तोडरमल (१५३५ ?–१० नोव्हेबर १५८९). अकबरचा एक ख्यातनाम खत्री जातीचा वित्तमंत्री. अयोध्या प्रांतातील लाहरपूर गावी टंडन कुळात त्याचा जन्म झाला, असे मानतात. प्रथम त्याने शेरशाहाकडे नोकरी केली. नंतर १५६१ साली अकबरच्या पदरी कारकून म्हणून त्याने नोकरी धरली. रणथंभोर, गुजरात, बिहार येथील लढायांत त्याने सेनानी म्हणून काम केले; पण स्वतःच्या योग्यतेमुळे तो हळूहळू वित्तमंत्र्याच्या पदापर्यंत चढला. त्याने सुरू केलेल्या महसूलपध्दतीमुळे त्याचे नाव प्रसिध्दीस आले. त्याने जमिनीचे सर्वेक्षण करून विभागणी केली व नवीन सारा बांधून दिला. आजच्या महसूलपध्दतीत त्याच्या पध्दतीचा काही अंश आढळतो. त्याने महसूल खात्यात हिंदीएवजी फार्सी भाषा सुरू केली. प्रामाणीक प्रशासक, उत्तम सेनानी व कट्टर स्वधर्माभिमानी म्हणूनही त्याची ख्याती होती. त्याचा तोडरानंद नावाचा धर्मविषयक विश्वकोशरूप ग्रंथ प्रसिध्द आहे. नारायण भट्टाने त्याच्या व लोकांच्या साह्याने मुसलमानांनी तोडलेले काशीच्या विश्वनाथांचे देऊळ पून्हा उभारले, अशी समजूत आहे. खोडवे, अच्युत स्त्रोत: मराठी विश्वकोश