सुंदर अक्षर हाच खरा दागिना असून वाचता न येणारं अक्षर हे अपूर्ण शिक्षणाचे चिन्ह मानले पाहिजे. सुंदर अक्षराचे महत्त्व विशद करणाऱ्या ह्या वाक्यांचा उल्लेख राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या सत्याचे प्रयोग या आत्मकथेत आढळून येतो. हा दागिना मिळविण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले तर सहजरित्या आपण हा दागिना मिळवू शकतो. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
जळगाव येथील किशोर कुळकर्णी हे आपल्या सुंदर अक्षर चळवळीच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून हसत खेळत विद्यार्थ्यांना सुंदर अक्षरासाठी योग्य मार्गदर्शन विनामुल्य करीत आहेत. पूर्वीच्या काळी मुलाने शाळेत प्रवेश घेतला की, शिक्षक त्याच्याकडून पेन्सिल, टाक, शाईचे पेन आदींच्या मदतीने अक्षर गिरवून घेत त्यामुळे साहजिकच सुवाच्य अक्षर काढण्याचं वळण हाताला लागत असे. परंतु डिजीटल क्रांतीनंतर विद्यार्थी पाटी पेन्सिल पासून दूरच झाली. शाळेतील मुलांना सुवाच्य, वळणदार अक्षर काढण्याची शिकवण आणि याबाबत प्रोत्साहनच शिक्षक, पालकांकडून मिळत नसल्यामुळे शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांपैकी फक्त पाच टक्के विद्यार्थ्यांचेच अक्षर सुंदर असते. साठ टक्के विद्यार्थ्यांचे अक्षर वाचता न येण्यासारखं गचाळ असते. हे सर्व लक्षात घेऊन जळगाव येथील किशोर कुळकर्णी हे स्वखर्चाने कुठलीही अपेक्षा न ठेवता अक्षर सुधार उपक्रम चालविण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावं, त्यांना सुंदर अक्षर काढण्याची सवय लागावी या हेतूने अक्षर सुधार उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. सन 1996 पासून सुरु केलेला हा उपक्रम गेल्या 20 वर्षापासून अखंडितपणे सुरु आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर त्यांनी सुधारले असून ह्या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद बघता ह्या अभिनव उपक्रमाने चळवळीचे रुप धारण केले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गेल्या दोन दशकापासून ही चळवळ वन मॅन आर्मी प्रमाणे किशोर कुळकर्णी आपली नोकरी व कुटुंब सांभाळून संपूर्ण महाराष्ट्रात राबवित असून त्यांच्या ह्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वखर्चाने गावोगाव फिरुन तेथील शाळांमध्ये जाऊन सुंदर वळणदार अक्षर कसं काढावं यावर प्रात्यशिक्षकासह मार्गदर्शनपर व्याख्यान देत आहेत. आपल्या स्वत:च्या गावापासून सुरु झालेली चळवळ महाराष्ट्रातील जवळपास सर्वच गावांमध्ये राबवून महाराष्ट्राची सीमा ओलांडली असून मध्यप्रदेश, छत्तीसगड या द्विभाषिक राज्यांमध्ये देखील ही चळवळ पोहचविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ही चळवळ राबविण्याचा त्याचा मानस आहे. त्यांच्या हया उपक्रमाचे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील कौतुक केले आहे.
नाशिक येथील एच.पी.टी. महाविद्यालयात वृतपत्र विद्या या विषयी पदवी शिक्षण घेत असताना नाना लाभे यांच्याशी त्यांची भेट झाली. नाना लाभे यांची अक्षर सुधार चळवळ सर्वज्ञात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुळकर्णी यांनी पहिले स्वत:चे अक्षर सुधरविले. नंतर गुरुदक्षिणा म्हणून ह्या चळवळीसाठी स्वत:ला त्यांनी झोकून घेतले. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अक्षर सुधारण्याचा उपक्रम राबविला. जून 1998 ला जिल्हा परिषदेत केंद्र प्रमुखांच्या बैठकीत तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीधर साळुंखे यांना ह्या उपक्रमाविषयी माहिती त्यांनी दिली. शिक्षण विभागाच्या बैठकीतही त्यांनी उपस्थित केंद्र प्रमुखांना या उपक्रमाची माहिती देऊन सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी मुल्य शिक्षणाच्या तासाला सामूहिकपणे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खाजगी शाळेत जाऊन एक तास मार्गदर्शन करण्याची मुभा त्यांना मिळाली. त्यामुळे या शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर करण्यात ते यशस्वी झाले. या कार्यात त्यांना तत्कालिन शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखांची खूप मदत मिळाली. तेथूनच खरं तर त्यांच्या चळवळीला गती मिळाली.
अक्षर सुधार या चळवळी अंतर्गत कुळकर्णी यांनी 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यावर भर दिला आहे. कारण या वयातील विद्यार्थी जास्त अनुकरणक्षम, ग्रहणक्षम आणि संस्कारक्षम असतात. या वयात जर मुलांनी अक्षर सुधारण्यावर भर दिला तर ते जास्त परिणामकारक ठरु शकते. ही बाब चळवळ चालवितांना त्यांच्या निदर्शनास आली. या वयोगटातील अनेक मुलांचे पूर्वीचे हस्ताक्षर व त्यांच्या कार्यशाळेनंतर सुधारलेल्या अक्षरामध्ये लिहिलेली पत्रे ते भेट देणाऱ्याना आवर्जून दाखवितात. अक्षर सुधार कार्यशाळेत किशोर कुळकर्णी विद्यार्थ्यांसमोर शास्त्रोक्त पद्धतीने आपले मुद्दे मांडतात. आपलं अक्षर अत्यंत सुशोभीत, सुंदर दिसण्यासाठी त्यामध्ये कोणकोणते सुधार केले पाहिजेत म्हणजे वर्णातील मुख्य रेषा, ती सरळ काढावी, मोठी असावी, अक्षरातील उंची, अक्षरातील दोन वर्णाचे अतंर, वाक्यांमधील अंतर, जाडी, लेखणी कुठे ठेवावी, कागदावर कशी चालवावी, पेन चालविण्याची दिशा, लिहिण्याची गती, वळण कसे व कुठे थांबवावे या सर्व गोष्टीचे अगदी बारिक सारिक मुद्यांसह प्रात्यक्षिक करुन विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेचे निरसन करत कुळकर्णी योग्य मार्गदर्शन करतात. किशोर कुळकर्णी यांचा अक्षर सुधार उपक्रम हा खरोखर स्तुत्य आहे. तळमळ, चिकाटीने आणि निरपेक्ष भावनेने चालविलेला हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
लेखक - निलेश परदेशी,
चाळीसगांव
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 3/26/2020
महाराष्ट्र जलक्षेत्र प्रकल्पामध्ये जिल्हयांतर्गत, ...
ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या...
सुधारगृह विषयक माहिती.
बर्ट्रड रसेल यांच्या प्रेरणेने जागतिक सुरक्षा व न...