অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत जनाबाई

संत जनाबाई

संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई ह्या पंढरपूरचे वारकरी ‘दमा’ आणि भगवद्भक्त स्त्री ‘करुंड’ या दांपत्याची मुलगी होत. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयता नियमित पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशेट शिंपी यांच्या पदरात टाकले, तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गौर्‍या-शेण्या वेचतांना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथेत मुद्रित केले आहेत. ह्या शिवाय कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा, हरिश्र्चंद्राख्यान अशा आख्यानरचना पण त्यांच्या नावावर आहेत. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या भावमधुर आख्यानांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ती मिळाली. 

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे त्यांच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानकाका, संत गोरोबा, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. 

संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.  (इ. स. १३५०)

 

स्त्रोत : वेबसाईट - मनसे

अंतिम सुधारित : 8/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate