অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समर्थ रामदास

समर्थ रामदास

समर्थ रामदास

(१६०८– २ फेब्रुवारी १६८२). ज्ञानी, भक्तिमान आणि कर्मयोगी संतकवी. मूळचे नाव नारायण; उपनाव ठोसर. ‘रामदास’ हे त्यांनी पुढे स्वतःसाठी घेतलेले नाव. एक थोर सिद्धपुरुष म्हणून लोक त्यांना आदरपूर्वक ‘समर्थ’ किंवा ‘समर्थ रामदास’ असे आजही म्हणतात.

रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानशा गावचा. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत, आईचे राणूबाई. राम आणि सूर्य ह्यांची उपासना त्यांच्या घरात होती.सूर्याजीपंत अनेक मुमुक्षूंना ‘अनुग्रह’ देत. रामदासांचे वडील बंधू गंगाधर ‘श्रेष्ठ’ आणि ‘रामी रामदास’ ह्या नावांनीही ओळखले जातात. रामदास आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि गंगाधर हे वडिलांचा संप्रदाय चालवू लागले.

वडिलांकडून आणि पुढे वडील बंधूंकडून आपल्याला मंत्रोपदेश मिळावा, म्हणून रामदासांनी प्रयत्न केला होता; परंतु दोन्ही वेळी तो निष्फळ ठरला. रामदासांच्या एका अभंगावरून असे दिसते, की प्रत्यक्ष रामचंद्रांनीच स्वप्नात येऊन ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र त्यांना दिला.

आई आणि वडील बंधू ह्यांनी रामदासांचे लग्न, त्यांची इच्छा नसतानाही ठरविले; पण मंगलाष्टकांमधले ‘सावधान’ हे शब्द ऐकताच भर लग्नमंडपातून ते पळून गेले, असे म्हटले जाते. त्यानंतर तपश्चर्येसाठी ते नासिकला गेले आणि नासिकजवळील टाकळी ह्या गावी असलेली एक गुहा त्यांनी त्यासाठी निवडली. राममंत्राचा तेरा कोटी जप,वेदशास्त्रे, वेदान्त, काव्ये, पुराणे ह्यांचा अभ्यास; गायत्री-पुरश्चरणे; संगीतसाधना त्यांनी येथेच केली. त्यानंतर ते भारतभ्रमणास निघाले (१६३२). काशी, प्रयाग, गया,अयोध्या, श्रीनगर; हिमालयातील बद्रिनारायण आणि केदारनाथ अशी अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. अयोध्येत त्यांचे वास्तव्य सर्वाधिक म्हणजे अकरा महिने होते. पंजाबात जाऊन तेथील शीख धर्मगुरूंना ते भेटले. मानसरोवराची प्रदक्षिणा केली. पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन घेतले.

दक्षिणेतीलही अनेक तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. महाराष्ट्रातही ते हिंडले. ह्या प्रवासात समर्थांनी अनेक साधुमहात्म्यांच्या भेटी घेतल्या. राम, हनुमान ह्यांची मंदिरे उभी केली. मठ स्थापन केले. समर्थांच्या आयुष्यातील ह्या यात्रापर्वात त्यांना भारताच्या लोकस्थितीचे दर्शन घडले. ते झाल्यानंतर समाजातील देवधर्माचे अराजक मोडावे, खऱ्या परमार्थाची स्थापना करावी आणि ऐहिक पुरूषार्थ साधणारी समाजव्यवस्था घडवावी, ही त्यांची साध्ये ठरली. ती सिद्ध करण्यासाठी ते कृष्णातीरी आले (१६४४). हे त्यांच्या आयुष्यातले अखेरचे पर्व.

ह्या पर्वात ते राजकारण म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य अखेरपर्यंत करीत राहिले. समर्थांना अभिप्रेत असलेला राजा हा परमार्थसंस्थापक आणि सज्जनांचा रक्षक असा होता. अशा राजाचे राज्य हे त्यांच्या दृष्टीने रामराज्य होते. अशा रामराज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी निर्माण करणे, म्हणजेच समर्थ करू पाहत असलेली धर्म-संस्थापना होती. समर्थांनी वापरलेल्या ‘राजकारण’ ह्या शब्दाचा अर्थ ह्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे.

राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होत. शिवाजी महाराजांच्या राजकीय उलाढालींत रामदासांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, हे जरी खरे मानले, तरी शिवाजी महाराजांनी हाती घेतलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याला अनुकूल अशी मनोवृत्ती रामदासांनी लोकांत निर्माण केली, हे दिसून येते.

इस्लामी राजवटीत, भयापोटी लोकांनी डोहांत वा नद्यांत बुडविलेल्या अनेक देवतामूर्ती बाहेर काढून रामदासांनी त्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली. धर्मप्रचारासाठी देवळे बांधली. देवांचे सार्वजनिक उत्सव सुरू केले. सामाजिक जीवनाची नैतिक परिशुद्धी करणे हे रामदासांच्या राजकारणाचे मर्म होय.

परमार्थाचा अधिकार पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही आहे, असे रामदास मानीत. अक्काबाई आणि वेणूबाई ह्या त्यांच्या अनुयायी स्त्रिया प्रसिद्ध आहेत; त्यांच्याखेरीज अन्य अनेक स्त्रियांनी रामदासांचे अनुयायीत्व स्वीकारले होते. त्यांत काही मुसलमान फकीरही होते. उच्च पातळीवरील धर्मविचारंत हिंदू, मुसलमान असा भेद त्यांनी केला नाही.

समर्थांच्या पट्टशिष्याचे नाव कल्याण (मूळ नाव अंबाजी). तो त्यांचा मुख्य लेखनिक होता. दिनकर स्वामी, गिरिधर इ. त्यांचे अन्य शिष्यही प्रसिद्ध आहेत. समर्थांनी चाफळ येथे श्रीरामाची स्थापना केली. ह्या देवस्थानास हिंदू सरदारांची, तसेच विजापूरच्या इस्लामी राज्याचीही इनामे मिळाली. शिवाजी महाराजांनीही वर्षाला दोनशे होन इनाम दिले.अनेक गावेही इनाम म्हणून दिली.

शिवाजी महाराजांनी समर्थांचा उपदेश घेतला होता. तथापि महाराजांच्या स्वराज्यसंस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध होता, असे दाखविणारा आधार मिळत नाही.शिवराय-समर्थ भेट ही प्रथम स्वराज्यस्थापनेच्या अवघी दोनच वर्षे आधी (१६७२) झाली, असे काहींचे म्हणणे आहे. पण ज्या पत्रावरून ही पहिली भेट असे म्हणतात, ती पहिली भेट म्हणजे (राजे यांची पहिलीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटेस आणावे......... इ. मजकूर ह्या पत्रात आहे) त्या गावाची पहिली भेट असाही अर्थ निघू शकतो.

शिवाजी महाराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेतले, तर हे दोन्ही थोर पुरूष स्वाराज्यस्थापनेपूर्वी अनेक वर्षे परस्परांना ओळखत होते, हे निश्चित आहे.शिवाय विचारवंत गुरू आणि पराक्रमी राज्यकर्ता ह्यांचा संबंध दृढ होतो. तो वैचारिक देवघेवीने. शिवाजी महाराजांनी अनेक साधुसंतांचे उपदेश घेतले, असे म्हटले जात असले, तरी रामदास आणि शिवाजी महाराज ह्यांचे गुरूशिष्यनाते वेगळे म्हणायला हवे.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर (१६८०) दोन वर्षांनी समर्थांचे सज्जनगडावर निधन झाले.

मर्थांच्या ग्रंथकर्तृत्वात दासबोध आणि रामायण (दोन कांडे) ह्यांचा प्रथम उल्लेख केला पाहिजे. दासबोध हा सर्मथांचा आणि रामदासी संप्रदायाचाही प्रमुख ग्रंथ. ७,७५१ ओव्यांच्या आणि दोनशे समासांच्या आजच्या दासबोधापूर्वी समर्थांनी एकवीस समासांचा एक दासबोधही रचलेला होता. मानवी सद्‍गुणांची वाढ व्हावी, लोक कर्तृत्वसंपन्न आणि परमार्थप्रवण व्हावेत, ही तळमळ दासबोधात दिसते.

रामदासी रामायणाची ‘सुंदर’ आणि ‘युद्ध’ अशी दोनच कांडे आहेत. समग्र रामायण रामदासांनी लिहिले नाही. सुंदरकांडाची श्लोकसंख्या १०१ असून युद्धकांडातील एकूण श्लोक १,३६२ इतके आहेत. ‘निमित्य मात्र ते सीता विबुधपक्षपुरता’ असे रामायणाचे सार रामदासांनी सांगितले आहे.

स्फुट कविता, प्रासंगिक कविता, आत्मारामसारखी वेदान्त प्रकरणे, अभंग, श्लोक, भूपाळ्या इ. अन्य बरीच रचना समर्थांची आहे. करुणाष्टक, मनाचे श्लोक, ‘सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची....’ ही महाराष्ट्र घरोघरी म्हटली जाणारी श्रीगणेशाची आरती ह्या रचना तर विख्यात आहेत. रामदासांनी ‘समर्थ’ होण्यापूर्वी तपश्चर्या केली,बहुश्रुतपणा मिळविला, कवित्व प्राप्त करून घेतले. ह्या साधनेत निराशेचे क्षणही अनेकदा आले. अशा प्रासंगिक निराशेचे व उद्वेगाचे प्रतिबिंब त्यांच्या करुणाष्टकात पडलेले आढळते. मनाच्या श्लोकांचा उर्दू अनुवाद शहा तुराव चिश्ती ह्या इस्लाम धर्मीयाने सु. अडीचशे वर्षांपूर्वी केला आहे. रामदासांनी संगीताभ्यास केला होता. केदार, बागेश्री,आसावरी, काफी अशा विविध रागांमध्ये त्यांनी बांधलेली पदे, त्यांच्या काही पदांतून आढळणारे तबल्याचे किंवा नृत्याचे बोल ह्यांतून हे लक्षात येते.

रामदासांच्या लेखनातून विखुरलेले साहित्यविषयक विचार शोधून रामदासांचे साहित्यशास्त्र (१९७३) ह्या नावाचा ग्रंथ भा. श्री. परांजपे ह्यांनी लिहिला आहे.

इंग्रजी अंमलापूर्वीच्या काळात रामदासांची बरीच चरित्रे लिहिली गेली, पण ती पौराणिक पद्धतीची आहेत. समर्थशिष्य गिरिधरस्वामी, हनुमंतस्वामी, महिपतिबुवा,दिनकरस्वामी, मेरुस्वामी, उद्धवसुत आदींनी लिहिलेल्या चरित्रांचा उल्लेख करता येईल.

 

संदर्भ : 1. Deming, W. S. Ramdas and Ramdasis, Calcutta, 1928.

2. Thackeray, K. S. Life and Mission of Samartha Ramdas, Bombay, 1918.

. आळतेकर, स. खं. श्रीसमर्थचरित्र, कराड, १९३३.

. देव, शं. श्री. श्रीसमर्थचरित्र, खंड १ ते ३, मुंबई, १९४९, १९४२, १९४५.

. देव, श. श्री. श्रीसमर्थहृदय, मुंबई, १९४२.

. पेंडसे, शं. दा. राजगुरू समर्थ रामदास, पुणे, १९७४.

. फाटक, न. र. रामदास : वाङ्‍मय आणि कार्य, मुंबई, १९७०.

. फाटक, न. र. श्रीसमर्थ : चरित्र, वाङ्‍मय आणि संप्रदाय (विविधज्ञानविस्तारातील लेख), पुणे,

१९७२.

. राजवाडे, वि. का. श्रीसमर्थ रामदास, सातारा, १९२६.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 1/30/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate