অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत चोखामेळा

संत चोखामेळा

‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’

संत चोखोबा हे संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत!  संत शिरोमणी नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे ते होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.

संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्र्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्र्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३ शतकात उदयाला आली म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ...

असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.

संत चोखोबांचे भावविश्र्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न,संवेदनक्षम,भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्‍या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखोबांचे सुमारे ३५० अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंत भट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.

‘धाव घाली विठु आता। चालू नको मंद।
बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार।
बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।।
चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’

हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत.

चोखोबांच्या रचनांत भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि ‘वेदनेचा सूर’ ही लागलेला दिसतो, जो आजही आपले अंत:करण हेलावून टाकतो.

‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।।’
‘जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।’
‘आदि अंती अवघा, विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे।
चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळापरते आहे कोण।।’

या रचनांतून उपरोक्त उल्लेख केलेल्या भावभावना दिसात.

‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्र्वर।।’


या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत चोखोबा ज्ञानेश्र्वर माउलींबद्दल ‘प्राणसखा’ हा अतिशय सुंदर शब्द सहजगत्या योजून जातात. यातून तेराव्या शतकातील या ‘संतकवी’ चे साहित्यगुणही दिसून येतात.

त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वांचे श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग- रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला ‘विठू पाटलाचा बलुतेदार,  म्हणून समजत असत.

संत चोखोबा मंगळवेढ्याचे (जिल्हा सोलापूर) होते. त्यांना उपेक्षित बांधवाच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान-हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.

गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना एका दुर्दैवी अपघातात त्यांचा अंत झाला, असे उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात आढळतात. संत नामदेवांनी त्यांच्या सर्व अस्थी गोळा केल्या. त्यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद त्यांनी ऐकला. संत नामदेवांची महाद्वारात जिथे पायरी आहे, त्याच्या बाजूला संत चोखोबांची समाधी पंढरपूरमध्ये आहे. संत बंका (चोखोबांचे मेव्हणे) व संत नामदेव यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत -

‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तिचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’
(- संत बंका)

 

‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।।
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।।
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।।
(-संत नामदेव)
स्त्रोत : वेबसाईट - मनसे

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate