অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बरीदशाही

बरीदशाही

बरीदशाही

द.भारतात बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या पाच शाह्यांपैकी कर्नाटक राज्यातील बीदर येथे स्थापन झालेली एक शाही. बरीदशाहीचा संस्थापक कासिम बरीद ऊर्फ बरीद उल्-मलिक (कार. १४९०-१५०४) हा होय. हा शिहाबुद्दीन महमूदशाह बहमनी (कार. १४८२-१५१८) याच्या कारकीर्दीत मुख्य वजीर होता. त्या वेळी निजाम-उल्-मुल्क, कासिम बरीद व इमाद-उल्-मुल्क यांनी सर्व सत्ता आपल्याकडे घेतली. निजाम-उल्-मुल्क आणि कासिम बरीद यांच्या जुलमी कारभाराला कंटाळून इमाद-उल्-मुल्क हा वऱ्हाडात आपल्या जहागिरीकडे निघून गेला. निजाम-उल्-मुल्क हा तेलंगणात स्वारीवर गेला असताना कासिम बरीदने त्याचा खून घडवून आणला आणि सुलतानाकडू वजीराच्या जागेवर आपली नेमणूक करून घेतली. अहमदनगर, विजापूर व वऱ्हाड येथील प्रांताधिकाऱ्यांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले; तथापि तो एकनिष्ठ राहिला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अमीर अली बरीद (कार. १५०४-४२) हा मुख्य वजीर झाला. त्यानेही सत्तेचा मनमुराद उपभोग घेतला. महमूदशाहच्या मृत्यूनंतर (१५१८) एकामागून एक असे चार नामधारी सुलतान झाले. शेवटचा सुलतान कलिमुल्ला याने बाबर याच्या मदतीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला; अखेर हताश होऊन तो प्रथम विजापूरला व पूढे अहमदनगरला आश्रयाला गेला. त्यामुळे अमीर अली बरीद बीदरचा सर्व सत्ताधारी झाला. त्याचा सत्ताग्रहणाचा काळ म्हणजेच एका नव्या राजवटीची स्थापना असे मानणे क्रमप्राप्त आहे. त्याने आपल्या बापाचे धोरणच पुढे चालू ठेवले. मलिक अहमद निजामशाह आणि युसूफ आदिलशाह यांच्यासारखे कर्तृत्व त्याच्यात नव्हते. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या शाह्यांत कलह लावून त्याने आपली सत्ता टिकविण्याचा प्रयत्न केला आणि आपली पकड घट्ट केली. युसूफ आदिलशाहने त्याचे वर्णन रोबाह-इ-दख्खन (दक्षिणेचा कोल्हा) असे करून इतरांना सावध राहण्याची सूचना दिली होती. बहमनी घराण्यातला शेवटचा नामधारी सुलतान मरण पावल्यानंतर अमीर अलीने आपले स्वातंत्र्य जाहीर करून सुलतान म्हणून आपल्या नावे द्वाही फिरविली. त्यानंतर वऱ्हाड आणि खानदेशच्या सुलतानांनी गुजरातच्या बहादूरशाहला अहमदनगर, विजापूर, आणि बीदर या त्रयीविरूध्द मदतीसाठी बोलाविले.या त्रयीचा गुजरातच्या बहादूरशाहपुढे निभाव लागला नाही (१५२७); परंतु युद्ध चालू असताना विजापूरच्या फौजात फंदफितुरी करण्याचा अमीर अली बरीदने प्रयत्न केला; तेव्हा इस्माइल आदिलशाहने अमीर अली बरीदविरुद्ध फौज पाठविली. त्या वेळी त्याने बीदरच्या किल्ल्यची व्यवस्था आपल्या मोठ्या मुलाच्या हाती देऊन आपण उदगीरच्या किल्ल्याचा आश्रय घेतला; पण इस्माइल आदिलशाहने खुद्द अमीर अली बरीद यालाच कैद केले (१५२९). बीदर शहर आदिलशाही फौजांच्या ताब्यात दिल्यानंतर अमीर अली बरीदची सुटका झाली व त्याची नेमणूक विजापूरचा एक उमराव म्हणून करण्यात आली. कल्याणी व कंधार हे दोन किल्ले विजापूरला देण्याचे ठरले. निजामशाहने १५४० मध्ये इब्राहिम आदिलशाहविरूद्ध काढलेल्या मोहिमेत अमीर अली बरीदने भाग घेतला; परंतु आदिलशाही फौजांपुढे बर्हान आणि अमीर अली यांना माघार घेऊन तह करावा लागला. यानंतर अमीर अली दौलताबाद येथे मरण पावला (१५४२) व त्याचे अधिकार त्याचा मुलगा पहिला अली बरीदशाह (कार. १५४२-१५८०) याच्याकडे आले. हा कलाभिज्ञ सुलतान होता आणि याने प्रथमच शाह ही उपाथी लावली. १५४३ मध्ये इब्राहिम कुत्बशाह गादीवर आल्यानंतर त्याने आणि बुर्हान निजामशाहीने विजयानगरचा राजा सदाशिवराय याजबरोबर संगनमत करून विजापूरवर हल्ला केला. त्यात पहीला अली बरीदशाह सामील झाला; पण इब्राहिम आदिलशाह यांना पराभव पतकाराना लागला (१५४६) बुर्हानने जेव्हा पुन्हा विजापूरविरुद्ध एकजूट करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यात सामील होण्यास पहिल्या अली बरीदने नकार दिला. तेव्हा बुर्हानने बीदरवर हल्ला करून औसा, उदगीर व कंधार हे किल्ले जिंकून घेतले (१५४६-४७). १५४७ मध्ये दक्षिणेच्या सुलतानांनी विजयानगरच्या वाढत्या सामर्थ्याला तोंड देण्यासाठी जी एकजूच केली, त्या एकजुटीत पहिला अली बरीदशाह हा ओढला गेला.

दक्षिणेतील सुलतानांनी ⇨तालिकोटच्या लढाईत विजयानगरचा पूर्ण पाडाव केला (१५६५); पण दक्षिणेच्या सुलतानांची ही एकजूट या विजयानंतर लगेच भंगली. विजापूर आणि अहमदनगर यांच्यात संघर्ष उडणार असे वाटू लागले; परंतु मुर्तजा निजामशाह याने वऱ्हाड आणि बीदर जिंकून घ्यावे आणि अली आदिलशाहने कर्नाटकात या दोन्ही राज्यांइतकाच मुलूख जिंकून घ्यावा, यांवर हा संघर्ष मिटला. वरील समझोत्यानुसार मुर्तजा निजामशाहने जेव्हा वऱ्हाडवर स्वारी केली (१५७०), तेव्हा वऱ्हाडचा राज्यप्रतिनिधी तुफालखान याने अली बरीदशाहकडे मदतीची याचना केली. अली बरीदने मदत करण्यास नकार दिला. वऱ्हाडनंतर पाळी बीदरची होती. १५७४ मध्ये वऱ्हाड जिंकून घेतल्यानंतर मुर्तजा निजामशाहने इब्राहिम कुत्बशाहबरोबर संगनमत करून बीदरवर चाल केली. अली बरीदने अली आदिलशाहकडे मदत मागितली. तेव्हा मुर्तजाने बीदरला घातलेला वेढा त्याला उठवावा लागला. अली बरीदच्या मृत्यूनंतर त्याचे अधिकार इब्राहिम बरीदशाह (कार. १५८०-८६) याजकडे आले. यानंतरच्या जवळजवळ २० वर्षाच्या कालखंडात दक्षिणेतील घडामोडींशी बीदरचा काहीही संबंध आला नाही. इब्राहिम बरीदशाहनंतर त्याच्या जागी दुसरा कासिम बरीदशाह (कार. १५८६-८९) हा आला. याची राजवट जेमतेम तीन वर्षे टिकली. त्याच्या कारकीर्दीत विशेष कोणतीच घटना घडली नाही. त्याच्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा गादीवर आला; पण दुसरा अमीर बरीद (कार. १५८९-१६०१) नावाच्या एका नातेवाईकाने गादी बळकाविली (१५८९). त्या वेळची काही तांब्याची नाणी उपलब्ध झाली आहेत. नंतर अमीर बरीदशाह हा गादीवर आला. याच वंशातील मीर्झा अली बरीद (कार. १६०१-०९) या नातेवाईकाने त्याला पुढे बाजूला सारले आणि गादी बळकाविली व अमीर बरीदला भागानगरला (हैदराबाद) पळवून लावले. या घटनेबाबत इतिहासकारांत मतभेद होते; पण अलीकडे सापडलेल्या मराठी व फार्सी कोरीव लेखांत या शाहचे नाव आढळले. तो १६०९ मध्ये मरण पावला. त्याच्या जागी दुसरा बरीदशाह आला. हा या वंशातील शेवटचा नामधारी सुलतान होय. पुढे हे राज्य दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहने जिंकून आपल्या अंमलाखाली आणले (१६१९). या कालखंडात दक्षिणेच्या राजकारणात फार मोठी उलथापालथ झालेली होती. मोगलांनी खानदेश व अहमदनगर यांचा पाडाव केला होता आणि त्यांची नजर गोवळकोंडा, विजापूर व बीदर येथील उर्वरित शाह्यांकडे वळली होती. अर्थात या शाह्यांना त्यांच्यावर आलेल्या संकटाची फार उशिरा जाणीव झाली.

इ. स. १५०० ते १६२० दरम्यानच्या सु. सव्वाशे वर्षांच्या काळात बरीदशाही सुलतानांनी राज्यविस्ताराबरोबरच वास्तुकलादी क्षेत्रांत मोलाची भर घातली. त्यांचे काही कोरीव लेख व नाणी अवशिष्ट असून त्यांतूनही त्यांची कलाभिज्ञता दिसून येते. इंडो-सॅरसॅनिक वास्तुशैलीस या काळात उत्तेजन मिळाले. एकापेक्षा एक सरस व भव्य अशा सुलेखनकलेने सुशोभित केलेल्या मशिदी आणि दर्गे बांधण्यात आले. या शिवाय बीदर व कल्याणी (बसव-कल्याण) या ठिकाणी दोन किल्ले बांधण्यात आले आणि महमूद गावान या कलाप्रेमी व विद्वान मंत्र्याने मदरसा सुरू करून ज्ञानार्जनाचे महत् कार्य केले. महमूदशाहने बांधलेल्या अनेक वास्तू अवशिष्ट आहेत. त्यांतील बीदरच्या किल्ल्याच्या गुबंद दरवाजाजवळील शाह बुरूज उल्लेखनीय आहे. महमूदशाहने किल्ल्याला शर्झ नावाचा दुसरा दरवाजा बांधला व त्यावर वाघाच्या दोन भव्य व सुरेख प्रतिमा कोरविल्या . दरवाजाच्या दर्शनीभागावर फरशांचे उत्कृष्ठ कलाकाम करून घेतले आणि त्यावर एख लेख कोरविला. आष्टूर येथील महमूदशाहचे थडगे भव्य आहे. अली बरीद हा कलाभिज्ञ सुलतान होता. त्याला काव्य व सुलेखनकला यांची आवड होती. त्याचे बीदर येथील थडगे आणि त्याने बांधलेला रंगीन महाल या वास्तू प्रेक्षणीय आहेत.

 

पहा : बहमनी सत्ता.

संदर्भ : 1. Government of Karnataka, Bidar District Gazetteer, Bangalore, 1977.

2. Majumdar, R.C. Ed. The Delhi Sultanate, Bombay 1971.

3. Yazadani, Gulam, Bidar : Its History and Monuments, Oxford, 1947.

कुंटे, भ.ग.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate