অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रजी साहित्य सन १५७८–१७००

१५७८–१७०० : इंग्रजी वाङ्‍मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असून त्याचे तीन प्रमुख कालखंड पडतात. पहिला 'रेनेसान्स' अथवा प्रबोधनाचा कालखंड (१५७८—१६२५). ह्या काळात  शेक्सपिअर (१५६४—१६१६) व  एडमंड स्पेन्सर (१५५२ ?–१५९९) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दुसरा कालखंड (१६२५–१६६०)  जॉन मिल्टन (१६०८–१६७४) या कवीचा. तिसरा कालखंड (१६६०–१७००) 'रेस्टोरेशन'चा अथवा राजसत्तेचा पुन:स्थापनेचा.  जॉन ड्रायडन (१६३१–१७००) हा ह्या कालखंडातील प्रमुख साहित्यिक.

ह्यांपैकी पहिले दोन कालखंड समान प्रवृत्ती व प्रेरणा घेऊन आलेले असून त्यांतील मिल्टनचा काळ ही प्रबोधनाच्या आंदोलनाची परिणती म्हणता येईल. तिसऱ्या कालखंडात मात्र स्वच्छंदतावादापेक्षा नव-अभिजाततावाद बळावलेला दिसतो आणि कल्पनेपेक्षा बौद्धिकतेकडे, पद्यापेक्षा गद्याकडे, अनिर्बंधतेपेक्षा नियंत्रणाकडे साहित्याने लक्ष पुरविलेले दिसते.

प्रबोधनाच्या प्रेरणा शोधण्यासाठी सु. १५० वर्षे मागे जावे लागेल व त्यात पुढील गोष्टींचा प्रामुख्याने निर्देश करावा लागेल: यूरोपियन पंडितांनी मानवतावादी भूमिकेवरून केलेला शिक्षणाचा प्रसार, ख्रिस्ती– ग्रीक संस्कृतिसंगम, त्यात मिसळलेला प्रांतिक, प्रादेशिक लोकवाङ्‍मयाचा प्रवाह, बायबलचे देशी भाषांतील अनुवाद, पोपच्या वर्चस्वाविरुद्ध झालेले बंड व त्यातून घडून आलेली धर्मसुधारणा; विज्ञानाला, प्रयोगनिष्ठेला, ऐहिकतेला आलेले महत्त्व; इंद्रियगोचर अनुभूती व त्यांवर आधारलेल्या शिल्प, चित्रकला यांसारख्या कलांना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती; व्यापारी व साहसी लोकांचे समाजातील वर्चस्व व व्यक्तिवादाचा उदय.

प्रबोधनाचे आंदोलन

प्रबोधनाचे आंदोलन यूरोपव्यापी होते व त्याने यूरोपीय जीवनाची सर्व अंगे व्यापून टाकली. त्याचा प्रादुर्भाव फ्रान्स, इटली, जर्मनी यांपेक्षा इंग्‍लंडमध्ये उशिरा व हळूहळू झाला व तो रूपण कलांपेक्षा काव्य-नाटक ह्या वाङ्‍मयप्रकारांत प्रामुख्याने झाला. नव्या युगाला पोषक अशा घटना जवळजवळ दोन शतकांपासून घडत होत्या; परंतु त्यांचा विस्मयचकित करणारा उद्रेक पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत (१५५८–१६०३) झाला. आठवा हेन्‍री (१५०९–१५४७) व एलिझाबेथ ह्या राज्यकर्त्यांच्या कारकीर्दींत राजाकडून व त्याच्या भोवतालच्या सरदारवर्गाकडून कलेला व कलावंतांना उत्तेजन आणि आश्रय मिळू लागला. पोपच्या धार्मिक अधिसत्तेचा राजसत्तेकडून पाडाव झाला व व्यक्तीच्या आत्मिक शक्तीवर आधारलेली धर्मसुधारणा घडून आली. युद्धक्षेत्रात स्पॅनिश आरमाराचा इंग्‍लंडकडून निःपात झाला (१५८८). ह्या साऱ्याचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय अस्मितेची व त्याबरोबरच व्यक्तीच्या प्रतिष्ठेची जाणीव. एक नवा जोम, नवी अशा, चैतन्य व्यक्तिमनात संचारले व त्यामुळे कवी, कथाकार, नाटककार व निबंधलेखक यांच्या साहित्यनिर्मितीला बहर आला.

मानवी मनाच्या, विचारभावनांच्या, कल्पनांच्या कक्षा रुंदावण्यास फ्रान्सिस ड्रेक, फ्रॉबिशर, रॅली, हॅक्‌लूट यांच्या सागरी साहसांची व नव्या भूभागांच्या शोधांची मदत झाली. मानवी जिज्ञासेला पुरेसे खाद्य मिळू लागले. स्वसामर्थ्याने व नव्या ज्ञानाने मानव विस्मयचकित झाला. त्याची प्रयोगशीलता आणि उपक्रमशीलता वाढली. वैचारिक क्षेत्रात विज्ञानाची कास  फ्रान्सिस बेकनसारख्यांनी (१५६१–१६२६) धरली. कोपर्निकस, गॅलिलीओ यांच्या ज्योतिषशास्त्रातील शोधांनी विश्वासंबंधीच्या जुन्या समजुतींना धक्का दिला. राजकारणात राजसत्तेला आणि धर्मकारणात कॅथलिक धर्मसत्तेला हादरे बसले व अखेर प्यूरिटन काळात लोकसत्ता स्थापन करण्याचा प्रयोग करण्यात आला. ह्या सर्व घडामोडींना साहित्याची फार मोठ्या प्रमाणात मदत झाली. साहित्याने समाजपरिवर्तनास मदत केली व समाजिक परिवर्तनामुळे साहित्यासही नवनवी दालने उघडता आली.

ह्या काळातील विपुल व विविध साहित्यनिर्मितीला पांडित्यपरंपरा व लोककला ह्यांचे मनोहर मिश्रण कारणीभूत झालेले दिसते. पंडितांनी ग्रीक व लॅटिन ग्रंथांच्या केलेल्या भाषांतरांनी कवी व लेखक यांनी स्फूर्ती मिळाली. ह्यात फिलीमन हॉलंडने (१५५२–१६३७) केलेली लिव्ही, प्लिनी व प्‍लूटार्क या ग्रंथकारांच्या ग्रंथांची व सर टॉमस नॉर्थने केलेली प्‍लूटार्कच्या ग्रंथांची भाषांतरे प्रमुख आहेत. अ‍ॅरिस्टॉटलच्या पॉलिटिक्सचेही भाषांतर झाले. फ्रेंच व इटालियनमधून बानदेल्लो, मॅकिआव्हेली व माँतेन यांच्या साहित्याचे अनुवाद केले गेले.  जॉर्ज चॅपमनने (१५५९ ?–१६३४ ?) होमरच्या महाकाव्यांचे भाषांतर केले. ह्या भाषांतरांतून गद्य-पद्य शैलींना नवे वळण मिळाले.

प्रबोधनाच्या पहिल्या कालखंडात राजाच्या आश्रयाने त्याच्या अवतीभोवती वावरणारा नवा खानदानी उमराव वर्ग महत्त्वाचा ठरला. त्याची सभ्यता आणि सुसंस्कृतता मोलाची ठरली. ह्या ‘जंटलमन’ची समाजमनातील प्रतिमा सुस्पष्ट झाली. हा धीरोदात्त, सुसंस्कृत, शालीन, कृतिशील नायक जसा विद्याभ्यासात व कलांत पारंगत; तसाच तो युद्धक्षेत्रातही प्रवीण. प्रियाराधनात तो जसा निष्णात; तसाच तो अमोघ वक्‍तृत्वाने जनमानस जिंकून घेणारा. एका बाजूने राजाशी व राजदरबाराशी त्याचे सख्य, तर दुसऱ्या बाजूने सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते. लोकजीवनाशी निगडित असल्याने ह्या काळातील वाङ्‍मयाचे नाते परंपरागत लोककलेशी अतूट राहिले. लोकांसाठी असलेल्या नाटकासारख्या साहित्यप्रकाराला भिन्नरुचींच्या प्रेक्षकांचे एकाच वेळी समाराधन करणे सहज शक्य झाले. नाटकांतून व्यक्तिगत संघर्ष व सामाजिक दर्जाची जाणीव ह्यांवर आधारलेल्या विषयांना महत्त्व आले. शहरी व दरबारी नागरिकतेला प्रतिष्ठा आली. तिचा सामान्यांच्या प्रबळ, दुर्दमनीय, बेबंद आशाआकांक्षांशी आलेला संघर्ष समाजात व साहित्यात महत्त्वाचा ठरला. जनसंमर्द व त्याचा नायकाशी संघर्ष अथवा सहकार्य यांवर श्रेष्ठ नाट्यकृती आधारल्या गेल्या. ह्या सर्व प्रेरणा स्वच्छंदतावादाला पोषक असल्या, तरी त्या बेबंद होऊ नयेत म्हणून त्यांना विवेकाचे नियंत्रण असावे, अशी जाणीवही दिसू लागली; म्हणून ह्या काळातील वाङ्‍मयात उत्स्फूर्ततेच्या जोडीला शिस्त व संयम असावा, असे प्रयत्‍न दिसतात व त्यांतून काही अंतर्विरोधही निर्माण झालेले दिसतात. मानवी बुद्धी ही निसर्गाची एक विकसित अवस्था. तिने परमेश्वरी सूत्राची परिपूर्ती करायची; पण ह्याबरोबरच निसर्गावर ताबा मिळविण्याची ईर्ष्याही धरायची, असा परस्परविरोध विचारक्षेत्रात व कलेत दिसू लागला. उदा., क्रिस्टोफर मार्लोची (१५६४–१५९३) नाटके.

ह्या काळात काव्याला मोठी प्रतिष्ठा लाभली. कवीसंबंधी परमादराची भावना निर्माण झाली. नवनव्या आशा व उर्मी प्रफुल्लित झाल्या. सर्वच क्षेत्रांत प्रयोगशीलता दिसत असल्याने ती भाषेच्या बाबतीतही दिसू लागली. तिचा आवेशपूर्ण आलंकारिक वक्‍तृत्वासाठी उपयोग झाला; तसेच तिची विविध अलंकृत-अनलंकृत, कृत्रिम वा अकृत्रिम, सरळ, सोपी अथवा अत्यंत क्लिष्ट अशी नाना रूपे गद्य-पद्यात दिसू लागली. भाषेचे स्वरूप निश्चित होऊ लागले; तिला नवनवे शब्द मिळाले. ह्या कालखंडातील साहित्यिक शब्दांच्या विलक्षण मोहिनीने भारावलेले दिसून येतात.

एलिझाबेथकालीन गद्य

एलिझाबेथकालीन गद्याची सुरुवात झाली ती जॉन लिली व  फिलिप सिडनी (१५५४–१५८६) यांच्या स्वच्छंदतावादी, अद्‌भुतरम्य ग्रंथांतून व अत्यंत आलंकारिक व कृत्रिम भाषेची आतषबाजी करणाऱ्या गद्यशैलीतून. हे गद्य पांडित्यप्रदर्शन करणारे, एका विशिष्ट दर्जाच्या ‘सभ्य’ नागरिकांची-विशेषत: उच्चवर्गीय, स्त्रियांची-करमणूक करण्यासाठी अवतीर्ण झाले. सिडनीच्या द आर्केडिया (१५९०) व लिलीच्या युफूस (२ भाग, १५७८, १५८०) ह्या स्वच्छंदतावादी, सुरस व चमत्कारिक कथांतून हे नादमय, तालबद्ध, चमत्कृतिपूर्ण गद्य वापरण्यात आले. युफूसमध्ये मायभूमीचे गोडवे अत्यंत आलंकारिक भाषेत गायले गेले असून त्यातील गद्यशैलीमुळे 'यूफिझम'( अतिरंजितशैली ) ही संज्ञा रूढ झाली. सिडनीच्या द आर्केडियामध्ये गोपकाव्याचा प्रभाव दिसतो. ह्यात अत्यंत गुंतागुंतीचे काव्यमय कथानक आहे. ह्या ग्रंथातील गद्यात भाषेचा मुक्त विलास आढळतो. तीत कृत्रिमता असली, तरी त्यामुळे भाषेचे सामर्थ्य अजमावता आले हे निश्चित.

