भारताशी व्यापार करावयाच्या स्पर्धेत उतरलेल्या प्रमुख यूरोपीय सत्तांपैकी फ्रेंच शेवटचे. चौदाव्या शतकात जॉर्देनस, फ्रायर ओडोरिक यांसारख्या धर्मोपदेशकांनी व सतराव्या शतकात ⇨ झां बातीस्त ताव्हेर्न्ये, ⇨ फ्रान्स्वा बर्निअर व थेवेनॉट यांसारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताविषयी बरीच उत्सुकता निर्माण केली होती. भारतात येऊन गेलेल्या या प्रवाशांनी व धर्मोपदेशकांनी, विशेषतः सुरतला आलेल्या काप्युशँ मिशनऱ्यांनी पूर्वेकडे व्यापार करू इच्छिणाऱ्यांचे काम सुलभ केले. फ्रान्सचा राजा चौथा हेन्री (कार. १५८९-१६१०), तेराव्या लूईचा मंत्री ⇨ आर्मो झां रीशल्य याच्या उत्तेजनाने पूर्वेकडे, विशेषतः भारताशी व्यापार करणाऱ्या कंपन्या स्थापनही झाल्या (१६०१, १६०४ व १६४२ इ.); परंतु ⇨ चौदाव्या लूईचा अर्थमंत्री ⇨ झां बातीस्त कॉलबेअर याच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या काँपान्यी देस इंडिजच्या स्थापनेपासून फ्रेंचांचा भारताशी पद्धतशीर व्यापार सुरू झाला (१६६४). बॅबॅर व लाबुलॉय ला गूझ या फ्रान्सच्या राजदूतांनी औरंगजेबाकडून सुरतेला वखार घालण्याची परवानगी मिळविली (१६६६). दोन वर्षांनी वखार सुरू झाली.
शिवाजींनी १६६८ मध्ये राजापूरला वखार घालायची परवानगी दिली. त्यानंतर मच्छलीपटनम्लाही फ्रेंच वखार सुरू झाली (१६६९). नौदलाचे सामर्थ्य एतद्देशीयांना दाखवून व्यापार वाढवावा, अशा उद्देशाने द लाहेच्या नेतृत्वाखाली एक नाविक दल भारतात आले (१६७१). त्याच्या जोरावर फ्रेंचांनी सँ थॉम ही मद्रासजवळील (मैलापूर) व्यापारपेठ गोवळकोंड्याकडून जिंकून घेतली;पण ती त्यांना फार काळ ताब्यात ठेवता आली नाही. तेव्हा फ्रेंच अधिकारी फ्रान्स्वा मारतँ याने दूरदर्शीपणे पाँडीचेरी ठाणे मिळवले(१६७३-७४). त्याच्या कर्तृत्वाने शहर वाढले आणि काही वर्षांनी सुरत मागे पडून ⇨ पाँडिचेरी हीच फ्रेंचांची भारतातील राजधानी झाली.याखेरीज बंगालमध्ये चंद्रनगर, पाटणा, कासीमबझार, डाक्का, जगदिया व ओरीसातील बालेश्वर (बलसोर) येथेही फ्रेंचांनी वखारी घातल्या. सुरु वातीच्या काळात डच-इंग्रजांच्या कारवाया आणि भारतीय राजेरजवाड्यांच्या लढाया यांमुळे फ्रेंच वसाहतींना बराच उपद्रव झाला. तरीही फ्रान्स्वा काराँ (कार. १६६८ - १६७३), फ्रान्स्वा बाराँ व मारतँ या कर्तबगार अधिकाऱ्यांनी फ्रेंचांचे व्यापारी व राजकीय महत्त्वही वाढीला लावले. मारतँने मराठ्यांकडून पाँडिचेरीच्या तटबं दीची व करवसुलीची राजपत्रे मिळवली. लहान प्रमाणावर फौजाही ठेवायला सुरुवात केली. तरीही प्रथमतः व्यापाराचे संरक्षण व त्यापासून होणारे आर्थिक लाभ फ्रेंच धोरणाचे प्रमुख सूत्र होते.
कॉलबेअरच्या मृत्यूनंतर (१६८३) अंतर्गत व्यापाराला संरक्षण म्हणून भारतीय कापडाच्या आयातीला फ्रान्समध्ये घातलेली बंदी आणि जबसदस्त सरकारी नियंत्रण यांमुळे हा व्यापार कंपनीला फारसा फलदायी झाला नाही. झां लॉने कंपनीच्या अर्थरचनेची १७१९मध्ये पुनर्घटना केली, तरीही काही वर्षातच कंपनीचे दिवाळे वाजण्याची वेळ आली. त्यामुळे १७२३ मध्ये फ्रेंच सरकारने काँपान्यी देस.... या नावाखाली तिची पुनर्रचना केली. त्यात सरकारी नियंत्रणे आणखी कडक झाली, कंपनीच्या संचालकांना अधिकार उरले नाहीत;तथापि १७२५-४० या काळात कंपनीने बराच फायदा मिळविला. मलबार किनाऱ्यावर माहे (१७२१) व मद्रास किनाऱ्यावर यानाम(१७२३) येथे वससाहती प्रस्थापित झाल्या.
बन्वा द्यूमा पाँडिचेरीचा गव्हर्नर झाला. त्याच्या कारकीर्दीत (१७३५-४२) फ्रेंच सत्तेची भरभराट झाली. त्याने पाँडीचेरीला नाणी पाडण्याचा मिळविलेला परवाना फ्रेंच व्यापाराला किफायतशीर ठरला. अर्काटचा नवाब दोस्त अलीच्या मृत्यूनंतर माजलेल्या वारसांच्या भांडणात त्याने दोस्त अलीचे कुटुंब, सफदर अली, चंद्रासाहेब या सर्वांना पाँडिचेरीत आश्रयदिला आणि चंदासाहेबांच्या मदतीने तंजावर राज्यातील कारिकलचा प्रदेश मिळविला (१७३९). पाँडिचेरीवर चालून आलेल्या रघुजीभोसल्याला वश करून घेतले. याबाबत रघुजीने केलेला पराक्रम फ्रेंचांनी दिलेल्या उंची दारूने निष्फळ ठरविला, अशा अर्थाचे उद्गारपुढे छत्रपती शाहूने काढले.
भारतीय फ्रेंच वसाहतीचा गव्हर्नर जनरल म्हणून १७४२ मध्ये ⇨ जोझेफ फ्रान्स्वा द्यूप्लेक्स आला.त्याने फ्रेंच धोरणाला नवी दिशा दिली. भारतात यूरोपीय वसाहतवाद आणण्याचे श्रेय त्याचे. त्यासाठी बन्वा द्यूमाच्या मनसबदारीचाद्यूप्लेक्सने गाजावाजा केला आणि कर्नाटकच्या गादीसाठी चाललेल्या कलहात प्रामुख्याने भाग घेऊन फ्रेंचांचे महत्त्व वाढवायलासुरुवात केली. मद्रासच्या इंग्रजांना हे सहन होणे शक्य नव्हते. त्यांनी अर्काटच्या गादीसाठी सुरुवातीस अन्वरुद्दीन व तो मारलागेल्यावर मुहम्मद अली यांचा पक्ष घेतला. द्यूप्लेक्सने चंदासाहेबाला उचलून धरले.
यूरोपात ऑस्ट्रियाच्या वारसावरून इंग्रज-फ्रेंचयुद्ध पेटले (१७४४) आणि भारतातील त्यांच्या प्रतिनिधींनी दक्षिण भारताची रणभूमी बनवली. ला बरदॉनेने मद्रास जिंकले आणिअतिशय प्रतिकूल परिस्थितीतही द्यूप्लेक्सने ते आपल्या ताब्यात ठेवले. या युद्धात फ्रेंच लष्करी सामर्थ्याचा प्रत्यय आला. तसेचयूरोपीय शिस्तीने लढणाऱ्या फौजांचे महत्त्व सिद्ध झाले. यूरोपात एक्स-ला-शपेलचा तह झाला (१७४८); तरी भारतातील इंग्रज-फ्रेंचांनीदक्षिण भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन अप्रत्यक्ष युद्ध चालूच ठेवले.
१७४८ मध्ये हैदराबादचा निजामुल्मुल्कमरण पावला. त्याच्या सुभेदारीसाठी सुरू झालेल्या वारसांच्या भांडणात इंग्रजांनी नासिर जंगला तर द्यूप्लेक्सने प्रथम मुजफर जंगआणि त्याचा खून झाल्यावर सलाबत जंग यांना पाठिंबा दिला. काँत द रोजर बुसी या पराक्रमी व तितक्याच मुत्सद्देगिरीने वागणाऱ्यावीराने हैदराबादेत लहानशा फौजेच्या जोरावर फ्रेंचांचे वर्चस्व स्थापन केले. मुस्तफानगर, एल्लोरे, चिकॅकोल आणि राजमहेंद्री या चारप्रांतांचा महसूलहक्क फ्रेंचांना या वेळी मिळाला. हैदराबाद प्रकरणात फ्रेंचांनी मराठ्यांचे शत्रुत्व ओढावून घेतले, तरीही बुसीचीहैदराबादेतील आठ वर्षांची कामगिरी फ्रेंचाच्या इतिहासात मोलाची ठरली ⇨ रॉबर्ट क्लाईव्ह आदींच्या पराक्रमाने द्यूप्लेक्सला मात्रअर्काटमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही.
फ्रेंच सरकारलाही त्याचे या युद्धावर पैसा खर्चणे पसंत पडले नाही. १७६४ मध्येद्यूप्लेक्सच्या जागी शार्ल रॉबेअर गोदहूला तहाच्या सुचना देऊन फ्रेंच सरकारने पाठविले. दोनच वर्षांत इंग्लंड-फ्रान्समध्ये कॅनडाच्याप्रश्नावरून पुन्हा युद्ध सुरू झाले (सप्तवार्षिक युद्ध १७५६ - ६३) आणि भारतातील इंग्रज-फ्रेंचांच्या पुन्हा लढाया सुरू झाल्या. फ्रेंचसरकारने काँत द लाली याला सर्वाधिकार देऊन भारतात सैन्य पाठविले; परंतु शूर, उद्दाम, चिडखोर लालीला इतर फ्रेंच अधिकाऱ्यांचेसहकार्य लाभले नाही. नाविक बळ व पैसाही अपुरा पडला. वाँदीवॉशच्या लढाईत लाली हरला व बुसीला कैद झाली. या युद्धातपाँडिचेरीसह सर्व फ्रेंच वसाहती इंग्रजांनी जिंकून घेतल्या. येथून फ्रेंच सत्तेच्या ऱ्हासाला प्रारंभ झाला.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/2/2020
अंजदीव : कर्नाटक राज्यातील कारवार बंदराच्या आठ किम...