অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त शासनाच्या वतीने सन 2015-16 हे वर्ष ‘सामाजिक न्याय व समता वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. या वर्षानिमित्त शासन, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था, इतर सामाजिक संस्था आणि व्यक्तींच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम हाती घेण्यात आले. या वर्षानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महान्यूजने घेतलेला हा वेध...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून प्रामुख्याने ओळख होते. ही त्यांची ओळख अत्यंत मर्यादित स्वरुपाची आहे असे मला नेहमी वाटे. पण मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत असताना डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील अन्य थोर पैलूंवर प्रकाश टाकण्याची संधी मला मिळाली. त्या अविस्मरणीय अनुभवांची ही आठवण....

त्याचं असं झालं की, 1988 साली मी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम हा अभ्यासक्रम करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मी दूरदर्शनमध्ये करारपत्रित कलाकार (स्टाफ आर्टिस्ट) म्हणून कार्यरत असल्याने मला अध्ययन रजा मिळू शकत नव्हती, जी एरव्ही नियमित शासकीय कर्मचाऱ्यांना मिळू शकते, म्हणून मी अन्य स्वरुपाची रजा घेऊन हा अभ्यासक्रम करण्यासाठी गेलो अभ्यासक्रमाचे पहिले सत्र नोव्हेंबरमध्ये संपले आणि मी रजेवरुन परत दूरदर्शनमध्ये सेवेत रुजू झालो.

त्याचवेळी माझे वरिष्ठ अधिकारी निर्माते सुधीर पाटणकर यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित हिंदी माहितीपट राष्ट्रीय प्रसारणासाठी बनविण्याची जबाबदारी केंद्राने सोपविली. बैठकीतून आल्यावर किती प्रचंड मोठी जबाबदारी सोपविली आहे, हे पाटणकरांना कळून चुकले होते. त्यामुळे ते विचारमग्न झाले होते. कक्षात येताच मी त्यांना त्याविषयी विचारल्यावर त्यांनी कारण सांगितले. यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही मला दोन दिवसांचा वेळ द्या, पूर्ण विचार करुन आपण काय ते ठरवू या.

त्या दोन दिवसात, विचारांती माझ्या लक्षात आले की, बाबासाहेबांची ओळख प्रामुख्याने भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे नेते अशी होते. वस्तुत: याशिवाय ते विचारवंत, समाजसुधारक, शिक्षण प्रसारक, कामगार नेते, धर्माचे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ, संपादक अशा विविध भूमिकांतून प्रभावीपणे वावरलेले आहेत. या विविध पैलूंपैकी मला सर्वाधिक भावला तो म्हणजे शिक्षणाचा पैलू. खरे पाहता बाबासाहेबांनी स्वत: अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले होते. परदेशात जाऊन डॉक्टरेट मिळविली होती. या त्यांच्या उच्च शिक्षणामुळे आपले पुढचे जीवन ऐटीत आणि आरामात घालविणे त्यांना सहज शक्य होते. परंतु शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी देशबांधवांना शिक्षित करण्यासाठी शिक्षण प्रसारणाचे काम हाती घेतले.

1988 साली औरंगाबादला विद्यापीठात शिकत असताना जो मराठवाडा तेव्हाही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला समजला जात असे, अशा मराठवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे 1948 साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. हे पाहून मला बाबासाहेबांविषयी अतोनात आदर वाटू लागला. अन्यथा त्याकाळी मराठवाड्यातील तरुण तरुणींना उच्च शिक्षण घ्यावयाचे असल्यास नागपूर, पुणे, मुंबई, हैद्राबाद अशा दूरच्या ठिकाणी जावे लागायचे. इतक्या दूर जाऊन शिक्षण घेण्याची अनेकांची ऐपत नसायची. त्यामुळे मराठवाड्यातील हजारो तरुण उच्च शिक्षणापासून वंचित राहात. त्यांच्या या अडचणी ओळखून बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील पहिले असे मिलिंद महाविद्यालय सुरु करुन अत्यंत दूरदृष्टी दाखवली.

या महाविद्यालयामुळे मराठवाड्यात उच्च शिक्षणाची क्रांती झाली असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. म्हणूनच 1988 साली माहितीपटासाठी विषयाचा विचार करताना मला बाबासाहेबांच्या शैक्षणिक पैलूवरच संपूर्ण माहितीपट असावा असे वाटू लागले. वरिष्ठांशी चर्चेअंती याच विषयावर माहितीपट करण्याचे निश्चित झाले. माहितीपटाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी सर्व तपशील, संशोधन परिपूर्ण असणे गरजेचे होते. त्यासाठी संशोधनाचे काम प्रा. गोविंद पानसरे यांना देण्यात आले. त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित संहिता लेखन प्रा.रतनलाल सोनाग्रा यांनी केले.

माहितीपटाच्या चित्रीकरणास आम्ही औरंगाबादपासून सुरुवात केली. या चित्रीकरण पथकात कॅमेरामन के. गणपती, ध्वनिचित्रमुद्रक किशोर जोशी, सहायक ए. के. सारस यांचा समावेश होता. नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाची वास्तू, तेथे उपलब्ध असलेली छायाचित्रे, बाबासाहेबांच्या संग्रही ठेवलेल्या वस्तू, प्राचार्यांची आणि विद्यार्थ्यांची मनोगते, तात्कालीन मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निवेदन आणि पुणे, महाड, मुंबई येथील शैक्षणिक वास्तूंचे चित्रीकरण व संकलन करुन पुढे 6 डिसेंबर, 1988 रोजी रात्री 9.00 वाजता दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणातून हा माहितीपट प्रसारीत झाला.

डॉ. बाबासाहेबांनी विद्यार्थीदशेत कसे शिक्षण घेतले, त्यानंतर समाजाला शिक्षित करण्यासाठी कसे परिश्रम घेतले, शैक्षणिक संस्था कशा उभारल्या, त्यांना या कामी मिळालेले इतरांचे साह्य, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांनी लिहिलेले ग्रंथ या सर्व महत्वाच्या शैक्षणिक बाबींचे दर्शन सुमारे 30 मिनिटांच्या या माहितीपटाद्वारे अत्यंत संवेदनशीलपणे दाखविण्यात आले. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असल्याने व रात्रौ 9.00 ची वेळ ही प्राईमटाईम असल्याने या माहितीपटाविषयी देशातील विविध भागातून खूप भावपूर्ण प्रतिक्रिया आल्या.

या माहितीपटामुळे बाबासाहेबांच्या एका पैलूचे थोडे फार का होईना, दर्शन घडविण्याची आपल्याला संधी मिळाली याबद्दल मला नेहमीच समाधान वाटत आले. तसेच बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य किती अचंबित करणारे आहे, हेही लक्षात येत गेले.

पुढे डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन 14 जानेवारी, 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला मिळालेली ही मानवंदनाच होय.


लेखक - देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती) (प्रशासन)

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate