অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे दिनांक 06 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. समता व सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या दिनानिमित्त वाहिलेली सुमनांजली.

दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महु येथे जन्म झालेले भीमराव रामजी आंबेडकर हे भारतभुमीत जन्माला आले हे एक थोर भाग्यच. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ या ठिकाणाहून ३ तास प्रवासानंतर आणि इंदोरपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर ‘महु’ हे गाव आहे. येथे अनेक पर्यटक त्यांच्या जन्मस्थळाला वंदन करण्यासाठी भेट देतात. भारताला डॉ. बाबासाहेबांनी एक मोठी देणगी दिली, ती म्हणजे भारताची राज्यघटना होय. त्यामुळे या देशाला ‘लोकशाही’ भारतीय अर्थशास्त्रांसंबंधी त्यांचा अभ्यास होता. विकासाच्या नावाखाली जमीन, पाणी पर्यावरणाचा नाश याविषयीची येणारी संकटे त्यांनी यापूर्वीच सविस्तरपणे मांडली होती. भारतासारख्या कृषीप्रधान देशात विद्युत विकासाला गती मिळाली पाहिजे, जलसंधारण वाढले पाहिजे, यासाठी त्यांचा हट्ट होता आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक ‘ज्ञानयोगी’. त्यांची विद्वत्ता अद्वितीय होती. त्यांच्या जीवनमानाचा आयुष्याचा सविस्तरपणे अभ्यास केला तर अत्यंत खडतर, कठीण परिस्थितीसमवेत त्यांना सामना करावयास लागला. त्यांनी अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन उच्चशिक्षण तर घेतलेच पण उत्तम संशोधन केले. तो तर त्यांचा खरा व्यासंग होता. दररोज 18 तास त्यांनी अभ्यास केला शिक्षण घेतल्यामुळे प्रगतीतर होईलच पण विकासाची दारे खुली होतील, हे सूत्र त्यांना पूर्णपणे माहित होते.

सन 1913 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेले होते त्या ठिकाणी विद्यार्थी वर्गासोबत राहताना त्यांना कुठेच दुजाभाव आढळला नाही. त्या ठिकाणी ‘समतेच्या’ वातावरणात ते खूप आनंदी होते. तेव्हांपासून त्यांना वाटू लागले ह्यासाठी शिक्षण फार महत्त्वाचे आहे. पददलीत बांधवानी शिक्षण घेतले पाहिजे. त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. “प्राचीन भारतातील व्यापार” या विषयांवर त्यांनी सन 1915 मध्ये प्रबंध लिहिला आणि त्यांना M.A ची पदवी प्राप्त झाली.
लंडनमध्ये असताना सुध्दा अतिशय खडतर, कठीण परिस्थितीत त्यांना शिक्षण घ्यावे लागले. आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते रात्रपहाट करीत असत. उच्च शिक्षण घेतल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक बुध्दिमान आणि सामर्थ्यशाली पुरुष झाले. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र, मानववंशशास्त्र या विषयांवर त्यांचा उत्तम पगडा बसला होता. भारत देशाच्या सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योगदान होते. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे निर्मातेही म्हटले जाते. एकूण 64 विषयांवर त्यांचा अभ्यास होता. अमेरिकेतील जगप्रसिध्द कोलंबिया विश्वविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगातील 100 विद्वानांच्या बरोबरीने गौरविले होते. डॉ. बाबासाहेब हे भारतातील पहिले अर्थशास्त्रज्ञ होते. समता आणि सामाजिक विचारासाठी त्यांनी जीवनभर लढा दिला होता. त्यांना ‘भारतरत्न’ च्या सन्मानाने गौरविले गेले. हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो.

भारतीय आर्थिक समस्यांची उकल करण्यासाठी त्याचप्रमाणे भारतीय अर्थशास्त्रीय विचार विकसीत करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि अर्थनीती, ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती यासारखे त्यांचे संशोधन फार महत्त्वाचे आहे. शतकानुशतके केवळ अन्याय, अवहेलना यांचेच धनी असणाऱ्या आपल्या दलित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी आमरण कष्ट उपसले. आपले विचार भाषणातून व आपल्या लेखणीतून मांडले. त्यांचे मराठीतील बहुतेक सर्व लेखन ‘मुकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ आणि जनता या नियतकालिकांतून प्रसिध्द झाले आहे. त्यांच्या लेखनांतून मराठी वैचारिक निबंध वाङमयाचे समृद्ध असे रूप दृष्टीस पडते. ते एक महामानव होते त्यांनी पद दलितांना मानवतेचा प्रकाश दाखविला. त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या तत्वांना लोकशाही समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी आवश्यक अशी मुलभूत तत्वे म्हणून गौरविले होते.

भारत देशाच्या विकासाकरिता सर्व प्रकारच्या भेदाभेदाच्या तटबंदी ढासळून टाकण्याची आवश्यकता आहे. ही जाणीव प्रखर करून जातीयता, निर्मुलन, अस्पृश्यता निर्मुलन यासाठी कणखरपणे कार्य त्यांनी केले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा आत्मोद्धाराचा महामंत्र व्यक्ती व्यक्तीच्या अंत:करणाच्या गाभाऱ्यातून धुमसत ठेवला. मुंबई येथील सिडनहॅम महाविद्यालयामध्ये सन 1918 ते 1920 या काळात ते अर्थशास्त्राचे अध्यापक होते.

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक तत्वज्ञान हे काही विशिष्ट घटकांसाठी नव्हते. तर संपूर्ण भारत देशाचे हित त्यांच्या डोळ्यापुढे होते. भारतीय अर्थकारणांवर त्यांचे विद्वत्तापूर्ण लेखन-संशोधन आणि जन आंदोलन हे अर्थशास्त्रीय कार्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी मात्र सांगून जाते.

गरीब दरिद्री शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सन 1928 पासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. समता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांचे महाडचे आंदोलन झाले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदीर प्रवेश ही त्याचे द्योतक आहेत. सन 1928 पासून त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या खोतांची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी. याकरिता प्रयत्न चालू केले. त्यासाठी कोकणांत रत्नागिरी जिह्यातील चिपळूण येथे शेतकरी परिषद भरविली. खोती पद्धतच नष्ट व्हावी म्हणून कायद्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात त्यांनी मांडले होते. विधीमंडळावर मोर्चाही आणला होता. शेतकऱ्यांच्या जातीचा विचार न करता सर्व जातीधर्माच्या शेतकऱ्यासाठी त्यांनी चळवळ उभारलेली होती. कामगारांच्या विकासाकरिता सन 15 ऑगस्ट 1936 मध्ये स्वतंत्र मजुरपक्षाची स्थापना त्यांनी केली होती.
मजुरांच्या कल्याणासाठी डॉ. बाबासाहेबांनी कायदे केले होते. मजुरांच्या हिताच्या दृष्टीकोनातून कामगार कायद्यांमध्ये त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. कामगारांच्या कामाचे तास कमी करण्यासाठी त्यांनी कारखाना कायद्यात सुधारणा केली होती. दामोदर नदी खोरे योजना, हिराकुंड नदी योजना, सोने नदी खोरे योजना यांचे प्रारुपही डॉ. बाबासाहेबांनीच तयार केले होते. संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघे चांगले मित्र होते. जुन्या रुढी परंपरा, अंधकार नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांनी खूप प्रयत्न केले होते.
महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती. कुटूंबनियोजन स्त्रियांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी विधेयकाच्या अनुषंगाने पटवून दिले होते. डॉ.आंबेडकरांनी महिलांच्या कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनात सर्व दृष्टीने त्यांना स्वतंत्र केले होते. स्त्रिदास्य आणि तिची अउन्नती का होते यासंबंधी त्यांनी सविस्तरपणे अभ्यास केला होता. महिलांना सुशिक्षित करणे, त्यांच्यामध्ये स्वत: जागृती निर्माण करणे आणि माणुसकीचे जीवन जगण्यास शिकवणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. महिलांनी कसे राहावे, कसे वागावे आणि काय करावे व काय करू नये या कामावर डॉ. आंबेडकरांनी भर दिला. त्यांना सुशिक्षित महिला पहावयाची होती त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केले. सन 1942 च्या दिनांक 18, 19 व 20 जुलै मध्ये नागपूर येथे अखिल भारतीय दलित महिला परिषदेचे अधिवेशन भरविण्यात आले होते त्यात त्यांनी मार्गदर्शनही केले होते.
ते समाजचिंतक तसेच संस्कृती पुरुष होते. समाजात परिवर्तन त्यांना घडवायचे होते. हे कार्य वृत्तपत्राच्या माध्यमातूनच होईल याची त्यांना खात्री होती. म्हणून ते त्यावेळी वृत्तपत्राकडे वळले. सन 1920 मध्ये मूकनायक, सन 1927 मध्ये बहिष्कृत भारत आणि 1930 मध्ये प्रबुद्ध भारत अशाप्रकारची त्यांनी वृत्तपत्रे काढली. त्या वृत्तपत्रामधून त्यांनी नैष्ठिक, ध्येयवादी आणि निर्भिड पत्रकाराची भूमिका सकारली. अर्थशेती शिक्षण आणि वाङमय या विषयावर त्यांचे लेखन थोडे होते पण ते कायमचे मार्गदर्शक ठरले. त्यांनी इंग्रजी भाषेत विपूल ग्रंथरचना व वृत्तपत्रीय लेखन असले तरी मराठी वृत्तपत्रे स्थापून आणि मराठी भाषेचाच सामान्य माणसांना प्रबोधित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता.

राष्ट्रीय एकात्मतेसंबंधी त्यांचे म्हणणे असे होते की, जोपर्यंत भारतात जातीय व्यवस्थेमुळे असलेली सामाजिक विषमता, आर्थिक विषमता दूर होत नाही तोपर्यंत भारताची एकता आणि अखंडता अबाधित राहणार नाही. डॉ. आंबेडकरांनी सन 1921 ते 1922 असे दोन वर्ष लंडनमध्ये ‘किंग हेन्नी’ या मार्गावर एका घरात राहत होते. या घरात त्यांनी रात्र पहाट अभ्यास केला. तेथेच प्रसंगी ते अर्धपोटीही राहिलेत, हे घर आज एक ऐतिहासिक स्मारक झाले आहे. इंदूमिल येथेही त्यांचे भव्यदिव्य स्मारक होत आहे. बाबासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय दिला. ते फक्त दलितांचे नव्हे तर जगातील सर्व शोषितांचे प्रेरणा स्थान आहेत. त्यांनी देशाला संविधान दिले. स्पृश्याकडून अस्पृश्यावर होत असलेला अन्याय धर्मांतरावाचून दूर होणार नाही. या त्यांच्या दृढ श्रद्धेनुसार त्यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे मोठ्या समारंभाने अनेक अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना वाचनाची अतिशय आवड होती. विद्यार्थीदशेत त्यांना संस्कृतचे अध्ययन करता आले नाही पण पुढे मात्र ते जिद्दीने संस्कृत शिकले होते. ग्रंथालयाशिवाय आपण राहू शकणार नाही असे त्यांना वाटे. त्यांच्याजवळ वैयक्तिक 25 हजार ग्रंथसंग्रह होता.

धुळे येथील वि.का. राजवाडे संशोधनालयाला भेट
दिनांक 18 जून 1938 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या धुळे भेटीत वि.का. राजवाडे संशोधनालयाला भेट दिली. तसा अभिप्रायही तेथील दस्तावेजात त्यांनी नोंदवला आहे. त्यांचा हा अमूल्य ठेवा आजही मंडळाच्या दस्ताऐवजात आपणास पहावयास मिळतो. धुळे येथील वि.का. राजवाडे मंडळ दिनांक 09 जानेवारी 1932 रोजी स्थापन झाले याठिकाणी आजपर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी देऊन येथील अमूल्य ठेवा अभ्यासला आहे. ते मंडळात आले तेव्हा मंडळाचे संस्थापक आदरणीय कै. भास्कर वामन भट यांनी आणि इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले होते.

डॉ. आंबेडकर आपल्या अभिप्रायात लिहितात : ज्यांनी युरोप आणि अमेरिकेतील विविध ग्रंथालयात सहा ते सात वर्ष घालविले मी इ. वि.का. राजवाडे संशोधन मंदिरातील हस्तलिखित आणि चित्रे यांचा संग्रह पाहून खरोखर आनंदी आणि थक्क झालो. युरोपातील ग्रंथालयाशी तुलना करता वस्तुत: खरोखर हे खूप छोटे स्थळ आहे. यासाठी ज्यांनी या संस्थेची स्थापना केली त्यांच्या खांद्यावर याची जबाबदारी येत नाही अशी आशा करु, नवीन सरकार अशा संस्थेकडे पुरेसे लक्ष देईल, की ही मोठे ग्रंथालय होतील यासाठी या संस्थेस मी शुभेच्छा देतो.

लेखक - प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर
धुळे 9404577020

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 4/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate