অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाई

मुक्ताबाई

(१२७७ किंवा १२७९–१२९७). ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण आणि मराठी संत कवयित्री. ज्ञानदेवादि चारी भावडांच्या जन्मकाळासंबंधी मतैक्य नाही. मुक्ताबाईचा जन्म एका मतानुसार १२७७, तर दुसऱ्या मतानुसार १२७९ ठरतो. पहिल्या मतानुसार तिला एकूण वीस वर्षांचे आयुष्य लाभले होते व दुसऱ्या मतानुसार मृत्युकाळी ती अठरा वर्षांची होती. या चारी भावंडांच्या जन्मस्थळाविषयीही मतैक्य नाही. कोणी ते आपेगाव मानतात, तर कोणी आळंदी मानतात. सबळ पुरावा असा कोणत्याच बाजूस नाही. या चारी भावंडांचे चरित्र साधारणपणे सारखेच असल्यामुळे मुक्ताबाईच्या चरित्रातील विशेष गोष्टी तेवढ्या सांगणे योग्य होईल.

पैकी एक म्हणजे तिचा चांगदेवाशी आलेला संबंध ज्ञानदेवांच्या भेटीस जाण्यापूर्वी त्यांना कोरे पत्र पाठविणाऱ्या चांगदेवाला अनुलक्षूनच तिने चांगदेव इतकी वर्षे जगून कोरा तो कोराच, असे म्हटले होते; पण तोच चांगदेव पुढे तिचा शिष्य झाला व दोघांतील हा गुरु-शिष्य-संबध दोघांनीही आपापल्या अभंगातून व्यक्त केला आहे.

पण त्यामुळे एक अडचण निर्माण झाली आहे. ती म्हणजे चांगदेवाच्या कवितेत त्याच्या स्वतःच्या आणि मुक्ताबाईच्या रचनेची झालेली गुंतागुंत. उदा., गुणातीत डहाळी पाळणा लाविला | तेथे सुत पहुडला मुक्ताईचा हे प्रसिद्ध पाळणागीत कोणाचे-मुक्ताईचे की चांगदेवाचे? अशा प्रकारचे प्रश्न चांगदेवाची गाथा पाहताना अनेक ठिकाणी निर्माण होतात.

मुक्ताईच्या चरित्रातील दुसरी विशेष गोष्ट म्हणजे तिने ज्ञानदेवांच्या भेटीस आलेल्या अहंमन्य नामदेवांचे उघडे केलेले अज्ञान. तिचे त्या प्रसंगी जाणवलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहूनच नामदेवांनी तिच्याविषयी 'लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी । केले देशोधडी महान संत' असे उद्‌गार काढले. पुढे नामदेव-चांगदेव ह्या दोघांनी तिचा गौरव केला आहे हे खरे; पण तिच्या स्वतःच्या भावंडांनी तिच्या संबंधात कोठे अवाक्षरही काढलेले नाही. असे का व्हावे? ती निवृत्ति-ज्ञानदेवांच्या जीवनाशी इतकी एकरूप झाली होती, की तिचा वेगळा निर्देश करण्याची आवश्यकताच त्यांना वाटली नाही हे त्याचे कारण असावे.

या चार भावंडांत ती वयाने सर्वांत लहान असली, तरी तिने समाधी घेतली ती निवृत्तीनाथांच्या पूर्वी. तिचे समाधिस्थान खानदेशात तापीच्या काठचे मेहुण हे गाव होय असे नामदेवांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही आत्मचरित्रपर अभंगांवरून मानले जाते. वारकरी पंथ शके १२१९, वैशाख वद्य १२, ही तिची समाधितिथी मानतो.

मुक्ताई निवृत्तीनाथांची अनुग्रहीत असताना चांगदेवासकट सर्व नाथपंथीय ग्रंथकार तिला अनुग्रह गोरखनाथांनी दिला असे का म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर यापूर्वी शिवदिनकेसरीने दोन भिन्न मुक्ताई कल्पून दिले होतेच (ज्ञानदीप, ओ. ९१०). आता त्याला अनुसरून रा. चिं. ढेरेही पुन्हा दोन मुक्ताई असल्याचा विचार मांडीत आहेत. इतकेच, की त्या भिन्न नसून दुसरी पहिलीचा पुनरावतार आहे.

पूर्वजन्मातील मुक्ताबाईला गोरखनाथांचा उपदेश असून ती चक्रधरांना त्यांच्या एकाकी भ्रमंतीत सालबडीच्या डोंगरात (ढेरे यांच्या मते श्री शैल पर्वतावर) एका वृद्ध योगिनीच्या रूपात भेटली होती (लीळा-चरित्र, एकाक ९). ढेरे यांच्या मतानुसार ही मुक्ताबाई चांगदेवाची मूळ गुरू असून पुढे ती दिवंगत झाल्यावर तिचाच नवा अवतार, म्हणजे ज्ञानदेवभगिनी मुक्ताई, हिला त्याने गुरू केले. पण हे सर्व अनुमान आहे. ते मानण्यात गोरखशिष्या मुक्ताई आपल्या दीर्घायुष्यात मुक्त न झाल्यामुळे तिला ज्ञानदेवांची बहीण म्हणून पुनरावतार घ्यावा लागला अशी विचित्र कल्पना करण्याची आपत्ती येते. त्यापेक्षा या दोन मुक्ताबाई सर्वस्वी भिन्न समजणेच योग्य होईल.

गाथेत मुक्ताईच्या नावावर एकूण ४२ अभंग आहेत. त्यात तिने आपला शिष्य चांगदेव याला उद्देशून रचिलेल्या व आता त्याच्या नावावर छापलेल्या सहा अभंगांची भर घालावी लागेल. त्या सहा अभंगात मुद्रिका 'मुक्ताई म्हणे' अशीच आहे. याशिवाय नामदेव गाथेतील 'नामदेव-भक्तिगर्वपरिहार' या मथळ्याखालील अभंगांपैकी (१३३४ ते १३६४) दहापंधरा तरी निश्चितपणे मुक्ताईचे आहेत. तसेच गाथेत न मिळणारे 'ताटीचे अभंग' ही तिचेच होत. म्हणजे तिची एकूण अभंगरचना सु. पाऊणशेच्या घरात जाईल. ती सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध आहे. ती मुख्यतः भक्तिपर असले, तरी योगमार्गाच्या खुणांनीही ती युक्त आहे.

मुक्ताईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तिराजाने सावध केले व त्यामुळे 'मुक्तपणे मुक्त । मुक्ताई पैं रत । हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।' अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे ती सांगते. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे; पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे. तसे पाहिल्यास तिचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड दिसतो.

पण ताटीच्या अभंगात तिच्या या स्पष्टवक्तेपणाने थोडे निराळे वळण घेतले आहे. एक दिवस ज्ञानदेवांना पाहून कोणा टवाळाने त्यांना संन्याशाचा पोर म्हणून हिणवले तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले व काही केल्या ताटीचे दार उघडीनात. त्या वेळी मुक्ताईने त्यांच्या ज्या विनवण्या केल्या त्या 'ताटीचे अभंग' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत जसा वडील भावावर रुसलेल्या धाकट्या बहिणीचा लडिवाळपणा आहे, तसाच परिणत प्रौढत्वाला साजेल असा समंजसपणाही आहे. मुंगी उडाली आकाशी । तिने गिळिले सूर्यासी ।  असे तिचे एक वचन आहे. हे तिला स्वतःलाही लागू पडते.

 

तुळपुळे, शं. गो.

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate