसिंहाला आज्ञा केली. शिवाजी महाराजांना बरोबर घेऊन तो विजापूरवर चालून गेला. मातब्बर प्रधान मुल्ला अहमद हा मोगलांकडे गेला असतानाही विजापूरकरांनी लढण्याची शर्थ केली (जानेवारी १६६६). निकराच्या लढायांत जयसिंहाला माघार घ्यावी लागली आणि भीमा ओलांडून सोलापूर गाठावे लागले.
या मोहिमेत शिवाजी महाराजांना कपटकारस्थानाने ठार मारण्याचा बेत दिलेरखानाने जयसिंहाला सांगितला, असे जयसिंहाच्या छावणीतील इटालियन प्रवासी निकोलाव मनुची (१६३९–१७१७) म्हणतो. तेव्हा जयसिंहाने ही सूचना फेटाळली आणि शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर हल्ला करावा असे सुचवले. नेताजी पालकर वेळेवर न आल्यामुळे महाराजांचा हा हल्ला अयशस्वी झाला (१६ जानेवारी १६६६). शिवाजी महाराजांच्या नाराजीमुळे नेताजी प्रथम विजापूरला मिळाला आणि जयसिंहाने त्याची मनसब वाढविल्यावर मोगलांकडे गेला व पुढे त्यास औरंजेबाने मुस्लिम करून (१७ मार्च १६६७) अफगाणिस्तानात पाठविले. त्याचे नाव मुहम्मद कुलीखान असे ठेवण्यात आले.
जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे विजापूरचे चाकर; पण जयसिंहाने त्यांना १६६५ नंतर मोगलांच्या आश्रयाखाली आणले. कोकणातील आपल्या अधिकारावर ही आक्रमण आहे, असे शिवाजी महाराजांना वाटू लागले. शिवाय विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची फजिती झाली होती. तेव्हा शिवाजी महाराज विजापूरशी युती करतील, अशी शंका जयसिंहाला आली. शिवाजीला औरंगजेबाने आग्र्यास बोलावून घ्यावे, असे त्याने बादशहास सुचविले. त्याप्रमाणे औरंगजेबाचा हुकूम आला. आग्र्याला जाण्यास ते राजी नव्हते; पण जयसिंहाने त्यांची समजूत घातली आणि पुरंदरच्या तहातील काही अटी सैल होऊ शकतील, असे सूचित केले. शिवाय मुलगा रामसिंह तुमच्या सुरक्षिततेची आग्र्यामध्ये पूर्ण काळजी घेईल, अशीही हमी जयसिंहाने दिली. आग्र्याला जाऊन बादशाहाची भेट घ्यावी, असे महाराजांनी ठरविले. मोजका सरंजाम आणि संभाजी यास घेऊन महाराज आग्र्यास जाण्यास निघाले (५ मार्च १६६६).
महाराज १२ मे १६६६ रोजी दुपारी आग्र्यास पोहोचले. रामसिंहाने त्यांचे स्वागत केले. रामसिंहाचा तळ त्यावेळी खोजा फिरोजखान याची कबर असलेल्या बागेत होता. ही जागा ग्वाल्हेर-आग्रा रस्त्यावर आग्र्याच्या किल्ल्यापासून सु. अडीच किमी. अंतरावर आहे. रामसिंहाने आपल्या तळाशेजारीच त्यांना राहण्यास जागा दिली. पुढील सु. तीन महिने त्यांचे वास्तव्य येथेच होते. महाराज पोहोचताच त्यांना आपल्या भेटीस आणावे, अशी औरंगजेबाने आज्ञा केली होती. त्यावेळी बादशहाच्या वाढदिवसानिमित्त भरविलेला दरबार संपला होता व औरंगजेब मोजक्या अधिकाऱ्यांसह दिवाण-इ-खासमध्ये बसला होता. या ठिकाणी रामसिंह शिवाजी महाराजांसह गेला.
महाराज आणि संभाजी यांनी दरबारी पध्दतीप्रमाणे मोहरा आणि रुपये नजर केले. औरंगजेब स्वागताचा एकही शब्द बोलला नाही. त्यांना दरबारी अधिकाऱ्याच्या रांगेत अयोग्य जागी उभे करण्यात आले. आपला अपमान झाला, ह्या विचाराने शिवाजी महाराजांचा क्षोभ अनावर झाला. औरंगजेबाने रामसिंहाला विचारले शिवाजीला काय होत आहे? रामसिंह जवळ येताच शिवाजी महाराज कडाडून म्हणाले, “ मी कोणच्या प्रकारचा मनुष्य आहे, हे तुला, तुझ्या बापाला आणि बादशहाला ठाऊक आहे. असे असूनही मला अयोग्य ठिकाणी उभे करण्यात आले.
मला बादशाही मनसब नको, चाकरी नको”, असे मोठ्याने म्हणतच महाराज जाऊ लागले. रामसिंहाने त्यांना थांबवण्याकरिता त्यांचा हात धरला, तो झिडकारून महाराज एका बाजूला जाऊन बसले (एका बाजूला म्हणजे ‘दरबाराच्या बाहेर’ असे नव्हे)...... त्यांना खिल्अत (सन्मानाचा पोशाख) देण्यास औरंगजेबाने आकिलखान, मुख्लिसखान, मुल्तफतखान यांना पाठविले. औरंगजेबाच्या आज्ञेने महाराजांच्या तळाभोवती चौकी पहारे बसविण्यात आले. आपल्यावर विश्वास ठेवून महाराज आग्र्याला आले, याची रामसिंहाला जाणीव होती. त्याने आपण महाराजांच्याबद्दल जबाबदार राहू, अशा प्रकारचा जामीन बादशहाला लिहून दिला. त्यामुळे महाराजांना रामसिंहाच्या तळावरून हलविण्यात आले नाही.
पुढील तीन महिने महाराजांचे वास्तव्य आग्र्यात होते. हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रसंग होता, असेच म्हणावे लागेल. औरंगजेबाने दगाफटका करावा, ठार मारावे वगैरे विचार व्यक्त केले; पण प्रत्येक वेळी अनपेक्षित घडत गेले आणि शिवाजी महाराजांवरील संकट टळत गेले. महाराजांना दगाफटका झाला, तर बादशहाच्या वचनावर इतःपर कोणाचाही विश्वास रहाणार नाही, असाही विचार औरंगजेबाची मोठे बहीण जहांआरा हिने बोलून दाखविला. महाराजांनीही मोगल वजीर जाफरखान, बख्शी मुहम्मद अमीन इत्यादींशी संपर्क साधून आपल्यावर एकाएकी प्राणसंकट येणार नाही, याबद्दल कसोशीने प्रयत्न केले.
आपल्या ताब्यात असलेले किल्ले आणि मुलूख महाराजांनी मोगलांना देऊन टाकावेत म्हणजे त्यांना इतरत्र मनसबी देण्यात येतील, हे औरंगजेबाचे धोरण होते. जयसिंहाने केलेल्या तहाने त्याचे समाधान झाले नव्हते. कुणीकडून का होईना, पण महाराजांना महाराष्ट्रातून बाहेर काढावे हा त्याचा हट्ट. उलट, “मी भक्कम रक्कम देतो, माझे किल्ले परत करा” असे महाराजांचे म्हणणे. महाराजांना आग्र्यासच काही दिवस ठेवावे ही जयसिंहाची इच्छा; पण त्यांच्या जीवास अपाय होऊ नये याची त्याला काळजी. आग्र्याच्या वास्तव्यात मोगल दरबारातील अधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्यात महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. महाराजांच्या बाणेदार वर्तनामुळे मोगल प्रजा स्तिमित झाली होती.
विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची नामुष्की झाली होती. इराणचा बादशहा भारतावर हल्ला करणार, अशी अफवा होती आणि महाराजांचा प्रश्न अद्यापि निकालात निघाला नव्हता. या परिस्थितीत औरंगजेब मोठ्या काळजीत होता. शिवाजी महाराजांकडून आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, हे पाहून औरंगजेबाने महाराजांवरील पहारे कडक केले. रामसिंहावर पुढे वाईट प्रसंग येऊ नये, म्हणून शिवाजी महाराजांनी रामसिंहाची जामीनकी रद्द करविली आणि सोबतची बरीच माणसे दक्षिणेस परत पाठविण्याची परवानगी मागितली. याच सुमारास महाराजांना शहरातील दुसऱ्या एका हवेलीत हलविण्याचा बेत आखण्यात आला. तत्पूर्वीच निघून जाण्याचे महाराजांनी ठरविले.
१७ ऑगस्ट १६६६ रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले. महाराज कैदेतून पळून गेल्याचे पहारेकऱ्यांना दुसऱ्यां दिवशी समजले. औरंगजेबाला ही बातमी ताबडतोब कळविण्यात आली. रामसिंह, फौलादखान, तरबियतखान इत्यादींना तपासासाठी कडक आज्ञा देण्यात आल्या. आग्र्यात अनेक लोकांची धरपकड करण्यात आली. औरंगजेबाचा मोठा संशय रामसिंहावर होता; पण आरोप सिध्द झाला नाही. अंबरची जहागीरही त्याला देण्यात आली. औरंगजेबाने अधिकाऱ्यांना काही शिक्षा केली नाही. पुढे शिवाजी महाराज सुरक्षितपणे राजगडला पोहोचले (२० नोव्हेंबर १६६६). नंतर काही महिन्यांनी संभाजींना राजगडाला सुरक्षितपणे आणण्यात आले.
पोहोचल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा फार गवगवा केला नाही. उलट वरकरणी आपण मोगलांशी एकनिष्ठ आहोत, असे दाखविले व बादशहाचा निरोपही घेता आला नाही, अशी दिलगिरी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा आपल्या मुलाला उपसर्ग होऊ नये, यासाठी औरंगजेबानेही सबुरीचे धोरण ठेवले. राजगडास पोहोचल्यानंतर महाराजांनी शहाजादा मुअज्जम यास पत्र लिहून संभाजीला दिलेली मनसब व जहागीर मिळावी, म्हणजे आपण त्याच्याबरोबर पथके देऊन सुभेदाराच्या चाकरीसाठी त्याला औरंगाबादेस पाठवू असे कळविले आणि सरदारांसहित संभाजी औरंगाबादेस गेले. तिथे संभाजी काही दिवस राहिले व पथके आणि सरदार यांना औरंगाबादेस ठेवून राजगडास परतले. त्यांना मनसब व जहागीर आणि शिवाजी महाराजांना ‘राजा’ ही पदवी या घटना १६६७ मधील होत.
महाराजांच्या आग्रा भेटीचा फायदा घेऊन आदिलशहाने कोकणात पुन्हा आक्रमण केले. शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला आणि इतर काही महाल वगळता मध्य व दक्षिण कोकण हे प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले आणि सावंतवाडीच्या बंडखोर देसायांना आपल्या हवाली करावे, असे पोर्तुगीजांना सांगितले. पोर्तुगीजांच्या गोव्याच्या मुलखातील बारदेशावर तीन दिवस स्वारी केली (१० ते १२ नोव्हेंबर १६६७). पेडणे, कुडाळ, डिचोली इ. भागांतील बंडखोर देसायांना पकडावे, असा त्यांचा उद्देश होता; पण ते लोक गोव्याला पळून गेले. या स्वारीत पोर्तुगीजांचे नुकसान व मनुष्यहानी झाली. अखेर थोड्या दिवसांनी १६६७ मध्ये दोन्ही पक्षांत तह झाला. तहाप्रमाणे मराठ्यांनी कैदी आणि मालमत्ता परत केली. पोर्तुगीजांनीही बंडखोर देसायांना आवर घालू अशी हमी दिली. दाभोळला पोर्तुगीजांना वखार उघडण्यास शिवाजी महाराजांनी परवानगी दिली. पुढे नारवे येथील सप्तकोटीश्वर देवालयाचा त्यांनी जीर्णोद्धार केला (१६६८). याच वर्षी फ्रेंचांनाही राजापूर येथे वखार घालण्यास त्यांनी परवानगी दिली. सिद्दीचा निकाल लावण्यासाठी मराठ्यांनी एप्रिल १६६९ मध्ये जंजिऱ्याला वेढा दिला.
जंजिरा शिवाजी महाराजांच्या हाती जाणे मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रज यांपैकी कुणालाच नको होते. ते सिद्दीला गुप्तपणे मदत करीत. या निमित्ताने सिद्दींना मदत करून मध्य कोकणात प्रवेश करावा, ही मोगलांची इच्छा होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा हा प्रयत्न असफल झाला; तथापि मोगलांवरच चढाई करण्याची धाडसी मोहीम महाराजांनी आखली (१६६९). औरंगजेबाने मूर्तिभंजनाचे धोरण जाहीर करून काशी येथील प्रसिध्द मंदिराची मोडतोड केली (सप्टेंबर १६६९). धर्मांतरालाही उत्तेजन देण्यात येऊ लागले. यामुळे सर्वसामान्य प्रजेत असंतोष वाढू लागला होता. महाराज योग्य संधीची वाट पहात होते. त्यांनी तत्काळ औरंगाबादेत तैनात असलेले मराठा लष्कर आणि अधिकारी प्रतापराव गुजर व आनंदराव यांना परत बोलाविले आणि मोगलांविरुध्द युद्ध पुकारले.
शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. तानाजीने केलेला सिंहगडावरील अचानक हल्ला त्याच्या हौतात्म्यामुळे अविस्मरणीय ठरला (४ फेब्रुवारी १६७०). या लढाईत तानाजी आणि राजपूत किल्लेदार उदेभान हे दोघेही ठार झाले. पुढील सहा महिन्यांत मराठ्यांनी पुरंदर, रोहिडा, लोहगड, माहुली (शहापूरजवळ) इ. किल्ले घेतले. पुरंदरचा किल्लेदार रजीउद्दीन हा मराठ्यांच्या ताब्यात आला (८ मार्च १६७०). मराठ्यांनी चांदवड लुटले आणि मोगल खजिना हस्तगत केला. हत्ती व घोडे ही लूटही त्यावेळी त्यांना मिळाली. माहुलीच्या किल्ल्यावरील मराठ्यांचा पहिला हल्ला किल्लेदार मनोहरदास याच्या दक्षतेमुळे फसला; पण दुसऱ्या हल्ल्यात (जून १६७०) मराठ्यांनी किल्लेदार अल्लाहवीर्दीखान याला ठार मारून किल्ला ताब्यात घेतला.
माहुलीवरील पहिल्या हल्ल्यानंतर महाराजांनी कल्याण, भिवंडीवर हल्ला चढविला. तेथे निकराचा लढा होऊन कल्याण-भिवंडीचा प्रदेश महाराजांच्या हातात पडला. तसेच महाराजांचे सैन्य दक्षिणच्या सुभ्यात चहूकडे पसरले. त्यांनी वऱ्हाड आणि पूर्व महाराष्ट्र येथील प्रदेशांवर आक्रमणे केली. खेड्यापाड्यातून मराठे चौथाई वसूल करू लागले. याच वर्षाच्या शेवटी त्यांनी वऱ्हाडमधील कारंजा हे शहर लुटले (नोव्हेंवर १६७०). त्यापूर्वीच महाराजांनी आणखी एक मोठा धाडसी उपक्रम केला. तो म्हणजे बागलाण प्रांतावर (सध्याचा नाशिक जिल्ह्यातील तालुका) चढाई आणि सुरतेवर दुसऱ्यांदा हल्ला हा होय.
मुअज्जम या आक्रमणाने हतबुध्द झाला. दक्षिणेत मोगलांचा दाऊदखान कुरेशीव्यतिरिक्त दुसरा मातब्बर सरदार नव्हता. दिलेरखान हा नागपूर प्रांतात होता. त्याने दक्षिणेकडे जावे म्हणून बादशहाने आज्ञा केली. खानदेश सुभ्यात सटाणा, गाळणा किल्ला व मालेगाव इत्यादींचा समावेश होता.
नाशिक (गुलशनाबाद) हे तालुक्याचे ठिकाण असून संगमनेर जिल्ह्यात मोडत होते. महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील जव्हारच्या मार्गाने पुढे सरकून नाशिक आणि बागलाणच्या मध्ये पसरलेल्या पूर्व–पश्चिम डोंगरावरील किल्ले हस्तगत करण्याचा सपाटा चालविला. इंद्राई, कांचन, मांचन, अचलगड, मार्कंडगड, अहिवंतगड हे किल्ले मराठ्यांच्या हातात पडले. शिवाजी महाराजांनी बागलाण आणि डांग वाटेने पुढे सुरतेवर हल्ला चढविला (३ ते ५ ऑक्टोबर १६७०). सुरतेतील समृध्द व्यापारी, पेढीवाले आणि सावकार यांची संपत्ती हरण करण्यात आली. या स्वारीत त्यांच्याबरोबर मकाजी आनंदराव, वेंकाजी दत्तो, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे आदी होते.
हिरे, मोती, सोने-नाणे अशी सु. पन्नास लाखाची लूट या स्वारीत मिळाली. लुटीची बातमी ऐकून औरंगजेबाला मोठा धक्का बसला. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी दाऊदखान कुरेशी चांदवडला गेला. मोगलांचे मुख्य जिल्ह्याचे ठिकाण मुल्हेर हे होते. मराठे-मोगल यांत लढाई झाली (१७ ऑक्टोबर १६७०). या लढाईत मोगलांचे अनेक सैनिक व सरदार ठार अगर जखमी झाले. मराठ्यांनी सुरतेचा खजिना नाशिक-त्रिंबक-मार्गे सुरक्षितपणे स्वराज्यात आणला. कोकणात या सुमारास शिवाजी महाराजांनी राजगडहून राजधानी रायगडला हलविली (१६७०). पुढील अल्पकाळातच मराठ्यांनी त्र्यंबकेश्वर, खळा, जवळा, औंढा, पट्टा इ. किल्ले जिंकून घेतले. ५ जानेवारी १६७१ रोजी मराठ्यांनी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्लाही जिंकून घेतला. मराठ्यांच्या दुसऱ्या सैन्याने औसा, निलंगा, नांदेड, उमरखेड इ. भागांत धुमाकूळ घालून बऱ्हाणपूर लुटले. तेव्हा औरंगजेबाने काबूलचा सुभेदार महाबतखान याची दक्षिणेच्या मोहिमेवर नेमणूक केली, तो औरंगाबाद येथे १० जानेवारी १६७१ रोजी दाखल झाला. महाबतखानाच्या हाताखाली दाऊदखानाला देण्यात आले.
दाऊदखान आणि महाबतखान यांच्या भांडणामुळे औरंगजेबाने दाऊदखानाला खानदेशातून हलविले आणि महाबतखानाला बदलले (सप्टेंबर १६७१). त्याच्या जागेवर गुजरातचा सुभेदार बहादुरखान याची नेमणूक केली. पुन्हा मोगल सैन्याने साल्हेरला वेढा घातला. मोगल आणि मराठे यांत घनघोर युद्ध होऊन साल्हेरच्या युद्धात मोगल फौजेची वाताहात झाली. मराठ्यांचा शूर सरदार सूर्यराव काकडे या युद्धात मारला गेला. बहादुरखानाने भीमा नदीच्या काठी श्रीगोंद्याजवळ पेडगाव येथे छावणी घातली आणि औरंगजेबाच्या आज्ञेने तिथे एक किल्ला बांधला. हाच बहादुरगड होय. पुढे अनेक वर्षे याचा उपयोग मोगलांची छावणी म्हणून होत होता.
या सुमारास औरंगजेबाला सतनामी जमात आणि वायव्य प्रांतातील पठाण यांच्या प्रखर बंडाशी मुकाबला करावा लागला (१६७२). त्याने मुअज्जम आणि इतर अनुभवी सरदार यांना दक्षिणेतून बोलावून घेतले. आणि बहादुरखानाला सुभेदार आणि लष्करी मोहिमेचा सूत्रधार नेमले. दक्षिणेतून सैन्य गेल्यामुळे त्याची कुचंबणा झाली. वायव्य प्रांतातील पठाणांचे बंड वाढले, बख्शी मुहम्मद अमीन याची पठाणांनी बेअब्रू केली. शिवाय मोगलांना सर्व प्रकारची हानीही सहन करावी लागली. तेव्हा औरंगजेब बंड शमविण्यासाठी स्वतः दिल्लीतून बाहेर पडला (एप्रिल १६७४).
अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले. विजापूरच्या राज्यातील प्रमुख सरदार खवासखान, अब्दुल मुहम्मद, अब्दुलकरीम बहलोलखान, मुजफ्फरखान इत्यादींनी आपापल्या मर्जीप्रमाणे विजापूर राज्यातील महत्त्वाची स्थळे ताब्यात घेतली होती. खवासखानाकडे विजापूरचे मुख्यप्रधानपद आले होते. महाराजांचा डोळा पूर्वीपासूनच सातारा, कोल्हापूर भागांबर होता. संधी साधून त्यांनी पन्हाळगड घेतला (६ मार्च १६७३). सातारा, परळी, कोल्हापूर इत्यादी स्थळेही त्यांनी जिंकली. बहलोलखानाशी झालेल्या युद्धात (मार्च १६७३) उमरानी येथे सेनापती प्रतापराव गुजर याने खानाला कोंडले आणि नंतर मैदानातून जाऊ दिले. याचा बोल महाराजांनी लावला, तेव्हा २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरी येथे प्रतापरावाने बहलोलखानावर हल्ला केला. या लढाईत प्रतापराव ठार झाला.
मोगल सरदार दिलेरखान आणि विजापूरचा सरदार बहलोलखान यांनी युती करून मराठ्यांवर चाल केली; पण या युतीला न जुमानता बहलोलखानाचा मराठ्यांनी दणदणीत पराजय केला. मराठ्यांनी संपगाव, लक्ष्मेश्वर, बंकापूर, हुबळी इ. स्थळे लुटली. महाराजांनी कोकणात मोगल आणि सिद्दी यांचा आरमारी युद्धात पराजय केला; पण सिद्दींचा सरदार सुंबुल याच्याबरोबर मराठ्यांचा आरमारी अधिकारी दौलतखान हाही जखमी झाला.
इंग्रजांनी सिद्दी आणि महाराज यांत मध्यस्थी करण्याच प्रयत्न केला; परंतु सिद्दी आरमाराला इंग्रज मुंबईत आश्रय देतात, या सबबीवर ही मध्यस्थी शिवाजी महाराजांनी झिडकारली. इंग्रजांची मुख्य गाऱ्हाणी म्हणजे राजापूर आणि इतर स्थळांतील वखारींच्या लुटीबद्दल भरपाई मागण्यासंबंधी होती. मराठ्यांच्या हाती जंजिरा पडू नये, ही इंग्रजांची इच्छा असूनही, व्यापार-उदीम, जकात आणि मुक्त संचार यांसाठी मराठ्यांशी मिळते घेण्याचे धोरण त्यांना स्वीकारावे लागले. अखेर वाटाघाटी होऊन इंग्रज आणि महाराज यांच्यात तह करण्याचे ठरले (१६७४).
शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [⟶ रामदास].
मोगलांचे प्रभावी सैन्य उत्तरेत गुंतले आहे आणि दक्षिणेत त्यांचा कोणीच मातब्बर सेनापती नाही, शिवाय विजापूरही हतबल अवस्थेत आहे, ही संधी साधून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट घातला आणि लवकरच राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला.
राज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टादी विद्वानांनी ठरविले. राज्याभिषेक समारंभाचे तपशील समकालीन कागदपत्रांवरून उपलब्ध झाले आहेत. २९ मे १६७४ रोजी महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुलापुरुषदान हे समारंभ पार पडले. ३० मे १६७४ रोजी पत्नींशी वैदिक पध्दतीने पुन्हा विवाह करण्यात आले. पुढील सहा दिवस विविध समारंभ होत होते. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुध्द द्वादशी, शुक्रवारी, शके १५७६, शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्रचामरे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले.
तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे एक छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली. राज्याभिषेकाच्या नंतर १२ जून १६७४ रोजी इंग्रज आणि महाराज यांत तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले. मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी, अशा अवास्तव मागण्या शिवाजी महाराजांनी नाकारल्या.
राज्याभिषेकानंतर जिजाबाईंचा मृत्यु झाला (१७ जून १६७४). याशिवाय काही आकस्मिक मोडतोडीच्या घटना रायगडावर घडल्या. तेव्हा निश्चलपुरी या मांत्रिकाने पुन्हा एक अभिषेक करण्याचा सल्ला दिला व तो तांत्रिक अभिषेक शिवाजी महाराजांनी केला.
राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वऱ्हाड, खानदेश या मोगल इलाख्यात चढाया केल्या (१६७४-७५). महाराजांनी जंजिऱ्याचे सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांवर दडपण आणले आणि कारवारकडचा विजापूरच्या आधिपत्याखालील प्रदेश घेण्याची योजना आखली. विजापूरचा मुख्य प्रधान सिद्दी खवासखान आणि पठाण सेनापती बहलोलखान यांत तेढ होती आणि पठाणांचे पारडे जड होऊन दोन तट पडले. याचा फायदा घ्यावा म्हणून शांततेच्या तहाचे प्रलोभन दाखवून महाराजांनी मोगल सुभेदार बहादुरखान याला निष्प्रभ केले. विजापूरावर आक्रमण केले. या स्वारीत कारवार, अंकोला, सुपे ही स्थळे घेऊन अंकोल्यापर्यंत आपली हद्द कायम केली.
बहलोलखान याने त्यांना विरोध केला नाही. स्वारीत त्यांनी आदिलशाहीकडून फोंड्याचा किल्ला सर केला (मे १६७५). या वेळी महाराजांनी बहलोलखानाला भरपूर लाच देऊन स्वस्थ बसविले, अशी त्यावेळी वदंता प्रसृत झाली. खवासखानाने मोगल सुभेदार बहादुरखान याच्याशी सख्य करून विजापूरची अंतर्गत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर १६७५ मध्ये पंढरपूर येथे बहादुरखान आणि खवासखान यांत करार झाला. पठाणांचे बंड मोडावे आणि मराठ्यांना प्रतिकार करावा असे ठरले; पण पठाण खवळले आणि खवासखान हा विजापूरला येताच त्यांनी त्याला कैदेत टाकले (११ नोव्हेंबर १६७५). तेव्हा दक्षिणी मुसलमान सरदार शेख मिन्हाज याने बहलोलखानाचा पठाण सरदार खिज्रखानाला ठार मारले. त्याचा सूड म्हणून पठाणांनी खवासखान यास ठार मारले (१८ जानेवारी १६७६). परिणामतः दक्षिणी मुसलमान आणि पठाण यांच्यात शाह डोंगर मुक्कामी प्रखर युद्ध होऊन दक्षिणी पक्षाचा मोड झाला (२१ मार्च १६७६).
शेख मिन्हाज आणि दक्षिणी सरदार यांनी गोवळकोंड्याच्या कुत्बशाहाची मदत मागितली. विजापूरची सूत्रे बहलोलखानाकडे आली. औरंगजेब पंजाबातून २७ मार्च १६७६ रोजी दिल्लीला परत आला. त्याने विजापूरच्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी बहादुरखानास विजापूरवर स्वारी करण्याची आज्ञा दिली आणि दिलेरखानास दक्षिणेत रवाना केले (जून १६७६). दिलेरखानाबरोबर नेताजी पालकरलाही दक्षिणेत पाठविले. नेताजीला आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला होता. दक्षिणेत येताच त्याने संधी साधून दिलेरखानाची छावणी सोडली आणि तो महाराजांकडे आला. त्याचे शुध्दीकरण करून महाराजांनी त्याला हिंदू केले (१९ जून १६७६).
जानेवारी-फेब्रुवारी १६७६ दरम्यान शिवाजी महाराज सातारला आजारी होते, तत्संबंधी अनेक अफवा प्रसृत झाल्या. संभाजी आणि सावत्र आई सोयराबाई यांचे परस्परसंबंध चिघळत असल्याची वदंता होती. संभाजींच्या वर्तनाविषयीच्या बातम्यांत काही अंशी वदंताही असावी; पण शिवाजी महाराजांनी शांतपणे या सर्व बाबी हाताळल्या. विजापूरविरुध्द मोगलांनी चालविलेली तयारी ते बारकाईने पहात होते. विजापूर राज्यातील अथणी, संपगाव इ. भागांतही ते स्वतः आक्रमणे करीत होते. मोगल सुभेदार बहादुरखान याने भीमा ओलांडून विजापूरवर चाल केली (३१ मे १६७६). विजापूरजवळील इंडी येथील युद्धात मोगलांची दैना उडाली (१३ जून १६७६). त्यात मोगल सरदार इस्लामखान रुमी मुलांसह ठार झाला. मोठ्या कष्टाने मोगलांनी माघार घेतली आणि नळदुर्ग किल्ल्याला वेढा घातला. बहलोलखानाने तो उठविला त्यात बहादुरखानाचाच मुलगा मोहसीन मारला गेला (ऑगस्ट १६७६). तेव्हा त्याने विजापूरचे दक्षिणी सरदार शेख मिन्हाज, सिद्दी मसूद, शेख जुनैदी यांना पुन्हा एकत्र आणले आणि विजापूरच्या पाडावासाठी महाराजांच्या मदतीची अपेक्षा धरली. महाराजांनी या संधीचा पूर्ण लाभ उठविला. त्यामुळे मराठ्यांना दक्षिण भारतात मोठे आश्रयस्थान निर्माण झाले.
तमिळनाडूमध्ये विजापूरच्या अधिकाऱ्यांत दोन तट होते. खवासखान याच्या पक्षाचा नासिर मुहम्मद हा जिंजीचा किल्लेदार होता आणि बहलोलखानाचा नातेवाईक शेरखान हा दक्षिण तमिळनाडूचा प्रशासक होता. तमिळनाडूमधील मांडलिक राजे विशेषतः तंजावर व त्रिचनापल्ली येथील राजे हे कधी शेरखानाला, तर कधी नासिर मुहम्मदला मदत करून आपला बचाव करून घेत होते. तंजावर दरबारातील मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते याने व्यंकोजी राजांना (शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू) समजावून सांगितले की, विजापूर दुर्बल झाले आहे व तमिळनाडूमधील विजापूरचे प्रशासक हे आपसांत भांडत आहेत. तेव्हा ही संधी साधून तमिळनाडूमधील विजापूरची सत्ता नाहीशी करावी; पण व्यंकोजी राजांना हा सल्ला मानण्याचे धैर्य झाले नाही. तेव्हा त्यांना सोडून रघुनाथ नारायण हा हैदराबादवरून साताऱ्यास आला. हैदराबादेस आक्कण्णा आणि मादण्णा या दोन बंधूंची सत्ता होती.
महाराजांना त्यांचे भरपूर साहाय्य मिळेल, असे रघुनाथ नारायण याने सुचविले. गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल्लाह २१ एप्रिल १६७२ रोजी मरण पावला. त्यानंतर त्याचा जावई अबुल-हसन तानशाहा गादीवर आला. महाराजांनी त्याच्याशी स्नेहसंबंध जोडले होते. पुढे आक्कण्णा व मादण्णा या दोन बंधूंनी गोवळकोंड्याचे राजकारण केले. शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी निकटचे संबंध जोडले. यातूनच महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मसलत तडीस नेली.
दक्षिणेकडे रवाना होण्यास योग्य मार्ग हैदराबाद, कुर्नूल, तिरुपती, मद्रास व जिंजी हाच होता. दुसरा मार्ग बेळगाव, धारवाड हे जिल्हे व तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील चित्रदुर्ग, कोलार, आंबोण, वेल्लोर, जिंजी हा होता. शिवाजी महाराजांनी हैदराबादमार्गे जाण्याचा निर्णय घेतला. गोवळकोंड्याचे प्रधान आक्कण्णा व मादण्णा हे अनुकूल होते. बहादुरखान मराठ्यांच्या मोहिमेला अनुकूल बनला. महाराजांनी आपल्या गैरहजेरीत राज्यकारभार व्यवस्थित चालावा, म्हणून रायगडावर प्रमुख मंत्री तसेच धाकटा मुलगा राजाराम आणि पत्नी सोयराबाई यांना ठेवले आणि संभाजींस शृंगारपूर येथे राहण्यास आज्ञा केली. दक्षिण दिग्विजयासाठी त्यांनी रायगड सोडला (१६७६). त्यांच्या अनुपस्थितीत मोरोपंतांची जंजिऱ्यावरील मोहीम, रामनगर प्रकरणात पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी, अशी काही प्रकरणे उद्भवली.
शिवाजी महाराज मजल दरमजल करीत हैदराबादच्या सरहद्दीवर पोहोचले. मराठ्यांच्या सैन्याची एक तुकडी बेळगाव, धारवाड या भागांत विजापूरविरुध्द लढण्यात गुंतली होती. ती नंतर महाराजांच्या सैन्यात सामील झाली. महाराज मार्च १६७७ च्या प्रारंभी हैदराबादला पोहोचले. तिथे त्यांचे भव्य स्वागत झाले. मोगलांना प्रतिकार करण्यासाठी मराठ्यांची आपल्याला मदत आसावी, अशी कुत्बशाहाची इच्छा होती. तमिळनाडूतून विजापूरची सत्ता सर्वस्वी नाहीशी करावी, ही मराठ्यांची इच्छा होती. कुत्बशाहाशी मैत्री केल्यास मोगलांविरोधी दक्षिणेत आघाडी उघडता येईल, असाही एक महाराजांचा हेतू होता. व्यंकोजीराजे यांनी तंजावरला राज्य स्थापिले होते. बंगलोर-जिंजीचा प्रदेश आणि तंजावर हे भाग शहाजींच्या नंतर त्यानी आपल्याकडे ठेवले. त्यांत आपल्याला वाटा मिळाला पाहिजे, असा दावा महाराजांनी केला; तथापि विजापूरची सत्ता नामशेष करणे, हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता.
हैदराबादला महाराज एक महिना राहिले. कुत्बशाहाशी वाटाघाटी होऊन मैत्रीचा तह झाला. त्यात मोहीम चालू असेपर्यंत स्वारी खर्चासाठी म्हणून कुत्बशाहाने रोजाना तीन हजार होन द्यावेत, तसेच महाराजांनी विजापूरकडून जिंकलेला प्रदेश त्यांची वडिलार्जित जहागीर वगळता त्यांनी कुत्बशाहाकडे द्यावा, असे ठरले. नंतर पंधरा ते वीस हजार घोडेस्वार आणि तीस हजार पायदळ घेऊन महाराज श्रीशैलम पर्वतावर गेले (एप्रिल १६७७). तेथून कालहस्ती, तिरुपती इ. क्षेत्रे करीत ते मद्रासच्या जवळ पेद्दपोलम गावी पोहोचले (मे १६७७). तेथून ते जिंजीच्या भव्य दुर्गाकडे आले. जिंजीचा किल्ला त्यांच्या ताब्यात आला (मे १६७७). वेल्लोरचा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला (२२ जुलै १६७८). महाराजांनी जिंजी प्रदेशाची मुलकी आणि बिनमुलकी व्यवस्था बारकाईने केली आणि किल्ल्याची डागडुजी केली.
महाराष्ट्रातून त्यांच्याबरोबर आलेले शेकडो कारकून, मुलकी अधिकारी कामावर तैनात करण्यात आले. हा हा म्हणता विजापूरचा कारभार नाहीसा झाला. त्रिवाडी येथे तमिळनाडूच्या आदिलशाहातील मुलखाचा सुभेदार शेरखान याचा मराठ्यांनी पराजय केला. विजापूरच्या अधिकाऱ्यांनी आपापली ठाणी सोडून पळ काढला. मराठ्यांनी वालदोर, तेगनापट्टण, पानेमोल, त्रिनेलोर इ. स्थळे ताब्यात घेतली. शेरखानाला कुठूनही मदत मिळण्याची आशा राहिली नाही. त्याने भुवनगिरीमध्ये आश्रय घेतला. मराठ्यांनी भुवनगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला (जुलै १६७७). तेव्हा शेरखान शरण घेऊन त्याने किल्ला मराठ्यांच्या हवाली केला, तसेच तह करून बाकीच्या अटीही त्याला मान्य कराव्या लागल्या.
पुढे महाराज कावेरीच्या तीरावर पोहोचले. तिरुमलवाडी येथे त्यांनी छावणी घातली. याच ठिकाणी मदुरादी राज्यांचे राजे आणि नायक यांनी मराठ्यांना खंडणी पाठविली. व्यंकोजीराजे यांनीही महाराजांची भेट घेतली. शिवाजी महाराजांनी वडिलार्जित मालमत्ता, प्रदेश यांमध्ये आपल्याला अर्धा वाटा मिळावयास हवा, असे व्यंकोजीस सांगितले. तेव्हा व्यंकोजीराजे अचानक तंजावरला गुपचूपणे निघून गेले. शिवाजी महाराजांनी कावेरीच्या उत्तरेकडील व्यंकोजीचा प्रदेश घेतला. त्यावेळी व्यंकोजींनी सबुरीचे धोरण अंगीकारून समझोता केला. म्हैसूर भागातील मराठा प्रदेशाची व्यवस्था करून बंगलोर वगैरे काही परगणे त्यांनी व्यंकोजीची बायको दिपाबाई हिच्यासाठी परत केले.
म्हैसूरच्या सीमाभागात त्यांच्यात आणि म्हैसूरकरांत किरकोळ चकमकी झालेल्या दिसतात; पण ते प्रकरण वाढले नाही. दक्षिणेत व्यंकोजीराजांनी महाराजांच्या सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण १६ नोव्हेंबर १६७७ च्या लढाईत त्यांचा पराजय झाला व त्यांना जबर रकमेची भरपाई करावी लागली. रघुनाथराव हणमंतेसारख्या वाकबगार अधिकाऱ्याच्या हाती महाराजांनी तमिळनाडू प्रदेशातील प्रशासनव्यवस्था सुपूर्त केली. बहादुरखानाने त्यांचा मार्ग मोकळा करून दिला, ती त्याची घोडचूक होती. औरंगजेबाने बहादुरखानाच्या हातून सूत्रे काढून घेतली.
म्हैसूरहून परतताना मराठ्यांनी कोप्पळ, गदग, लक्ष्मेश्वर इ. स्थळांवरून प्रवास केला. कर्नाटकात शिवाजी महाराजांचा तीन महिने मुक्काम होता. शिवाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर बेळगावच्या आग्नेयीस सु. ४८ किमी. वरील बेलवडी येथील देसाईण सावित्रीबाई हिने शिवाजी महाराजांच्या लष्करास सु. सत्तावीस दिवस कडवा प्रतिकार केला. अखेर अन्नधान्याचा तुटवडा पडल्यानंतर सावित्रीबाई महाराजांच्या सैन्यावर तुटून पडली आणि तिने पराक्रम गाजवून लष्कराची हानी केली; पण अखेर मराठ्यांनी तिची गढी घेतली. देसाईणीला तिच्या उपजीविकेसाठी काही प्रदेश देण्यात आला. दक्षिण दिग्विजय आटोपून महाराज एप्रिल १६७८ मध्ये पन्हाळागडास परत आले.
शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या काळात सोयराबाई व संभाजी यांचे पटत नाही, हे माहीत असल्यामुळे त्यांनी संभाजींना सहकुटुंब शृंगारपुरास राहण्यास बजाविले. संभाजींनी दिलेरखानाशी पत्रव्यवहार केला. शृंगारपूरला संभाजी असताना त्यांचे मंत्र्यांशी खटके उडत होते. म्हणून महाराजांनी संभाजींना कोकणातून हलवून परळी येथील सज्जनगड किल्ल्यावर जाण्यास सांगितले; पण स्वराज्यातून निघून मोगलांना मिळावयाचे हे संभाजींनी ठरविले होते. त्याप्रमाणे दिलेरखानाशी बोलणी करून ते १३ डिसेंबर १६७८ रोजीच परळी सोडून एकाएकी माहूलीला स्नानासाठी जातो म्हणून गेले आणि दिलेरखानाच्या छावणीत दाखल झाले. या सुमारास मराठ्यांनी चढाईचे धोरण स्वीकारून कोप्पळचा किल्ला जिंकून घेतला (३ मार्च १६७९). मसूदखान आणि दिलेरखान एक झाले, पण महाराजांची आक्रमणे त्यांना थांबविता येईनात. तेव्हा दिलेरखानाने संभाजींना पुढील महत्त्वाच्या मोहिमांत आपल्याबरोबर घेऊन प्रथम स्वराज्यातील भूपाळगडचा किल्ला जिंकून घेतला (१७ एप्रिल १६७९). त्यावेळी किल्ल्यातील सु. सातशे लोकांचे हात तोडण्यात आले.
विजापूर अतिशय दुर्बल झाले असून एका हल्ल्यात ते आपल्या हाती येईल, अशी समजूत दिलेरखानाने करून घेतली. औरंगजेब जोधपूर प्रकरणात राजपुतांची बंडे मोडण्यात गुंतल्यामुळे उत्तरेकडून लष्करी मदत मिळण्याची शक्यता नव्हती. सिद्दी मसूद आणि शिवाजी महाराज हे एक झाले. महाराजांनी विजापूरला फौज आणि रसद यांचा मुबलक पुरवठा केला. दिलेरखानाने धुळखेडजवळ भीमा ओलांडली आणि तो विजापूरवर चालून गेला (ऑगस्ट १६७९). महाराजही दहा हजार घोडेस्वारांसहित विजापूराजवळ पोहोचले. मोगल मुलखात चौफेर हल्ले करून त्यांना त्रस्त केले. त्यामुळे मोगलांनी विजापूरचा वेढा उठवावा हा हेतू सिध्दीस गेला.
याच सुमारास औरंगजेबाने हिंदूंवर लादलेल्या जझिया कराच्या निषेधार्थ शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला एक परखड पत्र लिहून त्याची कानउघडणी केली.
दिलेरखानाचा विजापूरचा वेढा अयशस्वी झाला; तेव्हा शहाजादा मुअज्जमने दिलेरखानावर ठपका ठेवला आणि औरंगजेबाकडे तक्रार केली. दिलेरखानाने विजापूरहून माघार घेऊन भोवतालच्या प्रदेशातील प्रजेवर अनन्वित अत्याचार करण्यास प्रारंभ केला. दिलेरखानाच्या मनातील कपटकारस्थान करण्याचे बेत जाणून संभाजीराजे दिलेरखानाच्या अथणी येथील छावणीतून निसटले आणि विजापूरमार्गे पन्हाळ्यास आले (डिसेंबर १६७९). त्यापूर्वी महाराजांनी वऱ्हाड, खानदेश इ. भागांतील मोगल प्रदेशात हाहा:कार उडवून दिला होता आणि नोव्हेंबर १६७९ मध्ये महाराजांनी औरंगाबादजवळील जालना शहरावर हल्ला करून ते लुटले. औरंगाबादहून मोगल सैन्य येत आहे, असे पाहून ते नगर आणि नाशिक यांच्या सीमेवरील पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर आले. तेथे त्यांना संभाजीराजे मोगलांकडून परत आल्याची बातमी कळली. ती ऐकून ते घाईघाईने पन्हाळगडास आले. पन्हाळगडावर पिता-पुत्रांची गाठ पडली (१३ जानेवारी १६८०). शिवाजी महराजांनी संभाजींना एकूण सर्व राज्यातील गड, कोट, किल्ले, उत्पन्न – खर्च इत्यादींचा तपशील समजावून दिला आणि त्यांस राज्यकारभारात अधिक भाग घेता यावा, अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
सज्जनगडावरून महाराज रायगडास परतले (४ फेब्रुवारी १६८०). रायगडावर राजारामांचे मौंजीबंधन झाले (७ मार्च १६८०). १५ मार्च १६८० रोजी राजारामांचा विवाह झाला. समारंभानंतर काही दिवसांनी महाराज आजारी पडले. नवज्वराचा ताप असावा. रक्ताच्या उलट्या होऊन महाराजांचा रायगडला मृत्यू झाला, असे फार्सी कागदपत्रांत म्हटले आहे. इंग्रज वखारींच्या कागदपत्रांत रक्ताचा अतिसार झाला असे लिहिले आहे. त्यांच्या मृत्यूविषयी विश्वासार्ह पुरावा अद्याप ज्ञात झाला नाही.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला आणि त्याबरोबरच राज्यकारभाराविषयक एक सुसूत्र नियमावली – कानुजाबता तयार केली. राज्याभिषेकाच्या समयी मुख्य-प्रधान (पेशवा), अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री व सुमंत अशी अष्टप्रधानांची नियुक्ती केली. त्यांपैकी सहा प्रधानांनी सैन्य घेऊन युद्धादी प्रसंग करावे, अशी आज्ञा होती. तत्कालीन राजकीय परिभाषा फार्सी होती व अधिकाऱ्यांची नावे फार्सीवरूनच घेतलेली असत. त्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांच्याकरवी राजव्यवहारकोश तयार करवून घेतला.
अष्टप्रधानांची कर्तव्ये आणि कार्यभार यांचे तपशील कानुजाबतात देण्यात आले आहेत. राज्याभिषेकानिमित्त होन आणि शिवराई ही दोन नवी नाणी पाडण्यात आली. त्या नाण्यांवर ‘राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे घातली. शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृत श्लोकबद्ध असून ते बहुधा शहाजींनी घडवली असावी; कारण ही मुद्रा शिवाजी महाराजांच्या पंधराव्या वर्षापासून वापरात दिसते. राज्याभिषेकानंतरही हीच मुद्रा कायम राहिली. ती अशी :“प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो:शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला. संस्कृत भाषेचा आणि भाषापंडितांचा मानसन्मान व आदर केला.
शिवाजी महराजांनी वतनदारांचे हक्क नियंत्रित केले, त्यांना महसुलातून (रयतेकडून) हिस्सा मिळत असे. त्याऐवजी रोख रक्कम वेतन म्हणून ठरवून दिली, त्यांना गढ्याकोट बांधण्यास मनाई केली. तसेच लष्कराला नियमित वेतन देण्याची पद्धत सुरू केली. तलवारीच्या जोरावर राज्य निर्मिले व तलवारीच्या जोरावरच ते रक्षिले; तथापि ‘साहेबी कारकुनाची’ अशी घोषणा केली. याचा अर्थ नागरी प्रशासन लष्करापेक्षा सर्वोच्च असेल. गड–कोटांना काय हवे ते कारकून देतील. कारकून प्रजेकडून कर वसूल करतील. तो लष्कराला हक्क नाही, अशा शिवाजी महाराजांच्या आज्ञा असत. कारभार ठीक चालवायचा असेल, तर मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असली पाहिजे. मध्ययुगात मुलकी सत्तेचे श्रेष्ठत्व सांगणारा हा थोर नेता भारताच्या इतिहासातही कदाचित एकमेव असेल.
स्वराज्यस्थापनेत डोंगरी किल्ले, सवेतन सुसज्ज सेना आणि विश्वासू सहकारी यांचा वाटा मोठा होता. स्वाऱ्यांचा हेतू राज्यविस्ताराबरोबर लूट मिळविणे आणि संपत्ती व दारुगोळा जमा करून खजिना सुसज्ज ठेवणे, हा होता. या राज्यांगाकडे शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष पुरविले. त्यामुळे सैन्याचा पगार कधी तटला नाही वा मागे पडू दिला नाही. किल्ले, दारुगोळा, धान्य, गलबते यांचा खर्च त्यांच्या या कोषबलावर अवलंबून होता. अपुरी शस्त्रास्त्रे, मर्यादित सैन्य व साधनसंपत्ती यांमुळे आमनेसामने अशी मैदानी युद्धपद्धती मोगल वा विजापूर यांसारख्या बलाढ्य शत्रूंसमोर निरुपयोगी ठरेल. एवढेच नव्हे तर ते हानिकारक ठरेल, हे जाणून त्यांनी आपल्या युद्धपद्धतीला गनिमी युद्धतंत्राची जोड दिली.
आपल्या प्रशासन–लष्कर व्यवस्थेत शिवाजी महाराजांनी धार्मिक बाबींना कधी आड येऊ दिले नाही. या काळात सर्वधर्मसहिष्णू राज्यपद्धती स्थापणे, हे एक प्रकारचे क्रांतिकार्य होते. मुसलमान सुलतान इस्लामशिवाय इतर धर्मांना आणि ख्रिश्चन राज्यकर्ते ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मांना गौण व हीन लेखत, भिन्न धर्मीय प्रजेला समान दर्जाची रयत म्हणून मान्यता मिळत नसे. लष्कराला त्यांच्या खास आज्ञा असत की, ‘युद्धात धार्मिक वास्तू, साधू-संत, बायका-मुले, कुराण् आदींना धक्का लागता कामा नये’. स्त्रियांची विटंबना त्यांना मान्य नव्हती. त्यांच्या लष्करात स्त्रियांना व कबिल्याला स्थान नव्हते.
शिवाजी महाराजांची हेरव्यवस्था उत्तम असली पाहिजे हे त्यांच्या अनेक मोहिमा, अनपेक्षित यशस्वी हालचालींवरून लक्षात येते. आपल्या राज्याच्या उत्पन्नाचा एक मोठा वाटा ते हेरव्यवस्थेवर खर्च करत असत. अशा प्रकारचे उल्लेख युरोपीय पत्रव्यवहारांत सापडतात.
शिवाजी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तम रीत्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली.
पतितपरावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबिला. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुंता झालेले आणि मुसलमानांत दहापाच वर्षे राहिलेले मराठे सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियांशी सोयरीक केली. तसेच सर्व धर्मांतील साधु-संतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. मुंबई–लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात (१६ जानेवारी व १४ फेब्रुवारी १६७८) अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर वीरांबरोबर शिवाजी महराजांची तुलना करण्यात आली आहे. मार्तिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे.
खाफीखान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार. तो शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेष्टा होता; पण तोही शिवछत्रपतींविषयी म्हणतो, ‘शिवाजीने सार्वकाल स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे. मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले. या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत.
जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील, त्याला तो कडक शासन करीत असे.’ महाराष्ट्रेतर कवींनी–विशेषतः तमीळ (सुब्रह्मण्य भारती), तेलुगू (कोमाराजू वेंकटलक्ष्मणराव), बंगाली (रवींद्रनाथ टागोर), गुजराती (झवेरचंद मेघाणी) हिंदी (केदारनाथ मिश्र) इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्ज्वल्य अभिमान यांमुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील, अशी व्यवस्था केली. धैर्य आणि साहस यांबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. म्हणून समर्थ रामदास म्हणतात –
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी.
दक्ष प्रजापालन, न्याय्य करव्यवस्था, सैन्याने रयतेला त्रास न देणे, या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढले आणि पुढे भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा-ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यांत शंका नाही.
संदर्भ : 1. Balkrishna, Shivaji The Great, 4 Vols., Kolhapur. 1932.
2. Duff, James Grant, A History of Marhathas, 2 Vols., New Delhi, 1978.
3. Kincaid, Denis, The Grand Rebel, Bombay, 1937.
4. Kulkarni, G.T. Moghal-Maratha Relations, Poona, 1983.
5. Mahaley K. L. Shivaji The Pragmatist, Nagpur, 1969.
6. Mujumdar R. C. Ed. The Mughal Empire, Bombay, 1974.
7. Nadkarni, R. V. The Rise and Fall of the Maratha Empire, Bombay, 1966.
8. Pagadi, Setumadhavarao, Shivaji, Bombay, 1983.
9. Ranade, M. G. Rise of the Maratha Power and Other Essays, Bombay, 1961.
10. Rawlinson, H. G. Shivaji The Maratha : His Life and Times, Oxford, 1915.
11. Sarkar, J. N. House of Shivaji, Calcutta, 1955.
12. Sarkar, J. N. Shivaji and His Times, Calcutta, 1961.
१३. काटे, रा. गो. संपा. राजव्यवहारकोश, पुणे, १९५६.
१४. काळे, दि. वि. छत्रपति शिवाजी महाराज, पुणे, १९५९.
१५. कुरुंदकर, नरहर, संपा. छत्रपति शिवाजी महाराज जीवन रहस्य, पुणे, १९८०.
१६. गर्गे, स. मा. संपा. मराठी रियासत, खंड १, पुणे, १९८८.
१७. ढेरे, रा. चिं. शिखर शिंगणापूरचा श्रीशंभूमहादेव, पुणे, २००१.
१८. दिवेकर, स. म. संपा. कवींद्र परमानंद लिखित श्री शिवभारत, पुणे, १९२७.
१९. दीक्षित, मो. गं. संपा. छत्रपति शिवाजी महाराज जन्मतिथि निर्णय समिती अहवाल व निवेदने, मुंबई, १९६८.
२०. देशपांडे, प्र. न. छत्रपति शिवाजी महाराजांची पत्रे, धुळे, १९८३.
२१. पिसुर्लेकर, पां. स. पोर्तुगेज मराठे–संबंध, पुणे, १९६७.
२२. पुरंदरे, ब. मो. राजा शिवछत्रपति, पुणे, १९८२.
२३. बेंद्रे, वा. सी. श्री. छत्रपति शिवाजी महाराज, २ खंड, मुंबई, १९७२.
२४. भावे, वा. कृ. युगप्रवर्तक शिवाजी महाराज, पुणे, १९५५.
२५.मेहेंदळे, गजानन भास्कर, श्री राजा शिवछत्रपति खंड १, भाग १–२, पुणे, १९९६.
२६. वाकसकर, वि. स. संपा. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, पुणे, १९३०.
२७. शहा. मु. ब. संपा. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे समग्र साहित्य, खंड १ ते १३, धुळे, १९९५–१९९८.
२८. शेलवलकर, त्र्यं. शं. श्री शिवछत्रपति : संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने, मुंबई, १९६४.
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/25/2020
महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्र...
श्रीमंत शहाजीराजानी आपल्या संग्रहातील अनेक दुर्मिळ...
या विभागात शिवाजी सुखदेव शिंदे, रा. एकांबा, जिल्हा...