सिडनी व लिली यांच्याप्रमाणेच  टॉमस लॉज (१५५८ ?–१६२५),  रॉबर्ट ग्रीन (१५६० ?–१५९२), टॉमस नॅश (१५६७–१६०१) ह्या नाटककारांनीही कथात्मक वाङ्‍मय लिहिले. त्यांचे आज महत्त्व ऐवढेच, की त्यांच्या कथांनी शेक्सपिअरला नाट्यविषय व कथानके पुरविली. नॅशने एक तऱ्हेचा सरळसोट वास्तववाद वाङ्‍मयता आणला व ठकसेनी पद्धतीची ‘पिकरेस्क’ कादंबरी स्पॅनिश वाङ्‍मयाच्या अनुकरणाने आणली.

प्रबोधनाच्या चळवळीतील विचारसंपदेत बेकनच्या अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ लर्निंग (१६०५) व नोव्हम ऑर्गनम (१६२०) ह्या ग्रंथांनी भर घातली. ह्या ग्रंथांतून त्याने निसर्गाचा अभ्यास करण्याची नवी विगमनपद्धती संशोधिली व आधुनिक विगमनदृष्टीचा पाया घातला. गद्यवाङ्‍मयप्रकारात त्याने एसेज (१६२५) लिहून नव्या स्फुट गद्यलेखनप्रकाराची भर घातली. बेकनचे हे निबंध व्यवहारात उपयोगी पडणारे उपदेश आहेत. त्यांना सुभाषितांचे स्वरूप असून व्यवहारकौशल्य व धूर्तता यांचा तो पाठपुरावा करतात. ह्या बाबतीत बेकनवर मॅकिआव्हेलीच्या कुटिल नातीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. बेकनच्या नीती व मूल्य यांविषयीच्या कल्पना व्यवहारवादी आहेत. त्याला अलंकारांची, प्रासांची व तालबद्धतेची हौस असली, तरी त्यांतून त्याची अर्थवाही सघनता लोपलेली नाही. बेकनच्या निबंधांमुळे इंग्रजी गद्यशैलीने एक मोठा पल्ला गाठला.

बेकनप्रमाणेच वॉल्टर रॅलीचा (१५५२ ?–१६१८) हिस्टरी ऑफ द वर्ल्ड (१६१४),  रिचर्ड हॅक्‍लूटचे(१५५२ ?–१६१६) प्रिन्सिपल नॅव्हिगेशन्स (१५८९) ह्या ग्रंथांनी विविध स्वरूपाच्या अर्थवाही गद्यशैली रूढ केल्या. त्यांतून प्रबोधनातील इतिहासाभिमान, साहसप्रियता हे गुण वाढीला लागले.  रिचर्ड हूकरच्या (१५५४ ?–१६००) द लॉज ऑफ इक्‍लीझिअ‍ॅस्टिकल पॉलिटी  (५ खंड, १५९४–१५९७) ह्या ग्रंथात धार्मिक विषयांवरील प्रवचनवजा भाष्य आढळते. हे गद्य अधिक सोपे व सरल आहे. १६११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बायबलच्या नव्या कराराच्या अधिकृत भाषांतरामध्ये हेच गुणविशेष आढळतात. ह्या भाषांतराचा व विशेषत: त्यातील काव्यमय, परंतु अकृत्रिम, अर्थवाही, रसपूर्ण शैलीचा इंग्रजी गद्यशैलीवर दीर्घकाळापर्यंत प्रभाव पडला.

टीकावाङ्‍मय

ह्याशिवाय टीकावाङ्‍मयात सिडनीच्या द अपॉलजी फॉर पोएट्री (१५९५), विल्यम वेबच्या डिस्कोर्स ऑफ इंग्‍लिश पोएट्री (१५८६), जॉर्ज पटनअ‍ॅमच्याआर्ट ऑफ इंग्‍लिश पोएझी (१५८९) ह्या ग्रंथांनी मोलाची भर घातली व टीकाशास्त्रातील परिभाषा रूढ करण्यास मदत केली. ऑर्ट ऑफ इंग्‍लिश पोएझी  हा ग्रंथ काहींच्या मते जॉर्जचा भाऊ रिचर्ड पटनअ‍ॅम ह्याने रचिला.

एलिझाबेथकालीन काव्य

एलिझाबेथकालीन काव्य व नाटक ह्या इंग्रजी वाङ्‍मयाला लाभलेल्या अजोड देणग्या आहेत. दोन्हींची विविधता, विपुलता, सूक्ष्मता, प्रयोगनिष्ठा व निर्भेळ कलागुण विस्मयकारी आहेत. जगातील बहुतेक सर्व प्रमुख भाषांवर व साहित्यावर त्यांचा प्रभाव पडला आहे. अगदी आधुनिक काळातही त्यांतील कोठली तरी प्रवृत्ती, प्रवाह वा कलाप्रकार अनुकरणीय वाटत आहेत.

टॉमस वायट आणि हेन्‍री हॉवर्ड सरी यांनी इटलीमधून प्रबोधनपूर्व काळातच आणलेला सुनीत हा काव्यप्रकार फिलिप सिडनी याने समर्थपणे अस्ट्रोफेल अँड स्टेला (१५९१) ह्या सुनीतमालेत वापरला. सिडनी हा भाषेचे व काव्यरचनेचे नवनवे प्रयोग करणारा ह्या काळातील पहिला प्रभावी कवी. त्याला भाषेच्या आतषबाजीची फार हौस. स्पेन्सरप्रमाणेच इटलीतील चित्रकला, मूर्तिकला व वास्तुशिल्प यांतील सौंदर्यकल्पनांचा त्याच्या काव्यावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे त्याला एक तऱ्हेची सर्वसमावेशक सौंदर्यदृष्टी आलेली दिसते. पारंपरिक रूपकपद्धती व नीतिकल्पना, बोधवादी वृत्ती, उच्च महत्त्वाकांक्षा, लोकरंजनप्रकारांपासून घेतलेली स्फूर्ती आणि अभिजात परंपरेतील तंत्र व काव्यपद्धती ह्या गोष्टी सॅम्युएल डॅन्यल (१५६२–१६१९) व मायकेल ड्रेटन (१५६३–१६३१) ह्या कवींप्रमाणेच एडमंड स्पेन्सर ह्या प्रातिनिधिक कवीमध्ये अधिक प्रकर्षाने दिसतात.

स्पेन्सरने साध्या गोपकाव्यापासून (शेपर्ड्‌स कॅलेंडर, १५७९) रूपकात्मक महाकाव्यसदृश रचनेपर्यंत (फेअरी क्‍वीन, ६ खंड-१५९०; १५९६) अनेक काव्यप्रकार हाताळले. त्याने भाषेला समर्थ व अर्थवाही केले. सौंदर्योपासना, इंद्रियगोचर अनुभूतींचे यथार्थ वा प्रतीकात्मक वर्णन, नैतिक भूमिकेवरून हाताळलेले काव्यविषय ह्यांमुळे स्पेन्सरला मोठी मान्यता मिळाली व कवींचा कवी म्हणून त्याची कीर्ती झाली. त्याने वापरलेली ९ ओळींची छंदोरचना, तीतील शब्दसंगीतामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून तिला ‘स्पेन्सरियन स्टँझा’ हे नाव प्राप्त झाले आहे. फेअरी क्‍वीनमधील मध्ययुगीन नैतिक भूमिका (१२ नैतिक गुणांची प्रतीके असलेली १२ सरदारांची पात्रे इ.) व विषय आज रुचण्यासारखे नसले, तरी सौंदर्यदृष्टी व शब्दसंगीत हे स्पेन्सरचे गुण लक्षणीय आहेत.

एलिझाबेथकालीन काव्यात उत्तान प्रणयाला महत्त्व देणारे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यात क्रिस्टोफर मार्लोचा हीरो अँड लिअँडर (१५९३) व शेक्सपिअरचे व्हीनस अँड अडोनिस (१५९३) आणि रेप ऑफ ल्यूक्रीझ (१५९४) हे महत्त्वाचे आहेत. ह्या काव्यविषयांना इटलीमध्ये प्रतिष्ठा मिळाली होती. तथापि मार्लो व शेक्सपिअर यांनी त्यात सुगम रचना, नादमाधुर्य व विशुद्ध सौंदर्यभावना यांची भर टाकली.

ह्या कालखंडातील उत्कृष्ट प्रेमकाव्यात शेक्सपिअरची सुनीते प्रामुख्याने उल्लेखनीय  आहेत. त्यांतील आत्मचरित्रात्मक ध्वनी आणि आशयाभिव्यक्तीची एकात्मता वैशिष्ट्यपूर्ण आहे.

ह्या काळातील गीतेही उल्लेखनीय  आहेत. ती प्रामुख्याने प्रणयभावनेवर आधारलेली असून ह्या भावनेच्या अनेकविध छटा त्यांत आढळतात. भावनेची उत्कटता व नादमाधुर्य ह्यांमुळे ह्या गीतांची अवीट गोडी व ताजेपणा आजही टिकून आहे. शेक्सपिअर,  बेन जॉन्सन (१५७२–१६३७) ह्यांच्याबरोबर अनेक लहानमोठ्या कवींनी व नाटककारांनी ती नाटकात वा स्वतंत्रपणे रचली व ‘गाणाऱ्या पक्ष्यांचे घरटे’ हा इंग्‍लंडचा लौकिक सार्थ केला.

स्पेन्सरच्या संप्रदायातील काव्यात आढळून येणारा नादमाधुर्याचा सोस, काव्यरचनेत व कल्पनांत आलेला तोचतोपणा ह्यांविरुद्ध  जॉन डन (१५७२–१६३१) ह्या कवीने केलेले बंड उल्लेखनीय आहे. डन हा प्रखर बुद्धिवादी. भावनांच्या हळुवारपणापेक्षा त्यांतील चमत्कृती त्याला अधिक मोहित करते. एका बेडर वृत्तीने तो परस्परविरोधी आणि विस्मयजनक चमत्कृती निर्माण करतो. भौतिक वर्णनांपासून अतिभौतिक सूक्ष्मतेकडे ह्या कवीने टाकलेली झेप मोठी आहे. ह्या काव्याला ‘मेटॅफिजिकल’ (मीमांसक काव्य) हे नाव प्राप्त झाले. त्यातील वक्रोक्ती; परस्परविरोधी भावना, कल्पना आणि रूपके एकत्र आणण्याची पद्धती व एक तऱ्हेची अर्थवाही चमत्कृती टी. एस्. एलियटसारख्या आधुनिक कवींनाही प्रभावित करू शकली. अत्यंत वेगळ्या, अनन्यसाधारण अनुभूती हा कवी संक्रमित करू पाहतो. त्यामुळे त्याची कविता काही वेळेस क्लिष्ट, अनाकलनीय ठरत असली, तरीही तीत एक आगळे माधुर्य जाणवते.

एलिझाबेथकालीन नाट्यवाङ्‍मय :

एलिझाबेथकालीन नाट्यवाङ्‍मय वैपुल्य, विविधता, प्रयोगशीलता व निखळ कलागुण ह्यांनी समृद्ध आहे. ह्या काळातील काव्य वैभवशाली असले आणि गद्यशैली वैविध्यपूर्ण व तत्त्वचिंतनपर असली, तरी ह्या सर्वांचा मुक्त विलास नाट्यात आढळतो. नाट्य हेच ह्या काळाचे माध्यम होते, असे म्हणावे लागेल. नाट्याची सुरुवात रोमन नाटककार सेनीका याच्या अभिजात, रक्तपाताला व भीषणतेला महत्त्व देणाऱ्या, वक्‍तृत्व आणि ओज हे गुण प्रामुख्याने असणाऱ्या नाटकांनी प्रभावित झाली असली, तरी अखेर शेक्सपिअरच्या स्वच्छंदतावादी नाट्याने वैभवाचे शिखर गाठले. नव-अभिजाततावादी नाटककारांत बेन जॉन्सन ह्या प्रभावी नाटककाराचा समावेश करावा लागेल.

नाट्यकृतींचा पाया विद्यापीठातील अभिजातविद्याविभूषित अशा तरुण नाटककारांच्या एका समूहाने घातला. ‘युनिव्हर्सिटी विट्स’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ह्या नाटककारांमध्ये टॉमस किड, ⇨ जॉर्ज पील (१५५८ ?–१५९७ ?), टॉमस लॉज, रॉबर्ट ग्रीन, क्रिस्टोफर मार्लो आणि टॉमस नॅश हे नाटककार आहेत. १५८० पासून १६६२ पर्यंत अनेक नाटके निर्माण झाली. त्यांची विपुलता व विविधता विस्मयकारक आहे.  टॉमस हेवुडसारख्या (मृ. १६५० ?) नाटककाराने २२० नाटके लिहिली. ह्यांपैकी फारच थोडी आज उपलब्ध आहेत. नाट्यकलेचा पाया धंदेवाईक नाटकमंडळ्या स्थापन झाल्यावर अधिक मजबूत झाला. १५७६ मध्ये लंडनमध्ये पहिले नाट्यगृह स्थापन झाले व १६०० पर्यंत एकूण आठ नाट्यगृहे निर्माण झाली. ही आकाराने लहान असून ह्यांत नेपथ्य फारसे नसे व त्याची जागा प्रतीकात्मक वर्णनाने व अभिनयाने भरून काढली जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत.

अत्यंत साध्या रंगमंचावर इतर कोठलीही रंगसाधने नसल्याने नटाचा अभिनय व त्याची भाषणे यांना महत्त्व आले. अनेक भाषणे स्वगतपर व्याख्यानांच्या स्वरूपाची असत. नट लोकप्रिय असले, तरी समाजात प्रतिष्ठित मानले जात नसत. आरंभी त्यांना राजदरबारचा, सरदारांचा आश्रय होता; परंतु पुढे त्यांनी स्वत: आपल्या व्यावसायिक नाटकमंडळ्या स्थापन केल्या, स्वत: नाटके लिहिली व उत्तरकाळात नाट्यव्यवसायाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

नाटकांचा प्रेक्षकवर्ग अत्यंत संमिश्र व विविध थरांतील होता. नाटक हे त्याच्या बुद्धीला, विचाराला, भावनेला व कल्पनेला खाद्य पुरविणारे एकमेव साधन होते. त्यामुळे त्यात एका बाजूला कमालीची सूक्ष्मता, भावनाभिव्यक्तीचे बारकावे, विचारांची भव्य झेप असे; तर दुसऱ्या बाजूला अत्यंत भडकपणा, ओबडधोबडपणा, ढोबळपणा आणि ग्राम्यता असे. ह्या दोन्ही टोकांचा तोल साधण्यात शेक्सपिअरसारख्या श्रेष्ठ नाटककारांनी यश मिळविले, ही गोष्ट उल्लेखनीय आहे.

‘युनिव्हर्सिटी विट्स’ ह्या समूहातील नाटककारांची नाटके आज केवळ इतिहासजमा झाली असली, तरी त्यांपैकी प्रत्येकाकडून शेक्सपिअरने नाट्य-भाषा-काव्य-कलागुण ह्यांपैकी काहीना काही स्वीकारले आहे. क्रिस्टोफर मार्लोच्या नाटकांतून प्रबोधनाच्या काळात मानवाला झालेली स्वसामर्थ्याची जाणीव व्यक्त होते. धर्मकल्पना, रूढ नीतिनियम, बंधने ह्यांना त्याने आपल्या नाट्यकृतींच्या द्वारे दिलेली आव्हाने त्याच्या टॅम्बरलेन, ज्यू ऑफ माल्टा, एडवर्ड द सेकंड, डॉ. फॉस्टस ह्या प्रभावी पात्रांच्या द्वारा प्रकट होतात. त्याच्या नाटकांत कल्पनांच्या भरारीबरोबरच भावनेची सूक्ष्मताही आढळते. मार्लोच्या नाट्यकृतींचा शेक्सपिअरवर मोठा प्रभाव होता.

एलिझाबेथकालीन नाट्यक्षेत्रातील एक वैभवशाली घटना म्हणजे विल्यम शेक्सपिअरची नाटके. जगात अशी एकही प्रगत भाषा नाही, की ज्या भाषेच्या नाट्यसृष्टीवर शेक्सपिअरच्या नाटकांचा प्रभाव पडलेला नाही. शेक्सपिअरच्या नाट्यलेखनाचे १५९२ ते १६०१, १६०१ ते १६०८ आणि १६०८ ते १६१६ असे तीन कालखंड पडतात. ह्या तीन कालखंडांत त्याच्या मनोवस्थेची काही वैशिष्ट्ये दिसून येतात. स्थूलमानाने पाहता पहिल्या कालखंडात त्याची वृत्ती आनंदी आणि खेळकर दिसते, तर दुसऱ्या कालखंडात ती गंभीर झाल्याचे जाणवते आणि जीवनातल्या दुःखाची आणि अपेक्षाभंगाची त्याला तीव्र जाणीव झालेली दिसते. त्याच्या चारही श्रेष्ठ शोकात्मिका ह्याच कालखडातील आहेत. तिसऱ्या कालखंडात चिंतनशीलता आणि गूढ अद्‌भुतरम्यता ह्यांचा प्रभाव दिसतो. ह्या तीन कालखंडांतील नाटकांत काही सुखात्मिका आणि काही शोकात्मिका असून काही शोक-सुखात्मिका आहेत. त्या नाटकांत भावनांचा, भावावस्थांचा, तात्त्विक विचारांचा व चिंतनाचा परिपाक आहे. शेक्सपिअरने प्रचलित नाट्यप्रकारात वापरले व रूढ कथानके हाताळली. तथापि प्रचलिताला आणि अल्पजीवी व आकस्मिक घटिताला चिरस्थायी, मनोज्ञ कलारूप देण्यात यश मिळविले. त्याच्या नाटकांत मानवी जीवनातील सौंदर्य, गूढता, रम्य-भीषणता आणि त्यातील अतर्क्य कोडी मांडण्याचे सामर्थ्य दिसते; तसेच विनोद, काव्यात्मता व कारुण्य ह्यांचा आविष्कारही तो आपल्या नाटकांतून प्रभावीपणे करतो. समकालीनांच्या दोषांपासून, आलंकारिक भाषेच्या हव्यासापासून ही नाटके अलिप्त नाहीत; परंतु त्याच्या काही नाटकांत– विशेषत: हॅम्‍लेट, मॅक्‌बेथ, किंग लीअर, ऑथेल्लो  ह्या शोकात्मिकांत– इतके श्रेष्ठ वाङ्‍मयीन गुण एकवटलेले आहेत, की त्यांना जोड नाही.

शेक्सपिअरच्या समकालीनांपैकी बेन जॉन्सनने नव-अभिजाततावादी, तंत्रबद्ध, रेखीव रचना असणारी नाटके लिहिली. त्याची एव्हरी मॅन इन हिज ह्यूमर (१५९८), व्हॉलोपन ऑर द फॉक्स (१६०७), एपिसीन  किंवा द सायलेंट वूमन (१६०९), बार्‌थॉलोम्यू फेअर (१६१४), द अल्केमिस्ट (१६१२) ही नाटके मुख्यतः स्वभावातील तऱ्हेवाईकपणावर आणि एकांगीपणावर भर देणारी आहेत. 'कॉमेडी ऑफ मॅनर्स' किंवा आचारविनोदिनी ह्या नाट्यप्रकाराचा प्रणेता म्हणून जॉन्सनला नाट्येतिहासात अढळ स्थान आहे.

बेन जॉन्सननंतर जॉन वेब्स्टरसारख्या (१५८० ?–१६२५ ?) नाटककाराने द व्हाइट डेव्हिल (१६१२), द डचेस ऑफ माल्फी (१६२३) ही नाट्यगुणांनी श्रेष्ठ, परंतु खून व रक्तपात यांनी रंगलेली नाटके लिहिली, तर  फ्रान्सिस बोमंट (१५८४–१६१६),  जॉन फ्‍लेचर (१५७९–१६२५),  फिलिप मॅसिंजर (१५८३–१६४०), जॉन फोर्ड (१५८६–१६४० ?),  जेम्स शर्ली (१५९६–१६६६) यांच्या नाटकांतही काही कलागुण आढळतात. तथापि ह्या पुढल्या काळात एकंदरीने नाट्यनिर्मितीचा बहर ओसरून नाट्यकलेला उतरती कळा लागलेली दिसते.

लेखक : म. कृ. नाईक

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate