অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पृथ्वीराज चौहान

पृथ्वीराज चौहान

पृथ्वीराज चौहान

(सु. ११६६ ते ११९२). राजपूत इतिहासातील चाहमान घराण्यातील एक प्रसिद्ध राजा. या वंशातील सोमेश्वर यास पृथ्वीराज व हरिराज असे दोन मुलगे होते. पृथ्वीराज ११७७ मध्ये पित्याच्या निधनानंतर गादीवर आला; परंतु तो लहान असल्यामुळे त्याची आई कर्पूरदेवी ही कंदबवास ह्या मंत्र्याच्या साहाय्याने काही काळ राज्याकारभार पाहत होती.

पृथ्वीराजाविषयीची माहिती प्रामुख्याने चंद बरदाईच्या पृथ्वीराज रासो (हिंदी) व त्याचा आश्रित कवी जयानक याच्या पृथ्वीराजविजय (संस्कृत) या काव्यांवरून मिळते. त्यांपैकी पृथ्वीराज रासो हे काव्य नंतरचे असून अतिशयोक्तींनी व दंतकथांनी भरले आहे. तर पृथ्वीराजविजय हे समकालीन असून अधिक विश्वासनीय आहे. परंतु दुर्दैवाने त्याचे एकच हस्तलिखित आणि तेही जीर्णशीर्ण अवस्थेत उपलब्ध झाले आहे. याशिवाय काही कोरीव लेखांवरून व मुसलमान इतिहासकारांच्या ग्रंथांवरून पृथ्वीराजाविषयी काही माहिती मिळते.
पृथ्वीराज ११७८ मध्ये राज्य करू लागला (ह्या तारखेविषयी मतभेद आहेत). त्या वेळी नागार्जुन नावाच्या त्याच्या चुलत भावाने बंड केले, ते त्याने मोडले. त्याच वेळी शिहाबुद्दीन मुहंमदाने (मुइझ्झुद्दीन मुहंमुद घोरी) मुलतानच्या बाजूने गुजरातवर स्वारी केली व पृथ्वीराजाकडे आपले प्रतिनिधी त्याने मांडलिकत्व स्वीकारावे व मदत करावी म्हणून धाडले; परंतु ते प्रतिनिधी अयशस्वी झाले. ह्याच वेळी दुसरा मूलराज ह्या चालुक्य राजाने शिहाबुद्दीन मुंहमदाचा पराभव केला. त्यामुळे पृथ्वीराजावरील संकट आपोआप निभावले. त्यानंतर पृथ्वीराजाने ११८२ मध्ये पूर्वीच्या अलवार संस्थानाजवळच्या तहशीलवर राज्य करणाऱ्या भादानकांवर स्वारी करून त्यांचा उच्छेद केला. त्यानंतर तो दिग्विजयासाठी बाहेर पडला; पण प्रत्यक्ष त्याने कोणते प्रदेश जिंकले, याचे तपशीलवर उल्लेख सापडत नाहीत.

पृथ्वीराजाचे गाहडवाल नृपती जयचंद याच्याशी प्रथमपासूनच वैर होते. जयचंदाने आपली कन्या संयोगिता हिच्या स्वयंवरप्रसंगी पृथ्वीराजाचा पुतळा द्वारपाल म्हणून उभा केला; पण पृथ्वीराजाने अकस्मात येऊन त्या पुतळ्याला हार घालणाऱ्या संयोगितेला घोड्यावर घालून पळवून नेले. या घटनेचा स्पष्ट निर्देश तत्कालीन लेखांत नाही; तथापि जयानकाच्या पृथ्वीराजविजय ग्रंथात तिलोत्तमा अप्सरेने पृथ्वीवर अवतार घेतलेल्या एका राज्यकन्येवर पृथ्वीराजाचे प्रेम बसल्याचे वर्णन आले आहे. ते याच घटनेस उद्देशून असावे. जयानक पृथ्वीराजाच्या दरबारी होता. दुर्दैवाने त्याच्या काव्याचा यापुढील भाग उपलब्ध नाही. यानंतर पृथ्वीराजाने आपल्या दिग्विजयास सुरुवात केली. त्याने प्रथम बुंलेदखंडावर स्वारी केली. परमर्दी या चंदेल्ल राजाचा पराभव केला. पुढे त्याने ११८७ मध्ये गुजरातवर आक्रमण करुन ते उद्ध्वस्त करण्याचा यत्न केला; पण तेथे त्यास फारसे यश आले नाही. त्यामुळे त्याने चालुक्य नृपती दुसरा भीम याच्याशी तह करुन युद्ध थांबविले. या सर्व शेजाऱ्यांच्या युद्धांतून त्यास कोणत्याच प्रकारचा फायदा झाला नाही. पुढे ११९१ मध्ये शिहाबुद्दीन मुहंमद घोरीने पृथ्वीराजाच्या राज्यावर आक्रमण करुन तबरहिंदचा दुर्भेद्य किल्ला हस्तगत केला आणि देशात धुमाकुळ माजविला. तेव्हा पृथ्वीराजाने मोठी फौज घेऊन त्याच्याशी सामना देण्याचे ठरविले. पंजाबात भतिंड्यापासून ४३ किमी. वर तराईन येथे दोन्ही सैन्यांची घनघोर लढाई होऊन मुहंमदाचा पराभव झाला. राजपुतांनी त्याचा पाठलाग न करता त्यास जाऊ दिले. पुढे त्यांनी पंजाबही हस्तगत केला नाही. ह्या पराभवाचे शल्य मुंहमदाच्या मनात सलत राहिले. त्याने पुढील वर्षी ११९२ मध्ये मोठी फौज जमवून पुन्हा पृथ्वीराजावर स्वारी केली. पृथ्वीराजाच्या हाकेला प्रतिसाद देऊन अनेक उत्तर भारतीय राजे त्याच्या मदतीला आले. तराईन येथेच दोन्ही सैन्यांची गाठ पडली. मुंहमदाने आपण आपल्या भावास विचारून माघार घेऊ असा खोटा संदेश पाठवल्यामुळे राजपूत सैन्य गाफील राहिले, तेव्हा या संधीचा फायदा घेऊन अचानक हल्ला करून मुहंमदाने जय मिळविला. पृथ्वीराज पकडला जाऊन पुढे मारला गेला व त्याच बरोबर चाहमान वंशाच्या साम्राज्यास उतरती कळा लागली.

पृथ्वीराजास तीन बायका होत्या. त्यांत संयोगिता ही अत्यंत आवडती होती. त्याचा पुत्र गोविंद पुढे अजमीरच्या गादीवर आला. पृथ्वीराज हा स्वत:एक चांगल्यापैकी सेनापती होता; परंतु त्याच्यात राजकारणी पुरुषाची नीतिकुशलता नव्हती. अनेक वेळा कदंबवास या आपल्या मंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे तो वागत असे आणि तो सल्ला काही प्रसंगी अयोग्य असे. पृथ्वीराजाने सदैव बचावाचे धोरण स्वीकारल्यामुळे त्यास अखेरीस अपयश आले. तबरहिंद ह्या सरहद्दीच्या किल्ल्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे सोडून त्याने अजमीरवरच सर्व डागडुजी केली व मुहंमदाचा पराभव केला असतानासुद्धा त्यास सोडून दिले. ह्या लष्करी चुकांमुळे त्याचा पराभव झाला व त्याचे साम्राज्य अधिक काळ टिकू शकले नाही.


पहा : चाहमान घराणे.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate