অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शहाजीराजे भोसले

शहाजीराजे भोसले

शहाजीराजे भोसले

(१६ मार्च १५९९ ? – २३ जानेवारी १६६४). छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९९) ग्राह्य धरतात.

भोसले घराण्यातील मालोजी व उमाबाई या दांपत्यापोटी शहाजींचा जन्म झाला. शरीफजी हा शहाजींचा धाकटा भाऊ. मालोजी हे निजामशाहीच्या नोकरीतील एक सरदार. भोसल्यांकडे हिंगणी, देऊळगाव, बेरडी इ. गावांची पाटीलकी होती. मालोजी १६१०-११ दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका लढाईत मारले गेले. तेव्हा निजामशाहीने मालोजींचा ‘मोकासा’ त्यांच्या मुलांना दिला. मालोजींचा भाऊ विठोजी यांनी मुलांचे संगोपन केले.

पुढे विठोजींच्या मृत्यूनंतर (१६२३) शहाजी स्वतःच मोकाशाचा कारभार पाहू लागले. शहाजींचा पहिला विवाह निजामशाहीतील एक सरदार व सिंदखेडचे पिढीजात देशमुख लखूजी जाधव यांच्या जिजाबाई या कन्येशी झाला (१६०९). त्यांना सहा अपत्ये झाली.त्यांपैकी संभाजी व शिवाजी वगळता अन्य अपत्ये अल्पायुषी ठरली.

संभाजी कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत (१६५४) मरण पावले. तुकाबाई आणि नरसाबाई या शहाजींच्या आणखी दोन बायका. शहाजींचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे पुढे तंजावरच्या गादीवर आले.

हाजींनी निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याला सहकार्य करून आदिलशाहीविरुद्धच्या भातवडीच्या लढाईत पराक्रम केला (१६२४); मात्र त्यात त्यांचे भाऊ शरीफजी धारातीर्थी पडले. त्यानंतर मलिक अंबर आणि शहाजी यांच्या आपापसांतील मतभेदांमुळे शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीस मिळाले; परंतु १६२७ मध्ये इब्राहिम आदिलशाहच्या मृत्यूनंतर पुन्हा ते निजामशाहीत आले (१६२८).

निजामशाहीत सासरे लखूजी यांचा खून झाल्यानंतर शहाजी काही दिवस चाकण-पुणे परगण्यांत जाऊन राहिले आणि नंतर मोगलांकडे गेले. मोगलांनी त्यांना पाच हजारी मनसबदार नेमले; परंतु शाहजहान बादशाहाचा निजामशाही बुडविण्याचा हेतू लक्षात येताच शहाजींनी मोगलांना सोडून निजामशाही कुळातील एका मुलास गादीवर बसवून पेणगिरीस निजामशाहीची स्वतंत्र सत्ता स्थापन केली (१६३२). त्यासाठी त्यांनी विजापूरकरांशी मैत्रीचा तह केला.

शहाजींनी दक्षिणेत नीरेपासून उत्तरेत चांदवडच्या डोंगरापर्यंतच प्रदेश आणि पूर्वेस अहमदनगरपासून पश्चिमेस उत्तर कोकणापर्यंतचा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. निजामशाही टिकविण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले; तथापि शाहजहानने अखेर निजामशाही खालसा केली (१६३६). त्यानंतर शहाजींनी आदिलशाहीत नोकरी धरली (१६३६). आदिलशहाने त्यांना ‘सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्या दिल्या. आदिलशहाने त्यांच्याकडे असलेले पुणे-सुपे ही जहागीर तशीच ठेवली. त्यानंतर शहाजींनी प्रदेश विस्ताराचे धोरण अंगीकारून आपले वर्चस्व वाढविले. तेव्हा मुहंमद आदिलशहाने कर्नाटकात जहागीर देऊन तिकडे त्यांची रवानगी केली (१६३७).

र्नाटकात पेनुकोंडे, बसवपटनम, होस्पेट, बिदनूर, श्रीरंगपटण वगैरे ठिकाणांच्या पाळेगारांविरुद्ध शहाजींनी मोहिमा आखून तो प्रदेश आदिलशाही अमलाखाली आणला (१६३७४८). या कामगिरीबद्दल त्यांना बंगलोरची जहागीर देण्यात आली. ते दुसरी पत्नी तुकाबाईंसह बंगलोरला राहू लागले. `महाराज फर्जंद शहाजी भोसले’ या किताबाने आदिलशहाने त्यांचा सन्मान केला. शिवाजींच्या स्वराज्यविषयक हालचालींमुळे आदिलशहा, मोगल व शहाजी ह्यांत वितुष्ट आले. शहाजी व शिवाजी यांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजी जिंजीच्या वेढ्यात गुंतले असता त्यांना २६ जुलै १६४८ रोजी अचानक कैद करण्यात आले.

शिवाजी महाराजांनी शाहजहानचा मुलगा मुराद याच्या मार्फत आदिलशहावर दबाव आणून शहाजींची सुटका केली (१६ मे १६४९). ह्या बदल्यात संभाजींना बंगलोर व शिवाजींना कोंडाणा (सिंहगड) आदिलशहाला द्यावे लागले. सुटकेनंतर शहाजींकडे पूर्ववत कर्नाटकचा कारभार सोपविण्यात आला. त्यांनी नलेंगापट्टम, पाटॉनोव्हो, तंजावर, वेल्लोर वगैरे गावे हस्तगत करून जणू स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. कर्नाटकात कोलार, बंगलोर, अर्काट, बाळापूर व शिरे हे भाग त्यांना आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाले. त्यांनी सर्व हिंदू पाळेगारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला.

मुद्‌गलचा पाळेगार जंजाप्पा नाईक व तंजावरचा जमीनदार पंचीरागू यांचे वैमनस्य होते. जंजाप्पाने शहाजींच्या मदतीने पंचीरागूचा पराभव करून त्याचा प्रदेश काबीज केला; पण पुढे दोघांत वितुष्ट आले. तेव्हा शहाजींनी जंजाप्पास बाजूला सारून तंजावर व मुद्‌गल येथील कारभार व्यंकोजींच्या स्वाधीन केला. अनेक विद्वान, कवी इ. शहाजींच्या आश्रयास होते. त्यांच्या अंगी पराक्रम, मुत्सद्दीपणा, धाडस आणि हिंमत होती; पण त्यांचे सर्व आयुष्य मुसलमानी सत्ताधाऱ्यांच्या सेवेत गेले.

शिमोगा जिल्ह्यातील होदिगेरे येथे शिकारीस गेले असता घोड्यावरून पडून ते मरण पावले. व्यंकोजींनी होदिगेरे येथे त्यांच्या स्मृत्यर्थ वृंदावन बांधले. शिखर शिंगणापूर येथे त्यांच्या स्मृत्यर्थ एक प्रतीकात्मक वृंदावन आहे.

 

संदर्भ : १. बेंद्रे, वा. सी. मालोजी राजे आणि शाहाजी महाराज, पुणे, १९६२.

२. मेहेंदळे, ग. भा. श्री राजा शिवछत्रपती, खंड १, भाग १, पुणे, १९९६.

देशपांडे, सु. र.; शिरगांवकर, वर्षा

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate