(१२६७ — १३१७). एक मराठी संत. पंढरपूरजवळील तेरढोकी येथे ते राहत असे. जातीने ते कुंभार होते आणि त्यांना संती व रामी नावाच्या दोन बायका होत्या. आपले काम करीत असता ते विठ्ठलाचे नामस्मरण करी.
एकदा माती तुडविताना ते नित्याप्रमाणे नामस्मरणात तल्लीन झाले आणि त्यांनी रांगत आलेले स्वतःचे लहान मूल पायाखाली तुडविले, अशी आख्यायिका आहे. त्यांच्याबाबत इतरही आख्यायिका रूढ आहेत.
ज्ञानेश्वरादी संतमंडळीत ते सर्वांत वडील होते आणि सर्वजण त्यांना गोरोबाकाका म्हणत. नामदेव परमार्थात कच्चा आहे की पक्का, हे ठरविताना संत गोरोबांचे मत प्रमाणभूत मानले गेले. त्यांनी आपल्या स्वानुभवाच्या थोपटण्याने मडके वाजवून तो निर्णय दिला, असे म्हटले जाते. त्यांचे फक्त वीसच अभंग उपलब्ध आहेत. त्यांत त्यांनी नामदेवाचा मोठ्या प्रेमाने वारंवार उल्लेख केला आहे.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या उद्धवचिद्घनाने त्यांचे मराठीत ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. तेरढोकी येथे त्यांची समाधी असून तेथील त्यांचे घर, त्याचप्रमाणे मूल तुडविलेली जागा आजही लोक दाखवितात.
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/4/2020
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रि...
संत चोखोबा हे संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले स...
महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. जन्म पैठण येथे. ...
एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म...