(१५३३-१५९९). महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. जन्म पैठण येथे. संत भानुदासांचे पणतू. वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे रुक्मिणी. त्यांचे वडील मोठे पंडित असावेत, असे एक मत आहे. बालपणीच आईवडील निवर्तल्यामुळे एकनाथांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पतकरले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांची तीर्थयात्रेत घालविली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते.
तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. गिरिजा हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांना हरिपंडित नावाचा एक मुलगा आणि गोदागंगा या नावाच्या दोन मुली होत्या. कर्नाटकातील डंबळ येथील बाळकृष्णवंत चंद्रकेत ह्यांना दुसरी मुलगी दिली होती. प्रसिद्ध मराठी पंडित कवी मुक्तेश्वर हा गोदेचा मुलगा. कवी शिवराम पूर्णानंद हा नाथांचा मुलीकडून पणतू. हरिपंडित हा कर्मठ व सनातनी असल्याने काही काळ एकनाथांचा विरोधक होता. आळंदीस जाऊन नाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला (१५८३) आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली (१५८४).
पैठण येथेच फाल्गुन वद्य षष्ठीस त्यांनी देह ठेवला. अस्पृश्याच्या चुकलेल्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचवणे, श्राद्धाला ब्राह्मण येईनात तेव्हा शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घालणे व गाढवाला गंगोदक पाजणे यासारख्या एकनाथांच्या चरित्रातील आख्यायिकावरून अद्वैत वेदान्ताचा व्यापक अर्थ त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बाणलेला होताहे दिसून येते. एकनाथ विठा रेणुकानंदन, जनी जनार्दन रामा जमार्दन आणि दासोपंत ह्या पाच समकालीन सत्पुरुषांना नाथपंचक म्हटले जाते. यांपैकी दासोपंतांची बरीच आणि जनी जनार्दनांची काही मराठी रचना उपलब्ध आहे.
चतुःश्लोकी भागवत (सु. १५५५) ही नाथांची पहिली रचना. भागवत पुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ श्लोकांवरील १०३६ ओव्यांचे हे भाष्य आहे. सृष्टीच्या आद्यंती असलेल्या नारायणाचे व भागवत धर्माचे निरूपण त्यात आढळते. प्राकृत भाष्याग्रंथांना पंडितवर्गाकडून होणार्या विरोधाचे पडसाद येथे उमटले आहेत.
वरील भाष्यानंतर एकनाथांनी काही आध्यात्मिक स्वरूपाची स्फुट प्रकरणे लिहिली. शंकराचार्याच्या हस्तामलक या चौदा श्लोकांच्या स्तोत्रावर ६७४ ओव्यांची रसाळ टीका त्याच नावाने त्यांनी लिहिली. शुकाष्टक हे प्रसिद्ध संस्कृत अष्टकावरील ४४७ ओव्यांचे विवरण आहे. स्वात्मसुखात ५१० ओव्या असून गुरुस्तवन, अद्वैतभक्ती व भक्तिमार्गातील परमार्थ हे विषय त्यात आले आहेत. आनंदलहरीतील १५o ओव्यांत आत्मस्थितीतील आनंदाचे व गुरुभक्तांचे वर्णन आहे. चिरंजीवपदात साधकाला उपदेश केलेला आहे.
रुक्मिणी स्वयंवर (१५७१) हे भागवत संप्रदायातील पहिले व परंपराप्रवर्तक आख्यानक काव्य होय. भागवताच्या दशम स्कंधातील अध्याय ५२ ते ५४ मधील १४४ श्लोकांच्या व हरिवंशातील विष्णुपर्वाच्या अध्याय ५९-६o च्या आधारे एकनाथांनी त्याची रचनी केली. त्याची ओवीसंख्या १,७१२ आहे. श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह म्हणजे जिवाशिवांचे मीलन, अशा रूपकाभोवती हे संपूर्ण काव्य रचलेले आहे. या काव्याचा प्रभाव पुढील अनेक कवींवर पडलेला दिसतो. कृष्णदयार्णव ह्या कवीने तर आपल्या हरिवरदा या रचनेत प्रस्तुत काव्य संपूर्णपणे अंतर्भूत केले.एकनाथी भागवत ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना होय. भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही विस्तृत टीका आहे.
भावार्थ रामायण ही त्यांची अखेरची रचना. अध्यात्म रामायण, क्रौंच रामायण, आनंद रामायण, योगवासिष्ठ इ. ग्रंथांच्या आधारे ही रचना केलेली आहे. 'बाल', 'अयोध्या', 'अरण्य', 'किष्किंधा', 'सुंदर' ही पहिली पाच कांडे आणि सहाव्या युद्ध कांडाचे ४४ अध्याय लिहून झाल्यानंतर नाथांनी देह ठेविला. त्यापुढील भाग गावबा नावाच्या त्यांच्या शिष्याने पूर्ण केला, असे परंपरा सांगते. याशिवाय मुक्तेश्वर, कोनेरीसुतशेष व एक अनाम कनी यांनी 'एका-जनार्दन' या नानानेच 'उत्तर'कांड लिहून भावार्थ रामायणाच्या पूर्तीचे प्रयत्न केले आहेत. भावार्थ रामायणाचे स्वरूप रामचरित्रावरील स्वतंत्र पौराणिक महाकाव्यासारखे आहे. एकनाथांच्या आवडत्य आध्यात्मिक रूपकांबरोबरच या काव्यात सामाजिक रूपकात्मताही आढळते. तत्कालीन यावनी सत्तेचा मराठी समाजावर झालेला अंतर्बाह्य अनिष्ट परिणाम त्यातून सूचित केला आहे.
या रचनांखेरीज बहुजनसमाजासाठी एकनाथांनी केलेली कथात्मक रचनाही वेधक आहे. सुबोध शैलीने लिहिलेल्या तुळशीमाहात्म्य व सीतामंदोदरीची एकात्मता या पुराणकथा, सांसारिकांच्या मनोवृत्तीचा आल्हादक व विनोदरम्य आविष्कार करणार्या हळदुली व कृष्णदान ह्या श्रीकृष्णकथा, कृपण माणसाचे हास्यजनक स्वभावचित्र रेखाटणारे कदर्यु-आख्यान, ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यू आणि सुदामा यांच्या नाट्यपूर्ण लघुचरित्रकथा आणि जानेश्वरादी संतांच्या संक्षिप्त जीवनकथा ही अशा रचनेची उदाहरणे होत.
एकनाथांनी गेय पदरचनाही केली आहे. ही पदे मुख्यतः श्रीकृष्ण-चरित्रपर आहेत. त्यांत सुंदर शब्दचित्रे, भावपूर्णता, कल्पकता, ध्रुव-पदांची वेधकता, मार्मिक तत्त्वसूचकता इ. वैशिष्ट्ये आढळतात. 'वारियाने कुंडल हाले', 'असा कसा देवाचा देव बाई ठकडा' इ. त्यांची पदे प्रसिद्ध आहेत.
प्राचीन मराठीतील भारूडरचनेत नवचैतन्य, विविधता व विपुलता निर्माण करण्याचे कार्य एकनाथांनीच केले. १२५ विषयांवर सु. तीनशे भारुड त्यांनी रचली. पुरातन काळापासून मराठी बहुजन-वर्गाचे आपल्या मनोरंजक व नाट्यपूर्ण गीतरचनेने रंजन करणार्या गोंधळी, भराडी, वासुदेव, डोंबारी, बाळसंतोष वगैरे जमातींचा एक वर्ग होता. एकनाथांनी त्यांच्या अलिखित लोककाव्याचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या कवित्वाची व्यापकता व लौकिकता यावरून स्पष्ट होते. आदिमाया, विंचू, जागल्या, कुडबुड्या जोशी या विषयांवरील त्यांची भारुडे प्रसिद्ध आहेत.
एकनाथांची बरीचशी रचना साडेचार चरणी ओवी छंदात आहे. त्यांनी स्फुट अभंगरचनाही केली आहे. गुरुभक्ती, पारमार्थिक अनुभव व सामाजिक स्थिती हे त्यांच्या अभंगांचे मुख्य विषय आहेत. त्यांत नामदेव-तुकारामांसारखा साधकदशेतील भावोत्कट अंतःकलह आढळतात नाही. रचनादृष्टीनेही एकनाथी अभंग सैल आहेत.
एकनाथांचे वाङ्मयीन, सांप्रदायिक व सांस्कृतिक कर्तृत्व त्यांच्या समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचेच निदर्शक आहे. प्रपंच व परमार्थ तसेच संतत्व आणि समाजोद्धार यांची यशस्वी सांगड आपल्या जीवनात त्यांनी घातली. जन्मजात स्वभावाबरोबरच तत्कालीन परिस्थितीनेही एकनाथांचे व्यक्तिमत्त्व घडविले.
अडीच शतकांच्या ज्ञानेश्वरोत्तर कालखंडात संतसाहित्याची परंपरा खंडित व विस्कळित झाली होती. एकनाथांनी त्या पूर्वपरंपरेचे भान ठेवून वाङ्मयनिर्मिती केली; म्हणूनच ती परंपरा अखंड, एकात्म व प्रगमनशील राखण्याचे कार्य ते यशस्वीपणे करू शकले. ज्ञानेश्वरीच्याच परंपरेतील पण अधिक सुबोध भाष्यग्रंथ म्हणजे त्यांच भागवत होय.भागवतामुळे वामनपंडित, शिवकल्याण, रमावल्लभदास यांसारख्या कवींना भाष्यरचनेती स्थिर बैठक लाभली. त्यांच्या भावार्थ रामायणा-मुळे मुक्तेश्वरासारख्या कवीलारामायण व महाभारत यांच्या रूपांतराची दिशा लाभली. रुक्मिणी स्वयंवराने तर आख्यानक काव्याचा नवा प्रवाहच मराठीत रूढ केला.
बहुजनसमाजाला रूपके समजतात व आवडतात, म्हणून एकनाथांच्या रूपकप्रचुर शैलीचा अवतार झाला. मराठीचा पुरस्कार करतानाही, सर्वसंग्राहक भाषादृष्टीने त्यांनी संस्कृत भाषेचे प्रौढत्व तिला प्राप्त करून दिले आणि आपल्या भारूडरचनेत बोलीभाषेचाही स्वीकार केला. वीररसाचा आविष्कार, अभंगरचनेतील भेदक समाजचित्रण, कीर्तनोपयोगी नाट्यपूर्ण कथाकाव्य यांही बाबतींत संतसाहित्यातील पहिले कर्तृत्व एकनाथांचेच आहे. संतत्वात अभिप्रेत असलेल्या लोकसंग्रहाचे, लोकसेवेच व लोकाद्धाराचे साधन म्हणूनच एकनाथांनी कवित्वाची साधना केली म्हणूनच त्यांच्या काव्यरचनेत आशयाभिव्यक्तीचे वैचित्र्य व वैपुल्य निर्माण झाले.
तेराव्या शतकात ज्ञानेश्वर-नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाती प्रतिष्ठापना केली. पुढील अडीच शतकांत यावनी सत्तेमुळे भक्तिमार्गाचा प्रभाव क्षीण झाला. एकनाथांनी त्या भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. आपल्या भागवत टीकेने भक्तिपंथाची त्यांनी शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि बहुजनवर्गाचा मेळावा त्या पंथाभोवती संघटित केला. बागवत पंथाला अशा प्रकारे शास्त्र आणि समाज यांचे दुहेरी अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले. जनताजनार्दन हे एक नवे तत्त्व प्रतिपादून भागवत पंथाला त्यांनी अधिक लोकाभिमुख बनविले.
या पंथाला श्रीकृष्णाप्रमाणेच श्रीराम हे दैवत नव्याने परिचित करून दिले व रामचरित्राचा वीरवृत्तिपोषक व कालोचित भावार्थही कथन केला. एकनाथांचा भागवतधर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाजप्रबोधन व समाज-संघटन केले. त्यातूनच सतराव्या शतकातील स्वराज्याच्या चळवळीला अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली, असे म्हणता येईल.
संदर्भ : १. तुळपुळे, शं. गो. पाच संतकवि, पुणे, १९६२.
२. फाटक, न. र. श्री एकनाथ : वाङ्मय आणि कार्य, मुंबई, १९५०.
३. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, मुंबई, १९६३.
४. श्रीएकनाथ संशोधन मंदिर, श्रीएकनाथ-दर्शन, २ खंड, औरंगाबाद, १९५२.
जोशी, वसंत स.
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2020
संत ज्ञानेश्र्वरकालीन संत प्रभावळीतील सत्पुरुषांपै...
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रि...
एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म...
विसाव्या शतकातील एक उल्लेखनीय मराठी कवी म्हणजे इंद...