घोडा, लांब भाला (सु. ३.५ मी.) व तलवार हा त्यांचा मुख्य संरजाम असे. मोडकी पिस्तुले व बंदुकाही काहीजण वापरीत. दिवसाकाठी ५० ते ६० किमी. पर्यंत ते मजल मारीत. मुक्कामासाठी त्यांच्याजवळ तंबू, राहुट्या, पाले इ. सामान नसे. शत्रूवर पद्धतशीर हल्ला करण्याइतके ते खचितच शूर नव्हते; पण सैन्य जाऊ शकणार नाही, अशा दुर्गम मार्गाने ते जात व अचानक हल्ले करून लूटमार करीत व धनधान्य नेत आणि जे पदार्थ नेता येत नसत, त्यांचा नाश करीत. त्यांच्या टोळ्यांना दुर्रे म्हणत. पेंढाऱ्यांच्या लहान टोळ्या लुटीला सोयीच्या असत. लूट, जाळपोळ, अनन्वित अत्याचार यांबद्दल त्यांची कुप्रसिद्धी होती. कित्येकदा एखाद्या गावास पूर्वसूचना देऊन ते खंड वसूल करीत व खंड न दिल्यास ते गाव जाळून टाकत.
उत्तर पेशवाईत पेंढारी हे मराठी सैन्याचा एक भाग बनू लागले. त्यांत मुसलमान-हिंदू अशा दोन्ही धर्मांचे लोक होते; पण दक्षिणी मुसलमान अधिक होते. त्यांच्या बायका सामान्यत: हिंदू ग्रामदेवतांची उपासना करीत. स्वारीहून परतल्यावर पुष्कळजण शेतीही करीत. चिंगोळी व हुलस्वार हे पेंढारी-पुढारी आपल्या अनुयायांसह पानिपतच्या युद्धात मराठी सैन्यात होते. इंग्रजी अमंलात पदच्युत झालेले संस्थानिक त्यांचे साहाय्य घेत. शिंदे-होळकरांकडील पेंढारी शिंदेशाही व होळकरशाही म्हणून ओळखले जात. टिपू व फ्रेंच यांचा पराभव झाल्यावर त्यांच्या विसर्जित सैन्यातून काही पेंढारी पथके बनली. एकोणिसाव्या शतकात काही संस्थाने खालसा होऊन इंग्रजी राज्य जसजसे दृढ होऊ लागले, तसतसे पेंढाऱ्यांचे आश्रयस्थान हळूहळू नाहीसे झाले. तेव्हा त्यांनी आपली स्वतंत्र पथके बनविली. हेरा व बुरन हे त्यांचे पुढारी होते. दोस्त मुहम्मद व चीतू नावाचे पुढारी पुढे प्रसिद्धीस आले. करीमखान हा पुढारी खानदानी मुसलमान कुटुंबातील होता. तो तरुणपणी प्रथम होळकरांकडे व नंतर शिंद्यांकडे गेला. शिंदे, भोसले व भोपाळचे नबाब यांच्याकडून तो पैसे घेई व लूट मिळवी. त्याच्या ताब्यात अनेक किल्ले होते. पुढे तो शिंद्यांनाही वरचढ झाल्यामुळे त्यांनी चीतूमार्फत त्याचा पराभव घडवून आणला. पुढे तो अमीरखानाकडे गेला. अमीरखान यशवंतराव होळकरांचा उजवा हात होता. वासिल मुहम्मद, नामदारखान, मीरखान इ. पेंढारी पुढारीही प्रसिद्ध होते. चीतूजवळ काही हजार घोडेस्वार, थोडे पायदळ व वीस मोडक्या तोफा होत्या. कादरबक्ष साहिबखान, शेखदुल्ला हे दुय्यम नेते होते. कोकणपासून ओरिसापर्यंतच्या प्रदेशांत त्यांनी धुमाकूळ घातला. मराठ्यांच्या साहचर्यातील पेंढाऱ्यांच्या लुटारूपणामुळे मराठेही लुटारू म्हणून बदनाम झाले. पेंढाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त लॉर्ड फ्रान्सिस रॉडन हेस्टिंग्जने केला (१८१८). त्याने अमीरखान व करीमखान यांना जहागिरी देऊन फोडले व इतर पेंढाऱ्यांचा बीमोड केला. यातूनच पुढे टोंक संस्थान उदयास आले. काही पेंढारी युद्धात मारले गेले, तर काही कायमचे अज्ञातवासात गेले. त्यामुळे उरलेल्यांनी लुटीचा व्यवसाय सोडला आणि ते मध्य प्रदेशात स्थायिक शेती करू लागले.
सासवडकर, प्र. ल.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/24/2020
खंबायत संस्थान : स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थ...
पेंढर ही वनस्पती श्रीलंका, भारत, पाकिस्तान, म्यानम...
इंग्रज-निजाम संबंध: मीर कमरुद्दीन ð निजामुल्मुल्क ...