অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत तुकाराम

संत तुकाराम

तुकाराम

(१६०८–९ मार्च १६५०). वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी चार श्रेष्ठ संतांपैकी अखेरचे संतकवी. पित्याचे नाव बोल्होबा किंवा बाळोबाबावा; मातेचे कनकाई. कुलनाम मोरे; उपनाव अंबिले. तुकाराम महाराजांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथला. आपल्या जातीचा ते शूद्र वा कुणबी असा उल्लेख करतात; कित्येकदा यातिहीन म्हणजे कोणतीही जात नसलेला किंवा हीन जातीचा, असाही स्वतःचा निर्देश ते करतात. मोरेकुळ हे मराठा क्षत्रिय. तुकाराम हे मराठे क्षत्रिय असूनही स्वतःला शूद्र म्हणवतात, ह्याचे कारण संस्कारलोपामुळे त्यांना वेदपठणाचा अधिकार उरला नव्हता, हे होय. तुकोबांचा वंशपरंपरागत व्यवसाय वैश्याचा म्हणजे वाण्याचा होता. शिवाय त्यांच्या घराण्यामध्ये पूर्वापार महाजनकीची वृत्ती होती.

महाजन म्हणजे बाजारपेठेच्या व्यापारव्यवहारांतील वजने–मापे, मालाची देवघेव इत्यादींवर देखरेख ठेवणारा आणि व्यापारी कर वसूल करणारा अधिकारी. त्यांच्या मालकीची आणि इनामाची शेती तसेच सावकारीही होती. सुखवस्तू व प्रतिष्ठित असे हे घराणे होते. वाडवडिलांपासून त्यांच्या घराण्यात विठ्ठलभक्तीची मिरास, एकादशीचा उपवास आणि पंढरीची आषाढी–कार्तिकी वारी. तुकाराम महाराजांच्या पूर्वीच्या आठ पिढ्यांची माहिती मिळते. त्यांच्या पूर्वीच्या आठव्या पिढीचा प्रमुख विश्वंभर ह्यांना एका शेतात विठ्ठल–रखमाईंच्या मूर्ती सापडल्या. नदीकाठावरील एका घरात त्या मूर्तींची त्यांनी प्रतिष्ठापना केली. ह्या घरास ‘देऊळवाडा’ असे म्हणत.

तुकाराम महाराजांची वंशावळ अशी : विश्वंभर → हरी → विठोबा → पदाजी → शंकर → कान्होबा → बोल्होबा आणि तुकाराम महाराज चैतन्य. तुकाराम महाराजांच्या आईला सावजी, तुकाराम आणि कान्होबा असे तीन मुलगे झाले. तिला दोन मुलीही झाल्या, असे काही संशोधक सांगतात.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे तुकारामांचा जन्मशक १४९० म्हणजे इ.स. १५६८ व निर्याणशक १५७१ म्हणजे सन १६५० मानीत होते. म्हणून तुकारामांचा एकूण आयुर्दाय त्यांनी ८० वर्षांचा ठरविला होता. तथापि तुकारामांच्या निर्याणकाली त्यांची पत्नी जिजाई ही गरोदर होती, ही वस्तुस्थिती राजवाडे ह्यांच्या ह्या निष्कर्षांशी विसंगत ठरते; कारण राजवाडे ह्यांच्या मतास अनुसरले, तर ह्या वेळी जिजाईची साठी उलटून गेली, असे मानावे लागते. भक्तलीलामृत लिहिणाऱ्या महिपतीने तुकाराम महाराजांच्या पहिल्या २१ वर्षांची क्रमवार हकीकत देऊन तेथे पूर्वार्ध संपले, असे म्हटले आहे. हेही राजवाड्यांच्या संशोधनाशी जुळत नाही. महिपतीच्या ग्रंथातील इतर अनेक प्रसंग व व्यक्तिविषयक उल्लेख कालविसंगत ठरले, तरी त्यांतील कालक्रमाचे महत्त्व नाकारून चालत नाही.

तुकाराम महाराजांचे शिक्षण तत्कालीन सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तींप्रमाणे झाले होते, असे दिसते. त्यांच्या साहित्यात संस्कृत–प्राकृत ग्रंथांच्या व्यापक अध्ययनाची आणि सखोल व्यासंगाची अनेक प्रमाणे मिळतात. भक्तिमार्गात असताना पातंजल योगमार्गाचाही त्यांना शोध झाला होता, असे काही अभंगांवरून दिसते. मालकीचे पांडुरंगमंदिर असल्याने तेथे होणारी नित्यनैमित्तिक भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच त्यांना बहुश्रुतपणा आलेला होता.

घरचा व्यवसाय सांभाळण्याच्या दृष्टीने लेखन–वाचन–जमाखर्च ह्यांचे शिक्षणही त्यांना अपरिहार्य होते. आपण यातिहीन असल्यामुळे वेदाध्ययनाला आचवलो, ह्याची खंत त्यांना आरंभी वाटे. तथापि पुढे ज्ञान–भक्ती–वैराग्याने परिपक्व झाल्यानंतर वेदरहस्यच आपल्या वाणीवर कवित्वरूपे प्रकट झाल्याची प्रचीती त्यांना आली. ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसी च ठावा’ (अभंग २२६६) असे ते आत्मविश्वासाने म्हणू लागले.

लहानपणी चेंडूफळी, हुंबरी, हुतूतू, विटीदांडू इ. अनेक खेळ ते खेळले असावेत. टिपऱ्या, हमामा, फुगड्या इ. खेळही त्यांनी रस घेऊन पाहिले असावेत. क्रीडाविषयक अनेक सुंदर अभंग त्यांनी रचिले आहेत. तुकाराम महाराजांच्या गाथेइतके खेळांचे वैविध्य अन्य संतांच्या गाथांत आढळत नाही.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला; परंतु त्यांची पहिली पत्नी रखमाई ही अशक्त आणि आजारी असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड येथे राहणाऱ्या आप्पाजी गुळवे ह्यांच्या अवलाई नावाच्या मुलीशी त्यांचा दुसरा विवाह झाला. हीच जिजाई. कित्येक चरित्रकारांच्या मते तुकाराम महाराजांचे दुसरे लग्न पहिली बायको निवर्तल्यानंतर झाले. दुष्काळात उपासमारीने ती मरण पावली, असे तुकाराम आत्मचरित्रपर अभंगात म्हणतात (अभंग १३३३).

तुकारामांचे वडील बंधू सावजी हे स्वतःची पत्नी वारल्यानंतर विरक्त बनून तीर्थाटनास निघून गेले ते पुन्हा परतले नाहीत. त्यामुळे वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी व्यवसायासह सर्व प्रपंचाचा भार तुकारामांवर येऊन पडला. त्यानंतर १६३०–३१ मध्ये महाराष्ट्रात जो भीषण दुष्काळ पडला त्यात त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबरच त्यांचा मुलगाही मरण पावला; दुकानाचे दिवाळे निघाले; दारिद्र्य आले. ह्या स्थितीमुळे जनातील मान गेला. अपमान होऊ लागले. त्यामुळे अनन्यगती होऊन ते देवाला शरण गेले. नवा जीवनमार्ग त्यांना स्पष्ट दिसू लागला. लहानपणापासून झालेले अध्यात्मविद्येचे संस्कार जागृत होऊन त्यांना उपरती झाली. अभ्यासाची ओढ लागली.

ते एकांतवासात रमू लागले. देहूच्या परिसरात सह्याद्रीचे अनेक उंच उंच रम्य पहाड आहेत. त्यांवर जाऊन वाचन–मनन–चिंतनात ते गढून जाऊ लागले.

देहूच्या उत्तरेस असलेल्या भामनाथ किंवा भामचंद्र डोंगरावरील लेण्यात ते बसू लागले. ह्याच ठिकाणी त्यांना गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेवदिकांच्या गाथा, योगवासिष्ठ, रामायण, दर्शने इत्यादिकांचा व्यासंग केला. प्रिया, पुत्र, बंधू ह्यांचा संबंध मनातून तुटला.

दुकानात बसून केवळ कुटुंबाच्या आणि देहाच्या धारणेपुरते मिळवण्यावर ते संतोष मानू लागले (अभंग १४८६). मनाच्या आणि इंद्रियांच्या विकारांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करू लागले. संतांचा, हरिभक्तांचा सहवास त्यांना मिळत गेला.

ज्ञानेश्वर–एकनाथादी संतांनी परमार्थात गुरूचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे मानले; परंतु गुरूसाठी हिंडण्याची तुकारामांची प्रवृत्ती नव्हती. पांडुरंगच गुरू, ही त्यांची भावना दिसते. तथापि परंपरेचाही त्यांच्या मनावर बळकट संस्कार होता. एका अभंगात (३६८) गंगास्नानास जातांना वाटेत सद्‌गुरूंनी गाठले; मस्तकी हात ठेवला; भोजनास पावशेर तूप मागितले; पण हे, स्वप्नच होते; त्यामुळे तूप देण्याचा विसर पडला, असे ते सांगतात. सद्‌गुरूंनी स्वतःचे नाव ‘बाबाजी’ असे सांगितले; राघवचैतन्य, केशवचैतन्य ही गुरुपरंपरा सांगितली. ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र दिला. माघ शुद्ध दशमी, गुरुवार हा तो दिवस होता, असेही त्यांनी म्हटले आहे. ल. रा. पांगारकर ह्यांच्या मते उपदेशाचे वर्ष १६३२ हे होय.

बाबाजी चैतन्य हे उपदेशकाळी हयात नव्हते, म्हणून स्वप्नातच उपदेश झाला, असे म्हणता येते. तथापि वा. सी. बेंद्रे ह्यांच्या मते बाबाजी चैतन्य हयात होतेच आणि तुकारामांना सद्‌गुरू भेटण्याचा हा योग २३ जानेवारी १६४० रोजी आला. ही भेट देहूलाच झाली की ओतूरला, ह्याबद्दलही वाद असून तो अनिर्णित आहे.

तुकारामांच्या अभंगात गंगास्नानाचा उल्लेख आहे. ओतूरला इंद्रायणी दक्षिणवाहिनी असल्यामुळे शास्त्राप्रमाणे तिला गंगा म्हणता येते; अशी गंगा देहूला नाही; म्हणून भेट ओतूरला झाली असावी, असे बेंद्र्यांचे मत आहे. तथापि ‘गंगा’ ही संज्ञा तीर्थविषयक धर्मशास्त्रात फार लवचिकपणेही वापरलेली आढळते. काशीच्या भागीरथी बरोबर इतर अनेक नद्यांना ‘गंगा’ ही अतिपवित्र संज्ञा दिलेली आहे.

बाबाजी चैतन्य हे बंगाली वैष्णव संत श्रीकृष्ण चैतन्य अर्थात गौरांग प्रभू ह्यांच्या संप्रदायाचे होते, असे अनुमान काहींनी काढलेले आहे. तथापी गौरांग प्रभू आणि तुकाराम महाराज ह्यांच्या तत्वज्ञानांत भिन्नता आढळते. श्रीकृष्ण चैतन्यांचे तत्वज्ञान शांकरमायावादास वगळणारा अचिंत्य भेदाभेदवाद होय, तर तुकाराम महाराजांचे तत्वज्ञान ज्ञानदेव–एकनाथांचा शांकरमायावाद व चिद्‌विलासवाद ह्या दोन वैचारिक श्रेणी वा टप्पे समाविष्ट करणारा अद्वैतवाद होय. श्रीकृष्ण चैतन्यांच्या संप्रदायात विशेषकरून आढळणाऱ्या मधुरा भक्तीची केवळ छटा तुकारामांच्या विराण्यांसारख्या गीतांमध्येही दिसते. शिवाय महाराष्ट्रात बंगाली चैतन्य संप्रदाय केव्हाही, कोठेही दिसत नाही.

बाबाजी चैतन्यांनी दिलेल्या गुरूपदेशाचे वर्णन तुकारामांनी केलेले असले, तरी गुरशिष्यनाते हे गुरूच्या ठिकाणी अहंता वाढविणारे, म्हणून त्यांना विशेषसे मान्य नाही. शिष्यसेवा घेऊ नये, असाही त्यांचा आग्रह आहे; दक्षिणा घेणे तर पापच होय, असे ते मानतात. त्यांना उपदेश झाला तो स्वप्नात म्हणजे तुर्येत किंवा उन्मनीत. तुर्या किंवा उन्मनी म्हणजे आत्मा होय. मांडूक्योपनिषदात शांत, शिव, अद्वैत व स्वयंप्रकाश आत्मा हे तिचे स्वरूप सांगितले आहे. जागृती, स्वप्न व सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थांना ती व्यापते आणि पलीकडेही राहते. तुकाराम महाराजांनी ‘स्वप्न’ ह्या संज्ञेने तुर्या वा उन्मनी ह्यांचा निर्देश केला असणे अत्यंत शक्य आहे.

गुरूपदेश झाल्यावर कवित्वाची स्फूर्ती झाली. संत नामदेवांनी पांडुरंगासवे स्वप्नात येऊन जागे केले आणि कवित्व करावयास सांगितले. नामदेवांची शतकोटी अभंगांची संख्या अपुरी राहिली आहे, ती पूर्ण कर, असे पांडुरंगाने सांगितले (अभंग १३२०; १३२१). तुकाराम अभंग लिहू लागले. संसार–परमार्थाच्या अनुभवांतून निष्पन्न झालेला विचार रम्य शब्दरूप घेऊ लागला. शब्दांची रत्ने आणि शस्त्रे त्यांना गवसली (अभंग ३३९६). त्यांच्या अभंगांत शब्दांची रत्ने जशी दिसतात, तसेच चमत्कार दाखविणारे बाबालोक; भविष्यशकुन सांगणारे, त्यांचे अपधर्म; पाखंड, धार्मिक, कर्मकांड वा थोतांड इत्यादिकांचे परखड खंडन करणारी शस्त्रास्त्रेही आढळतात. त्यांच्या शैलीचेच सूत्र उपर्युक्त अभंगातून त्यांनी बोलून दाखविले आहे. अभंगांतून स्वतःचा उल्लेख ते ‘तुका’ असा करतात.

आपल्या जीवनातून आणि अभंगांतून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी चालू ठेवले. त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेल्या अमृतवाणीने सामान्य जनांचा आणि प्रतिष्ठित, सुसंस्कृत लोकांचा समाज आकर्षित होऊ लागला. ब्रह्मसाक्षात्कारी महान संतकवी म्हणून त्यांची कीर्ती त्यांच्या हयातीतच महाराष्ट्रात पसरली होती. लोकांच्या स्तुतीमुळे आपला झडलेला अहंकार पुन्हा जडेल की काय, अशीही त्यांना भीती वाटू लागली होती. तथापि मोहाचा तो टप्पाही त्यांनी ओलांडला. ‘मी आहे मजूर विठोबाचा’ असे ते लोकांना सांगू लागले. तथापि त्यांचा हेवा आणि द्वेष करणारे दुर्जनही वाढत होते. सालोमालो हे कीर्तनकार, मंबाजीबुवा, देहूगावाचा पाटील हे त्यांत प्रमुख होते.

पुण्याजवळील वाघोलीचे रामेश्वरभट ह्यांचेही तुकारामांचे विरोधक म्हणून नाव घेतले जाते. पण रामेश्वरभट हे तुकारामांचे प्रथमपासूनच भक्त बनले होते; त्यांनी तुकारामांचा द्वेष कधीच केला नाही. तुकारामांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडविण्यात रामेश्वरभटांचा हात नव्हता; ती कल्पितकथा आहे. सालोमालो हे तुकारामांचे अभंग स्वतःच्या कीर्तनांत स्वतःच्या नावावर वापरीत. पाटलापेक्षा महाजनकीचा अधिकार त्या वेळी मोठा असल्यामुळे देहूगावचा पाटील मत्सरग्रस्त झाला असावा.

तुकोबा शूद्र असून वेदान्तोपदेश करतात, हा मत्सरग्रस्त विरोधकांचा त्यांच्यावर मुख्य आरोप होता. ते स्त्रियांना नादी लावतात असाही आरोप असल्याचे तुकोबांच्या अभंगांतून सूचित होते. नाना प्रकारे ह्या लोकांनी तुकोबाचा छळ केला. त्यांच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या. त्या कोरड्याच्या कोरड्या वर आल्याचा उल्लेख काही अभंगांत आलेले आहेत (२२४१, २२४३).

तुकोबांवर बहिष्काराचाही प्रयोग करण्यात आला होता असे अभंगांतून समजते. मंबाजीने तर पुण्यातील विख्यात राजयोगी आपाजी गोसावी ह्यांस पत्र पाठवून ह्या शूद्राचा ब्राह्मणसुद्धा अनुग्रह घेत असल्याची तक्रार केली होती आणि आपाजी गोसावी ह्यांनी तुकारामांना शिक्षा देण्याचा निश्चय केला होता, ही हकीकत बहिणाबाईंच्या अभंगांत आलेली आहे. तुकोबांनी ह्या सर्व संकटांना तोंड दिले.

वयाची चाळीशी उलटल्यानंतर जग सोडावे, असे त्यांना वाटू लागले आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांचे निर्याण झाले. शके १५७१, फाल्गुन वद्य द्वितीया (९ मार्च १६५०) हा त्यांचा निर्याणदिन म्हणून मानला जातो. तथापि वा. सी. बेंद्रे ह्यांच्या मते शके १५७१, विरोधी संवत्सर फाल्गुन वद्य पंचमी, सोमवार हा तो दिवस होय; कारण तुकारामांचे पुत्रपौत्र ह्याच दिवशी पुण्यतिथी साजरी करीत.

तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठास गेले असे चरित्रग्रंथांत आणि कथाकीर्तनांत सांगितले जाते; परंतु हे वाच्यार्थ्याने घ्यावयाचे नाही. त्यांचा देहच ब्रह्मरूप बनला, त्यामुळे ते सदेह वैकुंठात गेले, असे ध्वन्यर्थाने म्हणता येते. निर्याणसमयी त्यांना महादेव, विठोबा, नारायण हे तीन मुलगे आणि काशी, भागीरथी व गंगा ह्या तीन मुली अशी सहा अपत्ये होती. ह्या मुली मोझे, गाडे व चांभुलीकर ह्या प्रतिष्ठित घराण्यांत दिलेल्या होत्या.

मठस्थापना करून शिष्यशाखा निर्माण करण्याचे त्यांनी सावधपणे टाळले होते. त्यांनी प्रत्यक्ष शिष्य केलाच नाही. समकालीन रामेश्वरभट वाघोलीकर, बहिणाबाई सिऊरकर आणि नंतर झालेले कचेश्वरभट ब्रह्मे चाकणकर, निळोबाराय पिंपळनेरकर किंवा महिपती ताहाराबादकर ह्यांनी त्यांना गुरू मानले आहे. तथापि रामेश्वरभटांना दीक्षा दिलीच नव्हती. बाकीच्यांना स्वप्नात येऊन त्यांनी दीक्षा दिली, असे उल्लेख आहेत. शिवाजी महाराज आणि तुकाराम ह्यांच्या भेटीबद्दलही ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. वा. सी. बेंद्रे ह्यांनी तुकारामाचरित्राचे  बारकाईने संशोधन करून हे दाखवून दिले आहे.

धर्मरक्षण हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले. त्यासाठी जातपात, उच्चनीच भेद नाकारले. विष्णुदास जन्म घेतात तेच पवित्र कुळ आणि तोच पवित्र देश अशी त्यांची भूमिका होती. सामान्य लोकांना उचित साधनमार्ग दिला पाहिजे. भुताखेतांची साधना, जटाभार वाढविणारे ढोंगी, शकुन सांगणारे भविष्यवादी, क्षुद्र देवतांच्या उपासना ह्यांपासून लोकांना दूर केले पाहिजे, असे त्यांना वाटे. सगुणनिर्गुण हे एकाच आध्यात्मिक साक्षात्काराचे पैलू आहेत; वासना संपूर्ण विलीन होऊन पूर्ण व अविचल स्थिती अनुभवणे हे त्या साक्षात्काराचे फलित आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील भागवत धर्माचा पाया रचून देवालय श्रीज्ञानदेवांनी उभारले आणि तुकारामांनी त्याच्यावर कळस चढविला; असे म्हटले जाते. ह्याचे कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची पूर्ती तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झालेली होती. अनन्यभक्ती आणि पारमार्थिक समता ह्यांच्या मुशीत भागवत धर्माने ओतलेली सुवर्णमूर्ती म्हणजे तुकाराम. ‘अंत्यजादि योनी सरल्या हरिभजने तयांची पुराणे भाट झाली’ असे सांगून तुकारामांनी सामाजिक संकुचित अहंकार आणि शुद्ध धर्म ह्यांच्यातील विरोध स्पष्टपणे दाखवून दिलेला आहे.

मराठी साहित्यात तुकारामांच्या अभंग–गाथेने अढळ स्थान मिळविले आहे. साधकदशेतील ‘मनासी झालेले संवाद’ व ‘नाना बुद्धीचे तरंग’ उत्कटपणे तुकोबांनी व्यक्त केले. संसारातील काही प्रसंग, जनात आलेले अनुभव यांबरोबरोच गोपालकृष्णाच्या बालक्रीडा, विराण्या, ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार यांचीही अभंगरुप वर्णने त्यांच्या गाथेत आढळतात. संसारी लोकांना केलेला नीत्युपदेश व समाजातील सोंगाढोंगावर केलेला प्रहार हेही त्यांच्या अभंगवाणीचे मोठेच विषय आहेत.

तिच्यात लौकिकाच्या नाना क्षेत्रांतील उपमारूपकादी अलंकारांचा मार्मिक वापर आढळतो. ही अभंगवाणी सुभाषितात्मक वचनांनी नटलेली आहे. ती मराठी भाषेचेच एक अंग बनली असून जनसामान्यांच्या तोंडी कायमची स्थानापन्न झाली आहे. आधुनिक मराठी कवींना ही उत्स्फूर्त, उत्कट, अल्पाक्षरसुंदर अभंगवाणी स्फूर्तिदायक ठरली व अनुकरणीय वाटली. मराठी काव्याचे ती एक शाश्वत भूषण होय.

 

संदर्भ : १. जाधव, रा. ग. आनंदाचा डोह, वाई, १९७६.

२. लाड, पु. म. संपा. श्री. तुकारामबाबांच्या अभंगांची गाथा (महाराष्ट्र शासन), मुंबई, १९७३.

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

जोशी, लक्ष्मणशास्त्री

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate